रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरण्यास प्रशासनाचा प्रतिबंध

  • हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संस्था यांच्या निवेदनाची नोंद
  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे खडकवासला जलाशय रक्षण अभियान
जिल्हाधिकारी सौरभ राव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ

पुणे : गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संस्था यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येते. संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला जलाशयामधील जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये; म्हणून या अभियानाच्या अंतर्गत धरणाच्या भोवती मानवी साखळी करून पाण्यात उतरू पहाणार्‍या नागरिकांचे प्रबोधन केले जायचे. या उपक्रमाची आता प्रशासकीय स्तरावर नोंद घेतली गेली असून जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी होळी आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. श्री. राव यांनी पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली. पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी करून थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे, महेश पाठक, कृष्णाजी पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगून यामध्ये प्रशासनाचा सहभाग वाढावा, यासाठी निवेदन दिले होते, तसेच या अभियानाचे संगणकीय सादरीकरण (पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन) केले होते. त्या वेळी श्री. राव यांनी या उपक्रमाचे कौतुक करून ‘प्रशासनाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभेल’, असे आश्‍वासन दिले. त्यांनी तातडीने या उपक्रमाच्या प्रसिद्धीचे, तसेच शासकीय कर्मचार्‍यांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी सहभागी होण्याचे आदेश दिले. धर्माभिमानी सर्वश्री हणमंत आंबावडेकर, सुधाकर संगनवार, सुरेंद्र कुमार हेही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना उपस्थित होते.

‘प्रशासनाने या उपक्रमाची नोंद घेऊन जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने दिलेला आदेश आणि या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे’, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनी व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात