जळगावमधील ‘हिंदू एकता दिंडी’ने जागवले धर्माभिमान्यांमध्ये वीरत्व !

 • शौर्यजागरण प्रात्यक्षिकांना हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

 • मंगलमय वातावरणात असा झाला दिंडीला आरंभ…!

धर्मध्वजपूजन !

आरंभी नेहरू चौक येथे सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजाचे पूजन जळगाव शहराचे महापौर श्री. नितीन लढ्ढा आणि दै. देशदूत (कान्हादेश आवृत्ती)चे संपादक श्री. हेमंत अलोने यांनी केले. धर्मध्वजपूजनाचे पौरोहित्य श्री. योगेश्‍वर जोशीगुरुजी यांनी केले. या वेळी सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, ह.भ.प. प्रसाद महाराज आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शंखनादगर्जना !

धर्मध्वज पूजनानंतर दिंडीच्या आरंभी ६ शंखांनी नादगर्जना करण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण नादाने वातावरणातील मळभ दूर होऊन प्रसन्नतेच्या लहरी पसरल्याची आणि अंगावर शहारे येऊन भावजागृती झाल्याची अनुभूती बहुतांश उपस्थितांनी घेतली.

त्यानंतर वाजवलेल्या तुतारीने जणू ‘छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पुनरागमनाची चाहूल लागली आहे’, असे उपस्थित धर्माभिमान्यांच्या मनात आले !

आपल्या संस्कृतीची अस्मिता असणार्‍या या दोन्ही नादांच्या मंगलमय वातावरणात हिंदू ऐक्य दिंडीला आरंभ झाला.

गोपूजन !

दिंडीच्या आरंभी करण्यात आलेले गोपूजन हे या दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. ३३ कोटी देवतांचा वास असणार्‍या गोमातेचे पूजन करून जणू हिंदूंनी भारतमातेच्या रक्षणासाठी तिचे शुभाशीर्वाद घेतले ! सत्र न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता श्री. सुशील अत्रे आणि माजी नगरसेवक श्री. शाम कोगटा यांनी गोमातेचे पूजन केल्यावर ‘अतिव समाधानाने ती सर्वांकडे पहात असल्याचे भाव गोमातेच्या नयनांमध्ये प्रकटल्या’चे उपस्थितांना जाणवले.

हिंदु राष्ट्र स्थापनेेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर चालू झालेले ‘हिंदु राष्ट्र अभियान’ दिवसेंदिवस हिंदुत्वनिष्ठांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण करत आहे ! साधक, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, तसेच सनातनचे हितचिंतक विविध माध्यमांतून यात सहभागी होऊन श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत ! सकल विश्‍वातील मानवाच्या आनंदासाठी असलेल्या संकल्पित हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंचे संघटन करणे आणि राष्ट्रस्थापनेसाठी त्यांची सर्वतोपरी पूर्वसिद्धता करून घेणे हाच विविध ठिकाणी हिंदु एकता दिंडी आयोजित करण्यामागील उद्देश आहे. त्यानुसार जळगावमध्ये २७ मे या दिवशी सायंसमयी आयोजित केलेल्या हिंदू एकता दिंडीनेही हा हेतू सफल केला !

जळगावमधील हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, विविध संघटनांचे आणि पक्षांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते, विविध संप्रदायांचे भक्तगण, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, सनातनचे साधक आणि हितचिंतक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या अत्यंत उत्साहपूर्ण सहभागाने पार पडलेल्या ‘हिंदू एकता दिंडी’ने जळगावकरांमध्ये वीरश्री चेतवली ! ही भव्य दिंडी नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मार्गे खान्देश सेन्ट्रल मॉल परिसरातून शौर्यप्रदर्शन आणि चैतन्याचे प्रक्षेपण करीत मार्गस्थ झाली.

दिंडीतील भक्तीचा जागर !

वासुदेव जोशी समाज मंडळाच्या वासुदेवाच्या वेशभूषेतील युवकांनी दिंडीत सहभागी होऊन हिंदु परंपरा आणि संस्कृती यांचे दर्शन घडवले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा चित्ररथ !

 • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राविषयी दिशादर्शन करणारे संदेश देणारा चित्ररथ हे दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
 • परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र साधकांनी हातात धरले होते. विविध सुवचनांचे फलक साधकांनी हातात धरले होते, तसेच गाड्यांवर लावण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची पालखी आणि अन्य पालख्या !

 • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली पालखी पुष्पांनी आणि पुष्पमालांनी सजवण्यात आली होती.
 • या पालखीच्या मागे छत्रचामरधारी सेवेकरी नामजप करीत चालत होते. गणानाम संप्रदायाच्या वतीने संत गजानन महाराज पालखीमध्ये नृत्य करीत भक्तगण सहभागी झाले होते.
 • स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सेवेकरीही पालखी घेऊन या दिंडीत सहभागी झाली होते.
 • या दिंडीत नांद्रा, कानळदा येथील ग्रामस्थ टाळ मृदुंगासह, तर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या.

ठळक !

 • एवढ्या भव्य दिंडीसाठी अगदी मोजक्या पोलिसांचा बंदोबस्त होता. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेवरचा पोलिसांचा विश्‍वास यातून लक्षात आला.
 • दिंडीच्या अखेरीस उपस्थितांकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी केले.

हिंदूंमध्ये आत्मसन्मान जागृत करणारी आणि
त्यांच्या मनांत शौर्याचे अंकुर फुलवणारी दिंडी अशी झाली…!

‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अश्‍वारूढ छत्रपती शिवराय, अटकेपार झेंडा फडकवणारे थोरले बाजीराव पेशवे आणि शौर्याचे प्रतिक महाराणा प्रताप यांचे स्मरण आम्हाला सदैव करायचे आहे’, असा संदेश देण्यासाठी तशी वेशभुषा केलेले युवक दिंडीच्या अग्रस्थानी चालत होते.

रणरागिणींच्या तलवारबाजीची प्रात्यक्षिके !

 • आज राष्ट्र संकटात आहे. हिंदू, हिंदूंची मंदिरे आणि हिंदूंच्या स्त्रियाही संकटात आहेत. आज हिंदु माता-भगिनींना सक्षम बनण्यास उद्युक्त करणारे तलवारबाजीचे प्रदर्शन पारंपरिक वेशातील रणरागिणींनी केले. युवतींमध्ये शौर्यत्व जागृत करणारी ही चित्तथरारक शिवकालीन युद्धकला सादर करून रणरागिणींनी युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचा संदेशच जणू दिला. रणरागिणींनी केलेली लाठीकाठी आणि ढाल तलवारींच्या युद्धकलेची प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते.
 • चोपडा येथील युवतींचे लेझीम पथकही दिंडीत सहभागी झाले होते.
 • वाहनावर उभ्या राहीलेल्या तलवारधारी रणरागिणी झाशीच्या राणीचे स्मरण करून देत होत्या.

मर्दानी खेळांची आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके !

 • धर्माभिमानी युवकांनी चौकाचौकात सादर केलेली विविध मर्दानी खेळांची, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके म्हणजे ‘हिंदूंवरील संकटांचा सामना करण्यासाठी शौर्यजागरण हेच उत्तर आहे !’, असा संदेशच होता. हिंदूंवरील संकटांना तोंड देण्यासाठी आज केवळ हिंदूसंघटन पुरेसे नाही, तर हिंदूंना स्वसंरक्षणार्थ शौर्याचे प्रदर्शन करणारी कृतीही आगामी काळात करावी लागेल, हेही यातून सूचित झाले.
 • कानळदा येथील धर्मप्रेमींनी केलेल्या लाठी युद्ध, तलवार युद्ध, भाला चालवणे या प्रात्यक्षिकांनी क्षात्रतेजाचे बीज पेरले.

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीचे आदर्श !

 • महान भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणारे दिंडीतील बालसाधक सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र झाले. दिंडीमध्ये वारकरी संत परंपरेतील संत ज्ञानेश्‍वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, समर्थ रामदासस्वामी, संत मीराबाई यांच्या वेशभूषेत सहभागी बालसाधकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
 • नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या राष्ट्रपुरुषांच्या रूपात बालसाधकांनीही क्रांतीवीरांची आठवण नागरिकांना करून दिली.

घोषणांनी केली वातावरणनिर्मिती !

 • या वेळी दिलेल्या ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘एकच ध्येय एकच लक्ष हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र’, ‘हर हर महादेव’, ‘राम राम जय श्री राम’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी हिंदूंमध्ये कृतीशीलतेसाठी उद्युक्त होण्याची प्रेरणा निर्माण केली !
 • हिंदु महासभेच्या वतीने स्वांतत्र्यवीर सावरकरांचे हिंदु राष्ट्राविषयीचे विचार चित्ररथाद्वारे मांडण्यात आले होते.
 • हरिविठ्ठल नगरातील धर्माभिमान्यांनी केलेला ‘रायरेश्‍वरावर छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याची शपथ घेतांना’चा सजीव देखावा या दिंडीत सहभागी झाला होता.

दिंडी पाहून दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या
प्रतिमेत श्रीकृष्णाचे दर्शन झाले ! – सौ. लता वाणी, एक नागरिक

ही दिंडी पाहून मला पुष्कळ आनंद वाटला. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून पुष्कळ चांगले वाटले. त्यांच्या या प्रतिमेत प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे दर्शन झाले. ते श्रीकृष्णच आहेत, असे त्यांच्या चेहर्‍याकडे पाहून वाटले आणि आपोआपच हात जोडले गेले !

सौ. शोभा चव्हाण, शिरपूर : ही दिंडी पाहून हिंदु धर्माविषयीचा अभिमान वाढला. हिंदु महिलांनी ब्युटी पार्लरमध्ये वेळ घालवण्याऐवजी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे वाटते.

श्री. अक्षय खैरनार, पोलन पेठ जळगाव : आजची ही दिंडी पाहून जळगावमध्ये आज एक अविस्मरणीय सोहळा झाला आहे, असे वाटले.

श्री. महेंद्र त्र्यंबक शिरूडे, जळगाव : उत्तम व्यवस्थापन, निटनेटकेपणा आणि सत्य दाखवणारे एक पथसंचलन !

श्री. सुदर्शन जाधव, जळगाव : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेने घेतलेला पुढाकार अतिशय उत्तम आहे !

हिंदूंचा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद !

 • हिंदु जनजागृती समितीच्या जळगावच्या फेसबूक पानावरून अवघ्या दोन घंट्यांत दीड लक्षांहून अधिक हिंदूंनी ही दिंडी थेट पाहिली.
 • दैनिक जनशक्तीने त्यांच्या फेसबूक पानावरून दिंडीचे थेट प्रसारण केले.
 • दिंडी मार्गस्थ होत असतांना त्या पथावरून जाणारे आजूबाजूचे नागरिकही उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन दिंडीला पाठिंबा दर्शवत होते ! त्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिंडीत सहभागी झालेल्याचा उत्साह द्विगुणित झाला.
 • काही धर्माभिमानी हिंदू या शौर्यजागरण प्रात्यक्षिकांचे ध्वनीचित्रीकरण करत होते.
 • काही हिंदूंनी त्यांच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे केली.
 • ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत पुष्पवर्षाव करून करण्यात आले.
 • रस्त्यावरील हिंदूंनी साधकांना बोलवून त्यांचे दिंडीविषयीचे अभिप्राय स्वतःहून आवर्जून नोंदवले.

मान्यवरांना लक्षात आलेले हिंदु राष्ट्राचे महत्त्व !

१. श्री. हेमंत अलोने, संपादक, दै. देशदूत (कान्हादेश आवृत्ती)

आपला देश निधर्मी आहे याचा अर्थ धर्माच्या अवमानाचा अधिकार कुणालाही मिळतो असे नाही. हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था धर्मजागरणाचे कार्य करते, हे अभिमानास्पद आहे.

२. श्री. नितीन लढ्ढा, महापौर, जळगाव महानगरपालिका

हिंदुबहुल भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी प्रत्येक भारतियाने केली पाहिजे. या दिंडीप्रमाणे जर हिंदु एकत्र आले, तर श्रीराम मंदिर उभारण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात पहायला मिळेल.

क्षात्र आणि धर्म तेज जागवणार्‍या हिंदू एकता दिंडीच्या
अखेरीस मान्यवरांच्या विचारमंथनाने केले हिंदूंना अंतर्मुख !

प्रत्येकाने या कार्यात आध्यात्मिक उन्नती करून घेणे,
हीच खरी गुरूंप्रती कृतज्ञता असणार आहे ! – पू. नंदकुमार जाधव

सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत अनेक उपक्रम घेतले जात आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी अध्यात्म आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचे लिखाण केले. गुरुकृपायोग या जलद आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाद्वारे अनेक साधकांच्या जीवनाचा उद्धार झाला आहे. भारत हा देश विश्‍वाचा आध्यात्मिक गुरु म्हणून विराजमान होणार आहे. प्रत्येकाने या कार्यात आध्यात्मिक उन्नती करून घेणे हीच त्यांना खरी कृतज्ञता असणार आहे.

सनातन संस्थेमध्ये संस्कारी पिढी घडवली जाते ! – कु. रितेश पाटील,
हिंदु राष्ट्रातील भावी पिढीचे प्रतिनिधित्व करणारा सनातनचा बालसाधक

उच्च स्वर्गलोकातील बालसाधक कु. रितेश पाटील (वय १३ वर्षे) या वेळी म्हणाला, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सात्त्विक आई-वडील मिळाले. विश्‍वात असे कार्य करणारे कोणीही नाही, असे वाटते. आजकालची लहान मुले अनावश्यक बोलणे, भ्रमणध्वनीवर खेळणे अशा गोष्टींत रमतात; मात्र सनातन संस्थेतील मुले सतत नामजप करतात. सनातन संस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची संस्कारी पिढी घडवली जात आहे.’’

काही क्रांतीकारकांची वेशभूषा झालेल्या बालसाधकांनीही त्यांचे विचार या वेळी व्यक्त केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हिंदु
राष्ट्राचे कार्य सिद्धीस जाणार ! – ह.भ.प. प्रसाद महाराज

यानंतर चोपडा येथील ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी म्हणाले, ‘‘ही दिंडी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्णाच्या कृपेमुळे इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात कोरली जाईल. परात्पर गुरु डॉ. आठवले हे कार्य सिद्धीस नेणारच आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, याची निश्‍चिती वाटते.’’

हिंदु महासभेचे प्रदेश कार्यवाह अधिवक्ता गोविंद तिवारी म्हणाले ‘‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करायला हवेत.’’

‘हिंदू एकता दिंडीने’ हिंदूंमधील शौर्य जागवले आहे ! – सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘या हिंदू एकता दिंडीने हिंदूंमधील शौर्य जागवले आहे. या शौर्यामुळेच आपण हिंदु राष्ट्र स्थापन करू शकू.

या वेळी श्री. घनवट यांनी ‘‘आपण या हिंदु राष्ट्राचे केवळ साक्षीदार नाही, तर भागीदार होणार का ?’’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर उपस्थित करून सर्वांनी हात उंचवून ‘‘ आम्ही हिंदु राष्ट्राचे भागीदार होणार’’, असे सांगितले.

हिंदु धर्माभिमान्यांकडून दिंडीचे स्वागत !

दिंडी मार्गस्थ होत असतांना टॉवर चौक येथे वीर सावरकर रिक्शा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीप सपकाळे त्यांचे सहकारी श्री. विलास ठाकूर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर चित्रा चौक येथे धर्मप्रेमी व्यापारी श्री. निलेश संघवी आणि श्री. महेंद्र विसपुते यांनी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे मस्वागत केले.

इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ माजी नगरसेवक श्री. शाम कोगटा आणि नगरसेवक श्री. मनोज चौधरी यांनी दिंडीचे स्वागत करून दिंडीतील धर्माभिमानी हिंदूंना सरबताचे वाटप केले.

युवा फाऊंडेशनच्या वतीनेही टॉवर चौकात पाणीवाटपाचे नियोजन केले होते.

जळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’त भक्ती आणि शक्ती यांचा जागर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेल्या पालखीने केली चैतन्याची पखरण !

जळगाव येथील हिंदू एकता दिंडीतील परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र असलेली पालखी

जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ मे या दिवशी येथे आयोजित केलेल्या ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदूंचे शौर्यजागरण होण्यास चालना मिळाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेली, पुष्पहारांनी सजवलेली, चैतन्याची पखरण करत मार्गस्थ होणारी पालखी हे या दिंडीचे वैशिष्ट्य होते. पालखी घेणार्‍या धर्माभिमानी मावळ्यांसह पालखीचे दर्शन झालेले सारेच हिंदु नागरिक पालखीच्या दर्शनाने कृतकृत्य होऊन गेले !

या दिंडीत सहभागी झालेले हिंदु राष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगलेले धर्माभिमानी मावळे आणि रणरागिणी यांच्या वैविध्यपूर्ण स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. संतांची वंदनीय उपस्थिती लाभलेल्या आणि हिंदूंमध्ये त्यांच्या सामर्थ्याचा आत्मविश्‍वास निर्माण करणार्‍या या दिंडीमुळे जळगावमधील हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयात प्रज्वलित झालेली हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत अधिक तेजःपूंज झाली ! या दिंडीत ६०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

जळगाव हिंदू एकता दिंडीत झाला भक्ती-शक्तीचा आविष्कार ।

लवकरच होईल आता हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्न साकार ॥

धर्मध्वजपूजन

(डावीकडून) ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी, अधिवक्ता देवेंद्र पेंडसे, ह.भ.प. प्रसाद महाराज, श्री. सुनील घनवट, पू. नंदकुमार जाधव आणि अन्य मान्यवर, तसेच धर्मध्वजाच्या पूजनाचे पौरोहित्य करतांना श्री. योगेश्‍वर जोशी, (बसलेले डावीकडून) महापौर नितीन लढ्ढा आणि दैनिक देशदूतचे संपादक श्री. हेमंत अलोने

गोमातापूजन

गोमातेचे पूजन करतांना अधिवक्ता श्री. सुशील अत्रे
हिंदुत्वनिष्ठ विश्‍वजननी गोमातेला पुजती । लाभली दिंडीस्थळी ३३ कोटी देवतांची उपस्थिती ॥

शंखनाद

शंखनाद करतांना धर्माभिमानी हिंदू एकतेचा झाला हुंकार । ६ शंखनादासह वाद्यगजर झाला त्रिवार ॥
हिंदू जन सारे हर्षू लागले, मुखे जयघोष गर्जू लागले । एकसंघ आम्ही, आमचे एकच लक्ष्य, हवे आता आपुले हिंदु राष्ट्र ॥
डावीकडून १. अधिवक्ता देवेंद्र पेंडसे, २. श्री. विश्‍वनाथ जोशी, ३. (मागे) शिवसेनेचे श्री. गजानन मालपुरे, ४. अधिवक्ता श्री. सुशील अत्रे, ५. (मागे) शिवसेनेचे श्री. शाम कोगटा, ६. महापौर श्री. नितील लढ्ढा, ७. पू. नंदकुमार जाधव आणि ८. देशदूतचे संपादक श्री. हेमंत अलोने
हाती घेता भवानी तलवार जगदंबा दुर्गामातेचा झाला संचार । अबला, दुर्बल, लाचार न होता सद्र्क्षणार्थ करू आम्ही दुष्टांचा संहार ॥
वीरपुत्र शासक महाराणा प्रताप अश्‍वावर विराजमान । घेऊन आदर्श तयांचा घडवू इतिहास दैदिप्यमान ॥
प्रात्यक्षिके पहाण्यासाठी अलोट गर्दी जमली । ढाल, तलवार, लाठी-काठी यांमुळे जनतेतही वीरश्री संचारली ॥
बालरूपी संत अवतरले । सगुणरूपी ईश्‍वराचे दर्शन झाले ॥ भाविक नतमस्तक झाले । कृतज्ञता अश्रू नयनांतूनी बरसले ॥
उपासक हिंदु राष्ट्राचे करू नित्य स्मरण क्रांतीकारकांचे । आदर्श घेऊनी राष्ट्रपुरुषांचा करूया रक्षण राष्ट्र-धर्माचे ॥

दिंडीत शिवकालीन साहसी युद्धाची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी
सनातनच्या साधिकांना ती शिकण्यात मोलाचे सहकार्य करणारे श्री. शेखर कुळकर्णी !

जळगाव येथील स्वामी विवेकानंद व्यायामशाळेचे श्री. शेखर कुळकर्णी यांनी शिवकालीन साहसी युद्धाची, तसेच लाठी-काठी, ढाल-तलवार, दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके सनातनच्या साधिकांना एक सप्ताह शिकवली. विराट दिंडी पाहून प्रेरित झालेले कुळकर्णी म्हणाले, ‘‘धर्मासाठी लढणार्‍या युवक-युवतींना साहसी युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी मला कधीही बोलवा. मी सर्व हिंदु धर्माभिमान्यांना विनामूल्य शिकवेन.’’

जयजयकार जळगाववासियांचा …

प्रभु श्रीरामांच्या पावनभूमीत हिंदु एकतेची ललकारी उठली ।

मार्गदर्शनांतून वक्त्यांच्या वाघाची डरकाळीही फुटली ॥ १ ॥

संतसाधक धर्मवीर आणि आले क्रांतीकारी ।

एक झाले सारे हिंदु राष्ट्र स्थापण्या सत्वरी ॥ २ ॥

शिवबा अन् झाशीची राणी यांचे आशीर्वाद असती पाठी ।

कटिबद्ध राहू सदा राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी ॥ ३ ॥

हिंदुत्वनिष्ठांचा हिंदू ऐक्य दिंडीतील सहभाग म्हणजे त्यांनी धर्मकर्तव्य म्हणून धर्मसंस्थापनेसाठी दिलेले योगदानच आहे. राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील होणारे हिंदू म्हणजे उज्ज्वल अशा हिंदु राष्ट्राची चाहूलच आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात