होळीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नवी देहली आणि नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून अभियान !

डावीकडून निवेदन स्वीकारतांना बी.एस्. जागलान, कु. मनीषा माहुर, सौ. रमा भट्टाचार्य आणि श्री. कार्तिक साळुंके
डावीकडून निवेदन स्वीकारतांना रामानुज सिंह, श्री. अरविंद गुप्ता आणि सौ. तारा यादव

नवी देहली : होळीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून अभियान राबवण्यात आले होते. होळी आणि रंगपंचमी या दिवशी अश्‍लील शिवीगाळ करणे, चेहर्‍यावर काळा रंग लावणे, मद्य पिऊन धिंगाणा घालणे, रेव्ह पार्टींचे आयोजन करणे, महिलांची छेड काढणे, त्यांना अश्‍लील हावभाव करून दाखवणे, घाण पाणी भरून फुगे मारणे, अंडी फेकणे, अपायकारक रंगाचा वापर करणे, तसेच ‘कचर्‍याची होळी करा आणि पोळी दान करा’, अशा अधार्मिक आणि श्रद्धांचे भंजन करणारे अभियान नास्तिकतावाद्यांकडून राबवले जाणे, आदी अयोग्य कृतींच्या विरोधात हे अभियान राबवण्यात आले.

तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात ! – दक्षिण-पूर्व देहलीचे जिल्हाधिकारी बी.एस्. जागलान

या अभियानाच्या अंतर्गत दक्षिण-पूर्व देहलीचे जिल्हाधिकारी बी.एस्. जागलान आणि नोएडाचे शहर दंडाधिकारी रामानुज सिंह यांना वरील अनाचार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. या वेळी जागलान म्हणाले, ‘‘तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात. सध्या सर्वजण आपली भारतीय संस्कृती विसरत आहेत. आईवडिलांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केले, तरच मुले चांगले आचरण करतील आणि मगच समाज चांगला होईल.’’

या वेळी बी.एस्. जागलान यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. एका प्रसिद्ध मंदिरात ते गेले असता तेथे विदेशी महिलांनी साडी परिधान केली होती, तर काही भारतीय महिलांनी जीन्स घातली होती. ते म्हणाले की, आज विदेशी लोक आपली भारतीय संस्कृती स्वीकारत आहेत, तर भारतीय विदेशी संस्कृतीचे आचरण करत आहेत.

क्षणचित्र

जागलानी म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा वेळ देऊन हे कार्य करत आहात, ही मोठी गोष्ट आहे. मी गोव्याला गेलो, तर तुमच्या आश्रमात जाईन.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात