गुढी उभारणे केवळ कर्मकांड नव्हे, तर विज्ञान ! – श्री. आनंद जाखोटिया ,सनातन संस्था

उज्जैन येथील ‘मिहिर विचार क्रांती मंचा’कडून नववर्षानिमित्त कार्यक्रम

डावीकडून श्री. संजय खंडेलवाल, मंचचे अध्यक्ष श्री. मांगीलालजी रूपायला, संबोधित करतांना श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. कुलदीपजी पाल

कायथा (उज्जैन) – गुढी उभारणे केवळ कर्मकांड नाही, त्यामागे विज्ञान आहे. जसे दूरचित्रवाहिनी पहाण्यासाठी ‘डिश’ लावावी लागते, त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा या हिंदु नववर्षाला वातावरणात सर्वाधिक असलेल्या प्रजापती लहरींचा लाभ घेण्यासाठी गुढी उभारली जाते. त्यामुळे युवकांनी आपल्या सणांमागील विज्ञानाचा अभ्यास करून श्रद्धेने ते साजरे केले पाहिजेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया यांनी येथे केले. येथील मिहिर विचार क्रांती मंचच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याचा ५० हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. या वेळी मंचचे श्री. महेश पाटीदार यांनी सर्वांचे स्वागत केले, तर श्री. अनिल पांचाळ यांनी आभारप्रदर्शन केले.

श्री. जाखोटिया पुढे म्हणाले की, कडुलिंबाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले लाभ जरी आज विज्ञानाला कळाले असले, तरी त्यामध्ये प्रजापती लहरी ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक आहे, हे ऋषिमुनींना पूर्वीपासूनच ज्ञात होते. गुढीपाडव्याचे प्राकृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे; पण १ जानेवारीला नवीन वर्ष का ?, याचे काही कारण नाही. पाश्‍चात्त्य देश आज मनःशांतीसाठी हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे आपण पूर्णतः शास्त्रीय असलेली हिंदु संस्कृती स्वाभिमानाने आचरणात आणली पाहिजे.

या वेळी त्यांच्यासोबत रामकृष्ण मिशनचे सर्वश्री प्रदीप निगम, कुलदीप पाल आणि श्रीमती अनुपमा दौलताबादकर उपस्थित होत्या. या वेळी ध्यानाचे प्रात्याक्षिकही करवून घेण्यात आले.

तणावमुक्तीसाठी ध्यान लाभदायी ! – संजय खंडेलवाल

या वेळी रामकृष्ण मिशनचे उज्जैन केंद्रप्रभारी आणि प्रशिक्षक श्री. संजय खंडेलवाल म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याचे स्मरण अर्थात ध्यान आवश्यक आहे. रामकृष्ण परमहंस हे देवीपूजेशी इतके एकरूप झाले होते की, साक्षात् देवी त्यांच्याशी संवाद करायची, हे एकप्रकारचे ध्यानच आहे. त्याचप्रमाणे आज लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना असलेला ताण घालवण्यासाठी आपल्याला ध्यान शिकले पाहिजे.

आज तरुणांसमोर आचार्य वराहमिहिर यांच्यासारख्यांचा आदर्श ठेवण्याची आवश्यकता !

कायथा ग्रामवासी भाग्यवान आहेत; कारण आचार्य वराहमिहिर यांचे जन्मस्थळ असलेल्या गावात त्यांचा जन्म झाला आहे. आचार्य वराहमिहिर यांनी गॅलेलियोच्या पुष्कळ पूर्वीच पृथ्वी सपाट नसून चेंडूसारखी गोल आहे, हे आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय सभेत सप्रमाण सिद्ध केले. त्यांच्या विद्वतेचे अनेक दाखले आहेत. दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीमुळे युवकांसमोर ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचा नव्हे, तर चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू यांचा आदर्श ठेवला जात आहे. ही प्रथा मोडून आपण आचार्य वराहमिहिर यांच्यासारख्या ऋषिमुनींचा आदर्श सर्वांसमोर ठेवायला हवा.

क्षणचित्रे

१. उज्जैन कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. आयोजकांपैकी श्री. अनिल पांचाळजी हे प्रदर्शन पाहून प्रभावित झाले होते. हे धर्मशिक्षण गावातील लोकांना मिळावे, यासाठी त्यांनी संस्थेच्या वक्त्यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले.

२. पाश्‍चात्त्य कुप्रथा आणि हिंदु संस्कृती यांतील अंतर व्याख्यानातून लक्षात आल्यावर अनेकांनी सनातन संस्था प्रकाशित ‘धर्मशिक्षा फलक’ हा ग्रंथ घेतला आणि ‘वॉट्स अ‍ॅप’द्वारे नियमित धर्मशिक्षण मिळवण्यासाठी नाव नोंदवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात