वर्ष २०२३ ला भारत हिंदु राष्ट्र झालेलेच असेल ! – अभय वर्तक, सनातन संस्था

व्यासपिठावर उपस्थित वक्ते डावीकडून श्री. अभिजित देशमुख, श्री. अभय वर्तक, सौ. अलका व्हनमारे आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सातारा – हिंदूंची शौर्याची परंपरा कधीही खंडित झालेली नाही. राम-कृष्ण यांच्या अवतारांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत ते अलीकडे झालेल्या स्वातंत्र्यवीरांपर्यंत ही परंपरा चालू आहे. सध्या जगभर ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवादी कारवाया चालू आहेत. भारतातही ‘इसिस’चे समर्थक प्रत्येक गावात पकडले जात आहेत. येणार्‍या काळात इसिसचा आतंकवाद, १४ प्रकारचे जिहाद, धर्मांतर या समस्यांना तोंड देण्यासाठी शौर्यवान युवकांची आवश्यकता आहे. इसिसच्या माध्यमातून भारताला ‘इस्लामिक स्टेट’ होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची संविधानिक मागणीच आपल्याला करावी लागेल. संतांच्या आशीर्वादाने शौर्यवान तरुण वर्ष २०२३ पर्यंत तथाकथित निधर्मी राष्ट्राचे रूपांतर हिंदु राष्ट्रात निश्‍चितच करतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. ते १ एप्रिल या दिवशी सातारा येथील राजवाडा येथील गांधी मैदान येथे झालेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या सभेसाठी दोन सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

पू. विठ्ठलस्वामी वडगावकर यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. हणमंत कदम, शेजारी (डावीकडे) समर्थभक्त श्री. शहाजीबुवा रामदासी
पू. उदयनाथ महाराज यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. हणमंत कदम
पू. विजय महाराज यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. सुनील लोंढे, शेजारी (डावीकडे) पू. सोमनाथगिरी उपाख्य कुंभारदादा
ह.भ.प. सापते महाराज यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. हणमंत कदम, (मध्यभागी) ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजित देशमुख, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि वेदमंत्र पठणाने सभेचा प्रारंभ करण्यात आला. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने सातारा शहरात हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करून दाखवली. या सभेत पुरोगाम्यांचा बुरखा सर्वच वक्त्यांनी फाडून त्यांचा भोंदू विवेकीपणा हिंदूंसमोर उघड केला !

या वेळी श्री. अभय वर्तक म्हणाले…

१. सामाजिक कार्यात घराणेशाही चालू करणारे दाभोलकर हे एकमेव कुटुंब आहे. अविनाश पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असणार्‍या विश्‍वस्त न्यासाच्या कार्याध्यक्षपदी श्रीमती शैला दाभोलकर यांना घाईघाईने बसवण्यात आले. असे करून हमीद दाभोलकर यांनी सामाजिक कार्याची जाहगिरी निर्माण करून वंशपरंपरा चालू केली. दाभोलकर कुटुंबियांनी विवेकवादाचा खोटा बुरखा पांघरलेला आहे.

२. दाभोलकर कुटुंबीय आज ‘आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन द्या’ म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतात. याउलट त्यांच्या ट्रस्टमध्ये आंतरधर्मीय तर लांबच, समाजातील लोकही लांबच, तर केवळ त्यांच्याच घरातील लोक घेऊन परिवारवाद आणत आहेत.

३. सनातन संस्थेने अध्यात्मप्रसार करत रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. आज २५ वर्षांनंतरही सनातन संस्था वेगाने कार्य करत आहे.

४. विखे पाटील फाऊंडेशनला झाकीर नाईकसारखी व्यक्ती दोन कोटी रुपयांची देणगी देते, असे त्यांचे सख्खे भाऊ अशोक विखे पाटील सांगतात. त्या वेळी दाभोलकर कुटुंबीय पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत; कारण विखे पाटील हे काँग्रेसवाले आहेत. याउलट सनातनच्या विरोधात प्रतिक्रिया देण्याची वेळ आल्यास रात्री १२ वाजता उठवूनही प्रतिक्रिया देतात.

 

महिलेने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे
अत्यावश्यक आहे ! – सौ. अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

१. धर्माच्या नावाखाली हिंदु धर्मियांची दिशाभूल करणार्‍या तृप्ती देसाई यांसारख्या महिलांचे आम्ही ऐकणार नाही, तर आम्ही आमच्या परंपरांचा सन्मान करणारच ! आज हिंदु धर्मात महिलेला देवी मानले जाते, याचे भान आपण ठेवले पाहिजे.

२. आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीत महिला पोलिसांवरही अत्याचार झाले. या महिला पोलिसांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जी पोलीस यंत्रणा महिला पोलिसांचे रक्षण करू शकत नाही, ती तुमचे काय रक्षण करणार ? त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.

३. रणरागिणी शाखा धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात नेहमीच तत्परतेने आवाज उठवते. रामगोपाल वर्मा यांनी महिलांच्या विरोधात ट्विट केल्यावर आम्ही तात्काळ गोवा येथे तक्रार दाखल केली. देशभरात झालेल्या विरोधामुळे अखेर रामगोपाल वर्मा यांनी क्षमायाचना केली.

४. महिला आज तोकडी वस्त्रे परिधान करतात. योग्य पेहराव आणि योग्य आचार विचार यासाठी महिला आणि युवती यांना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे.

 

श्रीराम मंदिर तर बांधूच; पण
रामराज्यही आणू ! – अभिजित देशमुख, हिंदु जनजागृती समिती

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे ठिकाण हे श्रीरामजन्मभूमीचेच स्थळ असल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध होऊनही अद्याप उभारले जाऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. सध्या श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारे पूजा-अर्चा करता येत नाही. हे टाळण्यासाठी तेथे एक तात्पुरते लहान मंदिर बनवावे आणि त्यामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी आमची मागणी आहे. ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे रामराज्यासारखे आदर्श राज्य ! केवळ संविधानात ‘हिंदु राष्ट्र’ शब्द आला किंवा सत्तापरिवर्तन झाले; म्हणजे रामराज्याची अनुभूती येणार नाही. त्यासाठी राज्यकर्ते आणि प्रजा दोघेही प्रभु श्रीरामासारखे सात्त्विक आणि प्रामाणिक होणे अपेक्षित आहेत. न्यायालयाचा आदेश असूनही आज मशिदींवरील अवैध आणि ध्वनीप्रदूषण करणार्‍या भोंग्याच्या विरोधात कोणतीच कृती होतांना दिसत नाही. तरी या विरोधात हिंदूंनी संघटितपणे कृती करणे अपेक्षित आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख यांनी केले.

 

संतांच्या पुण्यभूमीत दाभोलकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणे दुर्दैवी !

सातारा नगरपालिकेने आज दाभोलकर यांच्या नावाने पुरस्कार घोषित केला आहे. वास्तविक संतांच्या या पुण्यभूमीत शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावे पुरस्कार देणे अपेक्षित असतांना घोटाळे करणार्‍या आणि हिंदु धर्मावर आघात करणार्‍या डॉ. दाभोलकर यांच्या नावे पुरस्कार दिला जाणे, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या पुरस्काराचे काय करायचे, याचा सातारकरांनी विचार केला पाहिजे !

 

जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होत आहे, तिथे तिथे आम्ही हिंदूंच्या
पाठीशी ठामपणे उभे राहू ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

या वेळी बोलतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाल्यावर कोल्हापूर येथे त्यांचे आरोपपत्र घेण्यास कोणीही पुढे आले नाही. ज्या प्रकरणात अद्याप काहीही निष्पन्नही झाले नाही, त्या प्रकरणात वकिलांनी अशी भूमिका घेणे अयोग्य आहे. एकीकडे आम्ही बलात्कारी, गुंड यांचे वकीलपत्र घेऊ; पण हिंदुत्वनिष्ठांचे घेणार नाही. याला काय म्हणावे ? हे वकीलपत्र हिंदु विधीज्ञ परिषदेने स्वीकारले ! जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होत आहे, तिथे तिथे आम्ही हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू ! यापुढे पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद आम्ही खपवून घेणार नाही.’’

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पुढे म्हणाले की…

१. दाभोलकर कुटुंबीय धर्माची चिकीत्सा संविधानाच्या आधारावर करायची आहे, असे नेहमी म्हणतात आणि जेव्हा त्यांच्या ट्रस्टची चौकशी करण्याची वेळ येते, तेव्हा ते सिद्ध नसतात ! हा दुतोंडीपणा आहे.

२. डॉ. दाभोलकर प्रकरणात प्लँचेटचा वापर करणारे पोलीस अधिकारी गुलाबराव पोळ यांना अटक करण्याची मागणी दाभोलकर कुटुंबियांकडून का केली जात नाही ?

३. जे पुरोगामी ‘एक गाव एक गणपती करा’, असे आवाहन करतात, ते ‘एक मोहल्ला एक बकरी’, अशी मागणी का करत नाहीत ? यावरून पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो.

४. मालेगाव स्फोट प्रकरणात सुधाकर चतुर्वेदी नावाच्या हिंदुत्वनिष्ठाला तत्कालीन एटीएस् अधिकार्‍यांनी पूर्णत: अवैध अटक केली. विमानप्रवास करतांना चर्तुवेदी यांच्या ऐवजी खोटे नाव वापरून भोपाळला नेले. वर्ष २००८ मध्ये अटक केलेल्या सुधाकर यांचा खटला वर्ष २०१७ आले, तरी अजून चालू झालेला नाही. हे असे किती काळ चालणार ? अशांसारख्या अनेकांची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी आम्ही आज उभे आहोत.

५. दाभोलकर-पानसरे कुटुंबीय आज सनातनच्या साधकांना जामीन मिळू नये, तसेच खटला चालू नये म्हणून प्रयत्नशील आहेत.

 

सभेत हिंदुत्वनिष्ठांनी ‘त्यांच्यात काय पालट झाला’, त्या संदर्भात व्यक्त केलेले मनोगत

सौ. गीतांजली गोंधळेकर

मी गेल्या वर्षीपासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. संस्थेत आल्यावर देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची, हे मला समजले. अन्य गोष्टींसमवेत माझ्यातील दोष निवारणाच्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले आणि त्यातून अनूभूती आल्या. यामुळे एकूणच जीवनाकडे आणि परिस्थितीकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला.

श्री. शिवराज तलवार (श्री शिवप्रतिष्ठान)

धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून नेमकी कृती काय करायची, ते लक्षात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज असे दोन्ही होते. त्यानुसार आपणही साधना केली पाहिजे, हे बिंबले. येथे उपस्थित असणार्‍या धर्मबांधवांना माझी ही विनंती आहे की, त्यांनी अधिकाधिक धर्मशिक्षणवर्ग आयोजित करावेत. धर्मशिक्षणवर्गामुळे विचार करण्याची पद्धत पालटेल. विचार पालटले की, सर्वच गोष्टींत पालट दिसू लागेल.

उपस्थित मान्यवर संत

पू. विजय महाराज, दत्तनाम जुना आखाड्याचे पू. सोमनाथगिरी उपाख्य कुंभारदादा, पू. उदयनाथ महाराज, पू. विठ्ठल स्वामी वडगावकर महाराज, समर्थभक्त श्री. शहाजीबुवा रामदासी, ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, ह.भ.प. बबनराव सापते महाराज. या सर्वांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. हणमंत कदम आणि श्री. सुनील लोंढे यांनी केला.

उपस्थित मान्यवर हिंदुत्वनिष्ठ आणि अन्य…

हिंदु महासभेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अधिवक्ता श्री. गोविंद गांधी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, हिंदु महासभेचे कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, श्री शिवप्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. सतीशबापू ओतारी, भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. काशीनाथ शेलार, अधिवक्ता विजय इंदलकर, अधिवक्ता श्री. प्रशांत मोरे, अधिवक्ता श्री. रमणिक पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. शिरीष दिवाकर, सातारा नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ. सिद्धी पवार, रहिमतपूरचे नगरसेवक श्री. निलेश संपतराव माने, रहिमतपूरचे माजी उपनगराध्यक्ष श्री. धनंजय मुकुटराव पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी नगरसेविका सौ. सुनीता धनंजय पवार, रहिमतपूरचे माजी नगरसेवक श्री. प्रवीण माने, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. अण्णा देशपांडे, शिवसेना खेडविभाग प्रमुख श्री. रमेश बोराटे, भाजपचे विद्यमान नगरसेवक श्री. विजयकुमार काटवटे

५ एप्रिल या दिवशी होणार्‍या आढावा बैठकीला उपस्थित रहाण्याचे आवाहन !

धर्माभिमानी हिंदूंना पुढील कार्याची दिशा ठरवता येण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन बुधवार, ५ एप्रिल या दिवशी शनि मारुति मंदिर, शनिवार पेठ येथे सायंकाळी ७ वाजता केले आहे.

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून सभेचे प्रक्षेपण !

या सभेचे फेसबूकच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले. त्या माध्यमातून २२४ हून अधिक जणांनी सभा पाहिली. याच समवेत व्हॉट्स अ‍ॅप, तसेच फेसबूकवरही सभेचा नियमित प्रसार करण्यात येत होता.

 

वैशिष्ट्यपूर्ण…!

सभेच्या वेळी मोठ्या प्रमाणात आलेले उन्हाळी किडे

१. सभेच्या आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्च या दिवशी सायंकाळी सभेचे ठिकाण, तसेच सातारा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विजांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शनिवार, १ एप्रिल या दिवशी सभेच्या दिवशीही काही प्रमाणात ढग दाटून आले होते; मात्र पावसाचा कोणताही व्यत्यय न येता सभा निर्विघ्नपणे पार पडली.

२. सभा चालू झाल्यावर काही वेळातच उन्हाळी किड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास चालू झाला. हे किडे सभेसाठी लावण्यात आलेल्या दिव्यांकडे, तसेच व्यासपिठाकडे मोठ्या प्रमाणात येत होते. उदबत्ती लावणे, नामजप-प्रार्थना, तसेच अन्य उपाय केल्यावर काही काळाने हा त्रास दूर झाला.

या वेळी श्री. अभय वर्तक त्यांच्या भाषणात म्हणाले ‘आपल्या कार्यात प्रारंभी किडेरूपी विघ्ने येतील; मात्र काही काळाने ती दूर होतील.’

…यांनी केले सभेला सहकार्य !

श्री. हरिभाऊ साळुंखे, श्री. आशिष निकम, श्री. साळुंखे, श्री. पद्माकर खुटाळे, श्री. तात्या किर्दत, विद्यमान नगरसेवक श्री. मनोज शेंडे, श्री. राहुल घोरपडे, स्वराज्य मंगल कार्यालय, कौशिक कुलकर्णी, गजानन मंगल कार्यालय, हॉटेल राधिका पॅलेस, हॉटेल श्रीमान, श्री. प्रदीप कुलकर्णी, श्री मंगल सेवचे श्री. उदय गजर, श्री साई शुभसेवा, श्री राजू भोसले, श्री. गणेश शिंदे, लोकमंगल मुद्रणालय, पटांगणासाठी सातारा नगरपालिकेने सहकार्य केले.

(हिंदु धर्मजागृती सभेसाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत !)

उद्बोधक आढावा बैठक !

सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात ठोस कृती करणे, धर्मशिक्षणवर्गासाठी पुढाकार घेणे, धर्मजागृती सभेचे आयोजन, तसेच अन्य गोष्टी ठरवण्यात आल्या. या वेळी अधिवक्ता श्री. गोविंद गांधी म्हणाले, ‘‘आपण प्रतिदिन करत असलेल्या व्यवहारातही हिंदु राष्ट्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अधिकाधिक स्वदेशी उत्पादने वापरून परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे.’’ ह.भ.प. बबनराव सापते महाराज यांनी ‘समितीच्या कार्याला वारकरी मंडळाचा पूर्ण पाठिंबा आहे’, असे सांगितले. श्री. शहाजीबुवा रामदासी म्हणाले, ‘‘सनातन संस्था आमचाच परिवार आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना भगवंत करणारच आहे. धर्म, संस्कृती, संत यांवर होणार्‍या आघातांचे आणि आक्षेपांचे सभेच्या माध्यमातून खंडण करण्यात आले.’’

क्षणचित्रे

१. श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी सभेचा प्रसार, सभेची पूर्वसिद्धता यांपासून मैदानाची सिद्धता, तसेच धर्मसभेच्या अन्य धर्मसेवांमध्येही सहभागी झाले होते. सातारा येथील एक दिव्यांग असलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. भगवानराव शेवडे हे त्यांची तिचाकी घेऊन सभेसाठी शेवटपर्यंत उपस्थित होते.

२. सभेला सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस, तसेच गोपनीय पोलीस उपस्थित होते. गोपनीय शाखेच्या पोलिसांनी सभेच्या कालावधीत काही छायाचित्रे काढली. (धर्म आणि राष्ट्रप्रेमी हिंदु जनजागृती समितीच्या सभेला आपला वेळ अनावश्यक वाया घालवण्यापेक्षा भारतात फोफावलेल्या जिहादी आतंकवादाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वेळ दिला असता, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक)

३. पू. विठ्ठलस्वामी वडगावकर हे ७० किलोमीटर दूरवरून आले होते, तर आसवली येथील पू. उदयनाथ महाराज हेही ५० कि.मी. अंतरावरून सभेसाठी आले होते.

४. वक्त्यांचे मार्गदर्शन, तसेच अन्य वेळी ओझर्डे (तालुका वाई) येथील श्री. राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडून वाजवण्यात येणार्‍या तुतारीमुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह निर्माण होत होता. सभेच्या पटांगणाच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी थांबून शेवटपर्यंत सभा ऐकली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात