हिंदु राष्ट्राची सिंहगर्जना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊया ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

बोरीवली येथील धर्माभिमान्यांची हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटिपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा !

सौ. नयना भगत अन् दीपप्रज्वलन करतांना श्री. सुमित सागवेकर

मुंबई : आज अमेरिका, युरोप यांमधील अनेक देश स्वत:ला अभिमानाने ख्रिस्ती राष्ट्र म्हणून सांगतात; मात्र जेव्हा भारतात हिंदु राष्ट्राचा विषय काढला जातो, तेव्हा अनेकांना पोटशूळ उठतो. हिंदु म्हणून आपण एकत्र येत नाही, हे दुर्दैव आहे. जात-पात सर्व बाजूला ठेवून धर्मावरील आघात रोखण्यासाठी, हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे स्वराज्याची गर्जना केली, त्याप्रमाणे आपण हिंदु राष्ट्र स्थापनेची सिंहगर्जना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी बोरीवली येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत केले.

बोरीवली (पश्‍चिम) येथील एक्सर परिसरातील श्री लक्ष्मी-नारायण आणि श्री विश्‍वेश्‍वर मंदिरात १४ मे या दिवशी ही सभा पार पडली. सभेला १५० धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.

१. सभेच्या आरंभी श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि श्री विश्‍वेश्‍वर मंदिराचे पुरोहित श्री. नंदन व्यास यांनी केलेल्या शंखनादाने सभेचा उत्साह द्विगुणित झाला.

२. सभेत येणार्‍या अरिष्टांचे निवारण व्हावे, यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता आणि विघ्नहर्ता श्री गणेश यांच्या चरणी प्रार्थनारूपी साकडे घालण्यात आले.

३. दीपप्रज्वलनाने वातावरण चैतन्यमय झाले.

४. सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी केले.

५. समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हिंदु जनजागृती समितीच्या उत्तरोत्तर वाढणार्‍या दैवी कार्याविषयी माहिती दिली.

६. सभेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली.

विशेष सहकार्य

श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि श्री विश्‍वेश्‍वर मंदिर, श्री साई कृष्ण माऊली डेकोरेटर्स्, अनमोल डेकोरेटर्स्, शेणॉय डेकोरेटर्स् आणि शेणॉय गृहवस्तू भांडार यांनी सभेसाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

विशेष

१४ मे या दिवशी दिनांकानुसार धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती असल्याने सभास्थळी उपस्थित हिंदूंच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ४२ सहस्रांहून अधिक जणांनी सभा अनुभवली !

हिंदु राष्ट्रजागृती सभेचे ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले. ४२ सहस्रांपेक्षा अधिक जणांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून सभा पाहिली.

गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना करून जीवनाचे
सार्थक करा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सध्या आपण संतांची शिकवण विसरत चाललो आहोत. सुखासाठी आपण तन, मन आणि धन अर्पण करत असून सुखालाच आनंद समजत आहोत. खरा आनंद साधनेनेच मिळतो. परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांनी गुरुकृपायोगाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समाजाला साधना सांगितली. तशी साधना करून सर्वांनी स्वत:च्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे.

धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी १७ मे या दिवशी आढावा बैठक !

स्थळ : श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि श्री विश्‍वेश्‍वर मंदिर, ठाकूर पाखाडी गावठण, एक्सर, बोरीवली (पश्‍चिम), मुंबई.

वेळ : सायंकाळी ७.३०

बैठकीला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात