पुणे येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य जागरण करणारी भव्य हिंदू एकता दिंडी !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाला भारतभर उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘एकच लक्ष्य – एकच ध्येय – हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!’ घोषणेने पुणे दुमदुमले !

पुणे येथे हिंदू एकता दिंडीत १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग

पुणे : सनातन संस्थेचे संस्थापक, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत आणि ‘हिंदु राष्ट्रा’चे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’चा एक भाग म्हणून येथे वीरश्री आणि शौर्य जागरण करणारी भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ १४ मे या दिवशी पार पडली. दिंडीमध्ये जातपात अन् पद, पक्ष विसरून सहभागी झालेले विविध हिंदुत्वनिष्ठ, विविध आध्यात्मिक संघटना, विविध संप्रदाय, सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, सनातनचे साधक, समितीचे कार्यकर्ते अशा १ सहस्र ५०० हून अधिक जणांनी भावपुष्प अर्पण करत ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय – हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!’ अशी घोषणा दिल्याने आसमंत दुमदुमला. हिंदु राष्ट्राच्या जयजयकारामुळे पुण्याच्या भूमीत चैतन्याचीच एकप्रकारे उधळण झाली अन् त्याद्वारे सर्वांमधील धर्मप्रेम जागृत झाले. दिंडीचा प्रारंभ सारसबाग येथील श्री गणपति मंदिरापासून होऊन बाजीराव रस्ता मार्गे श्री कसबा गणपति मंदिर येथे सांगता करण्यात आली.

धर्मध्वजाचे पूजन !

१. दिंडीमध्ये सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (श्रीमती) निर्मला दाते यांची वंदनीय उपस्थिती लाभली. स्फूर्तीदायी वातावरणात निघालेल्या दिंडीमध्ये प्रारंभी समितीचे कार्यकर्ते श्री. विजय चौधरी यांनी केलेला शंखनाद,  शिवकालीन मर्दानी खेळांचे पथक, रणरागिणी अन् धर्मवीर यांचे पथक, लेझीम यांमुळे वातावरणात वीररस निर्माण झाला होता.

२. दिंडीच्या प्रारंभी असणारा धर्मध्वज, संतांची उपस्थिती, रामनामाचा गजर आणि आध्यात्मिक संप्रदायांचा सहभाग यांतून ब्राह्मतेज प्रक्षेपित होत होते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय आणि आनंददायी चित्ररथाकडे पाहून सर्वांमध्ये कृतज्ञता भाव दाटून येत होता.

४. काही ठिकाणी सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक यांनी या दिंडीचे स्वागत करून कृतज्ञतापर पुष्पवृष्टी केली आणि ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी ठिकठिकाणी निघणार्‍या दिंडींवर अशाच प्रकारची पुष्पवृष्टी होईल’, याची चुणूक त्याद्वारे दाखवून दिली.

५. दिंडीमध्ये असलेले ‘आपत्काळातील संजीवनी – प्रथमोपचारा’चे पथक यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग दर्शवून दिंडीला व्यापक हिंदुत्वाचे स्वरूप दिले.

‘राष्ट्रपुरुषांचा इतिहास’ दर्शवणारे बालसाधक आणि त्यातून झालेले विचारप्रवण

हिंदु ऐक्य दिंडीमध्ये काही बालसाधक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वेश परिधान करून ‘राष्ट्रपुरुषांचा इतिहास’ दर्शवण्याचा भाग म्हणून सहभागी झाले होते. त्यासह ‘हिंदु राष्ट्रातील भावी पिढी’ असा फलक हाती घेतलेले उच्च लोकातून पृथ्वीतलावर आलेले बालसाधकही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. या दिंडीच्या सांगतेप्रसंगी वरील बालसाधकांनी राष्ट्रपुरुषांची सध्याच्या स्थितीवरील मनोगत स्वरूपातील आवेशपूर्ण भाषणे केली. त्याद्वारे समाजातील नागरिकांना विचारप्रवण केले.

लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना उदंड प्रतिसाद !

त्र्यंबकेश्‍वर प्रतिष्ठानच्या लहान वयापासून ते ४० वर्षांपर्यंतच्या मावळ्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी दाखवली. ही प्रात्यक्षिके दाखवली जात असतांना त्याला जिज्ञासू आणि मार्गस्थ यांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रात्यक्षिके आणि दिंडी मार्गस्थ होत असतांना मार्गावर दुतर्फा अनेक लोक पहात होते. इमारतीतील अनेक जण ‘टेरेस’वरून, घराच्या गच्चींमधून, बसच्या खिडकीतून प्रात्यक्षिके पहात होते. अनेक जणांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकांची छायाचित्रे आणि चलचित्रफीत भ्रमणभाषमध्ये काढून घेतली. दिंडीच्याही प्रारंभी अनेक जणांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके उत्सुकतेने पाहिली. लहान मुलांची लाठीकाठीची प्रात्यक्षिके पाहून अनेकांनी ‘आपणही ही प्रात्यक्षिके शिकली पाहिजेत’, असे अभिप्राय व्यक्त केले.

सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिववंदना संघ, योग वेदांत सेवा समिती, परशुराम सेवा संघ, शिव गोरक्ष समिती, गौड ब्राह्मण संघ, पुरोहित संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

१. दिंडीच्या प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन येथील धर्माभिमानी श्री. हनुमंत आंबावडीकर आणि सौ. साधना आंबावडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. पौरोहित्य ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. विश्‍वास नाईक यांनी केले.

२. शंखनाद करून हिंदुत्वनिष्ठ श्री. मुकुंद मासाळ यांनी श्रीफळ वाढवले. त्याच वेळी सारसबागेमधील श्री सिद्धीविनायकाच्या चरणी गार्गी फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे आणि सौ. सुहासिनी गावडे, श्री. हनुमंत आंबावडीकर अन् सौ. साधना आंबावडीकर, ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. दीपक आगवणे यांनी साकडे घातले.

३. लाठीकाठी, नानचाकू यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. श्री गणेशाचा श्‍लोक म्हणून दिंडीला प्रारंभ झाला.

दिंडीवर ठिकठिकाणी करण्यात आलेली स्वागतपर पुष्पवृष्टी

अ. सदाशिव पेठेतील माडीवाले वसाहत (कॉलनी) येथे दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. भालचंद्र सदाशिव भिडे, श्री. रमेश बेंगरुट आणि सौ. कल्पना बेंगरुट यांनी धर्मध्वजावर पुष्पवृष्टी केली.

आ. बाजीराव रोड नातूबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद कोंढरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह दिंडीचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. तसेच त्यांनी दिंडीच्या स्वागताचा कापडीफलक लावला होता. यासह ध्वनिक्षेपकावरून दिंडीच्या स्वागताची उद्घोषणा केली.

इ. शनिपार चौकामध्ये शिवसेना उपशहरप्रमुख आणि बजरंग दलाचे माजी शहराध्यक्ष श्री. शरद गंजीवाले अन् सौ. गंजीवाले यांनी धर्मध्वजाला औक्षण करून पुष्पवृष्टी केली.

ई. शनिवारवाड्याजवळील श्रीपाद इडली सेंटरचे श्री. संतोष नगरकर आणि नवग्रह मित्र मंडळाचे श्री. मानसिंग पाटोळे यांनी सपत्नीक धर्मध्वजावर पुष्पवृष्टी केली.

उ. जनार्दन पवळे संघाच्या वतीने श्री. सुधीर डाखवे यांनी श्री कसबा गणपति मंदिराजवळ आल्यावर धर्मध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

चैतन्य प्रदान करणारे हिंदुत्वनिष्ठांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

दिंडीच्या सांगतेच्या वेळी तिचे रूपांतर एका छोट्या धर्मसभेत झाले. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या अमूल्य कार्यात सहभागी होऊया ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

प.पू. डॉ. आठवले यांनी १९९८ मध्येच सांगितले आहे की, वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्व हिंदु संघटनांना एकत्रित करण्यासाठी हिंदु अधिवेशन घेतले होते. तसेच प.पू. डॉक्टरांनी अखिल भारतीय हिंदु अधिवेशन समितीद्वारे आयोजित करणारे ते ‘युगपुरुष’ आहेत. महर्लोक, स्वर्गलोक येथील जीव हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी भूतलावर जन्म घेण्यास आसुसलेले आहेत. असे असतांना आपण सर्वांनीही या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा देऊया आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊया.

हिंदु स्वाभिमान आणि सत्त्व यांचे प्रतीक म्हणजे
सुवर्ण सिंहासन ! – पराशर मोने, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन इस्लामिक शासकांच्या छाताडावर बसून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी सुवर्ण सिंहासनावर बसून हिंदवी स्वराज्य चालवले. ते श्रीमंत योगी होते. त्यांचे सुवर्ण सिंहासन हे हिंदु स्वाभिमान आणि सत्त्व यांचे प्रतीक होते. तोच हेतू डोळ्यांसमोर ठेवून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना पू. संभाजी भिडेगुरुजी हे ३२ मण सुवर्ण सिंहासन बसवणार आहेत.

समाजात आत्मसन्मान आणि शौर्यजागरण करणे आवश्यक ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

देशामध्ये सध्या अराजकाची स्थिती असून धर्मावर लव्ह जिहाद, धर्मांतर यांद्वारे आघात होत आहेत. सर्व प्रकारच्या समस्यांवर एकमात्र उपाय असून तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना. त्यासाठी सर्व हिंदु धर्मीयांनी जातपात, पद, पक्ष, संघटना विसरून एक ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हायला हवे. समाजात आत्मसन्मान आणि शौर्यजागरण करणे आवश्यक असून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन, धन आणि प्रसंगी प्रार्णापण करून सहभागी व्हायला हवे.

हिंदुत्वनिष्ठांनी घेतलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

दिंडीच्या सांगताप्रसंगी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सांगितली.

‘‘हे श्रीकृष्णा, आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही मार्गक्रमण करू! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनू ! प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आदर्श पथावरून वाटचाल करू ! आमच्या सर्वश्रेष्ठ अशा पूर्वज ऋषिमुनींनी घालून दिलेल्या परंपरांचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू ! त्यांनी निर्माण केलेले धर्मग्रंथ, संस्कृती, परंपरा आदींचे आम्ही काटेकोरपणे पालन करू ! आम्ही आमचा धर्म, देवळे, गायी आणि स्त्रिया यांचे प्राणपणाने रक्षण करू ! येथून पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्पिलेले हिंदु राष्ट्र हेच आमच्या जीवनाचे ध्येय असेल आणि त्यासाठी आम्ही अखेरच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहू ! हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आता आम्ही शांत बसणार नाही ! आता लक्ष्य एकच, हिंदु राष्ट्र ! हिंदु राष्ट्र !!’’ या प्रतिज्ञेनंतर ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून सांगता करण्यात आली.

श्री सिद्धीविनायक गणपति अन् श्री कसबा गणपति येथे हिंदुत्वनिष्ठांनी घातलेले साकडे

श्री सिद्धीविनायक गणपति अन् श्री कसबा गणपति येथे साकडे घालतांना केलेली प्रार्थना – ‘‘हे श्री गणेशा, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मकार्यात येणारी सर्व विघ्ने आणि अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्र लवकरात लवकर अवतरू दे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना !’’ ‘गणपति बाप्पा मोरया ।’

नवग्रह मित्र मंडळाच्या श्री गणेशाची सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते महाआरती

दिंडीच्या सांगतेनंतर नवग्रह मित्र मंडळाच्या श्री गणेशाची महाआरती सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाच्या महिला सदस्यांनी त्यांना श्री गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान केला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. मानसिंग पाटोळे अन् पदाधिकारी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. नवग्रह मित्र मंडळाच्या सदस्या सौ. पाटोळे यांनी दिंडीमधील सहभागी धर्माभिमान्यांसाठी पाणी वाटपाची सेवा उत्स्फूर्तपणे केली.

२. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराने सरबत वाटप केले.

३. भगवे फेटे आणि हाती भगवा ध्वज यांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.

४. हाताला अस्थिभंग झालेल्या धर्माभिमानी महिलेने आणि एका धर्माभिमानी महिलेने लहान बाळाला छातीशी बांधून दिंडीमध्ये सहभाग घेतला.

५. शिववंदना ग्रुपच्या १० हून अधिक कार्यकर्त्यांनी दिंडीचे आयोजन आणि सिद्धता यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

अभिप्राय

हिंदु राष्ट्र येणारच, असा विश्‍वास वाटतो ! – हनुमंत आंबावडीकर

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जे कार्य चालू आहे, ते हिंदु राष्ट्रासाठी आवश्यक आहे. ही दिंडी हिंदु राष्ट्राची पहिली पायरी आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र येईलच, याचा विश्‍वास वाटतो. धर्मध्वज पूजन करण्याची संधी प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच मिळाली. या पूजनामुळे माझा भाव जागृत झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात