संघटनाकडून कृतीप्रवणतेकडे !

रामनाथी, गोवा येथे सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने देश-विदेशातील २१ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले आहेत. हिंदूसंघटनाचा हा आविष्कार हिंदु राष्ट्र स्थापनेच्या अंतीम ध्येयासाठी असून यात सहभागी झालेला प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रेरित होऊन त्याच्या कर्मभूमीचे हिंदु राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी कृतीशील असेल.

 

सांघिक भावना निर्माण करणारे अधिवेशन !

देशभरात असे एकही गाव नाही की, जिथे हिंदूंना समस्या नाही, जिथे हिंदू सुरक्षित आहेत. हिंदूबहुल देश असूनही हिंदूंवर ही पाळी का आली ? यामागे अनेक कारणे आहेत. ६ वर्षांपूर्वी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने सर्वत्रच्या हिंदूंना एकत्र आणले. प्रत्येक ठिकाणचे हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या मूळ लढवय्या वृत्तीमुळे या समस्यांच्या विरोधात लढा देत होते; पण ते एकटे होते. पहिले अधिवेशन हे अशा हिंदूंना एकत्र आणणारे आणि त्यांच्या समस्या ऐकून त्यांना दिशादर्शन करणारे होते. नंतरच्या दोन अधिवेशनांत सहभागी संघटनांची संख्या वाढली. या अधिवेशनांतून हिंदुत्वनिष्ठांनी एकमेकांकडून प्रेरणा घेतली. काहींनी कार्याला आवश्यक असलेल्या ईश्‍वरी अधिष्ठानाचे महत्त्व जाणून साधनेला आरंभ केला. अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण झाली. गेली दोन अधिवेशने हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी विश्‍वास निर्माण करणारी आणि एकमेकांविषयी आपुलकी निर्माण करणारी ठरली.

 

हिंदुत्वनिष्ठ धर्माचरणी बनण्याचे लाभ !

हिंदूंना भेडसवणार्‍या समस्या अनेक आहेत. अन्य धर्मियांकडून होणारे शारीरिक अत्याचार; पोलीस, प्रशासन यांच्याकडून होणारे दमन; धर्मश्रद्धांवर होणारे आघात; धर्माचरणावर येणारी बंधने या बाह्य कारणांसह धर्मशिक्षण नसणे, धर्माचरणाचे महत्त्व ठाऊक नसणे, त्यामुळे धर्माचरण न करणे, या अंतर्गत त्रुटीपण आहेत. धर्म-अधर्म लढा सृष्टीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. अधर्मावर सातत्याने नियंत्रण राखणे हे धर्माच्या बाजूने असलेल्यांचे कर्तव्य आहे. अधर्माच्या बाजूने अनिष्ट शक्ती कार्यरत असते, तशी धर्माच्या बाजूने ईश्‍वराची शक्ती कार्यरत असावी लागते. ईश्‍वराचे पाठबळ नसल्यास धर्मकार्यात अडथळे येतात. ते येऊ नयेत, यासाठी साधना आवश्यक असते. नामजपादी साधना करून केलेले कार्य कसे यशस्वी होते, याविषयीचे अनुभव पंचम हिंदू अधिवेशनात काही हिंदुत्वनिष्ठांनी कथन केले. उदाहरणार्थ ढुबरी, आसाम येथील हिंदू सेवा मंचचे श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नामजपाला आणि सत्संग घ्यायला प्रारंभ केल्यावर त्यांचे मद्याचे व्यसन सुटणे, कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थीपणे कार्य करणे यांसारखे अनुभव सांगून एकूणच कार्याची फलनिष्पत्ती वाढल्याचे सांगितले. यातून प्रेरणा घेऊन गेल्या एक वर्षात इतर हिंदुत्वनिष्ठांनी साधनेला आरंभ केला असणार आणि यंदाच्या अधिवेशनात त्याची फलनिष्पत्ती आपल्याला पहायला मिळेल.

 

हिंदुत्वनिष्ठांचे प्रशिक्षण !

हिंदु जनजागृती समितीने पत्रकार परिषदेत घोषित केल्याप्रमाणे यंदाचे अधिवेशन दोन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा समान कृती कार्यक्रम आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा ठरवणारा असेल, तर दुसर्‍या टप्प्यात राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना संघटक आणि कार्यकर्ते यांना येणार्‍या अडचणींवर ऊहापोह होऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार असले, तरी प्रशासकीय व्यवस्था पूर्वीचीच आहे. त्यामुळे मूलभूत ध्येयधोरणांत फारसा काही पालट झालेला नाही. त्यामुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दुष्प्रवृत्ती यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा द्यावाच लागणार आहे. प्रचलित कायद्यांच्याच आधारे या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कसे लढावे, याचे प्रशिक्षण हिंदुत्वनिष्ठांना चांगलेच लाभदायक ठरेल, अशी आशा आहे. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्वनिष्ठांच्या सहकार्याने पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांचे हितरक्षण करावे, धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांना विनामूल्य उपलब्ध असलेल्या सेवांचे फलक लावावेत आदी सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा आरंभला आहे. गरिबांना योजनांचा लाभ मिळावा, प्रशासन कृतीप्रवण व्हावे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी, हे सामाजिक लाभ त्यात अंतर्भूत आहेत.

 

कालमहिम्यानुसार होत असलेले पालट !

हिंदु राष्ट्र का हवे ? किंवा हिंदु राष्ट्र कसे असेल ? याविषयी गेल्या सहा वर्षांत अनेकदा विश्‍लेषण करण्यात आले आहे. काही वृत्तवाहिन्या टीआरपीसाठी हिंदु राष्ट्राची मागणी ही अल्पसंख्यांकविरोधी असल्याचे भासवत असल्या, तरी हे प्रमाण काळानुसार अल्प होत चालले आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संयतपणे, सातत्याने आणि चिकाटीने करत असलेले कार्य पाहून अनेक पत्रकार, संपादक, प्रशासकीय अधिकारी, यांच्या दृष्टीकोनात सकारात्मक पालट झाल्याचेही अनुभवायला आले आहे. ‘व्यवस्थेतील त्रुटी हेच लोक दूर करू शकतात’, असा विश्‍वास समाजात हळूहळू का होईना निर्माण होत असून काळानुसार येणार्‍या हिंदु राष्ट्राची ही कुणकुण आहे. ‘उत्तरप्रदेशमध्ये एक योगी राज्याचा कारभार चालवेल’, असे कुणाच्या स्वप्नातही नव्हते; परंतु हा कालमहिमा आहे. द्रष्टे संत, अवतारी विभूती यांना काळाच्या पलीकडील ज्ञान होते. त्यानुसार ते समाजाला सजग करत असतात. येणारा भीषण आपत्काल आणि वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र यांविषयीचे भाकीतही संतांनीच केलेेले आहे. हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर भीषण आपत्कालात ईश्‍वर आपले रक्षण करीलच ! सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यासाठी सर्व हिंदूंना प्रेरणादायी ठरो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !