हिंदु राष्ट्राची राज्यघटना धर्मशास्त्रावर आधारित असणे आवश्यक !

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात बंगालमधील शास्त्र धर्म प्रचार सभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ‘हिंदु राष्ट्राची राज्यघटना धर्मशास्त्रावर आधारित असणे आवश्यक’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

डॉ. शिवनारायण सेन, सचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा

१. राज्यघटनेत भारताचा आध्यात्मिक उत्कर्ष, पारंपरिक पवित्रता आणि प्रशंसनीय संस्कृती यांचा कुठेच उल्लेख नाहीे

राज्यघटना पुन्हा नव्याने बनवण्याचे कारण काय ?, असा प्रश्‍न कुणालाही पडेल. याचे उत्तर ‘रवींद्रनाथ टागोर सेंटर ऑफ ह्यूमन व्हॅल्यूज’ या संस्थेचे प्रा. शितांशुकुमार चक्रवर्ती यांनी त्यांच्या ‘क्रुसिफिकेशन ऑफ अ कल्चर : कॉन्स्टिट्युशन ऑफ कॉन्स्टिट्युशन्स इंडियाज परफॉरमन्स’ या पुस्तकात दिले आहे. यात लिहिले आहे की, शासनाने स्वदेशाची राज्यघटना बनवतांना त्या देशाची संस्कृती आणि वारसा यांचा सन्मान करणे, त्यांच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न करणे आणि त्या देशातील सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहिती असणे, या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या एका प्राध्यापकाने इंग्लंडमध्ये पुढील प्रतिक्रिया नुकतीच व्यक्त केली, ‘‘भारताची राज्यघटना ही मूल्यहीन आणि हृदयहीन आहे; कारण तिच्यामध्ये सहस्रावधी वर्षांचा भारताचा गौरवशाली इतिहास, आध्यात्मिक उत्कर्ष, पारंपरिक पवित्रता आणि प्रशंसनीय संस्कृती यांचा कुठेच उल्लेख केलेला नाही, तसेच त्यामध्ये कुठेही स्वातंत्र्यासाठीच्या वीरतापूर्ण संग्रामाविषयी आभारही व्यक्त केलेलेे नाहीत.’’

२. आणीबाणीच्या काळात घटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द घुसडला !

आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याचे जरी सांगण्यात येत असले, तरी ती आधीपासून तशी नव्हती. वर्ष १९७६ मध्ये लादलेल्या आणीबाणीच्या काळात राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. भारतातील सामान्य जनतेला हे अजूनही ठाऊक नाही. यावर ना टीका झाली, ना कुठली चर्चा !

३. राष्ट्रांच्या राज्यघटनेत धर्म-संस्कृती यांचा उल्लेख

अ. चीनने राज्यघटनेत प्राचीन इतिहास, संस्कृती अन् परंपरा, राजकीय विचार आणि आध्यात्मिक सभ्यता यांचा समावेश केला आहे. चिनी राज्यघटनेच्या एका परिच्छेदात ३ वेळा ‘पॅट्रियट’ (म्हणजे देशभक्त) हा शब्द वापरला आहे. आपल्या राज्यघटनेत हा शब्दच नाही !

आ. श्रीलंकेच्या राज्यघटनेतही ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द नाही. त्यामध्ये बौद्ध धर्माला प्राधान्य देण्यात आले आहे.

इ. इजिप्तच्या राज्यघटनेत ईश्‍वराचे अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इजिप्त आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या व्यक्तींविषयी श्रद्धा, तसेच ईश्‍वरी प्रज्ञाशक्ती हिच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. त्यांच्या राज्यघटनेतही ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द नाही.

ई. कॅनडा, जर्मनी, नॉर्वे, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी ईश्‍वर, धर्म अन् परंपरा यांच्याविषयी श्रद्धा व्यक्त केली आहे.

उ. रशियानेही त्याच्या राज्यघटनेत त्याचा इतिहास आणि देशभक्त यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे. साम्यवादी विचारसरणी असलेला रशिया, अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्या राज्यघटनेत ईश्‍वर आणि धर्म यांचा निःसंकोचपणे उल्लेख आहे.

ऊ. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेत सर्वशक्तीमान अशा ईश्‍वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.

ए. ब्रिटन आणि अमेरिका यांच्या राज्यघटनांमध्येही धर्माला न्यून लेखले गेलेले नाही.

ऐ. फ्रान्स या एकमेव देशाच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द आढळतो. फ्रान्सच्या राज्यघटनेचीच भारताने नक्कल केली आहे. त्यामुळेच भारताची भारत, हिंदुस्थान आणि इंडिया अशी ३ नावे आहेत. पृथ्वीवर कोणत्याही देशाची ३ नावे नाहीत. त्यातही वर्ष १९७७ मध्ये ‘भारत’ हे नाव काढून टाकण्यात आले आहे.

४. हिंदु धर्मातील २० शास्त्रे आणि ५ ऋणे !

४ अ. २० धर्मशास्त्रे : नावे : १. मनु, २. अत्रि, ३. विष्णु, ४. हारीत, ५. याज्ञवल्क्य, ६. उशना, ७. अंगिरा. ८. यम, ९. आपस्तंब, १०. संवर्त, ११. कात्यायन, १२. बृहस्पती, १३. पराशर, १४. व्यास, १५. शंख, १६. लिखित, १७. दक्ष, १८. गौतम, १९. शातातप, २०. वसिष्ठ

४ आ. मनुष्याची ५ ऋणे : मनुष्य पुढील ५ ऋणे घेऊन जन्माला येतो, असे श्रीमद्भागवतात सांगितले आहे.

देवऋण, ऋषिऋण, भूतऋण, आप्तऋण, पितृऋण ही ५ ऋणे आपल्याला फेडायची आहेत. हेच हिंदु धर्माचे महत्त्व आहे. मनुष्याला मोक्ष मिळावा आणि जगाचे कल्याण व्हावे, यासाठी भारताची राज्यघटना असावी, हीच भारतवर्षाची मागणी आहे. हेच भारतवर्षाचा धर्म आपल्याला सांगतो.

५. हिंदु धर्मशास्त्रांची शिकवण !

५ अ. कामाचा मोबदला उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढाच घेणे
कार्षापणं भवेद् दण्ड्यो यत्रान्यः प्राकृतो जनः ।

तत्र राजा भवेद् दण्ड्यः सहस्रमिति धारणा ॥

– मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक ३६

अर्थ : हा मनुस्मृतीच्या ८ व्या अध्यायातील ३६ वा श्‍लोक आहे. कुठल्या साम्यवाद्याच्या डोक्यात ही गोष्ट येणार नाही, जी भारतात आहे. आमची शास्त्रे सांगतात की, हे बंधू, तुझ्या उदरनिर्वाहासाठी तू जे काम करतोस, तेवढेच तू घे; पण तू जर यापेक्षा अधिक घेतलेस, तर मात्र तू चोर आहेस.

५ आ. जठराग्नीच्या शांतीसाठी आवश्यक तेवढेच खाणे
यावद् भ्रियेत जठरं तावत् स्वत्वं हि देहिनाम् ।

अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति ॥

– श्रीमद्भागवत, स्कन्ध ७, अध्याय १४, श्‍लोक ८

अर्थ : तुझ्या जठराग्नीच्या शांतीसाठी तुला जेवढे खाणे आवश्यक आहे, तेवढे तू खा. ती तुझी आवश्यकता आहे; पण तू जर त्यापेक्षा अधिक खाल्लेस, तर तू चोर आहेस आणि त्यासाठी तुला शिक्षा भोगावी लागेल.

५ इ. अशी समानता पृथ्वीवर कुठे आहे का ?
पणो देयोऽवकृष्टस्य षडुत्कृष्टस्य वेतनम् ।

– मनुस्मृति, अध्याय ७, श्‍लोक १२६

अर्थ : जो उत्कृष्ट आहे, त्याला तितके मिळेल त्याच्या १/६ भाग, जो सर्वांत अल्प वेतन घेणारा आहे, त्या झाडूवाल्याला मिळाले पाहिजे. याहून अधिक अंतर असू शकत नाही. ही आमच्या शास्त्रांची सूचना आहे.

५ ई. राजा रंतिदेव म्हणाला, ‘‘मी केवळ एकच सांगू शकतो. माझी प्रार्थना एकच आहे की, मला ईश्‍वरी गती, परागती नको आहे. हे अष्टसिद्धी नवनिधी, मला अष्ट रिद्धी-सिद्धी जरी मिळणार असल्या, तरी मला पुन्हा जन्म घ्यावा लागू नये. आमच्या प्रजेची सुख-दुःखे मला द्या. हे ईश्‍वरा, हे दुःख मला मिळू दे. त्यांचे दुःख मला दे. त्यांचे दुःख दूर होईल.’’ ही भारतवर्षाची उदारता आहे. हे सर्व आमच्या धर्मशास्त्रांत लिहिले आहे.

६. भौतिक विज्ञान आणि प्रगती यांच्या नावावर काम अन् लोभ यांना चालना देण्याचा निर्लज्ज प्रयत्न चालू आहे !

अतीप्राचूर्याच्या मदामुळे (अती अहंभावामुळे) यदुवंश, कौरववंश, रावणवंश, रोमकराज्य, व्याबीलोन, मिशर यांचा विध्वंस झाला. आज भौतिक विज्ञान आणि प्रगती यांच्या नावावर काम आणि लोभ यांना चालना देण्याचा एक निर्लज्ज प्रयत्न सातत्याने चालू आहे आणि या निंदनीय स्पर्धेमुळे मनुष्य आणि पशू यांमधील भेद मिटत चालला आहे. केवळ भोग भोगल्याने त्याचा शेवट होत नाही. तुम्ही आगीत तेल टाकले, तर ती आणखी वाढतच जाणार. आपण सर्वांनी किमान यम-नियम, ध्यान, धारणा, समाधी आणि प्रत्याहार या गोष्टींचे पालन केले नाही, तर आपला समाज शक्तीशाली कसा होईल ?

७. धर्महीन राज्यघटना धर्मभ्रष्ट समाजाचे कल्याण करण्यास असमर्थ !

द्वापरयुगात श्रीकृष्णाची अवतारसमाप्ती झाली. तो प्रतिज्ञाबद्ध असल्याने त्याने शिशुपालाच्या १०० अपराधांना क्षमा केली; पण १०१ अपराध होताच, त्याने त्याचा नाश केला. त्रेतायुगात श्रीरामाने अहंकारी रावणाचा विनाश करून भक्त बिभिषणाकडे राज्यकारभार सोपवला. सत्ययुगात अत्याचार करणार्‍या वेनराजाला ऋषींनी मारून पृथु राजाकडे राज्यकारभार सोपवला. ही शक्ती धर्मात वास करते. प्राणाविना शरीर नसते, तसेच धर्महीन राज्यघटना धर्मभ्रष्ट समाजाचे कल्याण करण्यास असमर्थ आहे.

८. हिंदु राष्ट्रात अमूल्य रत्नसंभाराचा यथार्थ उपयोग होऊन जगाचे कल्याण होईल !

आपल्या राज्यघटनेत प्राचीन इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा केवळ दस्तऐवज बनवण्यात आला आहे. भारताची राज्यघटना धर्मशास्त्रावर आधारित नसल्यामुळे जो विपर्यास व्हायचा होता तोच (जे व्हायला नको तेच) झाला आहे. भारताची प्रज्ञा वेदांमध्ये अंतर्भूत आहे. समाजासाठी नीतीशास्त्रेही सांगण्यात आली आहेत. प्राचीन भारतवर्षातील विज्ञानात दशांशाची माहिती, कोट्यवधीपर्यंतची मोजणी करण्याचे शास्त्र, वायुविमान, नक्षत्रविमान, आयुर्वेद, शल्य, शास्त्रयोग, नक्षत्रविद्या, ज्योतिष, कृषी, अशी अनंत शास्त्रे आहेत. ही भारताची देणगी आहे. हिंदु राष्ट्रात धर्मशास्त्रावर आधारित राज्यघटना असल्यामुळे या अमूल्य रत्नसंभाराचा यथार्थ उपयोग होऊन जगाचे कल्याण होईल.’

– डॉ. शिवनारायण सेन, सचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात