श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा (१९ मे २०१७)

कोदंडधारी प्रभु श्रीरामाच्या रुपात अवतरलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

१. श्रीगुरूंप्रतीचा कृतज्ञता सोहळा

१ अ. श्री परमगुरवे नमः ।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

१ आ. प्रार्थना

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा आजचा द्वितीय दिवस ! काल आपण अमृत महोत्सवाच्या प्रथम दिवशी भावसोहळ्यामध्ये भिजून चिंब झालो होतो. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीचे श्रीकृष्णरूप आपल्या हृदयी कसे आणि किती साठवू, असे आपल्याला झाले असेल. या अद्भुत आनंद सोहळ्यात आपली आनंदाचे डोही आनंद तरंग ।, अशी अवस्था झाली असेल. आपल्या अंतःकरणात चिरस्थायी सामावला जाईल, अशा या सोहळ्याचा दुसरा दिवसही देवता, ऋषी आणि संत यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यातील भावाचे क्षणमोती…

१ इ. कृतज्ञता

हे गुरुराया, आम्ही कृतज्ञ आहोत. अनेक जन्म आम्ही दिशाहीन झालो असतांना आणि या घोर कलियुगाच्या वादळात आमची जीवननौका भरकटली असतांना, तूच आम्हाला या भवसागरातून तारण्यासाठी धावून आलास आणि आमच्या हाताचे बोट धरून आम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवलास. यासाठी आम्ही कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी थोडीच आहे.

१ ई. प्रार्थना

आपण सर्व जण डोळे मिटून प्रार्थना करूया.

१. हे कमलनयना, तुझ्याप्रती माझ्या अंतःकरणात दृढ भाव तूच निर्माण कर.

२. हे भगवंता, हे तुझे पृथ्वीवरील सदेह रूप आहे आणि त्याची सेवा केल्यामुळे तुझी कृपा होऊन मला तुझी प्राप्ती होणार आहे, याची मला सतत जाणीव असू दे.

३ हे दयाघना, तूच कर्ता आणि करविता आहेस, असा भाव माझ्यामध्ये निर्माण कर.

४. हे श्रीधरा, तूच सर्व चराचरात व्यापलेला आहेस, असा भाव माझ्यात सतत असू दे.

५. हे जानकीवल्लभा, तू जसे तुझ्या भक्तांवर अलोट प्रेम करतोस, तसे प्रेम तुझ्या कृपेने मलाही सर्वांवर करता येऊ दे.

६. हे दशरथनंदना, माझ्या साधनेत आणि गुरुकार्यात आध्यात्मिक त्रासांमुळे येत असलेले अडथळे दूर होऊ देत.

८. हे कोदंडधारी प्रभु श्रीरामा, मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासांशी क्षात्रवृत्तीने कसे लढायचे ?, ते तू मला शिकव.

७. हे राघवा, मी करत असलेला नामजप आणि प्रार्थना यांचे संरक्षक-कवच सतत माझ्याभोवती निर्माण होऊ दे.

९. हे केशवा, मानवाचा जन्म मिळणे आणि भारत देशासारख्या पुण्यभूमीमध्ये हिंदु म्हणून जन्माला येणे, ही सर्व तुझीच कृपा आहे, याची आम्हाला जाणीव होऊ दे.

१०. हे राजारामा, हिंदु धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आम्हाला प्रतिदिन अधिकाधिक वेळ देता येऊ दे.

११. हे हनुमंतांच्या प्रभुनाथा, हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर येणार्‍या संकटांना सामोरे जाण्यासाठी आम्हा हिंदूंमध्ये सांघिक भाव निर्माण कर.

१२. हे रामराया, तिसर्‍या महायुद्धाला तोंड देता येण्यासाठी आम्हा सर्व साधकांकडून तुला अपेक्षित अशी साधना करवून घे.

१३. हे अच्युता, आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी आम्हा सर्व साधकांमध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य तूच निर्माण कर. या कालावधीत सर्व साधकांचे रक्षण होऊ दे.

१४. हे मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामा, माझे जीवनही तुझ्यासारखे आदर्श बनावे, यासाठी तुझी कृपा माझ्यावर होवो.

 

२. श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले
यांचे शुभागमन आणि सिंहासनावर विराजमान होणे

ज्यांनी पीतांबर परिधान केले आहे, ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत आणि जे प्रसन्न असून आम्हा सर्वांवर ज्यांची दृष्टी आहे, ज्यांची कांती तेजस्वी आहे, जे अलंकारांनी सुशोभित आहेत, ज्यांच्या पाठीला बाणांचा अक्षय भाता आणि डाव्या हातात कोदंड नावाचा धनुष्य आहे, ते प्रभु श्रीरामरूपी श्री श्री जयंत बाळाजी आठवले आमचे नित्यमंगल करोत.

सप्तर्षि जीवनाडी वाचन क्रमांक १२८ मध्ये महर्षींनी श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत सोहळ्याच्या वेळी त्यांचे श्रीरामाच्या रूपात शुभागमन होईल, तेव्हा आपण सर्वांनी कसा विचार करायचा ?, याविषयी मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात, आपण श्रीरामाविषयी पुष्कळ ऐकले आहे, उदा. तो असा होता. त्याने असे केले. त्याने अशा लीला घडवल्या इत्यादी; पण प्रत्यक्षात आपण कोणीही त्याला पाहिलेले नाही. आज गुरूंच्या या रूपातून त्याची अनुभूती घेऊ शकतो. आपण कुठे चित्र पाहिले, कुठे मूर्ती पाहिली की, आपण म्हणतो, श्रीराम असा दिसतो. साधकांच्या मनात होते की, गुरूंना श्रीरामाच्या रूपात पहायचे आहे. आज प्रत्यक्षात ते घडले आहे !

 

३. श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या वस्त्रालंकारांचे महत्त्व

आज श्रीरामाच्या रूपात अवतरलेल्या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी जे श्रीरामाचे वस्त्रालंकार धारण केले आहेत, त्यांची माहिती आपण पाहूया.

३ अ. मुकुट

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी मुकुट धारण केला आहे. मुकुटातील पोकळीमध्ये उच्च देवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते. मुकुट धारण केल्याने उच्च देवतांच्या तत्त्वांचा लाभ होऊन ज्ञान, पराक्रम, ऐश्‍वर्य, यश, कीर्ती इत्यादी गुणांची प्राप्ती होते.

३ आ. गंध

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी १०८ नारायण लहरींचेे प्रतीक म्हणून उभे गंध लावले आहे.

३ इ. कानातील कुंडल

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी कानात कुंडल धारण केले आहे. कुंडल धारण केल्याने देहात वैराग्यभावाचे संवर्धन होते.

३ ई. कंठहार

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी कंठ आभूषण म्हणून चार रत्नजडीत सोनेरी हार धारण केले आहेत.

३ उ. यज्ञोपवीत

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी यज्ञोपवीत, म्हणजे जानवे धारण केले आहे. सुतापासून बनलेल्या धाग्याचे यज्ञोपवीत डाव्या खांद्यावरून उजव्या भूजेच्या खाली धारण केले जाते. या धाग्यामध्ये असलेली तीन सूत्रे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची प्रतीके आहेत.

३ ऊ. उपरणे

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी निळ्या रंगाचे भरजरी उपरणे हे पारंपरिक वस्त्र अंगवस्त्र म्हणून धारण केले आहे.

३ ए. बाणांचा भाता

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी पाठीवर बाणांचा भाता धारण केला आहे. भगवान परशुरामाने दिलेला हा बाणांचा भाता अक्षय, म्हणजे न संपणारा होता. श्रीरामाने भात्यातून एक बाण काढला की, दुसरा त्या भात्यात आपोआप उत्पन्न होत असे.

३ ऐ. बाजूबंद

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी बाहूंवर धारण केलेले बाजूबंद हे आभूषण १६ श्रृंगारांपैकी एक आहे.

३ ओ. मनगटी आणि अंगठी

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी आभूषण म्हणून सोनेरी मनगटी (कडे) आणि २ अंगठ्याही धारण केल्या आहेत.

हनुमान सीतेच्या शोधासाठी निघालेला असतांना श्रीरामाने आपल्या नावाची अंगठी खूण म्हणून सीतेला देण्यासाठी त्याच्याकडे दिली होती.

३ औ. धनुष्य

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी डाव्या हातात धनुष्य धारण केले आहे. प्रभु श्रीरामाच्या धनुष्याला कोदंड म्हणतात. दंडकारण्यातील बांबूपासून बनवलेल्या धनुष्याचे वैशिष्ट्य म्हणजे या धनुष्याने सोडलेला बाण शत्रूचा लक्ष्यभेद करूनच थांबत असे; म्हणून श्रीरामाला एकबाणी, असे म्हणतात.

३ अं. पीतांबर

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले पीतांबर नेसले आहेत. ते रेशमी धोतर असून भगवान विष्णूचे वस्त्र म्हणून ओळखले जाते.

३ क. कमरेचा गुलाबी रंगाचा शेला

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी पीतांबरावर गुलाबी रंगाचा शेला धारण केला आहे.

३ ख. कमरपट्टा आणि पायातील तोडे

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी कमरेत सोनेरी कमरपट्टा आणि पायांमध्ये सोनेरी रत्नजडीत तोडे धारण केले आहेत.

३ ग. मोजडी

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी चरण संरक्षक म्हणून राजस्थानी मोजडी धारण केली आहे.

३ घ. सिंहासनावरील लाल छत्री आणि चरणांखालील निळा पाट

प्रभु श्रीराम राजपुरुष असल्याने श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या सिंहासनावर लाल छत्री लावण्यात आली आहे आणि त्यांच्या चरणांखाली निळा पाट ठेवण्यात आला आहे.

प्रार्थना

हे रामस्वरूप गुरुराया, तूच आम्हा सर्वांकडून प्रभु श्रीरामाला अभिप्रेत असलेल्या आणि रामराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना करवून घे.

 

४. पुष्प-अर्चन आणि श्‍लोक उच्चारण

श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची पुष्पांद्वारे अर्चना केली गेली. मंत्रोच्चारांच्या घोषात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीरामाच्या रूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यावर पुष्प-अर्चन केले.

 

५. नृत्यसेवा

उत्तर भारतातील महान संतकवी तुलसीदास यांनी रचलेल्या तुलसीरामायणातील उत्तरकांडात राज्याभिषेकानंतर प्रभु श्रीरामाची स्तुती केली आहे. त्या स्तुतीवर आधारित नृत्य महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात नृत्यसाधना करणार्‍या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी सादर केले.

 

६. सनातनच्या ३०० व्या ग्रंथाचे प्रकाशन

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु संत भक्तराज महाराज एकदा त्यांना म्हणाले, माझ्या गुरूंनी मला तू किताबोंके उपर किताबे लिखेगा, असा आशीर्वाद दिला होता. मी भजनाचा एकच ग्रंथ लिहिला. मला दिलेला आशीर्वाद मी तुमच्याकडे देत आहे. पुष्कळ ग्रंथ लिहा. गुरूंचा आशीर्वाद फलद्रूप होण्यासाठी शिष्यामध्ये गुरूंविषयी दृढ श्रद्धा, गुरुचरणी समर्पित भाव, आज्ञाधारकपणा, लोककल्याणाची तीव्र तळमळ, गुरुकार्यातील निःस्वार्थता इत्यादी गुण असावे लागतात. परात्पर गुरु डॉक्टर हे अशा आदर्श शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत; म्हणूनच त्यांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याची आता झपाट्याने वाढ होत आहे. सनातनच्या प्रकाशित झालेल्या ग्रंथांची संख्या आता ३०० हून अधिक झाली आहे. आज श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अमृत महोत्सव आणि सनातनने ३०० ग्रंथांचा टप्पा गाठणे या दोन्ही शुभ योगांचे औचित्य साधून आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय या सनातनच्या ३०० व्या ग्रंथाचे प्रकाशन केले गेले.

अ. बांदा (सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज ह्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय या मराठी ग्रंथाचे प्रकाशन केले.

आ. याच ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी यांनी केले.

इ. याच ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी केले.

ई. तीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व या मराठी ग्रंथाचे प्रकाशन पंढरपूरच्या देवस्थानचे पुजारी अन् माजी विश्‍वस्त श्री. बाळासाहेब बडवे यांनी केले.

वर्ष २००७ पासून विविध आजारांमुळे आणि प्राणशक्ती अत्यल्प असल्यामुळे अत्यंत कठीण अशी शारीरिक स्थिती अनुभवत असतांनाही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ग्रंथरूपी ज्ञानयज्ञ अविरत चालूच ठेवणार्‍या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

 

७. श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या
अमृत महोत्सवानिमित्त सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन

महर्षींच्या कृपेने श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करण्यात आले.

७ अ. सप्तर्षि जीवनाडीतील महर्षीवाणीचे निवडक अंश

आजपर्यंत पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सनातनचे धर्मसंस्थापनेचे कार्य आणि साधकांवरील संकटांचे निवारण यांसाठी १२८ हून अधिक वेळा सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करून त्याद्वारे मार्गदर्शन केले आहे. अलीकडे झालेल्या काही नाडीवाचनांतील काही निवडक अंश…

७ अ १. साधकांचा भाव कसा असावा ?

सप्तर्षि जीवनाडी वाचन क्रमांक १२१ मध्ये महर्षि म्हणतात, गुरूंसाठीच माझा जन्म आहे. अध्यात्मासाठी माझा जन्म आहे, असा साधकांचा भाव हवा. अवतारी कार्य करणारे असे गुरु पृथ्वीवर आणखी कुठे आहेत का ? असतील, तर साधकांनी शोधून पहावे. श्रीविष्णूचे अंश असलेले परम गुरुजींसारखे गुरु दुसरे कोणीही या जगात नाही.

७ अ २. महर्षींचे साधकांना आशीर्वचन

सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १२१ मध्ये महर्षि म्हणतात, भावी काळात श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची कीर्ती होणार आहे. जशी कीर्ती होईल, तशी संकटेही येतील; पण साधकांनी त्याची काळजी करू नये. आपण दैवी कार्यासाठी आलो आहोत आणि दैवी शक्ती घेऊनच आलो आहोत, तर संकटांवरही मात होणारच आहे.
साधकांनी कितीही संकटे आली, तरी डगमगून न जाता परात्पर गुरुमाऊलीने सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य व्रतस्थपणे पार पाडायचे आहे.

७ अ ३. परात्पर गुरु डॉक्टरांची महानता

सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १२२ मध्ये महर्षि म्हणतात, श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे चक्रवर्ती गुरु आहेत. जो चक्रवर्ती राजा असेल, तोही श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना शरण येणार आहे.

या महर्षीवाणीवरून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, याची आपल्याला निश्‍चिती होईल.

७ आ. जीवनाडीपट्टीच्या वाचनासाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांना व्यासपिठावर आमंत्रण

महर्षींच्या आज्ञेने श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त होणार्‍या सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करण्यासाठी मी तिरुवण्णामलाई, तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी केले.

७ इ. पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा परिचय

लाखो वर्षांपूर्वी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत केलेले लिखाण सूक्ष्मातून जाणून विविध घटनांचे तंतोतंत भविष्य सांगणार्‍या दुर्मिळ व्यक्तींपैकी तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी हे एक आहेत. ते सध्या सप्तर्षींच्या आज्ञेने हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन, अनुष्ठाने, देवदर्शने, तसेच साधकांचे संकटांपासून रक्षण होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी हे वर्ष १९६५ पासून त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करत आहेत. त्या वेळी सप्तर्षि नाडीपट्टीत लिहिले होते की, परम गुरुजींच्या, म्हणजे श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या शिष्या कार्तिकपुत्री, म्हणजे कार्तिक नक्षत्रात जन्म घेतलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू त्यांच्याकडे येणार आहेत. तेव्हापासून ते सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आज ना उद्या येतील, याची वाट पहात होते. एप्रिल २०१५ मध्ये अनुमाने ५० वर्षांनी त्यांची आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांची भेट झाली.

७ ई. प्रत्यक्ष नाडीवाचन

मी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी प्रत्यक्ष नाडीवाचनाला आरंभ केला.

७ उ. महर्षीवाणी ऐकायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता

पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सर्वांना महर्षीवाणीचा अमृतबोध दिल्याबद्दल सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

८. अमृत महोत्सव सोहळा अनुभवता आल्याविषयी कृतज्ञता

सनातन धर्माचे महान कार्य करणार्‍या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा म्हणजे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर कृतज्ञता केवळ एक दिवस व्यक्त करण्यापेक्षा प्रतिदिन श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधनेच्या अंतर्गत अष्टांग साधना करणे आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत अध्यात्मप्रसार अन् हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणे, हीच सध्या खरी कृतज्ञता ठरणार आहे.

सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना, हेच श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे जीवितकार्य आहे. त्यांच्या या कार्यात अधिकाधिक वाटा उचलल्याने आपली साधना होणार आहे.

 

९. श्रीरामरूपातील गुरूंना प्रार्थना

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥

या प्रार्थनेचा अर्थ आहे – आम्ही श्रीरामचंद्राच्या रूपातील श्री गुरूंच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. आम्ही श्रीरामचंद्राच्या रूपातील श्रीगुरूंच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो. आम्ही श्रीरामचंद्राच्या रूपातील श्रीगुरूंच्या चरणांचे मस्तकाने नमन करतो. आम्ही श्रीरामचंद्राच्या रूपातील श्रीगुरूंच्या चरणी शरण आलो आहोत.