अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करा ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे खडकवासला जलाशय रक्षण अभियान

डावीकडून सर्वश्री विजय गावडे, सचिन पासलकर, प्रवीण नाईक आणि चैतन्य तागडे

पुणे : रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्‍या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांच्या समवेत ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवत आहे. यावर्षीही १३ मार्च (धूलिवंदन) आणि १७ मार्च (रंगपंचमी) या दोन दिवशी खडकवासला धरणाच्या भोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. ‘कमिन्स इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाचे कर्मचारी, अधिकारी, तसेच स्थानिक ग्रामस्थही या अभियानात सहभागी होणार आहेत. अधिकाधिक जणांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी व्हावे. त्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे, ‘गार्गी सेवा फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय गावडे, गोर्‍हे बुद्रुकचे सरपंच श्री. सचिन पासलकर हेही उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीनेही यंदाच्या वर्षी धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी खडकवासला धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. समिती, तसेच संस्था यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे प्रशासनाने याची नोंद घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतल्याविषयी श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. श्री. तागडे यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

भविष्यात हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता भासणार नाही ! – सचिन पासलकर

हिंदु जनजागृती समितीकडून गेल्या १४ वर्षांपासून या उपक्रमाचे आम्ही साक्षीदार आहोत. एक नागरिक म्हणून, तसेच संस्कृती रक्षा मंच या आमच्या संघटनेकडून या अभियानात नेहमीच सक्रीय सहभाग राहिलेला आहे. गेली अनेक वर्षे हा उपक्रम १०० टक्के यशस्वी होत असून समितीच्या प्रबोधनामुळे यापुढे नागरिकांमध्ये अजून जागरूकता निर्माण होऊन असा उपक्रम घेण्याची आवश्यकताच भासणार नाही.

समितीचे कार्यकर्ते दिवसभर उन्हात थांबून जलाशयाचे रक्षण करतात. आम्हाला या अभियानात सहभागी होण्याची आणि येथे येणार्‍या कार्यकर्त्यांना साहाय्य करण्याची संधी मिळते, हे आमचे भाग्यच आहे, अशी भावनाही श्री. पासलकर यांनी व्यक्त केली.

श्री. विजय गावडे यांनी समितीच्या माध्यमातून ‘गार्गी फाऊंडेशन’च्या वतीने प्रत्येक महाविद्यालयात जाऊन होळी आणि रंगपंचमी हे सण धर्मशास्त्रीयदृष्ट्या कसे साजरे करावेत, याचे प्रबोधन करणार असल्याचे सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना श्री. प्रवीण नाईक म्हणाले,

१. काही संघटना ‘कचर्‍याची होळी करा, पुरणाची पोळी दान करा !’ असा अपप्रचार करतात. याला न भुलता नागरिकांनी धर्मशास्त्राप्रमाणे सण साजरा करावा. गरिबांना अन्नदान न करण्याची समितीची भूमिका नसून धर्मशास्त्रातील कृती डावलण्याच्या धरलेल्या आग्रहाला विरोध आहे. प्रत्येक सणांच्या पाठीमागे अध्यात्मशास्त्र असल्याने कुठलाही सण का आणि कसा साजरा करावा, हे जाणून घ्यायला हवे. होळीमुळे वातावरणाची शुद्धी होते.

२. महिलांची छेडछाड होणे, त्यांच्यावर रंगांचे फुगे फेकून मारणे, मद्यपान-धूम्रपान करणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे आदी अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्तीपथके सिद्ध करून अपप्रकार करणार्‍या तरुणांना कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच आक्षेपार्ह रंग आणि फुगे यांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवरही कारवाई करावी. सण-उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार मोडून काढून सण धर्मशास्त्रदृष्ट्या साजरे व्हावेत, यासाठीही समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहेत. होळी, रंगपंचमी, धूलिवंदन या सणांमागील शास्त्र काय आहे, या संदर्भात शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊनही प्रबोधन करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात