परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथकार्याची फलनिष्पत्ती

१. ग्रंथ हेच खरे धर्मप्रसारक !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले होते, प्रसारसेवकांना वाटते की, आपण अध्यात्मप्रसार करतो; पण खरा प्रसार आपले ग्रंथच करतात ! त्यानंतर मी ही गोष्ट विसरून गेलो होतो. पुढे एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, सर्वसामान्य साधकाने बुद्धीच्या स्तरावर अध्यात्माविषयी लोकांना कितीही पटवून सांगितले, तरी त्याचा लोकांवर परिणाम व्हायला वेळ लागतो; परंतु संतांनी एक वाक्य जरी सांगितले, तरी त्यांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे लोकांच्या अंतर्मनावर संस्कार झाल्यामुळे त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भातही हेच तत्त्व लागू होते; कारण ग्रंथांतील लिखाण म्हणजे साक्षात् चैतन्याचा स्रोत आहे. त्या वेळी मला खरा अध्यात्मप्रसार आपले ग्रंथच करतात, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे वाक्य आठवले.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक.

 

२. सनातनच्या ग्रंथांची गरुडझेप

मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत !

सनातनच्या ग्रंथांच्या प्रकाशनाची ही गरुडझेप म्हणजे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य वृद्धींगत होत असल्याची पोचपावती होय. इतकेच नाही, तर सनातनवर बंदी आणू इच्छिणारे राजकारणी आणि सनातनविषयी सातत्याने अपप्रचार करणारे सनातनद्वेष्टे (धर्मद्वेष्टे) यांना ही सणसणीत चपराकच आहे. जसा विरोध होतो, तसे कार्य वाढते, हे तत्त्व सनातनच्या कार्याविषयी तंतोतंत खरे ठरले आहे !

 

३. ग्रंथांतील ज्ञानाला नियतकालिकांद्वारे प्रसिद्धी

१. बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशा या राज्यांत वितरित होणार्‍या दीड लाखांहून अधिक  खपाच्या दैनिक जागरण या हिंदी भाषिक वर्तमानपत्रात वर्ष २०१२-२०१४ या काळात प्रत्येक  मंगळवारी सनातनच्या ग्रंथांतील धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण लेख स्वरूपात प्रसिद्ध झाले.

२. महाराष्ट्रात राज्य पातळीवरील दैनिक सामना, दैनिक आपला वार्ताहर आदींमधून, तसेच जिल्हा पातळीवरील विविध दैनिकांतून सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रसिद्ध होत असते.

३. हिंदुत्ववादी नियतकालिक सनातन प्रभातच्या सर्व भाषांतील आवृत्त्यांमध्ये सनातनच्या ग्रंथांतील  लिखाण नियमित प्रसिद्ध केले जाते.

 

४. ग्रंथांतील ज्ञानाला प्रसारसाहित्याद्वारे प्रसिद्धी

१. गुढीपाडवा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या निमित्ताने काही धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटना; तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आदी प्रसंगी काही राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी संघटना सनातनच्या ग्रंथांतील लिखाण अंतर्भूत असलेली हस्तपत्रके, फ्लेक्स फलक आदी प्रकाशित करतात.

२. विविध आस्थापने स्वतःची दिनदर्शिका आणि वार्षिक दैनंदिनी यांत, तर अनेक जण मुंज आणि  विवाह यांच्या निमंत्रण-पत्रिकांमध्ये सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान प्रकाशित करतात.

 

५. ग्रंथांतील ज्ञान अंतर्भूत असलेली सनातनची उत्पादने

५ अ. सनातन पंचांग

वर्ष २००६ पासून प्रसिद्ध होणार्‍या वार्षिक सनातन पंचांगामध्ये सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रसिद्ध केले जाते. मराठी (३ आवृत्त्या), हिंदी, कन्नड (२ आवृत्त्या), गुजराती, इंग्रजी, तेलुगु, तमिळ आणि ओडिया या ८ भाषांत प्रकाशित होणारे हे पंचांग प्रतिवर्षी साधारणपणे १० लाख ग्राहकांपर्यंत पोचते. या पंचांगाचे ८ भाषांतील अ‍ॅन्ड्रॉइडसाठीचे अ‍ॅप्लीकेशनही वर्ष २०१३ पासून विनामूल्य प्रकाशित केले जात आहे. त्याद्वारेही प्रतिवर्षी १० लाखांहून अधिक वाचक सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा लाभ घेत आहेत.

५ आ. संस्कार वही

वर्ष २००६ पासून प्रसिद्ध होणार्‍या संस्कार वहीमध्ये मुलांवर सुसंस्कार करणारे, तसेच धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रप्रेम वाढवणारे लिखाण असते. यांतील बहुतांशी लिखाण सनातनच्या ग्रंथांतून घेतलेले असते.

 

६. ग्रंथांतील ज्ञानाला दूरचित्रवाहिन्यांद्वारे भारतभर आणि जगभर प्रसिद्धी

६ अ. उपग्रह दूरचित्रवाहिन्यांद्वारे प्रसिद्धी

१.ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे सनातन संस्था चेन्नईने ईश्‍वरप्राप्तीके लिए अध्यात्मशास्त्र आणि हिंदु जनजागृती समितीने धार्मिक कृत्योंका शास्त्र नामक २ मालिकांतर्गत धर्मसत्संगांचे अनुक्रमे १६४ आणि २०६ भाग बनवले आहेत. या धर्मसत्संगांचे प्रसारण श्री शंकरा या दूरचित्रवाहिनीवरून वर्ष २००८-२००९ मध्ये आशिया खंडात करण्यात आले.

२. धार्मिक कृत्योंका शास्त्र या मालिकेचे विविध भाग सुदर्शन या दूरचित्रवाहिनीवरून वर्ष २०१० मध्ये विविध देशांत प्रसारित करण्यात आले.

६ आ. स्थानिक केबलचालकांद्वारे आंतरराज्य प्रसिद्धी

वर्ष २०११-२०१२ मध्ये भारतातील विविध राज्यांत स्थानिक केबलचालकांद्वारे वर उल्लेखिलेल्या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्यात आले. या धर्मसत्संगांचा लाभ मध्यप्रदेश, राजस्थान, देहली, हरियाणा, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील २०,३९,००० हून अधिक दर्शकांनी घेतला. आजही महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील काही नगरांमध्ये (शहरांमध्ये) या धर्मसत्संगांचे प्रसारण केले जाते.

 

७. ग्रंथांतील ज्ञानाला संकेतस्थळांच्या माध्यमातून जगभर प्रसिद्धी

७ अ. ग्रंथांना ऑनलाईन मागणी

७ अ १. sanatanshop.com

या संकेतस्थळावरून सनातनची ग्रंथसंपदा भारतभरात कुठेही ऑनलाईन विकत घेता येते.

७ अ २. bookganga.com

यावर सनातनचे काही ग्रंथ ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

७ अ ३. संगणकीय पत्राद्वारे (ई-मेलद्वारे) ग्रंथांना मागणी येणे

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, नेपाळ आदी देशांतूनही संगणकीय पत्राद्वारे ग्रंथांना मागणी येत आहे.काही देशात हिंदु धर्माचा विशेष प्रभाव नसूनही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देश-विदेशांतील विविध ठिकाणांहून ग्रंथांना मागणी येत आहे.

– कु. रजनी कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

७ आ. सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान प्रसिद्ध करणारी संकेतस्थळे

७ आ १. sanatan.org (मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत)

७ आ २. hindujagruti.org (हिंदी आणि इंग्रजी या भाषांत)

७ आ ३. ssrf.org (फारसी, इंग्रजी, चिनी, फ्रेंच, जर्मन, डच, स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन, रशियन, स्लोवेनियन, मलेशियन, हंगेरियन, पोर्तुगीज, इंडोनेशियन, मॅकोडेनियन, बल्गेरीयन, रोमेनीयन, नेपाळी आणि अरबी या २० विदेशी भाषांत, तसेच हिंदी आणि तमिळ या २ भारतीय भाषांत)

७ आ ४. spiritual.university (इंग्रजी भाषेत)

७ इ. यू ट्यूबवरून प्रसार

www.youtube.com/user/Dharmashiksha या मार्गिकेवरील (लिंकवरील) धर्मशिक्षा वाहिनीवर (चॅनेलवर) गुढी कशीउभारावी ?, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी कसे साजरे करावेत ?, होळीचे पूजन कसे करावे ? यांसारख्या विषयांवरील मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्ल्याळम् आणि तमिळ या भाषांतील दृश्यपट (व्हिडिओज्) उपलब्ध आहेत. ११.५.२०११ या दिवशी चालू झालेल्या या यू ट्यूब वाहिनीला भेट दिलेल्यांची संख्या मार्च २०१७ पर्यंत ५,०९,६६१ एवढी आहे.

७ ई. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे (सोशल मीडियाद्वारे) प्रसार

फेसबूक, ट्विटर, व्हाट्स अ‍ॅप आणि न्यूजलेटर या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे सनातनच्या ग्रंथांतील लिखाण (सूत्र ७ आ मध्ये उल्लेखिलेल्या संकेतस्थळांवर ठेवण्यात आलेले लिखाण आणि यू ट्यूबवरील दृश्यपट) प्रतिमास सहस्रावधी लोकांपर्यंत पोचते.

७ उ. अ‍ॅन्ड्रॉइड अँप्सद्वारे प्रसार

बालसंस्कार, एच्जेएस् कुंभ आणि दैनिक सनातन प्रभात या अ‍ॅन्ड्रॉइड अँप्सद्वारेही सनातनच्या ग्रंथांतील लिखाण प्रतिमास सहस्रावधी लोक वाचतात.

 

८. ग्रंथसेवा करणार्‍या साधकांची शीघ्रतेने होत असलेली आध्यात्मिक प्रगती

परात्पर गुरु डॉक्टरांंचे मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे ग्रंथ-विभागात सेवा करून मार्च २०१७ पर्यंत ५ साधक संतपदाला पोचले, तर २७ साधकांनी ६० टक्के आणि त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली असून तेही संत बनण्याच्या मार्गावर आहेत.

संकलक : श्री. संजय मुळये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

ग्रंथ सेवेतील साधकांची गुरुचरणांप्रती कृतज्ञता आणि प्रार्थना !

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी एकदा त्यांना नमस्कार करण्यास आलेल्या एका स्त्रीला सौभाग्यवती भव । असा आशीर्वाद दिला. ती स्त्री सती जाण्यास निघाली होती. तिच्याकडून याविषयी कळल्यावर संत ज्ञानेश्‍वरांचे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना म्हणाले, एका योग्याचे वचन कधीही असत्य ठरू नये. गुरूंची आज्ञा प्रमाण मानून ज्ञानेश्‍वरांनी योगसामर्थ्याने तिरडीवर ठेवलेल्या तिच्या पतीला जिवंत केले. त्याचे नाव सदानंद असे होते. याच सदानंदबाबांनी पुढे ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेली ज्ञानेश्‍वरी लिहून घेतली. तात्पर्य, देवाची इच्छा असेल, तर तो एका सामान्य मृत व्यक्तीतही प्राण फुंकून तिच्याकडून महान ग्रंथकार्य करवून घेतो ! याप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांची इच्छा आहे; म्हणूनच आम्ही ग्रंथ-विभागातील सर्वसामान्य साधक त्यांचे हे महान ग्रंथकार्य करू शकत आहोत.

ग्रंथसेवा ही अन्य सेवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण सेवा आहे; कारण ग्रंथांचे विषय हे मुळातच सात्त्विक असल्याने या सेवेच्या माध्यमातून साधकांना सात्त्विकतेचा लाभ सहजगत्या होतो. याचसह सेवा करतांना अध्यात्मातील ज्ञानाचे नवनवीन विषय वाचनात येत असल्याने साधनेविषयी मार्गदर्शनही मिळते. या दोन्हींमुळे साधकांची साधना चांगली होण्यास साहाय्य होते. परात्पर गुरु डॉक्टर आम्हा साधकांना ग्रंथसेवेची अमूल्य संधी देऊन आमचा उद्धार करत आहेत, याविषयी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आणि कृपा यांमुळेच सर्व ग्रंथकार्य होत आहे; आम्ही साधक केवळ या कार्यासाठी निमित्तमात्र आहोत. परात्पर गुरु डॉक्टरांनी हाच भाव सदैव आमच्यात जागृत ठेवून आमच्याकडून ग्रंथकार्य करवून घ्यावे, अशी आम्हा सर्व साधकांची त्यांच्या चरणी प्रार्थना !

– ग्रंथ सेवेतील सर्व साधक