परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीत’ याविषयी साधिकांना केलेले मार्गदर्शन आणि संगीत साधनेविषयी दिलेले विविध दृष्टीकोन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संगीताच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. संगीतातील कोणताही राग म्हणतांना अध्यात्माच्या दृष्टीकोनातून काय वाटले पाहिजे किंवा स्वर्गलोकातील संगीत कसे आहे, याविषयीचा अभ्यास प्रारंभीच्या काळात त्यांनी केला. अशाच प्रकारचे संशोधन सध्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधिका करत आहेत. संगीत किंवा गायन यांच्या माध्यमातून ईश्‍वराला कसे अनुभवावे, याविषयीची सूत्रे या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीताच्या माध्यमातून साधना शिकवण्यास केलेला आरंभ !

 

१ अ. सर्वप्रथम सौ. अंजली गाडगीळ (आताच्या सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ) यांना संगीतकलेच्या माध्यमातून साधना करण्याविषयी सांगणे

वर्ष २००२ मध्ये संगीत विशारद सौ. अंजली गाडगीळ (आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘तुमचे संगीत क्षेत्रात शिक्षण झाले आहे. तुम्ही संगीताच्या माध्यमातून साधना चालू करा. ‘ईश्‍वरी संगीत काय आहे ?’, हे आपल्याला विश्‍वाला दाखवायचे आहे. ईश्‍वरी संगीत आजच्या संगीतापेक्षा पुष्कळ वेगळे आहे.’’

१ आ. सौ. गाडगीळ अंजली गाडगीळ यांना देवाकडून संगीताविषयी ज्ञान मिळवण्यास सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. अंजली गाडगीळ यांना ‘संगीतात सातच स्वर का आहेत ? पाच किंवा सहा का नाहीत ?’, याचे उत्तर शोधून काढण्यास सांगितले. काकूंनी ते बर्‍याच पुस्तकांमध्ये शोधले; परंतु असा संदर्भ कुठे मिळाला नाही. त्यांनी हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आता आपल्याला देवालाच विचारून पुढे जावे लागणार.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले काकूंना संगीताविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्‍न देत. काकू देवाला प्रश्‍न विचारून त्यांची उत्तरे मिळवत. यामुळे कोणत्याही ग्रंथात मिळणार नाही, असे गायन, वादन आणि नृत्य यांविषयी आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान त्यांना मिळू लागले.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधनारत सौ. गाडगीळ यांना विविध अनुभूती येेणे

सौ. गाडगीळकाकूंनी त्यांच्या संगीत साधनेच्या कालावधीत संगिताविषयी बरेच ज्ञान मिळवले आणि विविध स्वर अन् राग यांचे प्रयोग करून त्या रागांंच्या प्रकृतीनुसार अनुभव घेतले, उदा. मल्हार राग गातांना तोंडात लाळ गोळा होणे, दीप रागाचे स्वर आळवतांना थंडीच्या दिवसांतही उष्णता अनुभवणे. एवढेच नाही, तर त्या वेळी काकूंना विविध गंधर्व, किन्नर आणि स्वरदेवता यांची दर्शनेही झाली आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण

सौ. गाडगीळकाकूंच्या संगीत साधनेच्या कालावधीनंतर अनुमाने १० ते १५ वर्षे संगीतक्षेत्रात काहीच संशोधन झाले नाही. वर्षभरापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आपण त्या वेळी संशोधन केले असते, तर आतासारखी सर्व कलांसाठीची अनुकूलता आपल्याला मिळाली नसती. त्या वेळी साधकांची साधनाही प्राथमिक अवस्थेत होती. आता १० ते १५ वर्षांत साधकांची साधनाही चांगली झाली आहे, तसेच आता समष्टीला कलांच्या माध्यमातून साधनेत प्रगती करण्यासाठी अनुकूल काळही आहे.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टीसाठी
संगीत साधनेला पुनश्‍च शुभारंभ करायला सांगणे

३ अ. संगीत साधनेविषयीचे ग्रंथ प्रकाशित करायचे असल्याने त्या संदर्भातील ग्रंथांचा अभ्यास चालू करणे

साधारण वर्षभरापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीतातून साधना करण्यासाठी डॉ. ज्योती काळे, सौ. श्रेया साने आणि मला (कु. तेजल पात्रीकर यांना) निरोप दिला. या वेळी त्यांनी कळवलेे, ‘‘आपल्याला आता संगीत साधनेविषयीचे ग्रंथ प्रकाशित करायचे आहेत.’’ सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी पूर्वी संगीताविषयी एकत्रित करून ठेवलेल्या माहितीचे वाचन आणि अभ्यास करणे, विविध ग्रंथांचे वाचन करून ‘त्यांत संगीत साधनेविषयी काही सूत्रे आहेत का ?’, ते पहाणे, असा आमचा अभ्यास चालू झाला.

३ आ. संगीतकलेच्या माध्यमातून साधना होण्यासाठी दिशा देणे

मे २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला आणि डॉ. ज्योती काळे अन् सौ. श्रेया साने यांना संगीत साधनेची पुढील दिशा दिली.

त्या वेेळी त्यांनी सांगितले, ‘‘संगीत या विषयावर आपल्याला विविध ग्रंथ प्रकाशित करायचे आहेत, तसेच या तात्त्विक ज्ञानाच्या अनुभूतीही घ्यायच्या आहेत. आपल्याला संगीत साधनेत ‘ज्ञातपासून अज्ञाताकडे’ (नोन टू अननोन) या दिशेने मार्गक्रमण करायचे आहे. हा सगळा भाग नवीन असल्याने आपल्याला संशोधन करावे लागणार आहे. संगीत या विषयावर आपले केवळ ग्रंथ नसतील, तर ‘ते गायचे आणि अनुभवायचे कसे ?’, हे सांगण्यासाठी ग्रंथांसमवेत ध्वनीचित्र-चकत्याही असतील.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अभ्यासू वृत्ती आणि समष्टी भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कितीतरी आधीपासून संगीताविषयीच्या लिखाणाची कात्रणे, ग्रंथ आणि मासिके गोळा करून ठेवली आहेत. त्याचा उपयोग आज ग्रंथांसाठी होत आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाण्यांच्या संग्रहात बर्‍याच जुन्या चित्रपटातील गाण्यांचे राग आणि त्यांची वैशिष्ट्ये पूर्वीच लिहून ठेवली आहेत. त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची अभ्यासू वृत्ती आणि समष्टीचा विचार या गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७४व्या
जन्मोत्सवानिमित्त संगीतकला सादर करण्याची संधी मिळणे

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७४व्या जन्मोत्सवानिमित्त
काढलेल्या त्यांच्या जीवनावर आधारित लघुपटातील एका गीताची चाल त्यांच्या कृपेने सुचणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७४व्या जन्मोत्सवानिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचा कृतज्ञतापर लघुपट करण्यात येणार होता. त्या लघुपटातील ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव’ या गीतासाठी आतापर्यंतच्या आयुष्यात प्रथमच मला चाल सुचली आणि त्या चपखल चालीत ते गीत गुरुमाऊलीने गाऊनही घेतले. मला ‘त्यांच्या होणार्‍या या सोहळ्याच्या निमित्ताने सप्तस्वर त्यांच्या चरणी अर्पण करावे’, असे तीव्रतेने वाटत होते. गुरुमाऊलीने ती इच्छा अशा प्रकारे पूर्ण करवून घेतली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७४ व्या जन्मोत्सव
सोहळ्याच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या अंतर्गत संगीत विभाग
चालू झाल्याचे घोषित होणे आणि त्या सोहळ्यात एक गीत गाण्याची संधी मिळणे

मे २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७४ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी आम्ही संगीत कलेच्या माध्यमातून साधना करणार्‍या काही साधिका एक गीत गुरुमाऊलींसमोर सादर करणार होतो. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या अंतर्गत संगीत विभाग चालू झाल्याचे घोषित करण्यास सांगण्यात आले. आमचे एवढे भाग्य की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच संगीत विभागाचाही वाढदिवस आहे, तसेच त्या वेळी प्रथमच सिंहासनावर विराजमान असलेल्या श्रीमत् नारायणाच्या अवतारासमोर ‘गुरु बीन कौन बताए बाट’ हे गीत गाण्याची संधी त्यांच्याच कृपेने आम्हाला मिळाली. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस होता.

५. कालमाहात्म्यानुसार कलाक्षेत्रातही समष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला सांगणे

अ. एका साधकांना संगीत कलेतून साधना करतांना वेगवेगळ्या अनुभूती येत होत्या. त्यांनी ‘पुढे कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले. त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अनुभूती येत आहेत, हे चांगलेच आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे; परंतु समाजात असे अनेक जण आहेत, ज्यांना ‘कलेच्या माध्यमातून साधना करता येते’, हे ठाऊक नाही. त्यांच्यापर्यंत आपल्याला ‘कलेतून साधना’ हा विषय पोहोचवायचा आहे.’’

आ. एका प्रसंगी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘आम्हीही गाण्याचा सराव चालू करू का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आधी आपण संगिताचा तात्त्विक पाया पूर्ण करूया. मग प्रत्यक्ष सरावासाठी आपल्याकडे तात्त्विक माहितीही पूर्ण असेल. तुला एकटीलाच या मार्गाने पुढे जायचे नाही, तर समष्टीलाही पुढे घेऊन जायचे आहे.’’ म्हणजेच ‘त्यांना समष्टीसाठी माझ्याकडून तात्त्विक पाया आधी पूर्ण करवून घ्यायचा आहे’, हे माझ्या लक्षात आले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीतकलेतून साधनेची सांगितलेली वैशिष्ट्ये

अ. अन्य कलांमध्ये थोडा तरी बुद्धीचा भाग येतो; परंतु संगीत ही अशी कला आहे की, ती शब्द आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे.

आ. मूर्तीकला आणि चित्रकला या अनुक्रमे पृथ्वी अन् तेज या तत्त्वांशी निगडीत आहेत; पण संगीतकला थेट आकाशतत्त्वाशी निगडीत आहे. आकाशतत्त्व हे निर्गुणाच्या अधिक जवळचे आहे.

इ. सनातन संस्थेने ‘अक्षरशास्त्रानुसार सात्त्विक अक्षर कसे असावे ?’, याचा अभ्यास करून ग्रंथ प्रकाशित केला आहे. आता या सात्त्विक अक्षरांचे उच्चारही आपल्याला सात्त्विकच करण्याचा अभ्यास करायचा आहे. त्यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हे सिद्ध होईल. शेवटी संगीत हे उच्चारशास्त्रच आहे. त्यामुळे आपल्याला संगीतातील ‘सा, रे, ग’ यांचाही योग्य उच्चारही करायला शिकायचे आहे.

ई. आपल्याला गायन केवळ कानाने ऐकणारे नकोत, तर ‘सूक्ष्मातून त्याचा काय परिणाम होतो ?’, हे अनुभवणारे हवेत.

७. संगीतातील पदवी घेतलेली असूनही
‘खरे संगीत आता प.पू. डॉक्टर शिकवत आहेत’, असे वाटणे

मी व्यावहारिकदृष्ट्या संगीतात ‘विशारद’ झाले आहे; परंतु ‘आता संगीतसाधनेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले जे शिकवत आहेत, तेच खरे संगीत आहे’, हे माझ्या लक्षात आले. आतापर्यंत ‘मी काहीच शिकले नाही’, हेच पदोपदी जाणवत आहे.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला या सेवेची संधी लाभली, यासाठी माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. ‘त्यांनीच माझ्याकडून ही साधना करवून घ्यावी’, अशी त्यांच्या कोमल चरणी शरणातभावाने प्रार्थना करते. शेवटी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे,

हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।

या गायन माध्यमे देई बुद्धी । केवळ तव गुण गाण्या ॥’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात