शिवशंभूंनी केलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

सातारा – ज्याप्रमाणे शिवशंभू यांच्या जन्मापूर्वी हिंदु समाज निद्रिस्त निपचित पडला होता, तशी परिस्थिती आताही आहे. शिवरायांनी मावळ्यांना जागृत केले, पाच पातशाह्यांना याच भूमीत गाडून टाकले. ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. पूर्वी धर्मवीरांवर जसे अत्याचार झाले, तसेच अत्याचार सध्या हिंदुत्वनिष्ठांवर होत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जागृत केलेली शौर्याची ज्वाला प्रज्वलित रहाण्यासाठी अन्यायाच्या विरोधात पेटून उठावे आणि शिवशंभूंनी केलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हावे, असे जाज्वल्य प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. ते छत्रपती संभाजी महाराज बलीदानमासानिमित्त श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. २७ मार्च या दिवशी गांधी मैदान राजवाडा येथे ही सभा शिवशंभूप्रेंमीच्या अलोट गर्दीत पार पडली.

ते पुढे म्हणाले…

१. हिंदूंनो, येत्या काळात अधिवक्त्यांचे संघटन करा. त्यामुळे आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेचा वापर करून हिंदुहित साधता येईल.

२. इंग्रजांनी हिंदु समाजाला निस्तेज करण्यासाठी वर्ष १९६० मध्ये शस्त्रास्त्र बंदी कायदा लागू केला. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी आम्हा मावळ्यांना दिलेली तलवार बाळगणे गुन्हा समजले जाऊ लागले. सध्याचे नेतेही हे कायदे पालटत नाहीत. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदुहित साधण्याचा एकमेव मार्ग आहे.

३. येणारा काळ भयंकर असणार आहे. त्या वेळी अनेकविध संकटांवर मात करण्यासाठी हिंदूंनी उपलब्ध साधनांचा वापर करून स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. हिंदूंना आत्मबलसंपन्न केले पाहिजे. आत्मबलसंपन्न हिंदूच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतात.

४. डिसेंबर २०१६ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळच ‘सनबर्न पार्टी’ घेतली गेली. या पार्टीत दारूचा नंगानाच केला गेला. हिंदूंचे तीर्थस्थळ बाटवले गेले. पुढील वेळी असा पाश्चात्य कार्यक्रम या भूमीत होणार नाही, असे संघटन येत्या काळात उभे करू, शौर्य गाजवू, तरच आपण शिवशंभूंचे खरे पाईक ठरू.

५. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शिवराय, झाशीची राणी, तात्या टोपेंचा इतिहास दिलेला नाही. त्याच पुस्तकात साम्यवाद्यांनी मोगलांचा इतिहास पानेच्या पाने भरून लिहिला आहे. असा विकृत इतिहास तात्काळ पालटण्यासाठी आणि इतिहासाच्या पुस्तकात शिवशंभूंना मानाचे स्थान मिळण्यासाठी मोठे आंदोलन येत्या काळात उभे राहिले पाहिजे, तरच येणारी पिढी धर्मप्रेमी बनेल.

६. पू. भिडेगुरुजींनी सिद्ध केलेल्या धारकऱ्यांकडून सर्वजण आशेने पहात आहेत. आपण त्यांच्या अपेक्षा खऱ्यां ठरवूया. हिंदूंनी आता शौर्य गाजवण्याची वेळ आली आहे. सनातन संस्था तुमच्या पाठीशी उभी आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आता आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.

७. धर्मकार्य करणाऱ्यां युवकांनी धर्माचरण आणि साधना करून आपले आत्मबळ वाढवले पाहिजे. तरच येणाऱ्यां संकटांना शारीरिक आणि मानसिक स्तरावर तोंड देता येईल.

सभेचा प्रारंभ भगव्या ध्वजाचे आरोहण करून करण्यात आली. ध्येयमंत्र म्हणण्यात आला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष श्री. शेखर चरेगावकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार श्री. सतीश (बापू) ओतारी यांनी केला. समर्थभक्त श्री. शहाजीबुवा रामदासी यांचा सत्कार श्री. शेखर चरेगावकर यांनी केला. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे बंधू श्री. जयवंत महाडिक यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. श्री. सतिश (बापू) ओतारी यांनी या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा उपस्थितांना सांगितला, तसेच पुढील कार्याची दिशा सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी भगवा ध्वज उतरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. राहुल इंगवले यांनी केले.

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मभक्तीचे केवळ
स्मरण नको; तर अंगीकार करा ! – श्री. शेखर चरेगावकर, अध्यक्ष, राज्य सहकार परिषद

श्री. शेखर चरेगावकर, अध्यक्ष, राज्य सहकार परिषद

पूर्वी हिंदु धर्मावर परकियांची सशस्त्र आक्रमणे होत होती. आता हिंदु धर्मावर वैचारिक आक्रमणे केली जात आहेत. हिंदूंचा बुद्धीभेद करून दुही माजवली जात आहे. धर्मावरील ही संकटे परतवून लावायची असतील, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या गुणांचा अंगीकार करावा लागेल. तसे केल्यास हिंदु धर्मावर नाहक टीका करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. कितीही संकटे आली, अनन्वित अत्याचार झाले, तरी हिंदु धर्म सोडणार नाही, याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. तो आदर्श जगण्याची वेळ आता आली आहे.

 

 

छत्रपती संभाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन हिंदु
राष्ट्र स्थापनेचे ध्येय गाठूया ! – श्री. चंदन जाधव, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री. चंदन जाधव, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती संभाजी महाराजांनी ३० दिवस मृत्यूशी झुंज दिली, पण धर्म सोडला नाही. शंभूराजांचा हा पराक्रम, धर्मासाठी झेलेल्या वेदना प्रत्येक हिंदूंसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. हिंदुत्वासाठी शेवटच्या श्वाससापर्यंत लढण्याची ही प्रेरणा घेऊनच शिवशंभूभक्तांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी नेटाने प्रयत्न करावेत.

 

 

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात