श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा (१८ मे २०१७)

उजव्या हातात सुदर्शन चक्र आणि डाव्या हातात शंख धारण केलेल्या श्रीकृष्णाच्या रुपातील परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले

१. प्रार्थना

१ अ. श्री परमगुरवे नमः ।

नमस्कार. भगवान श्रीविष्णूपासून चालू झालेली थोर गुरुपरंपरा आणि कलियुगातील साक्षात् श्रीविष्णूचे अवतार असलेले श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी शरणागत भावाने वंदन करुन सर्वांनी  श्रीगुरूंना शरण जाऊन भावपूर्ण श्‍लोक म्हटला.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

१ आ. श्रीगुरूंप्रतीचा कृतज्ञता सोहळा !

गुरु हे ब्रह्मा आहेत, ते विष्णु आहेत आणि तेच शिव आहेत. गुरु आम्हा सर्व साधकांसाठी सर्वस्व आहेत; म्हणूनच साजरा झालेला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा म्हणजे या परात्पर गुरुमाऊलीवर श्रद्धा ठेवणार्‍या प्रत्येकासाठी कृतज्ञतेचा सोहळाच.

सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन क्र. १२८ मध्ये महर्षि म्हणतात, परात्पर गुरूंचा अमृत महोत्सव सोहळा हा त्यांनीच शिष्यांना आनंद देण्यासाठी आयोजित केलेला आनंद सोहळा आहे. या आनंददायी भाव सोहळ्याचा लाभ होण्यासाठी आपण त्यांच्या चरणीच शरण जाऊया.

सप्तर्षि आणि महर्षि भृगु या दोघांनीही वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितले आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन् नारायणाचे अवतार आहेत.

आजचा दिवस हा इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये साक्षात् भगवान महाविष्णूचा अवतारत्व प्रगटदिन म्हणून विख्यात होणारा दिवस आहे. २९.४.२०१७ या दिवशी भृगु महर्षि म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव हा प्रकाशोत्सवच आहे. या दिवसाला तुम्ही विष्णु प्रतिरूप तपोनिष्ठ तपोमूर्ती डॉ. जयंत-अवतार दिवस असे म्हणा.

भृगु महर्षि पुढे म्हणतात, परात्पर गुरु डॉक्टरांचा अवतार पुढे चिरंजीवी अवतार म्हणून नावाजला जाईल, म्हणजेच त्यांचे कार्य शाश्‍वत कार्याचेच एक प्रतीक म्हणून गणले जाईल.

आजचा हा अमृत महोत्सवाचा सोहळा पृथ्वीवर ७५० कोटी लोकसंख्या असतांना आपल्यासारख्या केवळ भाग्यवान जिवांनाच याचि देहि याचि डोळा । अनुभवता आला. यासाठी आपण परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी भावपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थना करूया.

१ इ. कृतज्ञता आणि प्रार्थना !

१. हे नारायणस्वरूप गुरुराया, तुमच्या कृपेनेच आज आम्हाला या मंगल सोहळ्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. हे गुरुराया, आमची कुठलीही पात्रता नसतांना आपण आम्हाला या अमृत क्षणांचे साक्षीदार बनवले. यासाठी आपल्याप्रती आमच्या मनात सदैव कृतज्ञताभाव असू द्या.

२. आम्हाला श्रीकृष्णरूपात सतत अनुभूती देणार्‍या हे गुरुराया, या अमृत सोहळ्यातून तुम्हीच आम्हाला तुमचे श्रीकृष्णरूप दाखवा. तुमचे अमृत सोहळ्यातील मनमोहक रूप आमच्या हृदयसिंहासनावर सतत विराजमान असू दे. आमच्या मनःपटलावर हा भाव सोहळा सदैव अंकित राहू दे आणि या दैवी सोहळ्याच्या भावस्मृती आमच्या अंतःकरणात जीवनभर जपल्या जाऊ दे, ही तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.

३. कलियुगात श्रीविष्णूचा अवतार म्हणून कार्य करणार्‍या हे परात्पर गुरुमाऊली, आम्ही या मायेत अडकलो असतांना तुझ्याविना आमचा उद्धार तरी कोण करणार ? हे गुरुनारायणा, आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. तूच या दैवी सोहळ्यातून आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार होण्याविषयी आश्‍वस्त कर.

१ ई. श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सवदिन

आज शक संवत अनुसार वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी आणि विक्रम संवत अनुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे १८ मे २०१७. आजच्या पावनदिनी श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांवर श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची, म्हणजे गुरूंची कृपा होणार आहे. आपल्या सर्वांना या भाव सोहळ्यामध्ये देवता, ऋषि आणि संत यांचे आशीर्वाद लाभलेत. गुरुपौर्णिमेसम असणार्‍या आणि गुरूंचे गुणसंकीर्तन करणार्‍या या अनमोल पर्वणीचा आपण सर्व जण लाभ करून घेऊया.

रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता यांचे आगमन

 

२ विविध संतों एवं महर्षियों द्वारा
अवतारी महामानव के रूप में गौरवान्वित
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की साधना-यात्रा (लघुपट)

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की साधना-यात्रा (लघुपट) दाखवण्यात आला.

 

३. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अवतारी कार्याची महानता

३ अ. प्रार्थना

भगवान विष्णु, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ति, शक्तिपुत्र पराशर, वेदव्यास, शुकमुनि, महान गौडपादाचार्य, गोविंदपूज्यपाद, आद्य शंकराचार्य, त्यांचे परमशिष्य तोटकाचार्य तसेच आनंद संप्रदायकच्या परंपरेचे महान गुरु श्री ब्रह्मानंदस्वामी, श्री चंद्रशेखरानंद परमहंस, श्री अनंतानंद साईश, संत भक्तराज महाराज व श्री श्री जयंत बाळाजी आठवलेजी यांच्या माध्यमातून असलेल्या गुरुपरंपरेपुढे अाम्ही नतमस्तक आहोत.

३ आ. श्रीविष्णु, श्रीकृष्ण आणि श्री श्री जयंत बाळाजी आठवले

वेवेष्टि इति विष्णुः ।, म्हणजे जो सर्व विश्‍वालाही व्यापून रहातो ते विष्णु. ज्ञानम् इच्छेत् सदाशिवात् मोक्षम् इच्छेत् जनार्दनात् ।, म्हणजे सदाशिवापासून, म्हणजे शिवापासून ज्ञानाची आणि जनार्दनापासून, म्हणजे श्रीविष्णूपासून मोक्षाची इच्छा करावी, असे शास्त्रात म्हटले आहे. अगदी त्याचप्रमाणे श्रीमन्नारायणस्वरूपी श्री श्री जयंत बाळाजी आठवले या गुरुमाऊलीचे कार्यच शिष्याला मोक्ष देणे हे आहे. श्रीविष्णूचा पूर्णावतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण ! श्रीकृष्ण हा पूर्णावतार असल्याने त्याला अवतार न म्हणता श्रीविष्णूच मानतात. कर्षति आकर्षति इति कृष्णः ।, म्हणजे जो खेचतो, आकर्षून घेतो, तो कृष्ण. ज्याप्रमाणे वृंदावनातील गोप-गोपी आणि पृथ्वीवर भगवद्भक्त यांना श्रीकृष्ण आकर्षून घेत होता, अगदी त्याप्रमाणे आम्ही सर्व साधक आणि पृथ्वीवरील सनातन धर्माचे भक्त यांना श्री श्री जयंत बाळाजी आठवले आकर्षित करत आहेत.

श्रीकृष्णाचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे त्याने ज्ञानशक्तीचे प्रतीक असलेली अलौकिक भगवद्गीता सांगितली. भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आदी साधनामार्गांविषयी मार्गदर्शन करतांना अर्जुनाच्या, म्हणजेच साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काय आवश्यक आहे, हे त्याने गीतेतून सांगितले आणि त्याहीपुढे जाऊन त्याने गीतेतून स्वतःच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याचे रहस्य उलगडले आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ७

अर्थ : जेव्हा जेव्हा धर्माली ग्लानी येते आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला जन्मास घालतो, म्हणजे अवतार घेतो.

आम्हा साधकांनाही श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचेही कार्य साक्षात् श्रीकृष्णाचेच कार्य आहे, याची पदोपदी अनुभूती येते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील अलौकिक ज्ञानाप्रमाणे महान ग्रंथरचना केली आहे. ते भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आदी साधनांचा संगम असलेला गुरुकृपायोग यानुसार साधकांना मार्गदर्शन करत आहेत. जगभर सनातन धर्माची प्रस्थापना होण्यासाठी आणि भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी धर्मसंस्थापनेचे अव्याहत कार्य करत आहेत; म्हणूनच श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा उल्लेख सप्तर्षि जीवनाडीपट्टीत महर्षि सतत श्रीकृष्ण म्हणून करतात.

एप्रिल २०१५ मध्ये सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे प्रथमच वाचन झाले. या प्रथम वाचनातच महर्षींनी स्पष्टपणे सांगितले की, भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत ३२ वर्षे राज्य केले. त्या काळात त्यानेही समाजाकडून फार विरोध सहन केला. त्याच्यावरही मिथ्यारोप झाले आहेत. कृष्णाप्रमाणेच परम गुरुजी आता आध्यात्मिक राज्य चालवत आहेत. परम गुरुजी आणि श्रीकृष्ण एकच आहेत.

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सव पर्दापणदिनानिमित्त झालेल्या नाडीवाचनात महर्षि म्हणाले, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, त्याप्रमाणे परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले श्री जयंतावतार या नावाने श्री महाविष्णूचा अवतार म्हणून ओळखले जातील.

परात्पर गुरुमाऊलीच्या ज्या श्रीकृष्णरूपाची अनुभूती साधक घेतात, तेच त्रिकालज्ञानी महर्षि वर्णितात ! श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या श्रीकृष्णरूपाची कथा ही अशी आहे !

परात्पर गुरुमाऊली आम्हा साधकांना तुम्ही माझ्यामध्ये अडकू नका, श्रीकृष्णाकडे चला, असे सांगतात; कारण ते स्वतः श्रीकृष्ण आहेत !

भगवंत धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतो, तेव्हा अनेक जिवांचा उद्धार करतो. परात्पर गुरुमाऊलीच्या रूपात साक्षात् श्रीमन् नारायण आपल्या उद्धारासाठी अवतरले आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळारूपी भावसागरात न्हाऊया आणि आपले जीवन सार्थक करूया.

 

४. कधी येशील मनमोहना । पहाण्या भारत अपुला महान ॥, या भजनाचे गायन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले कधी येशील मनमोहना । पहाण्या भारत अपुला महान ॥, हे भजन स्वतः श्रीकृष्णस्वरूप असलेल्या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पुष्कळ आवडते. त्यांनीच वर्ष १९९९ मध्ये देशभक्तांना आश्‍वस्त करण्यासाठी या भजनात पुढील ओळी जोडल्या – तो पहा आला मोहन । करण्या भारत अपुला महान ॥

हे भजन आता महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात संगीत कलेनुसार साधना करणार्‍या साधिका कु. तेजल पात्रीकर, सौ. श्रेया साने आणि सौ. सायली करंदीकर यांनी सादर केले.

(तो पहा आला मोहन । करण्या भारत अपुला महान ॥ या ओळींच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे आगमन झाले.)

 

५. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले
यांचे शुभागमन आणि सिंहासनावर विराजमान होणे

श्रीकृष्णरूपातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे व्यासपिठावर शुभागमन झाल्यावर त्यांना मानस वंदन करून सर्वांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.

द्वापारयुगातील जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगातील श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे एकच आहेत, हे आपण याचि देहि याचि डोळा । अनुभवत आहोत. आमच्या समक्ष जगद्गुरु श्रीकृष्णाच्या रूपात श्री श्री जयंत बाळाजी आठवले आहेत. परात्पर गुरुमाऊलीचे हे कृष्णरूप आमच्या हृदयाला शांती देवो, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.

सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक ११९ मध्ये महर्षींनीच परम गुरुजींना कृष्णालंकार करावेत, असे सांगितले होते. महर्षि म्हणतात, आजच्या दिवशी खर्‍या अर्थाने श्रीकृष्णाचे रूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या देहातून प्रगट होणार आहे. त्यांच्यातील अवतारत्वाचे प्रगटीकरण, हा आम्हा सर्वांसाठी एक अमूल्य असा सुवर्णक्षण आहे.

सप्तर्षि जीवनाडी वाचन क्रमांक १२८ मध्ये महर्षींनी श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत सोहळ्याच्या दिवशी त्यांचे कृष्णालंकार धारण करून शुभागमन होईल, तेव्हा आपण सर्वांनी कसा विचार करायचा, याविषयी मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात, आपण श्रीकृष्णाविषयी पुष्कळ ऐकले आहे, तो असा होता. त्याने असे केले. त्याने अशा लीला घडवल्या इत्यादी; पण प्रत्यक्षात आपण कोणीही त्याला पाहिलेला नाही. आज गुरूंच्या या रूपातून त्याची अनुभूती घेऊ शकतो. आपण कुठे चित्र पाहिले, कुठे मूर्ती पाहिली, तर आपण म्हणतो की, श्रीकृष्ण असा दिसतो. साधकांच्या मनात होते की, गुरूंना श्रीकृष्ण यांच्या रूपात पहायचे आहे. आज प्रत्यक्षात ते घडले आहे !

 

६. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या वस्त्रालंकारांचे महत्त्व

आज श्रीकृष्णरूपात अवतरलेल्या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी जे श्रीकृष्णाचे वस्त्रालंकार धारण केले आहेत, त्यांची माहिती आपण भावपूर्ण वाचूया.

६ अ. मुकुट

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी मुकुट धारण केला होता. मुकुटातील पोकळीमध्ये उच्च देवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते. मुकुट धारण केल्याने उच्च देवतांच्या तत्त्वांचा लाभ होऊन ज्ञान, पराक्रम, ऐश्‍वर्य, यश, कीर्ती इत्यादी गुणांची प्राप्ती होते.

६ आ. मोरपीस

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी मुकुटावर मोरपीस धारण केले होते. शरिरातील विचक्षणाकेंद्र हे अतींद्रिय शक्तीचे केंद्र आहे. ते जागृत झाले की, त्यातील कुंडलिनींचा आकार मोरपिसासारखा होतो. श्रीकृष्ण धारण करत असलेले मोरपीस हे अतींद्रिय शक्तीचे केंद्र सतत जागृत असल्याचे दर्शक आहे.

६ इ. गंध

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी १०८ नारायण लहरींचे प्रतीक म्हणून उभे गंध लावले होते.

६ ई. कर्णालंकार

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी दोन्ही कर्णांमध्ये कर्णालंकार धारण केले होते.

६ उ. वैजयंती माळ

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी गळ्यात धारण केलेली वैजयंती माळ यश आणि विजय यांचे प्रतीक आहे.

६ ऊ. मोहनमाळ

भारतीय अलंकारशास्त्रातील सोन्याच्या १० प्रमुख माळांपैकी ही एक माळ आहे. श्रीकृष्ण अशा प्रकारची माळ धारण करत असल्याने ती मोहनमाळ म्हणून सुप्रसिद्ध झाली. आज श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी धारण केलेली मोहनमाळ २ स्तर (लेअर) असलेली आहे.

६ ए. कंठहार

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी कंठ आभूषण म्हणून दोन सोनेरी हार धारण केले होते.

६ ऐ. यज्ञोपवीत

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी यज्ञोपवीत, म्हणजे जानवे धारण केले होते. सुतापासून बनलेल्या धाग्याचे यज्ञोपवीत डाव्या खांद्यावरून उजव्या भूजेच्या खाली धारण केले जाते. या धाग्यामध्ये असलेली तीन सूत्रे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची प्रतीके आहेत.

६ ओ. उपरणे

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी उपरणे हे पारंपरिक वस्त्र अंगवस्त्र म्हणून धारण केले होते.

६ औ. बाजूबंद

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी बाहूंवर धारण केलेले बाजूबंद हे आभूषण १६ श्रृंगारांपैकी एक आहे.

६ क. मनगटी आणि अंगठी

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी आभूषण म्हणून सोनेरी मनगटी (कडे) आणि २ अंगठ्याही धारण केल्या आहेत.

६ ख. शंख

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या हातात शंख आहे. हा शंख विष्णूच्या हातातील एक आयुध म्हणून प्रचलित आहे. श्रीकृष्णाने सागरातून उत्पन्न झालेला आणि महाविष्णूचा पांचजन्य शंख स्वतः धारण केला होता.

६ ग. सुदर्शनचक्र

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या दुसर्‍या हातात सुदर्शनचक्र होते. सर्व आयुधांत हे एकच आयुध सतत गतिमान असते.

६ घ. पीतांबर

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले पीतांबर नेसले होते. पीतांबर हे पिवळ्या रंगाचे रेशमी धोतर असून ते भगवान विष्णु आणि श्रीकृष्ण यांचे वस्त्र म्हणून ओळखले जाते.

६ च. कमरेचा गुलाबी रंगाचा शेला

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी पीतांबरावर गुलाबी रंगाचा शेला धारण केला होता. भगवान श्रीकृष्णाने कालियामर्दन करण्यासाठी यमुनेत उडी घेण्यापूर्वी कमरेचा गुलाबी शेला घट्ट बांधला आणि मग उडी घेतली, असे वर्णन महाभारत, भागवत आदी धर्मग्रंथांत आहे.

६ छ. मुरली

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कमरेला मुरली बांधलेली होती मुरलीचा नाद म्हणजे अनाहतनाद. त्या नादाने सर्व गोपींना वेड लावले होते, म्हणजे त्या किती उच्च आध्यात्मिक पातळीच्या साधिका असतील, हे लक्षात येईल.

६ ज. कमरपट्टा आणि पायातील तोडे

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी कमरेत सोनेरी कमरपट्टा आणि पायांमध्ये सोनेरी तोडे धारण केले होते.

६ झ. श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी प्रार्थना

श्रीकृष्णरूपात दर्शन देणार्‍या हे परात्पर गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत. आम्हाला याची जाणीव आहे की, भारताला महान करणारे मोहन दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहात. हे गुरुराया, तुम्हीच आम्हाला तुमच्या श्रीकृष्णरूपातून धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी आवश्यक भक्ती आणि शक्ती द्या.

 

७. पुष्प-अर्चन आणि श्‍लोक उच्चारण

श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची पुष्पांद्वारे अर्चना केली जाईल. मंत्रोच्चारांच्या घोषात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीकृष्णरूप श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यावर पुष्प-अर्चन केले.

 

८. मंत्रोच्चारात कणकेचे ११ दिव्यांनी श्रीगुरूंचे औक्षण

पुष्प-अर्चन झाल्यानंतर आता श्रीगुरूंची आरती केली गेली. महर्षीच्या आज्ञेनुसार श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना आरतीच्या वेळी कणकेच्या ११ दिव्यांनी औक्षण केले गेले. कणकेच्या ११ दिव्यांपैकी १० दिवे हे श्रीविष्णूच्या दशावतारांचे प्रतीक आणि त्यांमध्ये मध्यभागी एक मोठा दिवा म्हणजे विष्णूचे अंशावतार असलेल्या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे प्रतीक.

प्रथम सनातनचे ग्रंथ-विभागातील साधक श्री. अविनाश जाधव यांनी रचलेली आरती म्हटली गेली.

तद्नंतर सनातनच्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी रचलेली आरती म्हटली गेली.

आरतीचे गायन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत कलेनुसार साधना करणार्‍या साधिका कु. तेजल पात्रीकर, सौ. श्रेया साने आणि सौ. सायली करंदीकर यांनी केले. तेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी औक्षण केले.

 

 

९. नृत्यसेवा

अ. साक्षात् श्रीकृष्णाच्या रूपात अवतरित झालेल्या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या स्वागताप्रीत्यर्थ कु. अपाला आैंधकर हीने नृत्यसेवा समर्पित केली.

आ. नंतर श्रीविष्णूच्या वामन, श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांचे वर्णन करणारे नृत्य महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. आरती तिवारी यांनी सादर केले.

हे भावपूर्ण नृत्य पाहून सर्वांचा भाव जागृत झाला. यासाठी सर्वांनी श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

 

१०. तुलाभार विधी

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा तुलाभार करण्यात आला.

परात्पर गुरुमाऊली यांची महर्षींनी
सांगितलेली महती आणि त्या संदर्भात दिलेली अनुभूती :

७ मे २०१७ या दिवशी महर्षि म्हणतात, श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा तुलाभार करण्याचे ठरवले आहे; परंतु साक्षात् श्रीविष्णु असलेल्या त्यांचा तुलाभार करणे खरंच शक्य आहे का ? तुम्ही त्यांच्या स्थूलदेहाचा तुलाभार करू शकता; परंतु त्यांच्या अंतरातील सूक्ष्म प्राणात लपलेल्या त्या नारायणाचा नाही. महर्षि हे सांगत असतांना मोठ्याने गडगडाट झाला आणि विजाही चमकल्या. महर्षींनी या वेळी उपस्थित सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई सिंगबाळ या संतद्वयींना विजा आणि गडगडाट ऐकून ३ वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. त्या वेळी पाऊस पडू लागला आणि वरुणदेवाचा आशीर्वाद मिळाला. (सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी आकाशाकडे पाहून हे श्रीमन् नारायणा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गोड बुंदी आणि तुळस या द्रव्यांद्वारे त्यांचा तुलाभार करण्याचे ठरवले आहे, त्याचा स्वीकार करा, असे ३ वेळा म्हणून प्रार्थना केली. त्याच वेळी आकाशात मोठ्याने वीज चमकली आणि गडगडाट झाला. या दोन्ही सद्गुरूंच्या प्रार्थनेला भगवंताने वीज आणि गडगडाट यांद्वारे स्वीकृतीच दर्शवली असल्याची ही एक साक्षच (शुभ संकेत) दिली.) या वेळी सध्या होत असलेला पाऊस हा प्रत्यक्ष वैकुंठातून श्रीविष्णूने केलेला अभिषेकच आहे, असेही महर्षींनी या वेळी सांगितले.

संतांची प्रार्थना आणि साक्षात् महर्षींनी दिलेली आज्ञा यांनुसार आज श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा तुलाभार करण्यात आला.

अ. प्रथम श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे शास्त्रानुसार तुळेला एक प्रदक्षिणा घातली.

आ. नंतर श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी देवतेच्या रूप असलेल्या तुळेला पुष्पे वाहीली.

इ. नंतर श्री श्री जयंत बाळाजी आठवले तुलाभारासाठी तुळेत बसले.

ई. नंतर तुळेच्या उजवीकडील पारड्यात तुलाद्रव्य (बुंदी) भरले गेले.

तिरुपति बालाजीचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू वाटला जातो. परात्पर गुरुमाऊली स्वतःच श्रीविष्णूस्वरूप असल्याने त्यांचा तुलाभार करतांनाही आपण बुंदी उपयोगात आणली आहे. शास्त्र म्हणून तुलाभारात शमीपत्र, तसेच पंचलोह, म्हणजे सुवर्ण, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त हे धातू आणि नवरत्ने घातली गेली. औषधी वनस्पती असणार्‍या शमीपत्रात श्री गणेशतत्त्व असते. तुलाद्रव्यात बेलपत्र आणि तुळशीपत्र हेही घातले होते. त्यामुळे हरिहर एकत्र येऊन जी शक्ती निर्माण होइल, तिचा लाभ सार्‍या समष्टीला होणार आहे.

उ. तुळशीचे महत्त्व
तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीपत्राने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य भक्षण करत नाही.

ऊ. तुलाभारातील तुळशीचे महत्त्व
तुळस हे वैराग्याचे प्रतीक आहे. एकदा श्रीकृष्णाची तुला करतांना तराजूच्या पारड्यात कितीही हिरे, माणके, सोने इत्यादी ठेवले, तरी श्रीकृष्णाचेच पारडे जड रहात होते. शेवटी त्या अलंकारांवर रुक्मिणीने तुळशीपत्र ठेवल्यावरच ते पारडे जड झाले. श्रीकृष्ण संपत्तीने नाही, तर वैराग्यानेच जिंकता येतो, हे या प्रसंगातून श्रीकृष्णाने शिकवले आहे. घरावर तुळशीपत्र ठेवले, हा वाक्प्रचार घरादाराचा त्याग दर्शवतो. आपल्याला श्रीकृष्णरूपातील गुरुमाऊलीला सर्वस्वाचा त्याग करून जिंकायचे आहे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुलाद्रव्यावर तुळशीपत्र ठेवून तुलाविधी पूर्ण केला.

अमृत महोत्सवाच्या सोहळ्यातून आपल्याला परात्पर गुरुमाऊलीची तुळा प्रत्यक्ष अनुभवता आली, यासाठी सर्वांनी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

 

११. संतांच्या संदेशांचे वाचन

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या या अमृत सोहळ्याला अनेक संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यामुळे भरला संतांचा मेळा । असा हा परात्पर गुरूंचा अमृत सोहळा ॥, असे म्हणावेसे वाटते. असे असले, तरी अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी त्यांच्या शुभकामना संदेशाद्वारे कळवल्या आहेत.

११ अ. पुणे येथील संतदांपत्य प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये

देवतांच्या आशीर्वादाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होईल ! – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये

प.पू. डॉक्टरांनी पुष्कळ मोठे कार्य केलेले आहे. त्यांच्याविषयी काय लिहिणार ? त्यांच्याविषयी लिहिणे म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखे आहे. प.पू. डॉक्टरांच्या मागे भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरु सदानंद स्वामी उभे आहेत. दहा हातांमध्ये शस्त्र घेऊन उभी असलेली आई देवी आदिमाता प.पू. डॉक्टरांच्या पाठीशी आहे. असे असतांना प.पू. डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अडथळे आणण्याची कुणाची टाप आहे ? प.पू. डॉक्टरांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न लवकर साकार होवो, ही प्रार्थना ! – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

११ इ. पुणे येथील अगस्ति नाडीवाचक श्री. व्ही. मुदलीयारगुरुजी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना महर्षि आणि सप्तर्षि यांचे आशीर्वाद आहेत ! – श्री. व्ही. मुदलीयारगुरुजी

प.पू. डॉक्टरांना महर्षि आणि सप्तर्षि यांचे आशीर्वाद नेहमीच आहेत. त्यांना उत्तम दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभू दे. प.पू. गुरुदेव हिंदु राष्ट्राचे जे साम्राज्य उभे करत आहेत, ते कायमस्वरूपी टिकून राहू दे. हिंदु साम्राज्यासाठी (हिंदु राष्ट्रासाठी) साधकांच्या पाठीशी भरभरून आशीर्वाद असू दे. प.पू. डॉक्टरांना सर्व नवग्रहांचा आशीर्वाद असू दे, हीच शुभेच्छा ! – श्री. व्ही. मुदलीयार, अगस्थि नाडी केंद्र, कोथरूड, पुणे.

 

१२. उपस्थित संत आणि मान्यवर यांच्याकडून श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान

१२ अ. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी आणि श्री. सुभाष कोलंगडे यांच्या वतीने सन्मान, तसेच प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचे आशीर्वचन

पुणे येथील संत प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांची या ठिकाणी वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा नाथ संप्रदायातील संत प.पू. वसंत कर्वे यांचे २ वर्षांपूर्वी महानिर्वाण झाले आहे. त्यांचे जावर्इ श्री. सुभाष कोलंगडे त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले.

१२ आ. श्री विठ्ठलाचा पुष्पहार धारण करणे

पंढरपूर येथील पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत ! तेथील पुजारी आणि माजी विश्‍वस्त श्री. बाळासाहेब बडवे यांनी साक्षात् पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा पुष्पहार श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पुष्पमाला अर्पण केली.

संत तुकाराम महाराजांनी वीचा केला ठोबा, असे म्हटले आहे. वि म्हणजे विद् अर्थात ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती; म्हणून विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती. अठ्ठावीस युगे ज्ञानमूर्ती म्हणून पायरीवर उभा असलेल्या विठ्ठलाची पुष्पमाला ज्ञानमूर्ती असणार्‍या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी धारण करणे, ही न भूतो न भविष्यति अशी घटना आहे.

१२ इ. प.पू. दास महाराज (सिंधुदुर्ग) आणि पू. लक्ष्मी नाईक (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथील संतदांपत्य प.पू. दास महाराज आणि पू. लक्ष्मी नाईक यांची उपस्थिती लाभली. प.पू. दास महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना १०८० मण्यांची माळ घातली.

 १२ र्इ. पू. डॉ. ॐ उलगनाथनजी (तमिळनाडू)

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून साक्षात् महर्षि येथे उपस्थित होते.

१२ उ. भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा (पंजाब)

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महर्षि भृगु हे भृगुसंहितेचे वाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी यांच्या माध्यमातून उपस्थित होते. आज या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर भृगु संहितेतील फलादेशाच्या वाचनाचा कार्यक्रम झाला.

 १२ ऊ. म्हापसा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान करतांना म्हापसा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी सोबत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांची सून

१२ ए. बार्शी (सोलापूर) येथील वाजपेययाजी रघुनाथ काळेगुरुजी

(डावीकडून) बार्शी (सोलापूर) येथील वाजपेययाजी रघुनाथ काळेगुरुजी आणि लातूर येथील वेदमूर्ती प्रशांत जोशी यांनी यज्ञनारायणाचा प्रसाद म्हणून राजयोगी शाल अन् श्रीफळ अर्पण केले.

१२ एे. तमिळनाडू येथील वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण

तमिळनाडू येथील वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण यांनीही परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना मोत्यांचा हार अर्पण करून सन्मान केला.

 

१३. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले
यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला उपस्थित संतांचे आणि मान्यवरांचे सन्मान

१. पुणे येथील संत श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

१ अ. पुणे येथील संत वसंत (अण्णा) कर्वे यांच्याकरिता त्यांचे जावर्इ श्री. सुभाष कोलांगडे

२. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथील संत प.पू. दास महाराज यांंचा सन्मान

२ अ. प.पू. दास महाराज यांच्या धर्मपत्नी पू. लक्ष्मी नाईक यांंचा सन्मान

 

३. होशियारपूर, पंजाब येथील महर्षि भृगु यांच्या संहितेचे वाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी

 

४. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे पुजारी तथा माजी विश्‍वस्त श्री. बाळासाहेब बडवे

अनेक जीव ज्या भगवंतांचे स्वरूप पहाण्यासाठी जन्मोजन्मी कठोर साधना करतात, त्याला याचि देहि याचि डोळा । अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना लाभली. या परमभाग्याचे वर्णन करावे तरी कसे ? आज साक्षात् भगवान श्रीकृष्णच आपल्याला मोक्षाला घेऊन जाण्यासाठी परात्पर गुरुमाऊलीच्या रूपात अवतरित झाला आहे. त्याच्या अमृतदिनी प्रत्येक श्‍वास कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करूया.

 

१४. महर्षि भृगू यांच्या संहितेच्या फलादेश वाचनाचा कार्यक्रम

१४ अ. महर्षि भृगु यांचा संदेश

२९.४.२०१७ या दिवशी महर्षि भृगु म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव हा प्रकाशोत्सवच आहे. या दिवसाला आपण विष्णु प्रतीरूप तपोनिष्ठ तपोमूर्ती डॉ. जयंत-अवतार दिवस असे म्हणूया. परात्पर गुरु डॉक्टरांचा अवतार पुढे चिरंजीवी अवतार म्हणून नावाजला जाईल. म्हणजेच त्यांचे कार्य शाश्‍वत कार्याचेच एक प्रतीक म्हणून गणले जाईल.

आज महर्षि भृगु यांच्या आज्ञेने श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महासुदर्शन याग, शांतीयज्ञ आणि भृगु संहितेच्या फलादेशाचे वाचन करण्यात आले.

१४ आ. भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी यांचा परिचय

भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी हे होशियापूर, पंजाब येथील असून ते होमियोपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यांच्या गेल्या ३ पिढ्या महर्षि भृगु यांच्या संहितेचे वाचन करत आहेत. ते जेव्हा बोलतात, तेव्हा साक्षात महर्षि भृगु आपल्याशी बोलत आहेत, अशी अनुभूती अनेकांना आजपर्यंत आलेली आहे. श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे आयुरारोग्य उत्तम रहावे, त्यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे, यांसाठी ते सतत विविध तीर्थक्षेत्री याग आणि अनुष्ठाने करत आहेत. त्यांच्याप्रती सनातन परिवार कृतज्ञ आहे.

१४ इ. महासुदर्शन याग, शांतीयज्ञ आणि भृृगु संहितेच्या फलादेशाचे वाचन

१४ ई. कृतज्ञता

भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्माजी यांनी आम्हाला महर्षि भृगूंचे मार्गदर्शन सांगितल्याबद्दल त्यांच्याप्रती सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

१५. खरी कृतज्ञता

सनातन धर्माचे महान कार्य करणार्‍या श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा हा त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर केवळ कृतज्ञता एक दिवस व्यक्त करण्यापेक्षा प्रतिदिन सतत श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी सांगिलेल्या व्यष्टी साधनेच्या अंतर्गत अष्टांग साधना करणे आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत अध्यात्मप्रसार अन् हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणे, हीच सध्या खरी कृतज्ञता ठरणार आहे.

सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना, हेच श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे जीवितकार्य आहे. त्यांच्या या कार्यात अधिकाधिक वाटा उचलल्याने आमची साधना होणार आहे.