रोहा (जिल्हा रायगड) येथील श्रीराम मंदिराचा सनातन संस्थेच्या वतीने जीर्णोद्धार

 

चैतन्य प्रक्षेपित करणार्‍या श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्ती

रोहा (जिल्हा रायगड) – येथील रेल्वे स्थानकापासून जवळच असणार्‍या अष्टमी गावातील १५० वर्षे जुन्या असणार्‍या श्रीराम मंदिराचा सनातन संस्थेच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. उत्सवाच्या आदल्या दिवशी उदकशांती विधी सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

रामनवमीच्या दिवशी मंदिरातील मूर्तींना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर भावपूर्ण पूजन करून दुपारी १२ वाजता श्रीरामाचा पाळणा आणि आरती करून जन्मसोहळा साजरा करण्यात आला.

या वेळी ह.भ.प. बापू रावकर महाराज यांनी श्रीरामाची वैशिष्ट्येे आणि कार्य याविषयी प्रवचन केले. मंदिरात उपस्थित ग्रामस्थांना रामराज्याची संकल्पना याविषयी अवगत केले.

क्षणचित्रे

१. ग्रामस्थांनी ‘‘मूर्ती अतिशय सजीव असल्यासारख्या जाणवत आहेत. तुम्ही नवीन मूर्ती आणल्यात का ?’’, अशी विचारणा केली.

२. गावातील २५० हून अधिक भाविकांंनी दर्शन घेतले.

 

कोपरा (पनवेल) येथे श्रीराम मंदिरात मुलांसाठी श्रीरामाविषयी प्रवचन आणि प्रश्‍नमंजुषा !

पनवेल –  येथील कोपरा गावामध्ये असणार्‍या श्रीराम मंदिरामध्ये ‘सनातन संस्था ठाणे’ या न्यासाच्या वतीने गावातील मुलांना रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम आणि श्रीरामाची वैशिष्ट्ये याविषयी माहिती देण्यात आली आणि तोंडी प्रश्‍नमंजुषा घेण्यात आली. दुपारी १२ वाजता श्रीरामाची आरती करून आणि प्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी ३० मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. आणि सौ. पाटील हे उपस्थित होते.

कु. दुश्यंत पाटील याने गावातील मुलांना एकत्र करून मंदिरात बसण्यासाठी अनुमती घेतली आणि अन्य सिद्धताही केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात