रामनाथी (गोवा) येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १३२ हून अधिक संघटनांचे ५३८ हून अधिक प्रतिनिधींचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून यति मां चेतनानंद सरस्वती, साध्वी सरस्वती, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव

श्री विद्याधिराज सभागृह (गोवा), १४ जून (वार्ता.) –  संत-महंतांनी केलेल्या संकल्पानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. देशाला हिंदु राष्ट्र करण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. हिंदू अधिवेशन म्हणजे ‘भगवा आतंकवाद पसरवण्याचे केंद्र’ असे म्हणून ते बंद करण्याच्या हालचाली निधर्मीवाद्यांकडून करण्यात येत आहेत, तसेच अधिवेशनाचे आयोजन करणार्‍या हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्नही केला जात आहे. ही बंदी आणू पहाणारे कोण आहेत ? हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वाटचालीतील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनही निधर्मी वा धर्मांध रोखू शकणार नाहीत. एक समिती किंवा संस्था यांच्यावर बंदी आणल्यास सहस्रोे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था निर्माण होतील, असे खणखणीत प्रतिपादन छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा प.पू. साध्वी सरस्वती यांनी सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. या वेळी व्यासपिठावर उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या संत आणि हिंदू स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा यति मां चेतनानंद सरस्वती, छिंदवाडा, मध्यप्रदेशमधील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वती, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे संत आणि धर्मप्रसारक पू. नंदकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संतांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून हिंदु जनजागृती समिती आयोजित ६ व्या ४ दिवसीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला १४ जून या दिवशी येथील श्री रामनाथ देवस्थानातील श्री विद्याधिराज सभागृहामध्ये भावपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. या वेळी सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती श्री. केतन शहाणे, श्री. आेंकार पाध्ये आणि श्री. अमर जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. यामुळे अधिवेशनस्थळीचे वातावरण चैतन्यमय झाले. भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १३२ हून अधिक संघटनांचे ५३८ हून अधिक प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. सोहळ्याचे सूत्रसंचालन समितीचे श्री. अभिजित देशमुख आणि श्री. विनोद गादीकर यांनी केले.

सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे (उजवीकडून) वेदमूर्ती श्री. केतन शहाणे, श्री. आेंकार पाध्ये आणि श्री. अमर जोशी वेदमंत्रपठण करतांना

 

संतांचे सन्मान

यति मां चेतनानंद सरस्वति यांचा सन्मान करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

यति मां चेतनानंद सरस्वति यांचा सन्मान सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते, प.पू. साध्वी सरस्वती यांचा सन्मान सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केला, तर पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव यांचा सन्मान अनुक्रमे समितीचे श्री. हेमंत कानस्कर आणि समितीचे कर्नाटक समन्वयक श्री. गुरुप्रसाद यांनी केला.

 

लोकराज्याच्या आडून चालू असलेले हिंदूहिताचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

पू. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे प्रस्तावनात्मक विवेचन केले. ‘धर्माधारित हिंदु राष्ट्राची संकल्पना आणि अधिवेशनाची दिशा’ या संदर्भात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, गेले चार दिवस देशात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी होत असलेली चर्चा ही गेल्या ५ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांची फलनिष्पत्तीच आहे. उत्तरप्रदेशात हिंदु जनतेला मायावती आणि ओवैसी यांनी ‘हिंदु राष्ट्र कसे स्थापन करता ?’, असे आवाहन केले आणि जनतेने हिंदु राष्ट्राचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून योगी आदित्यनाथ यांना बहुमताने निवडून दिले. त्यामुळे आता देशामध्ये हिंदु राष्ट्राचे समर्थक आणि विरोधक असे ध्रुवीकरण होत आहे; मात्र ते ध्रुवीकरण हे धर्म विरुद्ध अधर्म असेच आहे ! याचा लाभ करून घेत आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी जनमानस सिद्ध करायचे आहे. देशातील ८० टक्के हिंदूंनी एकमताने ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, अशी लोकप्रतिनिधींकडे मागणी करून संवैधानिक पद्धतीने हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. जे लोकप्रतिनिधी ते मान्य करणार नाहीत, त्यांना लोकशाहीतील बहुमताचा आदर नाही, असेच म्हणावे लागेल ! निधर्मीवाद, लांगूलचालन आदी माध्यमांतून लोकराज्याच्या आडून चालू असलेले हिंदूहिताचे हनन करण्याचे राजकीय षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !’’

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली अधिवेशनाच्या फलनिष्पत्तीची सूत्रे !

१. गेल्या ५ वर्षांत देशभरातील २५० संघटनांच्या संघटनाद्वारे ८ राज्यांत आतापर्यंत ७५ हून अधिक ठिकाणी प्रांतीय हिंदू अधिवेशने
२. ३० एप्रिल २०१७ पर्यंत हिंदूंशी संबंधित २२५ विषयांवर १४ राज्यांत १ सहस्र ५२ आंदोलने झाली
३. काश्मिरी हिंदूंच्या प्रश्‍नाविषयी ९ राज्यांत १५ सभांद्वारे जागृती

 

देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवावेच लागेल ! – रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. डाव्या विचारसरणीचा पगडा असलेल्या माध्यमांद्वारे आता हिंदु जनजागृती समितीचा उल्लेख करतांना प्रत्येक वेळी ‘एक विद्वेषी संघटना’, असा केला जात आहे. तसेच या कालावधीत माध्यमांतून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची तुमची ‘ब्लू प्रिंट’ काय आहे ?’, ‘हिंदु राष्ट्रात मुसलमानांचे काय करणार ?’, असे प्रश्‍न उपस्थित करून हिंदु राष्ट्राविषयी नकारात्मकता पसरवण्याचे षड्यंत्र चालू आहे. या सार्‍या प्रश्‍नांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खणखणीत प्रत्त्युत्तर दिले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची भूमिका’ या विषयावर बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले की, १. लोकशाहीच्या गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत डाव्या विचारसरणीचे लोक हे विसरले आहेत की, ब्रिटीश आणि मोगल भारतात येण्यापूर्वी भारत हे एक समर्थ हिंदु राष्ट्रच होते. २. त्या वेळी जगातील निराश्रित पारसी, ज्यू, इराणी लोकांना आश्रय देणारा केवळ भारतच होता. ३. आता आपला विकासदर ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर गेला, तरी आनंद व्यक्त केला जातो; मात्र विदेशी अभ्यासक अँगर्स मेडिसनने लिहिले आहे की, त्या वेळी भारताचा विकासदर ३४ टक्के होता.४. हिंदु राष्ट्राची ब्लू प्रिंट आता नव्याने बनवण्याची आवश्यकताच काय ? मोगल आक्रमक येण्यापूर्वी या हिंदुस्थानात धर्मशास्त्र, राजनीती, कौटिल्याचे अर्थशास्त्र होते, स्थापत्यशास्त्र, नृत्यशास्त्र आदी सर्वकाही समृद्ध होते. या देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवण्यासाठी मात्र आम्ही ‘ब्लू प्रिंट’ बनवत आहोत. ५. ज्याप्रमाणे रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकि ऋषींनी ते लिहून ठेवले होते, त्याचप्रमाणे द्रष्टे संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्येच ‘भारतात २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येईल’, असे लिहिले आहे. त्यासाठी आता जनमानस सिद्ध होत असल्याचे देशातील घटनांवरून स्पष्ट झाले असून आता या अधिवेशनातील हिंदू हा विषय जनमानसात रूजवतील.६. हिंदु राष्ट्रात कुणाचेही लांगूलचालन नसेल, तर सर्वांना समानाधिकार असेल.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या विरोधातील अपप्रचाराची रमेश शिंदे यांनी केली चिरफाड !

१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयीचे वृत्तसंकलन करतांना काही वृत्तपत्रांनी हिंदु जनजागृती समितीचा ‘एक विद्वेषी उजवी संघटना’ असा उल्लेख केला. वास्तविक हिंदु जनजागृती समितीचे कार्य देशभरात सर्वत्र जोमाने चालू आहे. त्यांना मला सांगायचे आहे, ‘हम ना ‘लेफ्ट’ है, ना ‘राईट’ है, हम ‘करेक्ट’ है ।’ आम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या योग्य मार्गानेच चाललो आहोत.

२. काही हिंदूद्वेषी लोकांनी ‘या अधिवेशनावर बंदी यावी’, यासाठी लघुसंदेश मोहीम चालवली. या देशाच्या ‘बरबादी’च्या घोषणा देणारे अशा लोकांना चालतात; मात्र संवैधानिक मार्गाने आम्ही केलेली हिंदु राष्ट्राची मागणी का चालत नाही ?

 

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथांचे संतांच्या हस्ते प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून यती मां चेतनानंद सरस्वतीजी, प.पू. साध्वी सरस्वतीजी, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव

उद्घाटनप्रसंगी यति मां चेतनानंद सरस्वती, प.पू. साध्वी सरस्वती, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’ या सनातन-निर्मित मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

 

संतांच्या संदेशाचे वाचन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश समन्वयक आणि ६७ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. नीलेश सिंगबाळ यांनी केले. यासमवेत पुणे येथील प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे ६८ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. प्रदीप खेमका यांनी केले.

 

उपस्थित संत आणि महंत

हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, सनातनचे संत पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

क्षणचित्रे

१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला ठीक ९:३० वाजता प्रारंभ झाला आणि नियोजनानुसार दुपारी १२:३० वाजता पहिले सत्र संपले.

२. अधिवेशनाच्या विविध सत्रांमध्ये उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठ ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत होते. हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या जोशपूर्ण आणि वीररस निर्माण करणार्‍या घोषणांमुळे अधिवेशनस्थळी हिंदु राष्ट्र निर्मितीचा उत्साह ओसंडून वहात असल्याचे जाणवत होते.

३. शंखनाद आणि मंत्रपठण झाल्यानंतर ‘सनातन साधक-पुरोहित पाठशाळे’च्या ब्रह्मवृंदाचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

४. सनातनच्या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचे वय ७४ वर्षे असूनही त्या व्याख्यानांच्या वेळी देण्यात येणार्‍या घोषणांच्या वेळी उत्साहाने घोषणा देत होत्या.

५. सर्व संत आणि वक्ते यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

६. सभागृहामध्ये बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा या विषयाच्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

७. काही संघटनांच्या राष्ट्र आणि धर्म या विषयावरील ग्रंथांचे प्रदर्शनही अधिवेशनस्थळी झाले होते.