महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात साधकांना प्रतिदिन ऐकवण्यात येणार्‍या आणि शब्दांच्या पुढील पातळीची नादात्मक अनुभूती देणार्‍या स्तोत्रांचे अद्वितीयत्व !

कु. तेजल पात्रीकर

 

१. स्तोत्रपठण ऐकतांना रामनाथी आश्रमातील अनेक साधकांना येणार्‍या अनुभूतीचे स्वरूप

अ. तीनही स्तोत्रे संस्कृत भाषेत आहेत. त्यामुळे ती ऐकतांना शब्द कळत नाहीत, तरीही त्यांच्या भावपूर्ण लयीमुळे साधकांचे लक्ष स्तोत्राकडे अनायास खेचले जाते आणि मन एकाग्र होते.

आ. बहुतेक सर्वच साधकांना ही स्तोत्रे ऐकत रहावीत, असे वाटते.

इ. साधक नकळत ती लय गुणगुणायलाही लागतात.

ई. निर्विचार स्थिती अनुभवावयास येते.

उ. एवढ्या आपत्काळात महर्षी विविध माध्यमांतून आपल्या रक्षणासाठी कार्यरत असल्याचे लक्षात येऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.

ऊ. तोटकाष्टक हे ऐकतांना या स्तोत्राचा अर्थ ठाऊक नसून किंवा स्तोत्रातील शब्द कळत नसूनसुद्धा शरणागतीचा भाव जागृत होतो.

ए. दक्षिणामूर्ति स्तोेत्र आणि तोटकाष्टक ऐकतांना मनाला विशेष आनंद जाणवतो आणि शांती अनुभवावयास मिळते.

 

२. स्तोत्रपठण अधिक सात्त्विक होण्यामागील कारणे

अ. दक्षिणामूर्ति स्तोेत्र आणि तोटकाष्टक ही स्तोत्रे म्हणणार्‍यांचा भगवान शिव अन् आद्यशंकराचार्य यांच्याप्रतीचा उत्कटभाव या स्तोत्रपठणातून व्यक्त होतो.

आ. भावपूर्ण आणि एकाच लयीत स्वर आळवून स्तोत्रे म्हटलेली आहेत.

इ. दोन्ही स्तोत्रांच्या चालीत स्वरांची लय अधिक वर-खाली (स्वर वरच्या पट्टीत आणि खालच्या पट्टीत नेणे) केलेली नाही. एकाच लयीत ती म्हटली आहेत. स्वर एकाच लयीत म्हणणे, हे सत्त्वगुणदर्शक आहे. त्यामुळेही हे गायन सत्त्वप्रधान झाले आहे.

ई. दक्षिणामूर्ति स्तोेत्र हे स्तोत्र मालकंस या रागात म्हटले आहे, तर तोटकाष्टक हे स्तोत्र धीर-गंभीर अशा दरबारी कानडा या रागात गायले आहे.

उ. तोटकाष्टक या स्तोत्राचे रचयिते शंकराचार्यांचे प्रिय शिष्य तोटकाचार्य हे होते. त्यांचा आपल्या गुरूंप्रती अत्यंत उत्कट भाव होता. त्यांनी या स्तोत्रातून गुरूंकडे शरणागतीपूर्वक याचना केलेली आहे.

ऊ. तोटकाचार्यांचा भाव जाणून हे स्तोत्र म्हणणार्‍यानेही ते शरणागत भावात म्हटले आहे.

अशा अनेकविध कारणांमुळे या स्तोत्रांमध्ये सात्त्विकता एकवटली आहे. त्यामुळे या सात्त्विकतेचा परिणाम ही स्तोत्रे ऐकणार्‍यांवरही आपसूकच होतो. त्यामुळेच या स्तोत्रांकडे साधक सहज आकर्षित होतात, तसेच साधकांना ही स्तोत्रे शब्द कळत नसतांनाही ऐकावीशी वाटतात आणि त्यांना स्तोत्रे ऐकतांना सहज विविध अनुभूतीही येतात.

 

३. स्तोत्रपठणामध्ये वाद्यांची उणीव न भासण्याच्या दृष्टीने भावपूर्ण स्तोत्रपठणाचे महत्त्व

सुब्रह्मण्यभुजंग स्तोत्र, दक्षिणामूर्ति स्तोेत्र आणि तोटकाष्टक या तीनही स्तोत्रांपैकी दक्षिणामूर्ति स्तोेत्र आणि तोटकाष्टकम् ही स्तोत्रे म्हणतांना त्यात वाद्यांचा वापर केलेला नाही, तरीही ही स्तोत्रे ऐकतांना यात वाद्यांची न्यूनता जाणवत नाही. याचे कारण म्हणजे गायकाने ही स्तोत्रे अतिशय भावपूर्ण रितीने गायली आहेत. त्यामुळे ही स्तोत्रे ऐकतांना त्यांत गोडवा आणि आर्तता जाणवते. वाद्यांची उणीवही भासत नाही.

संगीत साधनेतूनही शेवटी अनेकातून एकात जाणे हेच अनुभवायचे असते. त्यानुसार अनेक वाद्यांच्या साथीने गायन करण्यातून वाद्यांच्या साथीविना भावपूर्ण गायनाकडे जाणे अपेक्षित असते. असे गायन अधिक परिणामकारक असते. हे शास्त्रही या स्तोत्रांच्या माध्यमातून सिद्ध होते.

 

४. तोटकाष्टकाचा अर्थ लक्षात घेऊन ते ऐकल्याने साधकांच्या भावजागृतीत वाढ होणे

तोटकाचार्य यांची कथा समजल्यावर तोटकाष्टक हे स्तोत्र ऐकतांना साधकांच्या भावजागृतीमध्ये वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे स्तोत्राच्या स्वरांना शब्द आणि अर्थ यांची जोड मिळाली.

साधनेच्या दृष्टीने संगीतातील (गीत अथवा स्तोत्र यांतील) शब्दांमधून आपल्याला अंतिमतः निर्गुणाकडे जायचे असले, तरी गीताचा / स्तोत्राचा अर्थ कळून त्याच्याशी एकरूप होणे आणि त्यामुळे भावजागृती होणे, अशा प्रकारचे त्यातील प्राथमिक टप्पे अनुभवणेही आवश्यक आहे. या स्तोत्रांच्या माध्यमातून साधक त्याही आनंदाचा अनुभव घेत आहेत.

 

५. सात्त्विक गायकांच्या आवाजातील स्तोत्रे महर्षींनी उपलब्ध करून देणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून मागील वर्षभरापासून आपण संगीताच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती याचा अभ्यास चालू केला आहे आणि याच कालावधीत अशा सात्त्विक गायकांच्या आवाजातील स्तोत्रेही महर्षींनी आपल्याला उपलब्ध करून दिली. केवढी ही महर्षींची कृपा !

 

६. महर्षींप्रती कृतज्ञता

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, महर्षि या स्तोत्रांच्या माध्यमातून केवळ साधकांचे रक्षणच करत नाहीत, तर साधकांची साधनेत शीघ्र प्रगती व्हावी, यासाठीही साहाय्य करून साधकांचे कल्याणच करत आहेत. त्यामुळे महर्षींच्या चरणी अनन्यभावे कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.