ओडिशातील राऊरकेला येथे ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व आणि एकाग्रता कशी वाढवू शकता’ या विषयावर अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत प्रवचन

राऊरकेला : उत्कलमणी गोपबंधु इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत सनातन संस्थेचे श्री. श्रीराम काणे यांनी ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व आणि एकाग्रता कशी वाढवू शकता’ या विषयावर अभियांत्रिकी शिकणार्‍या अनुमाने ६५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आज पाश्‍चात्त्य संस्कृतीमुळे आपल्याकडे रूढ झालेल्या हस्तांदोलन, दूरभाषवर ‘हॅलो’ बोलणे, कुंकुम वा तिलक न लावणे, जन्मदिनादिवशी केक कापणे, मेणबत्त्या विझवणे, फुगे फोडणे इत्यादि अनेक कुप्रथांमुळे होणारे नुकसान प्रतिपादन केले. त्याचबरोबर नमस्कार करणे, दूरभाषवर नमस्कार, रामराम इ. बोलणे, जन्मदिन तिथीनुसार साजरा करून औक्षण करणे इत्यादि हिंदु संस्कृतीतील प्रथांचे व्यक्ती, परिवार आणि समाज जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम विषद केले. संस्थेचे प्राचार्य श्री. प्रतापचंद्र रथ यांनी हे प्रवचन आयोजित करण्यात उत्स्फूर्त सहयोग दिला.