एखाद्या संतांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवणे, ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदी ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था.

पुणे – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सवाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसे विविध उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथेही विविध ठिकाणी व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे विविध विषयांवर व्याख्याने होत असून त्यामुळे जिज्ञासू प्रभावित होऊन कृतीशील होत आहेत. याविषयीचा आढावा येथे देत आहे.

 

व्याख्यानांचे विषय

  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले व्यष्टी-समष्टी साधनेचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
  • गुरुकृपायोगानुसार साधना आणि हिंदु राष्ट्र !
  • महिलांवर होणारे आघात आणि स्वसंरक्षण तसेच धर्माचरणाची आवश्यकता !
  • साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

 

लष्कर भागातील हिंद तरुण मंडळ येथील व्याख्यानात ४१ जिज्ञासूंची उपस्थिती

हिंद तरुण मंडळ येथे मार्गदर्शन करताना (१) श्री. प्रवीण नाईक आणि उपस्थित धर्माभिमानी

पुण्यातील लष्कर भागातील हिंद तरुण मंडळ येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले व्यष्टी-समष्टी साधनेचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा ४१ जणांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी समितीकडून पुणे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक श्री. दिलीप गिरमकर, तसेच भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. माधुरी गिरमकर यांना सनातनचे ग्रंथ भेट देण्यात आले.

 

वैशिष्ट्यपूर्ण

प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला मिळाल्याने अधिवक्त्यांची भावजागृती होणे

हिंद तरुण मंडळ येथील व्याख्यानाच्या वेळी उपस्थित अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्त आमचेही कृतज्ञतापुष्प त्यांच्या चरणी अर्पण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला आनंद मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सांगतांना त्यांची भावजागृती झाली.

 

हिंदुत्वनिष्ठांनो, हिंदु राष्ट्र जागृती अभियानात कशा प्रकारे सहभागी होऊ शकता ?

अ. हिंदु राष्ट्र जागृती सभांचे आयोजन करणे

आ. हिंदु शौर्य जागरण शिबिरांचे आयोजन करणे

हे उपक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क : श्री. सुनील घनवट – ९४०४९५६५३४

 

माणूस परिवार येथील व्याख्यानाने प्रभावित होऊन बिबवेवाडी येथे व्याख्यानाचे आयोजन

(१) श्री. चैतन्य तागडे यांचा सत्कार करतांना उजवीकडे श्री. गणेश चव्हाण

गावठाणमधील माणूस परिवार या संघटनेच्या सदस्यांसाठी ३० एप्रिल या दिवशी मार्गदर्शन आयोजित केले होते. या वेळी संघटनेचे १२ पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी गुरुकृपायोगानुसार साधना आणि हिंदु राष्ट्र याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी नाथ संप्रदायानुसार साधना करणारे श्री. गणेश चव्हाण यांच्या हस्ते श्री. तागडे यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे सदस्य श्री. महावीर ओसवाल हे व्याख्यान ऐकून प्रभावित झाले आणि त्यांनी बिबवेवाडी येथे व्याख्यान घेण्याची मागणी केली.

 

माणूस परिवार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेंद्र जगताप यांचा व्याख्यान घेण्यासाठी पुढाकार !

माणूस परिवार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेंद्र जगताप यांनी प्रवचनाचे संपूर्ण आयोजन केले. श्री. जगताप यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना उत्स्फूर्तपणे सांगितले. उपस्थितांमधील माणूस परिवार संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दुष्यंतराजे जगताप यांनी स्वतःहून हिंदु धर्माचे प्रवक्ता होण्याची इच्छा दर्शवली आणि कोठेही मार्गदर्शनासाठी येईन, असे सांगितले.

 

पिंपरी-चिंचवड येथे प्रवचनाच्या वेळी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून समितीचा सत्कार

थेरगाव येथील शिव कॉलनी भागातील ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्र येथे साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कुंभार यांनी व्याख्यान घेतले. या व्याख्यानाचा लाभ १८ जणांनी घेतला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्री. सचिन भोसले यांनी श्री. कुंभार यांचा सत्कार केला. उपस्थित सर्वांनी विषय खूप आवडल्याचे सांगितले.

 

व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थिनींकडून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी

वसतीगृहातील युवतींना मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर

सातारा रस्ता येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. श्रीकांत गोडबोले यांच्या वसतीगृहामध्ये समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी महिलांवर होणारे आघात आणि स्वसंरक्षण तसेच धर्माचरणाची आवश्यकता याविषयी ३० एप्रिल या दिवशी मार्गदर्शन केले. या वेळी १५ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित सर्व विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले आणि शौर्य जागरण शिबिराची मागणीही केली.

 

सन ब्राईट विद्यालयातील प्रवचनाला ६० शिक्षक उपस्थित

येथील आंबेगाव परिसरात असलेल्या सन ब्राईट विद्यालयात महाराष्ट्र दिनी झालेल्या ध्वजारोहणानंतर डॉ. ज्योती काळे यांनी साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी महाविद्यालयाचे ६० शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. या वेळी डॉ. काळे यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, स्वभावदोष निर्मूलनामुळे होणारा परिणाम याविषयी सांगितले. प्रवचनानंतर काही शिक्षिकांनी विविध विषयांवर जिज्ञासू वृत्तीने माहिती जाणून घेतली.

एखाद्या संतांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवणे, ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदी !

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय
वाणीतील मार्गदर्शनांच्या ध्वनीफितींचे सोशल मिडियाद्वारे प्रसारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या चैतन्यमय वाणीतील विविध विषयांवरील मार्गदर्शनाच्या ध्वनीफितींच्या प्रसारणाला सोशल मिडियाद्वारे (वॉट्स अ‍ॅप, फेसबूक यांद्वारे) नुकताच आरंभ झाला. साधना, नामजपाचे महत्त्व, व्यष्टी आणि समष्टी साधना या विषयांवर ८ ते १० मिनिटांच्या ध्वनीफिती क्रमशः प्रसारित करण्यात येणार आहेत. व्यक्तीच्या जीवनातील विविध समस्यांचे उत्तर साधना हे आहे; मात्र समाजाला साधना म्हणजे नेमके काय करावे, याविषयी संभ्रम असतो. अशा वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतवाणीतील अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांवर शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा, यासाठी ध्वनीफितींचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे.

टीप : साधकांना या ध्वनीफिती नेहमीच्या व्हॉटस्अ‍ॅप गटांद्वारे मिळतील आणि वाचकांनी या संदर्भात स्थानिक साधकांशी संपर्क करावा, ही विनंती.

साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर घेतलेली प्रवचने

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात