पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाला सनातन पुरून उरेल ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रमच्या जयघोषात शिरवळ
(जिल्हा सातारा) येथील हिंदु धर्मजागृती सभा दुमदुमली

डावीकडून सौ. राजश्री तिवारी, दीपप्रज्वलन करतांना श्री. अभय वर्तक आणि श्री. अभिजीत देशमुख
सभेला उपस्थित धर्मप्रेमी हिंदू
श्री. अभय वर्तक यांना तलवार भेट देतांना धर्माभिमानी श्री. सागर जरांडे
ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विठ्ठल जाधव

शिरवळ (जिल्हा सातारा) : आज या देशात पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद अनुभवायला येत आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या हिंदु धर्मविरोधी व्यक्तींचे उदात्तीकरण होत आहे. त्यांच्या हत्यांच्या प्रकरणात निर्दोष सनातन संस्थेला नाहक गोवले जात आहे. सनातनच्या निरपराध साधकांची चौकशी होते मात्र; विदेशातून पैसे घेऊन आर्थिक घोटाळे करणार्‍या दाभोलकरांच्या संस्थेवर कारवाई होत नाही. अन्वेषण यंत्रणांनीही कोणतेही पुरावे नसतांना सनातनचे साधक समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली आहे. विरोधकांनी सनातनवर कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला, तरी सनातनचे धर्मप्रसाराचे तेजस्वी कार्य दिवसेंदिवस वाढतच आहे. ईश्‍वराच्या अधिष्ठानामुळे सनातन तेजस्वी सूर्यासारखी तळपत राहील आणि पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाला सनातन पुरून उरेल, असे ठाम प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ५ मार्चला येथील ज्ञानसंवर्धिनी विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. हिंदूंवर चहूबाजूंनी जिहादी आक्रमणे होत असतांना हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण विश्‍वभर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. वर्तक पुढे म्हणाले,

१. पानसरे हत्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड हे निरपराध असतांना पोलिसांनी त्यांना अटक केली; मात्र आज पोलिसांकडे त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाही. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने दाभोलकर हत्या प्रकरणी तपासात आलेले अपयश झाकण्यासाठी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे; मात्र सनातनचे साधक १०० टक्के निर्दोष आहेत.

२. आज हिंदूंवर चहूबाजूंनी जिहादी आक्रमणे होत आहेत. इसिससारख्या संघटनांमध्ये धर्मांध तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. अशा सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण विश्‍वभर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कटिबद्ध होऊया. त्यासाठी हिंदूंना शौर्याचे प्रकटीकरण करावे लागेल.

दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सभेला आरंभ झाला. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. धर्माभिमानी श्री. संकेत पिसाळ यांनी धर्मशिक्षणवर्गात आल्यानंतरचे अनुभव सांगितले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सागर जरांडे यांनी श्री. अभय वर्तक आणि श्री. अभिजित देशमुख यांचा, तर सनातन संस्थेच्या सौ. छाया पवार यांनी सौ. राजश्री तिवारी यांचा सत्कार केला. समितीचे श्री. विठ्ठल जाधव यांनी सभेला उपस्थित दत्तगड येथील ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले. सभेला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे भोर तालुका अध्यक्ष श्री. अमर बुदगुडे आणि खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष श्री. उमेश पानसे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. नंदकुमार तारू, योग वेदांत सेवा समितीचे श्री. तात्यासाहेब पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. नागेश भूतकर, एफर्ट्स इन्स्टिट्यूटचे श्री. विनोद भंसाळे यांच्यासह ७०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

भवानी तलवार भारतात परत आणण्यासाठी देशव्यापी
आंदोलन उभारणार ! – श्री. अभिजित देशमुख, हिंदु जनजागृती समिती

भारतात १२५ कोटी हिंदू असूनही हे हिंदु राष्ट्र नाही. गोवंश हत्याबंदी कायदा असूनही आपल्याला गोरक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. जेएन्युमधील राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांविरोधात आपल्याला वैचारिक लढा द्यावा लागत आहे. या समस्यांना आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा एकमेव उपाय आहे. कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे; पण त्यासाठी शौर्यजागरण करण्याची आवश्यकता आहे. हिंदुत्वावरचे आघात थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटित कृती करणे आवश्यक आहे. लंडनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार भारतात परत आणण्यासाठी १२ मार्च या दिवशी देशव्यापी आंदोलन उभारणार जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊन खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.

आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच स्वसंरक्षणासाठीचे
आत्मबळ निर्माण होईल ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा

सध्या महिलांवर अत्याचार, तसेच भ्रष्टाचार यांच्या अनेक घटना घडत आहेत. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी महिलांवर अत्याचार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी लैंगिक छळ यांच्या घटना घडत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, तर कर्नाटकात गोरक्षकांच्या हत्या होत आहेत. हे थांबवायचे असेल, तर स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. स्वतःचा जीव, कुटुंब, संपत्ती, निराधार यांचे रक्षण करणे हा आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे. शस्त्रबळापेक्षा आत्मबळ अधिक महत्वाचे आहे. आपल्या देशाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या शूर वीरांगनांची परंपरा लाभली आहे. आत्मबळाच्या जोरावरच त्या इंग्रजांविरुद्ध लढल्या. यासाठीच आपण मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे आत्मबळ असेल, तर आपण स्वतःसह इतरांचेही रक्षण करू शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच स्वसंरक्षण करण्याचे आत्मबळ आपल्यात निर्माण होते.

क्षणचित्रे

१. सभेसाठी प्रत्येक गावातील २ ते ३ धर्माभिमान्यांनी गावांमध्ये बैठकीच्या नियोजनासाठी साहाय्य केले. तसेच सभेच्या पूर्वसिद्धतेसाठी आणि नंतर ३० धर्माभिमानी पूर्ण वेळ मदतीसाठी उपस्थित होते.

२. सभेसाठी खंडाळा तालुक्यातून एक ट्रक करून धर्माभिमानी तरुण आले होते. त्यासोबत पारंपरिक वेशात २५ ते ३० बाल-मावळ्यांचीही उपस्थिती होती.

३. सभेनंतर वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी ६० जण उपस्थित होते. सर्वांनी चर्चेत उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

४. हिंदुत्वनिष्ठांपैकी एकाने नवीन प्रवक्ते सिद्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता दर्शवली. हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर समादेश (सल्ला) मिळावा अशी मागणी काहींनी केली.

५.  एका हिंदुत्वनिष्ठांनी आपल्या भागात धर्मशिक्षण वर्गाची तसेच हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली.

धर्मशिक्षण वर्गात येऊन साधना आणि सेवा केल्याने
मला आनंद मिळू लागला ! – धर्माभिमानी श्री. संकेत पिसाळ

श्री. संकेत पिसाळ

या सभेमध्ये धर्मशिक्षण वर्गात नियमितपणे येणारे धर्माभिमानी श्री. संकेत पिसाळ यांनी वर्गात आल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभूती उपस्थितांना सांगितल्या. धर्मशिक्षण वर्गात येऊन धर्माचरण करायला शिकलो. नामजप कसा करायचा, सेवा कशी करायची हे शिकलो. नामजप केल्याने मनाला शांतता अनुभवता आली. समष्टी सेवा केल्याचा आनंदही मला मिळाला. धर्माप्रती, राष्ट्राप्रती आपले कर्तव्य आहे याची जाणीवही झाली. याविषयी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे, असे म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हिंदु धर्मजागृती सभेवर लक्ष ठेवणारे पोलीस !

सभास्थळी गणवेशातील आणि साध्या वेशातील मिळून साधारण १० पोलीस उपस्थित होते. काही पोलीस पत्रकार कक्षाजवळ येऊन थांबून कक्षाचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करत होते. काही पोलिसांनी सर्व भाषणे लिहून घेतली, तर एका पोलिसांनी भोजनाच्या व्यवस्था असलेल्या ठिकाणी जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला. (राष्ट्र आणि धर्म हितकारी उपक्रमांवर बारीक लक्ष ठेवण्यापेक्षा पोलिसांनी त्यांची शक्ती आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरली, तर देश आतंकवादमुक्त होण्यास साहाय्य होईल ! – संपादक)

या धर्मजागृती सभेनंतर पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी आढावा बैठकीचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.

१. गुरुवार, ९ मार्च २०१७

वेळ : सायं. ७ वाजता

स्थळ : श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी, शिरवळ

२. शुक्रवार, १० मार्च २०१७

वेळ : सायं. ७ वाजता

स्थळ : श्री भैरवनाथ मंदिर, खंडाळा

३. शुक्रवार, १० मार्च २०१७

वेळ : सायं. ७ वाजता

स्थळ : श्री भैरवनाथ मंदिर, सारोळा

सभा यशस्वी होण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले !

१. ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील डॉ. विनय जोगळेकर आणि रमेश देशपांडे यांनी सभेसाठी मैदान उपलब्ध करून दिले.

२. दत्त डेकोरेटर्सचे विक्रम पोतदार, शिरवळ येथील राठी मंगल केंद्राचे श्री. रामचंद्र राठी, मंगलमूर्ती कार्यालयाचे श्री. संदीप गोळे, श्रीदत्त डेकोरेटर्सचे श्री. विक्रम पोतदार या सर्वांकडून सभेचे सर्व साहित्य आणि बैठक व्यवस्था उपलब्ध झाली.

३. श्री. सोमनाथ निगडे यांनी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली.

४. सर्वश्री विशाल राऊत, रोहित राऊत, खंडाळा नगर परिषदेचे नगरसेवक युवराज गाढवे, सुनील सावंत,

श्री. नंदकुमार तारू, श्री गणेश ग्राफिक्सचे केदार हाडके आणि पोलीस प्रशासन यांचे बहुमूल्य सहकार्य समितीला लाभले, याविषयी त्यांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात