हिंदू संघटन आणि एकसंध भारत यांसाठी हिंदू अधिवेशन ! – राहुल कौल

पुणे येथे सहाव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनानिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून सर्वश्री विजय गावडे, राहुल कौल, पराग गोखले, हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, चंद्रशेखर तांदळे, संजीबकुमार बसू

पुणे : हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारतात बहुसंख्यांकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे तुकडे होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना प्राधान्य द्यायचे कि भारताची गौरवशाली परंपरा मानणाऱ्यां देशप्रेमींना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याची आता वेळ आली आहे.  ज्याप्रमाणे इस्लामी आतंकवादामुळे काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, तशी परिस्थिती आज केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्येही ओढवली आहे. अशा वेळी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून सनातन धर्माचे जागरण होऊन राष्ट्रविरोधी आवाजाला प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. गोवा येथे १४ ते १७ जून या कालावधीत होणार्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची माहिती देण्यासाठी १२ जूनला येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ते बोलत होते.   या प्रसंगी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, गोरक्षक श्री. संजीबकुमार बसू, गार्गी सेवा फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे उपस्थित होते. श्री. पराग गोखले यांनी अधिवेशनाचा उद्देश, स्वरूप, व्याप्ती, सहभागी हिंदुत्वनिष्ठ, तसेच मागील अधिवेशनांची फलनिष्पत्ती यांविषयी अवगत केले. श्री. चंद्रशेखर तांदळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते.

भारताला हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

धर्माच्या नावावर भारताची फाळणी झाली; मात्र आजही भारतभूमी हिंदु राष्ट्र म्हणून घोषित झालेली नाही. केंद्रात भाजपचे सरकार येऊनही अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली नाही. साधू-संत यांच्यावर केले जाणारे खोटे आरोप, त्यांचा होणारा छळ, गोहत्या, लव्ह जिहाद या सर्वांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे. भारताला हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही.

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे थेट प्रक्षेपण आपल्या
फेसबूक खात्यावरून  शेअर करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी हिंदू यांना आवाहन  हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी गोव्यात या वर्षीही १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.  या अधिवेशनाचा लाभ अधिकाधिक हिंदूंना व्हावा, यासाठी या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या www.facebook.com/HinduAdhiveshan या फेसबूक पानावरून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी हिंदू यांनी हे प्रक्षेपण त्यांच्या फेसबूक खात्यावरून शेअर करावे आणि राष्ट्र-धर्मकार्यात सहभागी व्हावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात