परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाला विविध संत आणि जाणकार यांचे मिळत असलेले मार्गदर्शन

परात्पर  गुरु डॉ. आठवले यांनी संगीत साधनेविषयी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वेळोवेळी संगितलेली मार्गदर्शक सूत्रे

१. तानसेन आणि बैजुबावरा या गायकांच्या
उदाहरणांवरून साधनेत अहं अल्प असण्याचे  महत्त्व शिकवणे

‘एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संगिताविषयी काही सूत्रे विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘तानसेनने दीप राग गायल्याने तो दिवे लावू शकला. नंतर त्याच्या शरिराचा दाह होऊ लागल्याने त्याला मेघमल्हार हा राग गावा लागला. तानसेन हा दरबारी गायक असल्याने त्याच्यात अहं होता; म्हणून त्याला त्रास झाला; परंतु बैजुबावरा नावाच्या गायकात अहं अल्प असल्याने त्याला दीपराग गातांना त्रास झाला नाही.’’

२. ‘संगितातील गीताला विसरून त्यातील केवळ चैतन्य अनुभवणे
म्हणजे संगीत’, असे वाटून आणि गुरु साधना करण्यास शिकवून
मूळ ईश्‍वरी तत्त्वाकडे नेत असल्याचे सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्या लक्षात येणे

वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला संगीतसाधना करायला सांगितली. तेव्हा मला वाटायचे, ‘संगिताला धरूनच आता मला पुढे जायचे आहे. वर्ष २००८ मध्ये मला वाटू लागले, ‘संंगितातील गीताला विसरून त्यातील केवळ चैतन्य अनुभवणे म्हणजे संगीत.’ यातूनच गुरु त्या त्या टप्प्यातून साधना करवून घेतांना कसे त्यातील मूळ ईश्‍वरी तत्त्वाकडे नेतात, ते लक्षात येते. आता संगीत ऐकण्यापेक्षा त्यातील चैतन्य अनुभवण्यात अधिक आनंद मिळतो.’

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. तेजल पात्रीकर

‘कलाकार जीव ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी तो अन्य जिवांपेक्षा ईश्‍वराकडून काहीतरी अधिक घेऊन जन्माला येतो. एखादी कला अवगत होणे, हे ईश्‍वरी कृपेविना अशक्यच आहे. या ईश्‍वरी वरदानाचा उपयोग कलाकाराने ईश्‍वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्‍या अर्थाने कलाकाराच्या जन्माचे सार्थक होते. केवळ लोकेषणेसाठी कलेचा विनियोग करणे, म्हणजे एक प्रकारे ईश्‍वरी शिक्षेला पात्र होणे होय.

आज ‘कलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती कशी करावी ?’, हे सांगणारे कुणी नाही. त्यामुळे कलाकारांना साधनेची दिशा नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कलाकाराची साधना व्हावी, यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे विविध कलांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. यांपैकी संगीतकलेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून करवून घेत असलेल्या साधनेविषयी आपण या लेखात पहाणार आहोत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळेच
गायन क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळण्यास आरंभ होणे

१ अ. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाद्वारे पहिला गीतरामायणाचा कार्यक्रम रामनाथी आश्रमात होणे

३.६.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाद्वारे पहिला गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या वंदनीय उपस्थितीत त्यांचे चिरंजीव श्री. उदयकुमार उपाध्ये यांनी गीतरामायणातील विविध गीते सादर केली. या कार्यक्रमात संगीत विभागातील माझा आणि सौ. श्रेया साने तसेच सौ. सायली करंदीकर यांचाही सहभाग होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत त्यांच्याच कृपेने ‘गुरुवीण नाही दुजा आधार’ आणि ‘तुज मागतो मी आता’ ही गीते सादर करण्याची अमूल्य संधी संगीत विभागातील साधिकांना अनुभवायला मिळाली.

१ आ. प.पू. आबा उपाध्ये यांनी संगीत विभागातील साधकांना मार्गदर्शन करणे

४.६.२०१६ या दिवशी प.पू. आबा उपाध्ये यांनी संगीत विभागातील साधकांना संगीत आणि वाद्य यांविषयीच्या विविध सूत्रांवर मार्गदर्शन केले. त्यांनी संगितातील सर्व श्रृतींना स्पर्श करत ‘ॐकार’ कसा म्हणावा ?’, हेही त्या वेळी म्हणून दाखवले.

१ इ. अमरावती येथील ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकलेले श्री. रमाकांत देवपुजारी यांनी संगीत साधनेविषयी मार्गदर्शन करणे

डिसेंबर २०१६ मध्ये मी अमरावती येथे घरी गेले असता तेथील श्री. रमाकांत देवपुजारी यांच्याशी भेट झाली. एका साधकाप्रमाणे व्रतस्थ राहून देवपुजारीकाका स्वतः गातात आणि विद्यार्थ्यांना संगीत ‘साधना’ म्हणून शिकवतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला त्यांचे हे वेगळेपण शिकायची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. काकांचे गायन हे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे आहे. देवपुजारीकाका यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला सर्व संगीतसाठा अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी दिला. काकांचा आध्यात्मिक स्तरही चांगला असल्यानेे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चैतन्याच्या स्तरावर संगीत शिकवणार्‍यांशी आम्हाला जोडून दिले’, असे वाटले.

१ ई. उडुपी येथील प.पू. विनायकानंदस्वामीजी आणि प.पू. देवबाबा यांनी मुख्यत्वेकरून अनुक्रमे नृत्य आणि संगीत यांविषयी मार्गदर्शन करणे

फेब्रुवारी २०१७ मध्ये उडुपी येथील प.पू. विनायकानंदस्वामीजी आणि प.पू. देवबाबा रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी मला आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर यांना संगीत अन् नृत्य यांविषयी मार्गदर्शन केलेे. परात्पर गुरु डॉ. आठवले या संतद्वयींशी केवळ संगीत आणि नृत्य यांविषयीच बोलत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले या संतद्वयींना तळमळीने सांगत होते, ‘‘पुढच्या पिढीला संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून साधना कशी करायची ?’, हे सांगायचे आहे. आपण या क्षेत्रातील जाणकार आहात. याचा एक अभ्यासक्रम सिद्ध करण्यासाठी आपणच साहाय्य करा.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बोलण्यातून ‘आता काळ अल्प आहे आणि मानवजातीसाठी कलांच्या माध्यमातून साधनेची दिशा स्पष्ट होण्यासाठी ग्रंथ लवकरात लवकर प्रकाशित व्हावेत’, ही प्रचंड तळमळ अनुभवली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळमळीमुळे या संतद्वयींनी पुढचे शिक्षण घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या आश्रमात बोलवले आहे.

२. सर्व करूनही नामानिराळे रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकेक जण अशा प्रकारे संपर्कात येत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकदा मला निरोप पाठवला, ‘‘देव टप्प्याटप्प्याने संगिताची एकेक कडी कशी जोडत चालला आहे ! ‘संगितावर ग्रंथ लिहायला हवेत’, ही माझी आधीपासून इच्छा होती. देव आता तुम्हा सर्वांच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण करवून घेत आहे.’’

त्यांचे हे वाक्य ऐकून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्या वेळी वाटले, ‘आमचेच केवढ्या जन्मांचे भाग्य की, साक्षात् श्रीमत् नारायणाच्या अवताराच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला संगीत साधना करण्याची संधी मिळत आहे. आम्हाला त्यांनी माध्यम बनवले, यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत.’ (परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमत् नारायणाचे अवतार आहेत, असा साधिकेचा वैयक्तिक भाव आहे. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतार आहेत, असे नाडीवाचनात म्हटले आहे. – संकलक)

३. समाजातील संगिताविषयीच्या जाणकार व्यक्ती संपर्कात येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘कलेतून साधना’ या संकल्पामुळे समाजातील अनेक जण ‘आम्हालाही संगिताच्या माध्यमातून साधना करायची आहे. त्यासाठी काय करावे ?’, अशी विचारणा करत आहेत.

डिसेंबर २०१६ मध्ये संगीतोपचार करणारे ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांची भेट झाली. त्यांनी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची आहे’, असे सांगितले.

जानेवारी २०१७ मध्ये सांगली येथील सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी रामनाथी आश्रमात येऊन सतारवादन केलेे. त्यानंतर त्यांनी आता ‘यातून मी साधना कशी करू शकतो ?’, असे स्वतःहून विचारलेे. यासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आपण एक पाऊल टाकले की, देव नऊ पावले कसे येतो ?’, याचाच हा अनुभव आहे.’’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळेच
ईश्‍वराकडून संगीत आणि अन्य कला यांच्याविषयी ज्ञान मिळू लागणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संगितात आपल्याला ‘ज्ञातपासून अज्ञाताकडे’ (नोन टू अननोन) कडे जायचे आहे, म्हणजे लोकांना संगिताविषयी ठाऊक नसलेली माहिती द्यायची आहे’, असे सांगितले होते. त्यांच्या या संकल्पामुळेच ‘संगीत आणि अन्य कला यांच्या माध्यमातून साधनेमध्ये प्रगती कशी करावी ?’, याविषयी पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले शास्त्रीय ज्ञान जून २०१६ पासून श्री. राम होनप यांच्या माध्यमातून देवाकडून मिळू लागले.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

टीप :  परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अत्यल्प असूनही विविध संतांच्या उपस्थितीत झालेल्या आश्रमातील कार्यक्रमांना ते उपस्थित राहू शकले आणि संगिताविषयी साधकांना मार्गदर्शन करू शकले, यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. – संकलक