दुर्गम भागातील दोन शाळांना सनातनचे ग्रंथ, सात्त्विक वह्या आणि क्रांतिकारकांचे सचित्र फलक यांचे संच भेट

सनातनचे साधक श्री. मनोज महाजन यांच्या पुढाकारातून राबवल्या
जाणार्‍या रद्दी संकलन उपक्रमातून दोन शाळांना मिळाली संस्कारक्षम भेट !

कार्यक्रमाला उपस्थित नागरिक

पुणे : सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. मनोज महाजन यांच्या पुढाकारातून कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे आणि सिंहगड रस्ता परिसरात गेली ६ वर्षे रद्दीसंकलन उपक्रम राबवला जात आहे. यंदाच्या वर्षी रद्दीसंकलन उपक्रमातून मिळालेल्या अर्पणनिधीतून दुर्गम भागातील दोन शाळांना सनातनचे ग्रंथ, सनातनच्या सात्त्विक वह्या आणि शौर्यजागरण करणारे क्रांतिकारकांचे सचित्र फलक संच भेट देण्यात आले. तळेगाव-चाकण रस्ता येथील निगडे गावातील मावळ शिक्षण संस्थेच्या ‘प्रतिक विद्यानिकेतन’चे मुख्याध्यापक श्री. उत्तम मांडे, तसेच डहाणू येथील स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक न्यासाच्या निवासी आश्रमशाळेच्या प्रतिनिधी सौ. श्रद्धा गायकवाड यांनी ही भेट स्वीकारली. सर्व संच आणि रोख रक्कम मिळून दोन्ही शाळांना प्रत्येकी ६० सहस्र रुपयांचे साहाय्य करण्यात आले. २८ मे या दिवशी हॅपी कॉलनी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी २०० हून अधिक जण उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी श्री. मनोज महाजन म्हणाले, ‘‘समाजऋण फेडण्याच्या जाणिवेतून, तसेच ‘एआर्एआय’ आस्थापनामधील वरिष्ठांच्या प्रेरणेतून रद्दीसंकलनाची संकल्पना साकार झाली. यातून मिळणार्‍या निधीमधून पुण्याबाहेरील दुर्लक्षित स्वयंसेवी संस्था अथवा व्यक्ती यांना साहाय्य केले जाते. आतापर्यंत जवळपास १५० जण या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. मी केवळ माध्यम असून सर्वांच्या सहकार्यामुळेच हे कार्य होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक हे विद्यार्थ्यांसाठी खरे प्रेरणास्थान असल्याने त्यांचे सचित्र प्रदर्शन आपल्या शाळांमध्ये शक्य झाल्यास भेट द्यावे, तसेच आनंदी जीवनासाठी अध्यात्म असे प्रवचन आपल्या परिसरात आयोजित करावे.’’

श्री. उत्तम मांडे यांनी शाळा चालवतांना त्यांना आलेले अनुभव आणि प्रयत्न यांविषयी अवगत केले. त्या अनुभवांतून, तसेच ‘दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर समाज पालटता येतो’, या त्यांच्या वाक्यातून सर्वांमध्येच सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे जाणवले. डहाणू शाळेच्या सौ. श्रद्धा गायकवाड यांनीही समाजसेवेच्या उद्देशातून १३ वर्षांपूर्वी चालू केलेल्या त्यांच्या निवासी आश्रमशाळेविषयी माहिती दिली. या वेळी ‘गोल्डन मेमरीज्’च्या वतीने ‘मावळत्या दिनकरा…’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉ. विश्‍वास मेहेंदळे यांच्या हस्ते कलाकारांचा सनातन-निर्मित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. मेहेंदळे यांनी ‘महाजनांसारखे अनेक कार्यकर्ते निर्माण होवोत’, असे सांगत श्री. मनोज महाजन यांचे कौतुक केले. कार्यक्रमस्थळी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे, तसेच क्रांतिकारकांविषयीचे सचित्र फलक प्रदर्शन लावले होते. त्याचाही अनेक जणांनी लाभ घेतला.

क्षणचित्र

१. आनंदी जीवनासाठीचे अध्यात्माचे महत्त्व विशद केल्यानंतर उपस्थित दोन जणांनी त्यांच्या परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेण्याची मागणी केली.

रद्दीसंकलन उपक्रम म्हणजे अहंनिर्मूलनासाठीची साधना अन् धर्मप्रसाराची संधीही !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मात अहंनिर्मूलन हा महत्त्वाचा टप्पा सांगितला आहे. रद्दीसंकलन उपक्रमाच्या वेळी काही जणांकडून अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात, तसेच कटू अनुभवही वाट्याला येतात. या माध्यमातून देव अहंनिर्मूलनासाठीची साधनाच करवून घेत आहे, असे जाणवते. तसेच काही जण धर्मकार्यात सहभागीही होत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य सांगितल्यानंतर अनेक जण धर्मकार्यासाठी अर्पणही देऊ लागले आहेत. या उपक्रमाची ही फलनिष्पत्ती म्हणता येईल, असे श्री. मनोज महाजन यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात