विपर्यस्त वृत्ते प्रसारित करून सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खालच्या थराला जाऊन अपकीर्ती करणारी सनातनद्वेष्टी प्रसारमाध्यमे !

कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात कोल्हापूरच्या विशेष चौकशी पथकाच्या अधिकार्‍यांनी गोव्यात सनातनच्या आश्रमात येऊन साधकांची चौकशी केली. यामुळे नेहमी सनातनची अपकीर्ती करण्यासाठी हपापलेल्या प्रसारमाध्यमांना आयते कोलित मिळाले. ‘सनातनच्या आश्रमावर धाड टाकली’, ‘साधकांची कसून चौकशी’, ‘डॉ. आठवलेंची सलग २ दिवस चौकशी’ यांसारखी धादांत खोटी आणि विपर्यस्त वृत्ते छापून प्रसारमाध्यमांनी सनातनद्वेषाचा कंड शमवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक ‘चौकशीचा तपशील देऊन सनातनची अपकीर्ती करू नये’, असा न्यायालयाचा आदेश आहे; मात्र या आदेशाला न जुमानता सनातनची अपकीर्ती करण्यात आली.

… हा प्रसारमाध्यमांचा वैचारिक आंतकवाद !

प्रसारमाध्यमांकडून गेली काही वर्षे सातत्याने सनातनला लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी सातत्याने कार्य करणार्‍या सनातन संस्थेचे कार्य हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांना खुपते ! त्यामुळे सनातनची कितीही अपकीर्ती केली, तरी त्याला भीक न घालता सनातनचा राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य यांचा झंझावात चालूच राहील, हे सनातनद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे !

१. अतिरंजीत आणि तथ्यहीन माहिती देऊन सनातनची अपकीर्ती करणारे दैनिक लोकमत !

दैनिक लोकमतच्या २ मार्चच्या कोल्हापूर आवृत्तीच्या अंकात ‘सनातनच्या आठवले यांची चौकशी’ अशा मथळ्याखाली बातमी देऊन सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. या बातमीत ‘गोव्यातील आश्रमात धडक’, ‘एस्आयटीचे पथक दोन दिवस तळ ठोकून’ असे अतिरंजीत मथळे देण्यात आले आहेत.

१ अ. हेतूपुरस्सर संशय निर्माण करणारे उपमथळे देऊन सनातनविषयी लोकांचे मत कलुषित करणारे लोकमत ! : या वृत्तात ‘चौकशी अधिकारी सुहेल शर्मा यांची बदली होण्याची शक्यता’ ही चौकट छापण्यात आली आहे. वास्तविक शर्मा यांची पदोन्नती होऊन त्यांचे स्थानांतर होणार आहे; मात्र अशा आशयाचा उपमथळा देऊन त्यांची बदली व्हावी, असा दबाव आहे, असे भासवण्याचा खोडसाळ प्रयत्नही या वृत्तात करण्यात आला आहे.

१ आ. प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली असतांना त्यांची २ दिवस चौकशी केल्याचे लिहिणारे सनातनद्वेष्टे लोकमत ! : या वृत्तात ‘मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस डॉ. आठवले यांची चौकशी केली’, तसेच ‘साडेतीन घंट्याहून अधिक काळ चौकशी चालू होती’, असे वृत्तात नमूद करण्यात आले होते. वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एक दिवस १ घंटा भेट घेऊन त्यांच्याकडून संस्थेचे कार्य आध्यात्मिक दृष्टीकोन, साधनेचा प्रवास आदी तात्त्विक सूत्रांविषयी जाणून घेतले होते. असे असतांनाही धादांत खोटी माहिती देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करण्यात आली.

२. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ ही म्हण सत्यात आणणारे दैनिक लोकसत्ता !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी संशय निर्माण करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न :

विपर्यस्त वृत्त : ‘जयंत आठवलेंवरील उपचारनोंदींची तपासणी’, अशा मथळ्यांखाली ३ मार्च या दिवशी लोकसत्ताच्या संकेतस्थळावर वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. त्यात डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या वेळी ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होते का, तसेच या हत्या घडल्या त्या वेळी ते किती सक्रीय होते याचा तपास झाला’, असे छापण्यात आले आहे.

खंडण : वर्ष २००३ पासून आजारामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले खोलीच्या बाहेरही पडलेले नाहीत. असे असतांनाही त्यांच्याविषयी संशय निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती छापून त्यांची अपकीर्ती करण्याचा हा अश्‍लाघ्य प्रकार लोकसत्ताने केला.

२ आ. साधकांविषयी विपर्यस्त माहिती :

विपर्यस्त वृत्त : या वृत्तात डॉ. नंदिनी यांनी डॉक्टरी सोडली असून त्यांच्याकडे सनातन संस्थेच्या संपादकीय विभागाचे दायित्व सोपवल्याचे म्हटले आहे.

खंडण : वास्तविक सनातन संस्थेचा संपादकीय विभाग असा संस्थेत कुठलाही भाग नाही. तसेच सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संपादक श्री. शशिकांत राणे हे आहेत. असे असतांना रकाने भरण्यासाठी वाट्टेल ते छापणारा ‘लोकसत्ता’ !

३. महाराष्ट्र टाइम्सचा सनातनद्वेष !

सनातन संस्थेचा आणि त्याहून अधिक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करण्यात महाराष्ट्र टाइम्सही आघाडीवर होता. या वृत्तपत्राने ‘जयंत आठवलेंची एस्आयटीकडून चौकशी’ तसेच ४ मार्च या दिवशी त्याच्या वृत्तसंकेतस्थळावर ‘दुसर्‍या दिवशीही आठवलेंची चौकशी’ अशा मथळ्याखाली वृत्ते प्रसिद्ध केली.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कह्यात घेतले असल्याप्रमाणे वृत्त देऊन त्यांची अपकीर्ती करणारा महाराष्ट्र टाइम्स ! :

विपर्यस्त वृत्त : ‘एस्आयटीकडून करण्यात आलेली ही चौकशी दोन्ही दिवस चार तास चालली आणि त्यानंतर त्यांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) सुटका करण्यात आल्याचे एस्आयटीकडून सांगण्यात आले.

खंडण : वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची केवळ एकच दिवस एकच घंटा भेट घेतली. असे असतांना दोन दिवस चार तास चौकशी केली, अशी धादांत खोटी माहिती देणारे हे वृत्तपत्र लोकांना काय दिशा देत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! या वृत्तात ‘चौकशी करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सुटका केली’, अशा आशयाचे वाक्य आहे. सुटका करण्यासाठी त्यांना कह्यात कुठे घेतले होते ? पीतपत्रकारितेचे हे उदाहरण होय !

४. सनातनद्वेषाचा कंड शमवणारे ‘मुंबई मिरर’ !

नेहमी सनातनची अपकीर्ती करण्यात आघाडीवर असणारे इंग्रजी वृत्तपत्र ‘मुंबई मिरर’ने २ मार्च या दिवशी त्यांच्या सनातनद्वेषी वृत्तीला साजेसे वृत्त प्रसारित केले.

४ अ. सनातनच्या साधकांना ‘गुंड’ ठरवण्याचा प्रयत्न करणारे ‘मुंबई मिरर’ ! :

विपर्यस्त वृत्त : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समर्थकांनी कोणतेही ‘नाटक’ करू नये अथवा गोंधळ घालू नये, यासाठी साध्या वेशातील ३ पोलिसांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकशी केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

खंडण : डॉ. दाभोलकर अथवा पानसरे प्रकरणात सनातनच्या साधकांनी नेहमीच पोलिसांना सहकार्य केले. असे असतांनाही सनातनचे साधक हे गुंड मनोवृत्तीचे आहेत, असे दाखवण्याचा हा अश्‍लाघ्य प्रकार आहे.

४ आ. पोलिसांचा हवाला देत तावडे आणि इतर हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आदेशानुसार’ कृती करत असल्याचे सांगणार्‍या ‘मुंबई मिरर’चा सनातनद्वेष ! :

खोटे वृत्त : पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. तावडे आणि इतर हे डॉ. आठवलेंच्या आदेशानुसार कृती करत होते. ‘डॉ. आठवले हे निवृत्त आयुष्य जगत आहे’, असे सांगण्यात येते; मात्र ते बरेच सक्रीय आहेत.

खंडण : पोलीस सूत्रांचा हवाला देत पानसरे यांच्या हत्येच्या मागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हात आहे, असे दाखवण्याचा हा अश्‍लाघ्य प्रकार आहे. सनातनद्वेषापायी खालच्या थराला जाऊन वृत्तसंकलन करणार्‍या ‘मुंबई मिरर’चा निषेध करावा, तेवढा थोडाच ! याविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात