परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेत घडण्यासाठी दिलेली ईश्‍वरी भेट म्हणजे फलकमूर्ती, म्हणजे चुकांचा श्रीफलक ! – सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. एखाद्याने अनेक वर्षे कितीही कठोर साधना केली, तरी त्याचे दोष
आणि अहं यांचे निर्मूलन होत नाही, तोपर्यंत तो जीव ईश्‍वराशी एकरूप होऊ न शकणे

सनातन संस्था अशी एकमेव आध्यात्मिक संस्था आहे, जिथे गुरुकृपायोगाने साधक ईश्‍वरप्राप्तीसाठी साधनारत आहेत. या साधनेचा मूळ पाया, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ! एखाद्याने अनेक वर्षे कितीही कठोर साधना केली; पण त्याचे दोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले नाही, तर तो जीव ईश्‍वराशी एकरूप होऊ शकत नाही. ज्या मनात अनावश्यक विचार, विकार, दोष वास करतात, तिथे देव तरी कसा बरे राहील ? याचसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना दिलेली दिव्य ईश्‍वरी भेट, म्हणजे चुकांचा श्रीफलक !

२. फलकावर चुका लिहिल्याने साधकाला चुकांची जाणीव होणे आणि इतरांनाही त्यातून शिकता येणे

सनातनच्या सर्व आश्रमांमधे आपल्याला एक मोठा फलक लावलेला दिसतो. साधक त्यावर स्वत:च्या चुका लिहितात. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना फलकावर चुका लिहिण्यास शिकवले आहे. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. साधकाला केवळ चुकांची जाणीव होणे पुरेसे नाही, तर त्याने केलेली चूक इतरांनाही कळावी आणि त्यांनाही त्या चुकीतून शिकता यावे.

आ. त्या साधकाचे दोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे.

३. चुकांचा फलक, म्हणजे साक्षात् भगवंताची मूर्ती श्रीफलक आहे !

चुका लिहिण्याच्या फलकाचे महत्त्व विशद करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणाल्या, फलकाच्या रूपात प्रत्यक्ष देवच आपल्यासाठी आश्रमात अखंड उभा आहे. दिसायला काळा; पण सर्व भक्तांचे दु:ख हरण करणारा पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे. तसाच हा श्रीफलकाच्या रूपातील भगवंत सनातनच्या साधकांसाठी त्यांचे अहं-निर्मूलन करून दोष हरणासाठी अविरत उभा आहे. देवाला आपला भाव अपेक्षित आहे. फलकावर चूक लिहितांना श्रीफलक पहात असतो, आपण काय भाव ठेवून चुका लिहीत आहोत ? साधकाला त्याच्या चुकीची खंत किती आहे ? यावरून त्याचे पापक्षालन करण्यास हा श्रीफलक साहाय्य करत असतो. भक्ताला देवाशी जोडायला जसे देवाचे सगुण रूप आवश्यक, तसेच हा फलक साधकांना गुरूंच्या तत्त्वाशी एकरूप होण्यास साहाय्य करतो. दु:खांचे हरण करणारा देव, तसे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारा हा श्रीफलक आहे.

४. फलकावर चूक लिहिणे, म्हणजे देवाच्या एक पाऊल जवळ जाणे

जशी चुकीची जाणीव महत्त्वाची, तशीच ती समष्टीलाही कळावी, त्यातून इतर साधकांनाही बोध घेता येईल, शिकायला मिळेल आणि या प्रक्रियेमधून माझेही पापक्षालन होत आहे, असा भाव ठेवून चूक लिहिल्यास ती साधकाला देवाच्या एक पाऊल जवळ नेते. आपल्याला साधनेतला आनंद देते. आपण जेव्हा एक पाऊल देवासाठी पुढे टाकतो, तेव्हा देव आपल्यासाठी दहा पावले पुढे येतो.

५. फलकावर चुका लिहितांना प्रार्थना, क्षमायाचना आणि कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक

मंदिरात गेल्यावर देवाला पाहून जसा आपोआप भाव जागृत होतो आणि आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेत येतात, तसेच या श्रीफलकाला पाहून होते. गुरुमाऊलींच्या कृपेमुळे या श्रीफलकाची कृपा आमच्यावर अखंड आहे.

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

६. कृतज्ञता

आश्रमात येता-जाता आम्ही प्रतिदिन हा चुकांचा श्रीफलक पहातो. त्यावर चुकाही लिहितोे; पण आज या फलकाचे खरे महत्त्व सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या माध्यमातून देवाने पटवून दिले. त्यांनीच सांगितलेल्या सूत्रांमुळे मला हा लेख लिहिता आला. सद्गुरुकृपेने आम्हा साधकांना श्रीफलकाचे खरे दर्शन देवाने घडवले. साधकाला साधनेत साहाय्य करणारी प्रत्येक गोष्ट देवस्वरूपच आहे, हेही शिकायला मिळाले. सद्गुरुचरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

– श्री. दिवाकर आगावणे, चेन्नई, तमिळनाडू. (१३.४.२०१७)

फलकावर चुका लिहितांना करावयाच्या प्रार्थना आणि कृतज्ञता

अ. प्रार्थना

१. हे श्रीफलका, माझ्याकडून झालेल्या या चुकीसाठी मला क्षमा कर. माझ्या चुकीचे क्षालन होऊ दे.

२. हे श्रीकृष्णा, मी लिहीत असलेल्या या चुकीवर तुझे मोरपीस हळूवार फिरव आणि यातील पाप नष्ट कर.

३. देवा, मी लिहीत असलेल्या या चुकीकडे तुझे लक्ष असू दे.

४. देवा, ही चूक मी येथे लिहीत आहे; पण ती माझ्या अंत:करणावर कोरली जाऊ दे. जेणेकरून मला तिच्यातून शिकून साधनेत पुढे जाता येईल.

५. सकाळी उठल्यावर केव्हा एकदा येऊन मी येथे चूक लिहितो, अशी माझी तळमळ वाढू दे.

६. चूक लिहिण्यास जेवढा अधिक वेळ लागेल, तेवढे माझे पाप वाढत जाईल, याचीही मला जाणीव असू दे.

आ. कृतज्ञता

हे श्रीफलका, तुझ्या चरणांवर मस्तक ठेवून मी कृतज्ञता व्यक्त करतो, तुझ्यामुळे आज मला देवाची कृपा संपादन करण्याची संधी मिळत आहे. माझ्याकडून अशा भावाने चूक लिहिली जाऊ दे की, त्या प्रत्येकीतून शिकून मला देवाजवळ जाता येईल.

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात