कोल्हापूर येथे शिकवणीवर्गातील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठमधील श्री. अनिल सूर्यवंशी यांच्या शिकवणीवर्गात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ताण-तणावाची कारणे, आनंदी रहाण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी नामजप आणि प्रार्थना यांचा होणारा लाभ यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नामजप कोणत्या देवतेचा आणि कसा करायचा, श्री दत्ताचा नामजप का करायचा ? असे प्रश्‍न जिज्ञासूपणे विचारले.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी
आठवले यांचे कार्य महान आहे ! – श्री. अनिल सूर्यवंशी

व्याख्यानानंतर श्री. अनिल सूर्यवंशी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतो. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले करत असलेले कार्य अतिशय महान आहे. ते समाजाला घडवत आहेत.

या वेळी श्री. सूर्यवंशी यांनी शिकवणीवर्गात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा संच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच पुन्हा व्याख्यानाचे नियोजन करूया, असेही सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात आलेले अन्य उपक्रम !

१. कोल्हापूर आणि उंचगाव येथील तुलसी गॅस एजन्सी आणि उद्यमनगर (कोल्हापूर) येथे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.

२. उजळाईवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी  २२ जिज्ञासू उपस्थित होते. सुभाषनगर येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. सातपुते यांच्या घरी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

३. इचलकरंजी येथील चंदूर, कबनूर, कबनूरमधील लक्ष्मीनगर आणि गोकुळ चौक येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

इचलकरंजी येथे युवा शौर्य जागरण शिबीर

इचलकरंजी : येथील सनातनच्या साधिका सौ. समता बोहरा यांच्या घरी युवा शौर्य जागरण शिबीर घेण्यात आले. या शिबिराला २५ हून अधिक महिलांची उपस्थिती होती. रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती मिरजे आणि सौ. शर्वरी रेपाळ यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात