‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

देवतांचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या मेंदीच्या सात्त्विक कलाकृती, हे कलाक्षेत्रातील नवे योगदान !

सनातनच्या साधिका कु. कुशावर्ता आणि कु. संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली. त्यांना सात्त्विक रांगोळ्या सुचण्याची प्रक्रिया, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याविषयी केलेले मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

नित्य धार्मिक रूढी म्हणून काढण्याच्या रांगोळ्यांसंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी केलेले हे संशोधन नाविन्यपूर्ण आहे. रांगोळीसह मेंदीच्या कलाकृतींतूनही देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित होईल, अशा विविध कलाकृती साधकांनी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केल्या आहेत. या सर्व कलाकृती सनातनचा लघुग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’, मोठा ग्रंथ सात्त्विक रांगोळ्या (भाग १)’, ‘सात्त्विक मेंदी’ आणि ‘मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार’ यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 

१. सात्त्विक रांगोळ्या सुचण्याची प्रक्रिया

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने मेंदीच्या सात्त्विक नक्षी आणि रांगोळ्या सुचणे

साधारण वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातनचा सात्त्विक रांगोळ्यांचा ग्रंथ करूया’, असे सांगितले. काही कालावधीनंतर ‘सात्त्विक मेंदीचा ग्रंथ करूया’ आणि त्यानंतर ‘आता सात्त्विक रांगोळीचा मोठा ग्रंथ करूया’, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी मला दिवसभर सलग मेंदीच्या नक्षी, रांगोळ्या सुचायच्या.

१ आ. रांगोळी सुचण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले
यांनी विचारल्यावर त्यामागील प्रक्रिया लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे

रांगोळी काढण्याच्या ठिपक्यांचे ३ प्रकार आहेत. ‘किती ठिपक्यांची आणि कोणत्या प्रकारची रांगोळी काढायची आहे, हे तुला कसे कळते ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला एकदा विचारले. तेव्हा मी म्हणाले, ‘‘देव सुचवत आहे’, अशी मनाला एक वेगळी संवेदना येते. काही वेळा रांगोळीचे विविध आकार दिसायला लागतात. ते विचार मनात येत असतांनाच मी रांगोळीच्या ठिपक्यांच्या तीन प्रकारांपैकी कोणताही एक ठिपक्यांचा कागद घेऊन रांगोळी पूर्ण करते. त्यानंतर लक्षात येते, ‘रांगोळीतील सर्व आकार ठिपक्यांत बसले आहेत.’’ ‘देवाकडून रांगोळी सुचण्याची प्रक्रिया होत असतांना माझ्याकडून बुद्धीचा वापर न होता अशी कृती होते’, याची मला जाणीव नव्हती. प्रश्‍न विचारल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच सर्व करवून घेत आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.’

 

२. साधनेत येण्यापूर्वी लोकेषणा असणे; पण साधनेत आल्यानंतर
कला हे ईश्‍वरप्राप्तीचे साधन असल्याचे लक्षात आल्यावर लोकेषणा न्यून होणे

या आधी आम्ही शिक्षण घेत असतांना एखाद्या स्पर्धेमध्ये ‘मला पारितोषिक मिळावे’, असे वाटायचे. कलेचे शिक्षण घेत असतांना आणि त्यानंतर एखादे चित्रकला प्रदर्शन, सामाजिक उपक्रमातील भित्तीपत्रक कल्पना (poster project) यांमध्येे ‘माझ्या कलाकृतीची निवड व्हावी, पारितोषिक मिळावे, कौतुक व्हावे’, असे प्रत्येक कलाकाराला वाटते, तसे माझे विचार असायचे. काही सेवा करतांना माझ्या मनात ‘माझी सेवा इतरांपेक्षा चांगली आहे’, असे विचार यायचे. सेवेच्या फळाची अपेक्षा असायची.

‘कलेचा उद्देश ‘कलेसाठी कला, लोकेषणा अथवा पैसे मिळवण्यासाठी कला’, असा नाही. एखाद्या जिवाला एखादी कला ‘ईश्‍वरप्राप्तीचे (आनंदप्राप्तीचे) साधन’ या उद्देशानेच ईश्‍वरानेच दिलेली असते, तसेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हा आध्यात्मिक सिद्धांत आहे’, हे सनातनमध्ये आल्यावर कळाले.

साधना करवून घेतांना परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी देवतांसाठी रांगोळ्या काढणे, ही आमच्या प्रकृतीशी निगडित सेवा दिली. यांतून परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी आमची कला आणि ईश्‍वर यांना जोेडले. रांगोळी ग्रंथाची सेवा करता करता लोकेषणा न्यून झाली होती. या कालावधीत ते आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ही प्रक्रियाही सहजपणे करवून घेत होते. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे त्यांनी आम्हाला कधी आणि कसे नेऊन ठेवले’, हे आम्हाला कळले नाही; कारण आम्हाला केवळ आनंदच मिळत होता.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य मार्गदर्शन !

देवतांचे तत्त्व असलेल्या काही रांगोळ्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर त्यांनी काही रांगोळ्यांत पालट सांगितले. साधारण वर्ष २००७ पासून रांगोळीत देवतांचे तत्त्व येण्यासाठी आणि ते वाढवण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले मार्गदर्शन करून रांगोळीचे पुढचे-पुढचे टप्पे शिकवत आहेत. यांत काही रांगोळ्या सगुण, तर काही निर्गुण स्तरावरच्या आहेत. वर्ष २००७ मध्ये ‘सात्त्विक रांगोळ्यांचा ग्रंथ करूया. त्यामुळे ‘सात्त्विक रांगोळ्या’ असा शब्द लोकांना ठाऊक होईल’, असे त्यांनी सांगितले. सगुणापेक्षा निर्गुणात अधिक आनंद असतो; म्हणून ते सर्वच आकार निर्गुण होण्यासाठी ते मार्गदर्शन करत आहेत. ‘पुढील १५ वर्षे आणि त्याहून अधिक काळ हे संशोधन चालू राहील. यात प्रत्येक देवतेच्या सगुण आणि निर्गुण रूपांच्या, संप्रदायांनुसार आणि संतांच्या रांगोळ्या असतील’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात