समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभाग यांच्याकडे निवेदन

वनअधिकारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

 

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘द लिजंड
ऑफ राणी पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास अनुमती देऊ नका !

कोल्हापूर  – संजय लीला भन्साळी हे जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारे चित्रपट तयार करतात. त्यांच्या नवीन येत असलेल्या ‘द लिजंड ऑफ राणी पद्मावती’ या चित्रपटात राजस्थानमधील राणी पद्मावती आणि मुसलमान आक्रमक अल्लाउद्दिन खिल्जी या लंपट बादशहाचे प्रेमप्रकरण दाखवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटास राजस्थानमधील करणी सेनेने तीव्र विरोध करत राजस्थान येथे त्याचे चित्रीकरण होऊ दिले नव्हते. हेच भन्साळी सध्या अनेक नियम धाब्यावर बसवून कोल्हापूर येथील मसाई पठार येथे अनधिकृतरित्या याचे चित्रीकरण करत आहेत. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘द लिजंड ऑफ राणी पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास अनुमती देऊ नका, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांनी स्वीकारले. (चित्रपटांद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संजय लीला भन्साळी यांचे चित्रीकरण थांबवण्याची मागणी करणार्‍या सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन ! – संपादक)

या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, बजरंग दल जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, बजरंग दल शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, बजरंग दलाचे श्री. राजेंद्र सूर्यवंशी, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. आशिष लोखंडे, इस्कॉनचे श्री. दीपक सपाटे, हिंदु एकतेचे शहरप्रमुख श्री. जयदीप शेळके, पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, पतीत पावनचे उपाध्यक्ष श्री. आकाश नवरुखे, ‘वंदे मातरम् युथ ऑरगनायझेशन’चे श्री. अवधूत भाटये, धर्माभिमानी श्री. गोविंदराव देशपांडे, श्री. देवराज सहानी, सौ. मनीषा लाड, श्री. शांताराम कांबळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, बाबासाहेब भोपळे, सनातन संस्थेचे श्री. प्रथमेश गावडे, विद्यार्थी संघटनेचे श्री. नितीश कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.

 

आमच्या जागेत चुकीचे घडल्यास निश्‍चित कारवाई ! – वनअधिकारी

वनअधिकारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांना निवेदन देण्यात आले. मसाई पठार हा वन्यजीव आणि वैविध्यपूर्ण वनस्पतींचा प्रदेश आहे. १५ मार्च २०१७ या दिवशी लागलेल्या आगीत वन्यजीव आणि दुर्मिळ वनस्पती जळून गेल्या असण्याची दाट शक्यता आहे. याप्रकारे झालेली हानी कशानेही भरून निघणार नाही. हा भाग वनविभागाचा आहे का याचीही निश्‍चिती होणे आवश्यक आहे. जर वनविभागाची ही भूमी असेल, तर चित्रीकरणाची अनुमती कशी दिली ? त्यामुळे इतिहासाचा विपर्यास्त करणे, वनविभागाची जागा चित्रीकरणासाठी वापरणे हे अनधिकृत आहे. त्यामुळे या चित्रपटास अनुमती नाकारण्यासमवेत भन्साळी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. डॉ. शुक्ला यांनी ‘आमच्या जागेत चुकीचे काही होऊ देणार नाही. योग्य ती कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले.

 

पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन

चित्रीकरणाच्या कालावधीत अवैधरित्या प्राण्यांना आणून कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणी prevention of cruelty to animals act खाली भन्साळी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करा !

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांच्या पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. prevention of cruelty to animals act 1960 आणि prevention of cruelty to animals act 1970 या अन्वये सध्या कोणताही चित्रपट अथवा नाटक यात कोणत्याही जिवंत प्राण्याकडून काम करून घेण्यास अनुमती नाही. असे असतांना हे सर्व नियम धाब्यावर बसवून संजय भन्साळी यांनी त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी घोडे आणले होते. याशिवाय गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात उद्रेक झाल्याने काही लोकांनी चित्रीकरणाचा सेट पेटवून दिला. या प्रकरणात सेटच्या ठिकाणी जे घोडे उपस्थित होत, ते गंभीररित्या घायाळ झाले. यात प्राण्यांचा जीव जाण्याचा दाट धोका होता. हा एकप्रकारे प्राण्यांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार झाला. त्यामुळे शासनाची अनुमती नसतांना prevention of cruelty to animals act या कायद्याखाली नियम मोडणार्‍या भन्साळी यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच ‘Performing Animals (Registration) Rules, 2001’ या कायद्याखाली योग्य ती अनुमती घेतली आहे का, त्याचीही तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातही दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात