स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नियमितपणे काढा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ

‘सध्या त्रास होत असलेल्या साधकांना नामजपादी उपाय सांगतांना असे लक्षात आले की, वातावरणातील अनिष्ट शक्ती साधकांचे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण वारंवार आणत आहेत. हे आवरण वाढून मग डोक्यापासून ते छातीपर्यंत घोंगडे पांघरल्याप्रमाणे पूर्णपणे आवरण येते. यामुळे साधकांना ‘न सुचणे, मन अस्वस्थ असणे, निरुत्साह, नामजप करावासा न वाटणे, उपायांचा परिणाम न होणे’, असे त्रास होत आहेत. यासाठी साधकांनी डोक्यावर किंवा छातीवर दाब जाणवत असल्यास, तसेच वरील त्रास होत असल्यास प्रथम त्या विशिष्ट स्थानाचे किंवा छातीपासून डोक्यापर्यंतच्या शरिराच्या भागाचे आवरण काढावे. साधक ठराविक वेळाने अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतात, तेव्हा त्यांनी स्वतःवरील आवरणही काढावे. आवरण काढण्यासाठी १ – २ मिनिटेच लागतात.

स्वतःवरील आवरण हाताच्या बोटांनी किंवा सनातन प्रभात नियतकालिकाने काढू शकतो. हाताच्या बोटांनी आवरण काढण्याचा लाभ म्हणजे आपल्या हाताच्या बोटांतून अविरतपणे जी प्राणशक्ती प्रक्षेपित होत असते, ती प्राणशक्तीही आपल्याला मिळते. सनातन प्रभात नियतकालिक सात्त्विक असल्याने त्यानेही आवरण निघते. आपल्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नियमितपणे काढल्यास त्रासाचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात न्यून होते.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.