प.पू. यशवंतराव मराठे गुरुजी म्हणजे भक्तीने भरलेले ज्ञानाचे भांडार ! – श्री. वामनराव अभ्यंकर

प.पू. मराठे गुरुजी

संगीत, तत्त्वज्ञान, तसेच वेदांत यांचे गाढे अभ्यासक असलेले प.पू. यशवंतराव मराठे गुरुजी हे एक चालते-बोलते पुस्तकच होते. शब्दांपेक्षा त्यांनी कृतीतून इतरांना शिकवले. प.पू. मराठे गुरुजी म्हणजे भक्तीने भरलेले ज्ञानाचे भांडार होते, अशा भावना ‘ज्ञानप्रबोधिनी’चे माजी प्राचार्य श्री. वामनराव अभ्यंकर यांनी व्यक्त केल्या. प.पू. मराठे गुरुजी यांच्या शिष्य परिवराच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त १५ मार्च या दिवशी धन्वंतरी सभागृह येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी आळंदी येथील आध्यात्मिक प्रतिष्ठानचे श्री. अशोक कुलकर्णी, चिंचवड देवस्थानचे श्री. विघ्नहरी देव यांच्यासह शारदा ज्ञान पीठम्चे पं. वसंतराव गाडगीळ, प्रसिद्ध गायक श्री. आनंद भाटे, तसेच प.पू. मराठे गुरुजी यांचे अनेक शिष्य उपस्थित होते. ‘धर्माचे संस्कार टिकवले पाहिजेत. सत्संगाचे महत्त्व अपार आहे. धर्माचरण आणि कर्माचरण करतांना अधर्माचे निर्दालन करणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन श्री. अशोक कुलकर्णी यांनी केले.

‘प.पू. मराठे गुरुजी न्रम होते. ते कधीच स्वतःचा मोठेपणा मिरवत नसत. त्यांनी कधीही शिकवण्याचा आव आणला नाही’ असे सांगत श्री. देव महाराज यांनी प.पू. मराठे गुरुजी यांची गुणवैशिष्ट्ये उलगडली. पं. वसंतराव गाडगीळ यांनीही नेहमीप्रमाणे संस्कृतमधून मनोगत व्यक्त करतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘प.पू. मराठे गुरुजी यांच्या प्रेरणेमुळेच माझ्याकडून संस्कृतची सेवा घडली’, असे ते म्हणाले.

 

प.पू. मराठे गुरुजी म्हणजे देवमाणूसच ! – श्री. आनंद भाटे

श्री. आनंद भाटे म्हणाले, ‘‘प.पू. मराठे गुरुजींनी माझ्याकडून वरच्या आणि खालच्या पट्टीतील स्वरांचा सराव करून घेतला. त्यांची शिकवण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यात कोणताही अभिनिवेश नसायचा. प.पू. मराठे गुरुजी म्हणजे खर्‍या अर्थाने देवमाणूसच होते.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभदा वझे यांनी केले. सौ. अश्‍विनी टिळक यांनी गुरुस्तवन म्हटले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सनातनचे साधक श्री. मिलिंद भिडे आणि सौ. विजया भिडे यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार होता.

 

क्षणचित्र

सनातनचे साधक आणि प.पू. मराठे गुरुजी यांचे भाचे श्री. मिलिंद भिडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. मराठे गुरूजींविषयी लेख लिहिला होता. दैनिक ‘सनातन प्रभात’चा तो अंक या वेळी उपस्थितांना देण्यात आला.

प.पू. मराठे गुरुजी यांच्या विद्यार्थिनी आणि सनातनच्या साधिका श्रीमती लीला घोले यांनी त्यांच्याविषयी मनोगत लिहून दिले. त्या लिहितात,

प.पू. मराठे गुरुजींनी आम्हा विद्यार्थ्यांना पुष्कळ काही दिले. संगीत, तसेच अध्यात्माचे पाठ त्यांनी आम्हाला शिकवले. ते दैवी गुणांची जणू खाणच होत. एकदा त्यांना गुरुदक्षिणा किती द्यायची असे विचारल्यावर ‘तुमचे समाधान ज्यात आहे, असे द्या’, असे ते म्हणाले होते. पहाटेपासूनच विविध विषयांतील ज्ञान घेण्यासाठी त्यांच्याकडे सतत जिज्ञासू येत. वेदांतशास्त्र, न्यायशास्त्र, दासबोध शिकण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडे येत. दृष्टी नसतांनाही प्रत्येकाला ते त्या त्या विषयांतील ज्ञान देत असत. ते आम्हाला तंबोरा लावून देत. १-२ धडे आरोह-अवरोह रूपात सांगत आणि जपमाळ हातात घेऊन अखंड नामस्मरण करत असत. कुठे चुकले किंवा खर नीट लागत नसेल, तर लगेच ‘आज थांबा’ असे सांगून ‘चुकीचे गळ्यात बसायला नको’ असे ते म्हणत असत. स्पष्ट सांगून ते आम्हाला घडवत होते. त्यांचा सवाई गंधर्व महोत्सवात ‘आधुनिक संत’ म्हणून सत्कारही झाला होता. तेव्हा त्यांचे साधेपण आणि वीरक्तीचा भाव सर्वांनी अनुभवला. संगीत शिकवत असतांना विद्यार्थ्यांचा कल पाहूनच ते अध्यात्मातील विषय बोलायचे आणि विद्यार्थ्यांचे निरीक्षण करायचे. नारद मंदिर येथील माझ्या पहिल्या गाण्याच्या वेळी ख्याल गायकी आणि नवीन तबलावादक यांच्यासमवेत माझा सराव नसल्याने मला आधार देण्यासाठी आणि माझी भीती मोडावी म्हणून ते स्वतः माझ्यासमवेत तबल्याची साथ करायला आले होते. त्यांच्या चरणी शतशः नमन !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात