परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या सत्संगात श्री. अभय वर्तक यांनी अनुभवलेले अनमोल क्षण !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

श्री. अभय वर्तक

१. सनातन संस्थेशी संपर्क

माझे वडील श्री. नाना वर्तक यांनी आमच्या गावात सनातनचे कार्य चालू केले. त्यांच्या समवेत श्री. बापू रावकर आणि अन्य अनेक साधक होतेे. ते मला नेहमी सनातन संस्थेविषयी सांगायचे. त्यांच्यामुळेच मी सनातन संस्थेशी जोडला गेलो.

२. साधनेला आरंभ

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गात झोप येणे, तेव्हा त्यांनी
अनिष्ट शक्तींची भीती किंवा वाईट वाटू नये म्हणून थकला असल्याने झोप येत असेल, असे सांगणे

एकदा वडील मला मुंबई येथे परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गासाठी घेऊन गेले. माटुंगा येथील रूईया महाविद्यालयात हा एक दिवसाचा अभ्यासवर्ग होता. मी या अभ्यासवर्गात पूर्णवेळ बसलो. मला तेथे अनावर झोप येत होती. अभ्यासवर्ग संपल्यावर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, मला वर्गात एवढी झोप का येत होती ? त्यावर त्यांनी मला सांगितले, तू थकला असशील. त्यामुळे तुला झोप आली असेल. त्यानंतर एक वर्षाने मला समजले, मला आध्यात्मिक त्रासामुळे झोप येत होती. तेव्हा मला वाटले, या गुरुमाऊलीला माझी केवढी काळजी ! मला भीती किंवा वाईट वाटून मी साधना करण्याचे सोडू नये, यासाठी त्यांनी मला वास्तवाची जाणीव करून दिली नाही. पुढे त्यांनी योग्य वेळी यामागील शास्त्र सांगून त्यावर उपाययोजनाही केली.

२ आ. अभ्यासवर्गाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर
पहिल्या भेटीतच ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले, अशी स्थिती अनेकांची असणेे

मी महाविद्यालयीन जीवनात चंचल होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे या जिवात सुधारणा झाली; नाहीतर या जिवाचे काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक मासाच्या आरंभी पुण्याला यायचे. पुढे ते दोन, तीन आणि नंतर सहा मासांतून एकदा यायचे. मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो, त्याच महाविद्यालयातील एका वर्गात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अभ्यासवर्ग व्हायचा. त्या वेळी अभ्यासवर्गात ५० ते १०० अशी उपस्थिती असायची. (आज लक्षात येते की, आज जर सनातनच्या साधकांनी असा केवळ अध्यात्म या विषयावर पूर्ण दिवसाचा अभ्यासवर्ग घ्यायचा ठरवला, तर किती जण येतील आणि कितीजण टिकतील ?) परात्पर गुरु डॉक्टरांचे सर्व कार्य केवळ चैतन्यशक्तीवर चालणारे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याशी झालेल्या केवळ एका भेटीतच अनेकांना आपलेसे करून टाकले. ते आले ! त्यांनी पाहिले ! आणि ते जिंकले !!, असेच सगळे असायचे.

अनेक व्यक्तींनी पूर्ण जीवनच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले सांगायचे, पुढे आपला सनातनचा वटवृक्ष होणार आहे. काळजी करू नका. आज आपण अनेक जण त्यांचे हे बोल सत्यात उतरल्याचे याचि देही याचि डोळा पहात आहेत.

२ इ. निष्काम भक्ती करण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक अभ्यासवर्गात निष्काम भक्तीचे महत्त्व सांगितले. याचे एक गमतीचे उदाहरण आहे. एकदा माझे वडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत चारचाकीने प्रवास करत होते. मार्गातील एका उपाहारगृहाकडे बोट दाखवून माझे वडील त्यांना म्हणाले, या उपाहारगृहाचा मालक एका आध्यात्मिक गुरूंकडे जातो. तो साधना करू लागल्यावर त्याची एकाची दोन उपाहारगृहे झाली. त्याला अनुभूती आली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, आपल्याकडे एखाद्याचे एक उपाहारगृह असल्यास त्याने साधना चालू केल्यावर त्याला अनुभूती येऊन तो ते बंद करील आणि जोमाने साधना करू लागेल. या उदाहरणातून लक्षात आले, खरे गुरु नेहमी शिष्याला मायेतून मुक्त करून ब्रह्माच्या सान्निध्यात नेतात.

३. आरंभीच्या काळात केलेल्या सेवा

३ अ. अभ्यासवर्गाचे कापडी फलक (बॅनर) लावण्याची सेवा करणे

मी परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक मासात घेत असलेल्या अभ्यासवर्गासाठी कापडी फलक लावण्याची सेवा करायचो. मी जीन्स घालणारा, मस्ती करणारा, अव्यवस्थित (बेबंद) युवक होतो. मला अध्यात्म काय कळले, ते देवच जाणे ! मी संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी अगदी वेडा झाला होतो. मी महाविद्यालयातून घरी आल्यावर खोलीचे दार लावून संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर बसून त्यांची भजने म्हणायचो. तेव्हा डोळ्यांतून अश्रू यायचे. मी काय करत आहे, हे त्या वेळी मला काहीच समजायचे नाही; परंतु ते पूर्णतः श्री गुरूंच्या संकल्पामुळे होत होते, असे मला आज जाणवते.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसार करण्यासाठी पैसे देणे

महाविद्यालयातील शिक्षण आणि उधळा स्वभाव यांमुळे मला नेहमीच पैसे अल्प पडायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले मला पैसे द्यायचे. मी प्रसारासाठी नियमितपणे सायकल आणि कधीतरी पेट्रोल भरून दुचाकी वापरायचो. त्या वेळी २० रुपये लिटर पेट्रोल होते. ते दिवस आठवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, त्यांचे मार्गदर्शन, मी चुकायचो त्या वेळी त्यांचे मला लगेच सावध करणे, हे सगळे आठवते. मला याचे वाईटही वाटते की, त्यांनी मला अध्यात्म शिकवले आणि मी मात्र मायेला निवडले. मी त्यांना अपेक्षित असे वागण्यात अल्प पडलो.

४. आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन

४ अ. मनात काही प्रश्न आल्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दूरभाष करणे

माझ्या मनात काही प्रश्न आल्यास मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दूरभाष करत असे. ते माझे नातेवाईक असल्याने मी आरंभी त्यांना काका असे संबोधायचो. नंतर मी त्यांना प.पू. डॉक्टर असे म्हणू लागलो. त्यांनी मला त्यांच्या प्रेमातच पाडले होते. त्या वेळी भ्रमणभाष नव्हते. मी १ रुपयाचे नाणे टाकून त्यांना दूरभाष करत असेे.

४ आ. कावळे मागे लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काय करू ?, असे विचारल्यावर त्यांनी
काही करायला नको, असे सांगणे; मात्र त्यांना बुद्धीने विचार करून दत्ताचा जप करू का ?, असे विचारणे

एकदा माझ्यामागे कावळे लागले. मी जिकडे जाईन, तिकडे कावळा मला टोच मारायचा. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, काय करू ? त्यांनी सांगितले, काही करायला नको. त्या वेळी ते अभ्यासवर्गात अध्यात्मशास्त्र या ग्रंथातील सूत्रे सांगत असत. त्यावरून हा पूर्वजांचा त्रास आहे, असे मला वाटले आणि मी त्यांना दत्ताचा जप करू का ?, असे २ – ३ वेळा विचारले. मग ते म्हणाले, तुला वाटते, तर कर.

आता हा प्रसंग आठवल्यावर वाटते, कशाला बद्धी आड आली ? गुरु सांगतील तसेच करायला हवेे होते. त्यांच्या संकल्पामुळे कावळ्यांचा त्रास दूर झाला; पण मी मात्र गुर्वाज्ञापालनास मुकलो. मला जो त्रास दूर करणे शक्य नव्हते, तो गुरुमाऊलीने दूर केला.

४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पूर्णवेळ सेवा करू का ?, असे विचारल्यावर त्यांनी नोकरी कर, असे सांगणे

माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटून सांगितले, आता मला पुढे काही करायचे नाही. मला पूर्णवेळ सेवाच करायची आहे. त्यावर त्यांनी विचारले, लग्न कसे करणार ? मी त्यांना सांगितले, मी लग्न करणार नाही. त्यावर ते हसले. मला वाटले, माझा निश्चय तर पक्का आहे. मग हे का हसले ? (पुढे १० वर्षांनंतर माझे लग्न झाल्यानंतर त्यांच्या हसण्याचा अर्थ मला उमगला.) तेव्हा त्यांनी मला सांगितले, आता तू पूर्णवेळ सेवा करू नकोस. मला वाईट वाटले. काही झाले, तरी त्यांचे घर सोडायचे नाही, असा मी मनाचा निश्चय करून गेलो होतो. मी तेथेच राहिलो. असेच काही दिवस गेले. एक दिवस मला एका साधकाने सांगितले, तू असाच स्वत:च्या मनाने येथे राहिलास, तर प्रगती होणार नाही, असा निरोप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुला द्यायला सांगितला आहे. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे जाऊन त्यांना विचारले, मी काय करू ? व्यवसाय, नोकरी कि पुढील शिक्षण ? त्यांनी सांगितले, नोकरी कर.

५. पूर्णवेळ सेवेची संधी मिळणे

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले जाहीर सभा
घेऊ लागल्यावर त्यांनी पूर्णवेळ सेवा करण्यास सांगणे

त्यांनी सांगितल्यावर मला घरापासून अवघ्या १८ कि.मी. अंतरावर असलेल्या एका रासायनिक कारखान्यात नोकरी मिळाली. मला नोकरी करूनही प्रसारात सेवा करायला मिळायची. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभा होऊ लागल्यावर मी सुटी घेऊन धर्मरथासह सेवेला गेलो. काही दिवसांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला किती दिवसांची सुटी घेऊन आला आहेस ? परत जायचे नाही का ?, असे विचारले. मी म्हणालो, तुम्ही सांगाल तसे. त्यावर ते म्हणाले, आता पूर्णवेळ सेवा करू शकतो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

गुरुमाऊलीने साधनेची एक अनमोल संधी उपलब्ध करून दिली. मी केवळ ११ मास चाकरी केली होती. त्यानंतर आजतागायत एक रुपयाही कमवला नाही; पण गुरुमाऊलीने मला कसलीही उणीव भासू दिली नाही. जीवनात शिकण्याच्या अनेक संधी दिल्या. मीच अल्प पडलो. त्यांना अपेक्षित अशी साधना जमली नाही; म्हणून मला खंत वाटते.

५ आ. प्रसारासाठी बाहेरगावी जायला सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घर म्हणजे आनंदघर होते. एकदा ते मला म्हणाले,बाहेर जा. एका वृक्षाखाली दुसरा मोठा वृक्ष वाढत नाही. नंतर मला प्र्रसारानिमित्त सातत्याने बाहेर रहावे लागले. परात्पर गुरूंचा वृक्ष मोठा व्हावा, हा संकल्प आहे आणि त्याप्रमाणेच होणार ! (क्रमश: उद्याच्या अंकात)

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

६ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व आणि संकल्प यांमुळे
घरातील आध्यात्मिक त्रास दूर होऊन आश्रमाप्रमाणेच घरातही चैतन्य जाणवणे

आमच्या घरात तीव्र आध्यात्मिक त्रास होता. परात्पर गुरु डॉ. आठवले घरात आल्यावर ते त्यांच्या समवेत आलेल्या साधकांना विचारायचे, ‘‘येथे कसे वाटले ?’’ कधी ते रात्री निवासाला असायचे. तेव्हा ते विचारायचे, ‘‘रात्री झोपेत काय अनुभव आले ?’’ प्रत्यक्षात बहुतेक जणांना रात्री त्रास झालेला असायचा. काही वेळा साधकांना अनिष्ट शक्तींचे अस्तित्व जाणवायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सातत्याने येणे आणि त्यांचा संकल्प यांमुळे घरातील त्रास नष्ट झाला.
आता या घरातील चैतन्य एवढे जागृत झाले आहे की, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘या घरातही आश्रमाएवढेच चैतन्य जाणवत आहे.’’ आश्रमातील चैतन्याचा स्तर आणि या घरातील चैतन्याचा स्तर सारखा झाला आहे. (‘घर हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मस्थान आहे आणि येथील चैतन्य दिवसेंदिवस वाढत आहे.’ – संकलक)

६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःचा वाढदिवस
साजरा करण्यात रूची नसणे आणि साधकांनी वाढदिवसाची सिद्धता केल्यावर ‘कार्यक्रमाची
सिद्धता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अध्यात्मप्रसाराचे कार्य केल्यास लाभ झाला असता’, असे सांगणे

सनातन संस्थेची स्थापना होण्यापूर्वी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ ही लहान संस्था होती. त्या वेळी कोणतीही औपचारिकता नव्हती. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नागोठणे येथे येणार होते. परात्पर गुरु डॉ. आठवले येणार; म्हणून साधकांनी दाराला केळीचे खांब लावून मखर केले होते. ते पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘हे असले सुशोभीकरण करून तुमचा वेळ व्यर्थ घालवलात. तो वेळ तुम्ही अध्यात्मप्रसाराच्या कार्याला दिला असता, तर लाभ झाला असता.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले नागोठणे येथे अनेक वेळा आले. त्यांच्या चरणस्पर्शाने त्यांचे जन्मस्थान, म्हणजे श्री. नाना वर्तक यांचे घर पावन झाले. आता त्या घरातील चैतन्य अवतारी कार्याचा एक भाग म्हणून वेगाने वाढत आहे.

६ इ. ‘प्रगती कधी होणार’, असे विचारल्यावर ‘अढीत
आंबा पिकायला ठेवल्यावर त्याला पिकायला वेळ लागतो’, असे सांगणे

वर्ष १९९४ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले नागोठणे येथे आले असतांना मी त्यांना विचारले, ‘‘माझी आध्यात्मिक पातळी किती आहे ?’’ त्यांनी सांगितले, ‘‘३८ टक्के.’’ मला माझी पातळी समजली; म्हणून आनंद झाला. माझा एक मावसभाऊही सनातनच्या मार्गदर्शनानुसार थोडीफार साधना करत होता. त्यानेही त्याची आध्यात्मिक पातळी विचारली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याला त्याची पातळी ५० टक्के असल्याचे सांगितले. पुढे त्याने सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे सोडून दिले. त्याला बहुतेक ‘५० टक्के म्हणजे अल्प पातळी आहे’, असे वाटले असावे. नंतर काही दिवसांनी एकदा मी शीव येथे असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘माझी प्रगती केव्हा होणार ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अढीत आंबा पिकायला ठेवल्यावर तो लगेच थोडाच पिकतो ?’’

७. गुरुमाऊली संत भक्तराज महाराज
यांच्याप्रती शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदरभाव

७ अ. ‘संत भक्तराज महाराज यांचा जयघोष उत्साहपूर्ण
व्हायला हवा’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

एकदा संत भक्तराज महाराज आले होते. ते आल्यावर मी जरा बिचकतच संत भक्तराज महाराज यांचा जयघोष केला. परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘जयघोष जोरदार व्हायला हवा होता.’’ त्यातून लक्षात आले, ‘श्री गुरूंचा डंका जोरदार पिटला पाहिजे.’ डंका हळू केला, तर कृपाही तशीच होणार. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या गुरूंचा डंका कसा जोरदार केला, ते अनुभवून तसा डंका पिटता यावा, हीच प्रार्थना !

७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या गुरुमाऊलींचेे १०० टक्के आज्ञापालन करणे

एकदा इंदूरच्या आश्रमातून संत भक्तराज महाराज त्यांचे शिष्य डॉ. आठवले आणि अन्य काही भक्त यांच्यासह चारचाकीने निघाले. डॉ. आठवले स्वत: चारचाकी चालवत होते. आश्रमाबाहेरच मुख्य मार्ग आहे. मार्ग ओलांडून पुढे जायचे होते. मार्गाच्या मध्येच चारचाकी आली असतांना संत भक्तराज महाराज यांनी ती थांबवण्यास सांगितली. तेव्हा डॉ. आठवले यांनी त्या क्षणी जिथे चारचाकी होती, तिथेच ती थांबवली. त्या वेळी ‘गुरूंचेे १०० टक्के आज्ञापालन कसे करायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.

८. भावपूर्ण आणि नियोजनबद्धरित्या साजर्या केलेल्या संत
भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे

८ अ. प्रत्येक गोष्ट सात्त्विक होण्यासाठी बारकाईने लक्ष देणे

संत भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी गोवा येथून पुष्कळ साधक आले होते. गोव्यातील मडकई येथील साधकांनी मुख्य व्यासपिठावरील छत पताकांनी छान सजवले होते. रात्री परात्पर गुरु डॉ. आठवले तेथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले, ‘त्यातून चांगली स्पंदने येत नाहीत. तेव्हा त्यांनी लगेच ते सर्व काढायला सांगून ‘योग्य कसे करायचे ?’, तेही सांगितले. साधकांनी रात्रभर जागून नवीन छत बनवले. ‘आदर्श शिष्याचा गुरूंचा अमृत महोत्सव साजरा करतांना कसा भाव असतो ?’, ते आम्हाला त्या वेळी जवळून अनुभवायला मिळाले.

८ आ. महोत्सवाच्या सेवेतील साधकांची उन्नती करवून घेणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या महोत्सवाच्या सेवेत असणार्याा अनेक साधकांची उन्नती करवून घेतली. यातील अनेक जणांनी आज संतपद प्राप्त केले आहे आणि काही जणांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के किंवा त्याहून अधिक होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.

८ इ. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ हे सातत्याने मनावर बिंबवणे

संत भक्तराज महाराज यांनी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात सोन्याची आणि चांदीची नाणी उधळली. तेव्हा काही साधक ती नाणी घेण्यासाठी गेले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना बोलावून सांगितले, ‘‘आजपर्यंत अभ्यासवर्गात जे शिकलात, ते फुकट घालवलेत. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे तुमच्या का लक्षात आले नाही ?’’ त्या वेळी एक महिला साधिका म्हणाल्या, ‘‘मी तेथे नव्हते.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना म्हणाले, ‘‘बरे झाले तुम्ही नव्हतात, नाहीतर तुम्हीही नाणी झेलायला धावला असतात.’’ स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणार्यार त्या साधिकेला तिची चूक कळली. नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाला संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र असलेले नाणे मिळेल, अशी व्यवस्था केली.

९ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण !

९ अ. पुढे संपूर्ण आयुष्यच सनातनला देणार असल्याविषयी
संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

९ अ १. साधकाने नुकतीच साधना आरंभ केली असतांनाही साधकाच्या आजीची ‘यांनी त्यांचा मुलगा आणि नातू सनातनला दिला आहे’, अशी संत भक्तराज महाराज यांना ओळख करून देणे आणि तसेच घडणे : एकदा शीव येथे संत भक्तराज महाराज आले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी, माझी आजी आणि वडील गेलो होतो. तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले उभे होते. त्यांनी संत भक्तराज महाराज यांना माझ्या आजीची ओळख ‘यांनी त्यांचा मुलगा आणि नातू सनातनला दिला आहे’, अशी करून दिली. त्या वेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो आणि नुकताच साधनेत आलो होतो. मी पूर्णवेळ साधकही नव्हतो. गुरुमाऊलीला ‘पुढे काय होणार आहे ?’, हे आधीच ठाऊक होते; किंबहुना ‘त्यांच्या इच्छेप्रमाणेच त्यांच्यासाठीच हा जीव आहे हे त्यांना ठाऊक होते’, हे आता लक्षात येते.

९ अ २. संत भक्तराज महाराज यांच्या चरणी पैसे अर्पण केल्यावर त्यांनी ‘तुला तर तुझे आयुष्य द्यायचे आहे’, असे सांगणे : वरील प्रसंगानंतर एकदा मी संत भक्तराज महाराज यांच्या दर्शनासाठी कांदळी येथे गेलो होतो. तेथील प्रथेप्रमाणे मी थोडेसे पैसे त्यांच्या चरणी अर्पण केले. तेव्हा पैसे परत देऊन मला ते म्हणाले, ‘‘तुला तर तुझे आयुष्य द्यायचे आहे.’’ मला त्या वेळी त्याचा अर्थ कळला नाही. आता लक्षात येते, ‘जीवनात पुढे केवळ ‘सनातनच’ असणार आहे’, हे देवाने ठरवलेलेच आहे.’ हे माझे अहोभाग्यच आहे.

९ आ. ‘एका गावात परिस्थिती अनुकूल नाही’, असे परात्पर
गुरु डॉ. आठवले यांनी सांगूनही साधकांनी तिथे अनेक वेळा प्रसार करणे आणि तिथे
प्रतिसाद न लाभल्याने ‘गुरूंनी सांगितलेले ऐकणे किती महत्त्वाचे असते !’, हे लक्षात येणे

रायगड जिल्ह्यातील नागोठणे आणि पाली या दोन गावांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. नागोठणे येथील प्रवचनाला अनुमाने ५० ते ६० जण उपस्थित होते. त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘रंग आणि त्यांचे आध्यात्मिक अर्थ’ याविषयी प्रामुख्याने सांगितले. त्यांची ‘निळा हा भक्तीचा आणि पिवळा हा ज्ञानाचा रंग आहे,’ ही वाक्ये अजूनही मनावर कोरली आहेत. नंतर आम्ही पाली (अष्टविनायकांपैकी एक गाव) येथे गेलो. या प्रवचनासाठी प्रसार करूनही कुणीच आले नव्हते. त्यामुळे प्रवचन झाले नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘या गावातील परिस्थिती अनुकूल नाही.’’ पुढे प्रत्यक्षातही या गावात प्रसारासाठी अनेक प्रयत्न केले; पण एकही साधक मिळाला नाही. ‘गुरूंनी सांगितलेले ऐकणे किती महत्त्वाचे असते !’, हे आता जाणवते.

९ इ. श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांची
पूर्वसाधना जाणून यांच्या आईला ‘तुमचा मुलगा आम्हाला द्याल का ?’,
असे विचारणे आणि पुढे त्यांची सद्गुरुपदापर्यंत आध्यात्मिक उन्नती करवून घेणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले कोकणातून पुढे गोवा येथे जाणार होते. मी त्यांच्यासमवेत चारचाकीने जाण्यास निघालो. त्यांची इच्छा होती, ‘याने माझ्यासमवेत राहून अध्यात्म शिकावे’; पण तेवढे समजण्याची माझ्यात तळमळ नव्हती. मी त्यांच्यासमवेत गेलो. तेव्हा काही वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले स्वत: गाडी चालवायचे. ते मला प्रवासात ‘प्रत्येक प्रसंगात कसा विचार करायला हवा’, हेही सांगायचे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरे गावात रहाणार्या श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांच्या घरी गेलो. आमचा चहा घेऊन झाल्यावर घरून निघतांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या आईला म्हणाले, ‘‘हा तुमचा मुलगा आम्हाला द्याल का ?’’ पुढे तसेच झाले. सत्यवानदादा सद्गुरु पदावर आरुढ होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच झाले.

९ ई. साधक लग्न करणार, हे आधीच ठाऊक असणे

साधनेचा प्रवास चालू असतांना एका वर्षी माझ्या मनात अकस्मात् ‘लग्न करायला हवे’, असे विचार यायला लागले. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. १२ – १३ वर्षांपूर्वी ‘लग्नाचे काय ?’, या त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नावर ‘मी लग्न करणारच नाही’, असे मी ठामपणे सांगितले होते. त्यावर ‘ते का हसले होते ?’, याचे उत्तर मला मिळाले आणि ते आठवून मलाही हसू आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला इथपर्यंत आणले. तेच माझी यापुढील प्रगतीही करवून घेणार आहेत. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी अल्प आहे. ‘हा देह निरपेक्षपणे श्री गुरुसेवेत झिजावा’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.३.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात