मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ वाढवण्यास केलेली बंदी शासनाने मागे न घेतल्यास पुढच्या संकष्टीला मी स्वत: मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

सांगली येथील राष्ट्रीय हिंदू
आंदोलनासाठी ६० हून अधिक हिंदूंची उपस्थिती

आंदोलनस्थळी उपस्थित हिंदु धर्माभिमानी
पू. माधवदास महाराज

सांगली, २० मार्च (वार्ता.) – बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी बोलण्याची कुणाचाही पात्रता नाही. मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर येथे श्रीफळ वाढवण्यास बंदी करण्यात आली आहे, हे अत्यंत अयोग्य आहे. अशामुळे या विधीपासून होणार्‍या लाभापासून हिंदू वंचित रहातात. ही बंदी शासनाने मागे न घेतल्यास पुढच्या संकष्टीला मी स्वत: मंदिरात जाऊन नारळ फोडेन, अशी चेतावणी पू. माधवदास महाराज यांनी दिली. ते १८ मार्च या दिवशी सांगली येथील मारुती चौक येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.

स्पष्ट बहुमत असलेले शासन सत्तेत असल्याने
हिंदूंचे प्रश्‍न सुटतील, अशी आशा करूया ! – नितीन शिंदे

माजी आमदार आणि मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘आज स्पष्ट बहुमत असलेले शासन सत्तेत असल्याने श्रीराम मंदिर होणे, ३७० कलम रहित होणे, समान नागरी कायदा हे सर्व विषय हळूहळू मार्गी लागतील, अशी आशा करूया. हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनास मी पूर्ण पाठिंबा घोषित करतो. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन असतांना नारळ बंदीसारखा निर्णय शासन घेऊच कसे शकते ? आज नारळबंदी करणारे शासन उद्या हार, फुले आणू नका, असे सांगेल ! हे आम्ही खपवून घेणार नाही.’’

स्वच्छेने हिंदु धर्मात येणार्‍यांसाठी कायद्याचे संरक्षण असावे ! – सौ. वर्षा देशपांडे

स्वा. सावरकरप्रेमी सौ. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘‘हिंदु धर्म-संस्कृतीचे महत्त्व लक्षात आल्याने परधर्मातील अनेक जण हिंदु धर्मात परत येण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे स्वच्छेने हिंदु धर्मात येणार्‍यांना संरक्षण मिळावे; म्हणून विशेष कायदा सिद्ध करण्यात यावा. या देशात ८० प्रतिशत हिंदू आहेत त्यामुळे धर्मांतरबंदीचा कठोर कायदाही होणे अपेक्षित आहे.’’

सनातन संस्थेच्या सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे आणि कु. प्रतिभा तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी मनसेचे श्री. स्वप्नील कुंभोजकर, हिंदु धर्माभिमानी श्री. किरण बुटाले, श्री. गणेश आनंदे, मिरज येथील श्री. दिगंबर कोरे, श्री. मंदार पाटुकले यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचे ६० हून अधिक हिंदु धर्माभिमानी आंदोलनासाठी उपस्थित होते.

विशेष घडामोडी

१. ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून सौ. गौरी खिलारे यांची व्हिडीओ बाईट २ सहस्र १६४ जणांनी पाहिली, तर २६४ जणांनी आंदोलन पाहिले.

२. ६५६ नागरिकांनी स्वाक्षर्‍या करून स्वाक्षरी अभियानाद्वारे आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

३. रस्त्यावरून येणारे-जाणारे अनेक लोक थांबून विषय ऐकत होते, तर काही युवक शेवटपर्यंत आंदोलनस्थळी भाषण ऐकत होते.

४. स्थानिक ‘सी’ केबल वाहिनी आणि बालाजी केबल न्यूज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांची मुलाखत घेतली.

५. ‘समितीचे प्रत्येक आंदोलन शिस्तबद्ध असते’, असे मत काही पत्रकार आणि आंदोलनस्थळी उपस्थित असणारे पोलीस यांनी व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात