हिंदुत्वनिष्ठ संघटनांनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करा ! – पू. नंदकुमार जाधव, धर्मप्रसारसेवक, सनातन संस्था

पू. नंदकुमार जाधव

संघटित असण्याचे महत्त्व अगदी प्राथमिक शाळेपासून सांगितले जाते. लाकडाची १ काठी तोडता येते; मात्र १० – १२ काठ्यांची मोळी तोडता येत नाही, या गोष्टीपासून हा प्रारंभ होतो. अगदी महाभारतकाळी पांडव वनवासात असतांना चित्रसेन गंधर्वने कौरवांना पराजित करून बंदी केले. हा संदेश मिळाल्यावर धर्मराज युधिष्ठिर पांडवांना चित्रसेन गंधर्वाशी लढण्याची आज्ञा करतांना ‘वयं पंचाधिकं शतम् ।’ म्हणजे शत्रूच्या विरोधात ‘आम्ही एकशे पाच’, आहोत, असा संदेश देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही एकेका मावळ्याचे संघटन उभारून हिंदवी स्वराज्य साकार केल्याचा इतिहास आपण विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक जण हिंदूंना संघटित होण्याचेच आव्हान करतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर ‘माझी मार्सेलिसची समुद्रातील उडी एक वेळ विसरलात तरी चालेल; मात्र माझे हिंदूसंघटनाचे कार्य विसरू नका’, असे म्हटले होते. त्यांच्या या उदाहरणातून धडा घेऊन आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी हिंदूऐक्याचा नवा इतिहास घडवायचा आहे.

१. संपूर्ण भारतातील हिंदूंचे संघटन करायचे आहे !

काही जणांना वाटेल, आता हिंदूंच्या लहान लहान शेकडो संघटना निर्माण होत असतांना हे कसे शक्य होईल ? या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे की, आज भिन्न विचारसरणींचे राजकीय पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. अशाच प्रकारे कामगारांच्या ‘युनियन’ बनतात. राजकीय पक्ष आणि ‘युनियन’वाले हे सत्ता, अधिकार इत्यादींसाठी, म्हणजे स्वार्थासाठी एकत्र येतात; मग हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान उद्देशाने हिंदुत्वनिष्ठ संघटना का एकत्र येऊ शकणार नाहीत ? निश्‍चित येऊ शकतील ! त्यासाठी आजपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रीकरणात येत असलेले अडथळे समजून घेऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे व्यापक संघटन व्हावे, यासाठी हिंदु संघटनांनी एकमेकांचे साहाय्य, अनुभवांची देवाणघेवाण, परस्परपूरक कार्य इत्यादी कृतींची जोड दिली, तर हे संघटन सहज साध्य होऊ शकेल !

धर्मप्रसारासाठी विविध राज्यांत प्रवास करतांना आम्ही अनुभवले की, एकाच शहरात गोरक्षण, ‘लव्ह जिहाद’ यांसाठी प्रयत्न करणारे अनेकजण आहेत; पण त्यांच्यामध्ये समन्वय नाही. या क्षेत्रात कार्य करणारे अधिवक्ताही आहेत; पण संघटनांना त्यांची ओळखही नाही. त्यामुळे आपल्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून केवळ आपले शहर, जिल्हा, राज्यच नव्हे, तर संपूर्ण भारतातील हिंदूंचे संघटन करायचे आहे.

२. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ
संघटनांनी एकत्रितपणे कार्य करण्याची दिशा !

२ अ. विचारवंत आणि प्रत्यक्ष कृती करणारे यांचे एकत्रित कार्य आवश्यक !

राष्ट्ररचनेत विचारवंतांची भूमिका एखाद्या सुकाणूसारखी असते. ज्याप्रमाणे सुकाणू जहाजाला दिशा देते, त्याप्रमाणे विचारवंत हे चळवळींना दिशा देण्याचे कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु विचारवंतांकडूनही असेच कार्य अपेक्षित आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यपुरुषाचे विचारवंत हे बुद्धी आहेत, तर प्रत्यक्ष कृती करणारे हिंदु संघटनांचे कार्यकर्ते हे हात आहेत. या दोन्ही घटकांनी एकत्रितपणे कार्य केल्यासच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे रचनात्मक कार्य उभे राहू शकते; म्हणून विचारवंत आणि प्रत्यक्ष कृती करणारे या दोन्ही घटकांनी एकमेकांचे विचार समजून घेऊन कृती करायला हवी.

२ आ. जहाल आणि मवाळ संघटनांनी परस्परांना पूरक कार्य करणे आवश्यक !

कार्य करतांना काही जणांना ते आक्रमकरित्या क्रांती करून करावे असे वाटते, तर काही जणांचा समाजाचे प्रबोधन करून शांतपणे ते करण्याचा मानस असतो. यामुळे प्रत्येक कार्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट कार्यरत असतात. या दोन्ही विचारांची कार्याला आवश्यकता असते; मात्र या दोन्ही गटांनी आपापल्या मतांचा आग्रह बाळगून दुसर्‍याच्या मताचे खंडन केल्यास त्यांच्यात मतभेद निर्माण होऊन फूट पडते आणि विरोधी पक्षालाच त्याचा लाभ होतो. यामुळे हा दुराग्रह सोडून संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळीही काँग्रेसमध्ये अशीच फूट पडल्याने चळवळीची ८ वर्षे वाया गेली. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा म्हणाले होते, ‘‘भारतभूला जहालवाद्यांमुळे स्वातंत्र्य मिळाले किंवा मवाळवाद्यांमुळे स्वातंत्र्य मिळाले, ही चर्चा गौण आहे. भारतभूला स्वातंत्र्य मिळावे, म्हणून ईश्‍वराला प्रार्थना करणार्‍या सश्रद्ध सर्वसामान्य भारतियांचाही स्वातंत्र्याच्या श्रेयात वाटा आहे.’’

‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात इतरांच्या सहभागावर टीका न करता, निरपेक्ष भावनेने कार्य करणारा प्रत्येक हिंदु हा आपला वाटायला हवा’, हे यातून आपल्याला शिकता येते.

२ इ. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे एकत्रित कार्य करणे अपेक्षित !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रत्यक्ष कार्य करतील, तेव्हा आध्यात्मिक संस्था त्या कार्याला आध्यात्मिक बळ पुरवतील. आध्यात्मिक बळाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी एक उदाहरण आपल्यासमोर मांडतो. राजस्थानमधील जैसलमेर येथून ३० कि.मी. अंतरावर तनोट मातेचे मंदिर आहे. सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानसह झालेल्या युद्धात पाक सैन्याने या मंदिरावर अनेक बाँब फेकले; पण एकही बाँब फुटला नाही. तेव्हापासून सीमा सुरक्षा दलही मोठ्या आस्थेने या मंदिराची व्यवस्था पहात आहे. धर्मरक्षणाचे कार्य करतांना आपले रक्षण व्हावे आणि कार्य यशस्वी व्हावे, यासाठी आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व या उदाहरणातून सहज लक्षात येईल. याकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये.

३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील विविध घटकांचे संघटन करा !

३ अ. विचारवंतांचे संघटन आणि त्याचे महत्त्व !

प्राचीन राजे-महाराजे यांच्या राजसभेत विद्वत्जनांना (विचारवंतांना) महत्त्वाचे स्थान होते. आर्य चाणक्य असो वा युधिष्ठिरालाही नीतीनियमांची आठवण करून देणारा विदुर, यांच्या रूपाने विचारवंतांनी किती उंचीवर राहून कार्य केले पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक घटनेकडे दूरदृष्टीने आणि पृथःकरणात्मक दृष्टीकोनातून पहाण्याचे आणि त्याचे समाजहिताच्या दृष्टीने विश्‍लेषण करण्याचे सामर्थ्य विचारवंतांमध्ये असते. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनाधार निर्माण करण्याचे कार्य ते प्रबोधनाद्वारे करू शकतात. प्रसिद्धीमाध्यमांतून हिंदु राष्ट्राची समर्पक बाजू मांडण्याचे कार्यही ते प्रभावीपणे करू शकतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक अशा अनेक घटनांत स्वतःकडील हे सामर्थ्य विचारवंतांनी उभे करावे, यासाठी आपल्याला त्यांचे संघटन करावे लागेल.

३ आ. संप्रदायांमधील निःस्वार्थी आणि अहंभावशून्य अनुयायांचे संघटन करा !

जगद्गुरु आद्यशंकराचार्यांनी अवैदिक मतांचे खंडण करण्यासाठी शांकरदिग्विजय केला अन् चार शांकरपिठे स्थापून सनातन धर्माची पुनर्रचना केली. चाणक्याने दुराचारी नंदवंशाचा नाश अन् सम्राट चंद्रगुप्ताच्या ध्वजाखाली भारताला एकसंध करून राष्ट्रसंस्थापना केली. जगभर हिंदु धर्माची नालस्ती केली जात असतांना स्वामी विवेकानंदांनी सातासमुद्रापार हिंदु धर्म पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. गुरुपरंपरेने धर्मसंस्थापनेसाठी दिलेले हे योगदान अपूर्व आहे. असे ईश्‍वरी बळप्राप्त संत आणि संप्रदाय यांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग असेल. त्यामुळे अशा संतांचे आणि सर्व संप्रदायांतील निःस्वार्थी अन् अहंभावशून्य अनुयायांचे संघटन आपल्याला करावे लागेल.

३ इ. सामाजिक संघटनांचे संघटन करा !

सध्या समाज भ्रष्ट शासकीय यंत्रणांच्या अन्यायामुळे पीडित आहे. त्याला या अन्यायाची जाणीव करून देऊन संघटित करणे आवश्यक आहे. जागृत समाजाच्या संघटित शक्तीच्या पुढे राजकारण्यांना हार मानावी लागते. भ्रष्टाचाराने पिडलेल्या जनतेने ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला संपूर्ण देशभरातून दिलेला पाठिंबा आपल्याला ज्ञातच आहे. त्यामुळे सध्याच्या भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात लढणार्‍या सामाजिक संघटना आणि व्यक्ती यांचे संघटन नितांत आवश्यक आहे. अनेकदा माहिती अधिकार कार्यकर्ते जीव संकटात टाकून भ्रष्टाचार्‍यांची माहिती गोळा करतात, अशांनाही आपण एकत्र केले पाहिजे. भ्रष्टाचार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी आंदोलने करणार्‍या देशभक्त सामाजिक संघटना आणि आदर्श हिंदु राष्ट्राचे ध्येय घेऊन कार्यरत हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नानेच देश भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यांतून मुक्त होऊ शकेल.

३ ई. अधिवक्त्यांचे संघटन करा !

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रभक्त विचारांच्या अनेक विद्वानांनी कायद्याचे शिक्षण घेऊन आपले बुद्धीकौशल्य पणाला लावले आणि इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला. एवढेच नव्हे, तर अनेकदा इंग्रजांना त्यांच्याच कायद्याच्या आधारे हरवले. आजही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात हिंदूंचे मनोबल वाढवण्यासाठी अधिवक्त्यांनी त्यांची संघटित शक्ती हिंदूंच्या मागे उभी केली, तर हिंदूंचे मनोबल निश्‍चित वाढेल आणि त्यांना वैधानिक मार्गांचा उपयोग करून धर्मरक्षण करणे शक्य होईल.

‘धर्महिताच्या गोष्टींसाठी शासन आणि प्रशासन यांवर दबाव टाकणे, ‘माहिती अधिकारा’च्या संदर्भात समाजात कार्यशाळेद्वारे जागृती करणे, सांप्रदायिक दंगलींसारख्या प्रकरणात निःशुल्क कायदेशीर साहाय्यता देणे, हिंदूंना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा या करता त्यांना मार्गदर्शन करणे’, यांसारख्या धर्मसेवांमध्ये अधिवक्त्यांचे साहाय्य होऊ शकते. अधिवक्त्यांच्या सहयोगाने मनोबल आणि धर्मबल वाढलेले हिंदूच पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील, यात शंका नाही. या उद्देशाने याच ठिकाणी झालेल्या प्रथम हिंदु अधिवेशनात ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ची स्थापना झाली आणि या परिषदेने अनेक प्रकरणात यश प्राप्त केले आहे. आपल्यालाही आपापल्या क्षेत्रांत अधिवक्त्यांचे संघटन करून त्यांना हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी करून घ्यायचे आहे.

३ उ. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे जागृती करणार्‍यांचे संघटन करा !

सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञान यांचे आहे. त्यानुसार प्रचाराचे तंत्रही पालटत आहे. सर्व युवकांकडे ‘स्मार्टफोन’ आले आहेत. ते आता स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी आणि आवडत्या विचारसरणीच्या प्रसारासाठी व्हॉटस् अप, फेसबूक, ट्वीटर आदी सामाजिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. इतकेच काय, सध्या राजकीय निवडणुकांतही सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आपणही या माध्यमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज अनेक युवक व्हॉटस्अप, फेसबूक, ट्वीटर आदी सामाजिक प्रसारमाध्यमांतून राष्ट्र आणि धर्म विरोधी घटनांना विरोध करत आहेत. अशा युवकांना जर आपण हिंदु राष्ट्राची दिशा देऊन संघटित केले, तर हिंदु राष्ट्राच्या विचारांचा प्रसार करणारी एक परिणामकारक शक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना पहायला मिळेल.

४. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय
स्तरावर एकत्र कार्य केल्याने होणारे लाभ

४ अ. ज्ञान आणि अनुभव यांची देवाणघेवाण होणे : सर्वच क्षेत्रांतील माहिती एका व्यक्तीला ठाऊक असेलच, असे नाही. त्या त्या क्षेत्रांतील व्यक्तींशी चर्चा आणि विचारविनिमय करून हे ज्ञान वाढवता येते. त्या दृष्टीने केवळ हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांनीच नव्हे, तर हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सर्वच घटकांनी सातत्याने विचार, अनुभव आणि चुका टाळण्यासाठी अनुभवांची देवाणघेवाण करायला हवी.

४ आ. स्थानिक स्तरावरील हिंदू आंदोलनांचे राष्ट्रीयीकरण होईल !

आज अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना वेगवेगळ्या राज्यांत कार्य करत आहेत. यांपैकी बहुतांश संघटनांचे कार्य गोहत्या रोखणे, धर्मांतराला विरोध करणे, अन्य धर्मियांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना विरोध करणे, संस्कृतीरक्षण अशा स्वरूपांचे म्हणजे धर्मरक्षणाचेच आहे. या सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन कार्य करू लागल्या, तर धर्मरक्षणाच्या कार्याला राष्ट्रीय स्वरूप येईल ! एखाद्या हिंदू संघटनेचे कार्य एखाद्या राज्यापुरते मर्यादित असले, तरी तिच्या आंदोलनाला देशभरातील हिंदू संघटनांचे पाठबळ मिळेल, म्हणजे स्थानिक स्तरावरील आंदोलनांचे राष्ट्रीयीकरण होईल !

४ इ. हिंदूंचा दबावगट सिद्ध होईल !

मुसलमान आणि ख्रिस्ती भारतात अल्पसंख्य असूनही शासनाला त्यांच्या मागण्यांनुसार झुकावे लागते. त्यांनी संघटितपणे निर्माण केलेल्या दबावगटाचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे हिंदू संघटनांचेही एकत्रीकरण झाल्यास हिंदूंचाही दबावगट निर्माण होईल. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांची नोंद राज्यकर्त्यांना घ्यावीच लागेल आणि कोणताही निर्णय घेतांना हिंदूहिताचा विचार त्यांना करावा लागेल.

४ ई. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे
उपक्रम एकमेकांच्या साहाय्याने राबवा !

यामुळे अनुभवांची देवाणघेवाण होईल. तसेच उपक्रमांच्या अंतर्गत येणारी विविध कार्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विभागून घेतल्यास श्रमविभागणीही होईल.

५. आवाहन

एकंदरच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला दिशा देण्यासाठी विचारवंत, कार्य पुढे नेण्यासाठी संप्रदाय, अधिवक्ता, हिंदु संघटना आणि कार्य यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्य असणार्‍या संतांचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. या संघटनाच्या कार्यातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रत्यक्ष कार्य करणारे ५ लक्ष कार्यकर्ते आपल्याला मिळवायचे आहेत. या ५ लक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच हिंदु राष्ट्र स्थापन होईल.

– पू. नंदकुमार जाधव, धर्मप्रसारसेवक, सनातन संस्था

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात