वैज्ञानिक विकास, भ्रष्ट राज्यकर्ते आणि पाश्चात्त्य विचारवंत यांच्यामुळे ढासळलेल्या पृथ्वीच्या असमतोलावर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच उपाय ! – प.पू. दास महाराज

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनानिमित्त संतसंदेश !

प.पू. दास महाराज

१. वैज्ञानिक विकासाने झपाटलेल्या
मानवजातीमुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येणे

‘विश्वरचनेचा सिद्धांत मांडणार्या डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी ’मानवजातीसाठी पृथ्वीवरील हे शेवटचे शतक ठरेल’, असे भाकीत नुकतेच वर्तवले आहे. साधारण ९ वर्षांपूर्वी ‘जागतिक तापमान वाढ’ या विषयावर बोलतांना त्यांनी हेच मत मांडले होते. ‘पृथ्वीच्या, म्हणजेच निसर्गनियमांच्या विरुद्ध जाऊन माणसाने स्वत:ची जीवनशैली बनवली आहे. वैज्ञानिक विकासाने झपाटलेल्या मानवजातीमुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे. विज्ञानाने विकास केल्याची अंधश्रद्धा त्याच्यात निर्माण झाली आहे. ही अंधश्रद्धा नष्ट करून माणसाने पुन्हा नैसर्गिक संरचनेत जाऊन त्याप्रमाणे आचरण केले नाही, तर विनाशकाळ दूर नाही’, असे भाकीत डॉ. हॉकिंग यांनी मांडले आहे.

२. डॉ. हॉकिंग यांनी विज्ञानाचे माजवले जाणारे स्तोम थांबवण्याची सूचना केली असणे

डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी जे मत मांडले आहे, ते संपूर्ण मानवजातीला अंतर्मुख करायला लावणारे आहे. विशेषत: हिंदु संस्कृतीला रानटी आणि जंगली म्हणून हिणवणार्या (अंध)बुद्धीवाद्यांना चपराक आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगण्याच्या मोहिमा राबवणार्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे मत आहे; पण अहंकाराने बरबटलेल्या आणि घोर अंधश्रद्धेत वावरणार्या या विज्ञानवाद्यांना डॉ. हॉकिंग यांचे मत स्वीकारायला काहीसे जड जाणारे आहे; कारण डॉ. हॉकिंग यांनी विज्ञानाचे माजवले जाणारे स्तोम थांबवण्याची सूचना केली आहे. डॉ. हॉकिंग यांचे भाग्य चांगले की, ते भारतात नाहीत, नाहीतर जसे देवाचे अस्तित्व मानणारे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना अंनिससारख्या संघटनांनी वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न डॉ. हॉकिंग यांच्याविषयीही केला असता.

३. निसर्गाला देव मानणार्या हिंदु संस्कृतीला हिणवणार्या पाश्चात्त्य
विचारवंतांना डॉ. हॉकिंग यांनी ‘निसर्गदेवांना शरण जा’, असा संदेश दिला असणे

पाश्चात्त्य विचारवंतांनी आतापर्यंत नेहमीच निसर्गाला देव मानणार्या हिंदु संस्कृतीला हिणवले. तिची ‘चंद्र, सूर्य, धरणीमाता, नाग, वारूळ, गाय, वटवृक्ष आदींची पूजा करणारी रानटी संस्कृती’ अशी हेटाळणी केली. आज याच निसर्गदेवांना शरण जाण्याचा संदेश डॉ. हॉकिंग यांनी दिला आहे, म्हणजे डॉ. हॉकिंग हे प्रामाणिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांना विज्ञानाचे धोके स्पष्टपणे दिसले आहेत. विज्ञानाच्या बुरख्याखाली लपलेला विनाश त्यांना दिसला आहे. त्यांनी आता ‘निसर्गरचनेला धरून विज्ञानाचा विकास नसेल, तर संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश निश्चित आहे’, हे ओळखले आहे. जी गोष्ट अत्यंत प्राचीन काळी ऋषीमुनींनी ओळखली, ती आता शास्त्रज्ञांना किंचितशी समजू लागली आहे. आमच्या ऋषीमुनींनी वेदांमध्ये ‘निसर्गदेवो भव ।’ का म्हटले, हे उशिरा का होईना; पण सत्यनिष्ठ वैज्ञानिकांना आता समजू लागले आहे.

४. प्राचीन ऋषीमुनींनी ‘पंचमहाभूते जितकी निर्मळ,
स्वच्छ आणि प्रदूषणविरहीत असतील; तितकी जीवसृष्टी
सुखी, निरोगी अन् दीर्घकाळ सुदृढ राहील’, हा विचार करून
त्यांनी निसर्गदेवांना संतुष्ट करण्याचे तंत्र शोधून काढलेले असणे

निसर्ग म्हणजे पंचमहाभूतांचे साकार, स्थूल रूप ! याच निसर्गातून मानवाची निर्मिती झाली. त्याच्यावरच तो जगतो आणि शेवटी त्याच्यातच विसर्जित होतो; म्हणून पंचमहाभूते जितकी निर्मळ, स्वच्छ, प्रदूषणविरहीत असतील; तितकी जीवसृष्टी सुखी, निरोगी आणि दीर्घकाळ सुदृढ राहील. हाच विचार करून निसर्गदेवांना संतुष्ट करण्याचे तंत्र प्राचीन ऋषीमुनींनी शोधून काढले आणि वेदांच्या माध्यमातून ते संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध करून दिले. याच वैदिक संस्कृतीचे रक्षण करणे, ही काळाची निकड बनली आहे. ही संस्कृती जीवसृष्टीला विनाशापासून वाचवू शकते. या संस्कृतीच्या विरुद्ध आचरण करणे, म्हणजे समष्टीला धोक्यात आणण्यासारखे आहे.

५. ‘विज्ञानाच्या अती वापराने निसर्गाची हानी होऊन पंचमहाभूते प्रदूषित होत असली,
तरीही माणूस विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचत आहे’, यासारखी दुसरी अंधश्रद्धा नसणे

आपण सर्वांनी बारकाईने विचार केला, तर ही गोष्ट स्पष्टपणे जाणवेल. पृथ्वीवर म्हणजे भूमीवर रासायनिक खते आणि औषधे वापरली, तर तिची सुपिकता नष्ट होते अन् अन्नाची चव बिघडते. तसेच रासायनिक भाजीपाला खाल्याने विविध रोग जडतात.  औद्योगिक वसाहतीतील रसायने नद्यांमध्ये सोडल्याने पाणी, म्हणजे आपतत्त्व प्रदूषित होते. अशा दूषित पाण्यातून विविध रोग जडतात. तेज म्हणजे सूर्याची अतीनील किरणे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केल्याने वायू आणि तेज ही दोन्ही तत्त्वे दूषित होतात. यातून निरनिराळे रोग जडतात. तसेच ‘हे रोग ठीक करण्यासाठी वापरली जाणारी वैज्ञानिक औषधे नवे रोग निर्माण करतात, तरीही माणूस विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचत आहे’, यासारखी दुसरी अंधश्रद्धा नाही.

६. संपूर्ण जीवसृष्टीला वाचवण्यासाठी समस्त मानवजातीने वैदिक
धर्माप्रमाणे आचरण करणे अत्यंत आवश्यक असणे आणि त्यासाठी
निधर्मी राज्यप्रणाली पालटून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य असणे

यावर उपाय म्हणून समाजाला वैदिक धर्माचे शिक्षण देणे आणि वैदिक धर्माला अनुसरून समाजरचना करणे या दोन गोष्टी नितांत आवश्यक आहेत. याचा आरंभ भारतातून होणे अपेक्षित आहे. विद्यमान स्थितीत ही गोष्ट साध्य होणे शक्य नाही; कारण भारताला दुष्प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी निधर्मी राज्यप्रणालीच्या दावणीला बांधले आहे. त्यामुळे निधर्मी राज्यप्रणाली म्हणजे अधर्मी राज्यप्रणाली पालटणे आवश्यक ठरते.

७. निधर्मी (अधर्मी) लोकशाहीमुळे निर्माण झालेल्या दुष्टचक्रातून भारतासह
समस्त मानवजातीला वाचवण्याचे दायित्व हिंदुत्वनिष्ठच निभावू शकणे

७ अ. संसदेत जनतेचे प्रश्नव सोडवण्यापेक्षा निवळ आरडाओरड,
गदारोळ आणि हाणामारी होत असल्याने ती ‘अयोग्य अधिवेशने’ ठरणे

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीने रामनाथी येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू केले. यंदाचे हे सहावे अधिवेशन आहे. हे अधिवेशन आणि विधानसभा किंवा संसदेत होणारी शासकीय अधिवेशने यांच्यातील भेद तुमच्या लक्षात आलाच असेल ! संसदेत असलेल्या खासदारांपैकी कित्येेकांवर खून, बलात्कार आणि आर्थिक घोटाळे यांचे आरोप आहेत. असे गुंड प्रवृत्तीचे आपला देश चालवत आहेत ! अशा राजकारण्यांकडून कधीतरी जनहिताची अपेक्षा करता येईल का ? याच कारणामुळे देशातील समस्या सुटण्यापेक्षा त्या अधिक गुंतागुंतीच्या बनल्या आहेत. या शासनकर्त्यांमध्ये जनतेला सुख प्रदान करण्याचा विचार राहिलेला नाही; म्हणून संसदेत जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा निवळ आरडाओरड, गदारोळ आणि हाणामारी होत असल्याचे आढळते. त्यामुळे त्या अधिवेशनांना ‘अयोग्य अधिवेशन’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

७ आ. भारतमातेला वाचवण्यासाठी दुष्प्रवृत्तीचे
निर्मूलन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे क्रमप्राप्त असणे

आज देशात महिला सुरक्षित नाहीत. साधारण २० वर्षांपूर्वी एकटी महिला रस्त्यावरून जाऊ शकत नव्हती; पण न्यूनतम घरात तरी सुरक्षित होती. आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. आता स्वतःच्या घरातही लहान मुली किंवा वृद्ध स्त्रिया सुरक्षित नाहीत. लहान मुली म्हणजे कुमारिका शक्ती आहे. त्यांच्यावर वासनांध नराधम बलात्कार करत आहेत. हा एकप्रकारे भारतमातेवरीलच बलात्कार आहे; म्हणूनच भारतमातेला वाचवण्यासाठी दुष्प्रवृत्तीचे निर्मूलन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे क्रमप्राप्त होते.

७ इ. भ्रष्टाचार आणि लाचलुचपत यांतून भारतासह समस्त
मानवजातीला वाचवण्याचे दायित्व आता हिंदुत्वनिष्ठांवर येऊन ठेपलेले असणे

गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे मोदी शासन सत्तेत आहे, तरीही देशातील बिकट परिस्थिती पालटलेली नाही. प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्च पदस्थ अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठी जनतेकडून लाच घेतली जाते. व्यापारी ग्राहकांना लुटत आहेत. एका बाजूने शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसर्या बाजूने बळीराजा स्वतःच पिकवलेल्या धान्याची नासाडी करून सामान्य नागरिकांना उपाशी मारण्यासाठी सिद्ध झाला आहे. या सर्व दुष्टचक्रातून भारतासह समस्त मानवजातीला वाचवण्याचे दायित्व आता आपल्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांवर येऊन ठेपले आहे.

८. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होणार्या पुण्यवान
जिवांनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीयपणे कार्यरत व्हा !

८ अ. श्रीमन्नारायणाच्या या अवताराचे धर्मसंस्थापनेचे कार्य आता चालू झाले असणे आणि
त्याच्या संकल्पाने होत असलेल्या या अधिवेशनात सहभागी होणारे जीव महान आणि पुण्यवान जीव असणे

गेल्या पाच वर्षांपासून आपण सर्व हिंदु धर्माचे सेनापती एकत्र येऊन रामनाथी येथे अधिवेशन भरवत आहोत. हे अधिवेशन साधेसुधे नाही; कारण हे दैवी अधिवेशन आहे. साक्षात् श्रीमन्नारायण अवताराच्या संकल्पाने हे अधिवेशन होत आहे. ज्या चळवळीला भगवंताचे अधिष्ठान लाभते, ती निश्चित यशस्वी होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचा अवतार असल्याचे त्रेतायुगातील महर्षि वसिष्ठ आदी सप्तऋषींनी आधीच जाणले होते. त्याचे वर्णन त्यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये लिहून ठेवले आहे. या नाडीपट्टीचे वाचन नुकतेच त्यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनी करण्यात आले. त्यामुळे नारायणाच्या या अवताराचे धर्मसंस्थापनेचे कार्य आता चालू झाले आहे. त्यांच्या संकल्पाने होत असलेल्या या अधिवेशनात आपण सर्व जण सहभागी होत आहोत. यातूनच ‘आपण महान आणि पुण्यवान जीव आहात’, हे स्पष्ट होते. या कार्यासाठी ईश्वराने तुमची निवड केल्याने निश्चितच तुमची श्रेष्ठता सिद्ध करते.

८ आ. गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला सूक्ष्मातून आरंभ
केल्याने हिंदुत्वनिष्ठांनी आता स्थुलातून सक्रीयपणे कार्य करायला हवे !

आता गुरुदेवांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गतीमान करण्याची वेळ जवळ आली आहे. त्यांनी सूक्ष्मातून त्यांच्या कार्याला आरंभ केला आहे. त्यामुळे आपण हिंदुत्वनिष्ठांनी आता स्थुलातून सक्रीयपणे कार्य करायला हवे.

१. ज्याप्रमाणे हिंदु जनजागृती समिती वर्षातून एकदा अधिवेशन घेते, त्याप्रमाणे अधिवेशनात येणार्या प्रत्येक प्रतिनिधीने स्थानिक पातळीवर अशा अधिवेशनाचा आरंभ करावा.

२. प्रत्येक हिंदु मंदिरामध्ये धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत. त्यातून वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू करायला हवा.

३. हिंदूंच्या प्रत्येक उत्सवात, देवतांच्या जत्रांमध्ये किंवा वार्षिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक भक्तापर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी भगवंताला प्रार्थना करून यंदाच्या अधिवेशनात एक निश्चित कार्यक्रम ठरवून कार्याला आरंभ करा.

८ इ. प्रार्थना

आपल्या कार्याला श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव यश देवो’, हीच त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.६.२०१७)