पुणे येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय अधिवेशनात सनातनच्या ग्रंथांचे प्रकाशन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे प्रांतीय अधिवेशन

ग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, समर्थभक्तमंदारबुवा रामदासी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख

पुणे : श्रीराम समर्थ उपासना, धर्मसंस्थापनेचा संकल्प, शत्रूंचे दंडन आणि भगवंताचे मंडन (मनन) ही आमची हिंदु राष्ट्राची दिशा आहे. अखिल विश्‍वकल्याणासाठी हिंदु राष्ट्र निर्मिती आवश्यक आहे. व्यष्टी साधनेसह समष्टी साधना केल्यास आपण मोक्षाला कारणीभूत होऊ. आत्मज्ञानी व्यक्ती आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी रणांगणावर धारातीर्थी पडणारा यांना मोक्ष मिळतो. धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी एकत्र येऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील वाळवेकर सभागृह येथे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख उपस्थित होते. या अधिवेशनाला पुणे, नगर आणि नाशिक येथील १४० हून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करून समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी इंग्रजी भाषेतील सनातनच्या ‘शारीरिक आणि मानसिक व्याधींवर नामजप उपायपद्धती भाग १ आणि भाग २’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन समर्थभक्त मंदारबुवा रामदासी आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी उपस्थितांना अधिवेशनाचा उद्देश अवगत करून दिला. या वेळी ह.भ.प. भानुदास महाराज तुपे, थेऊर येथील कीर्तनकार ह.भ.प. आनंद महाराज तांबे उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

२. अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वच हिंदुत्वनिष्ठांमध्ये आपलेपणाचे नाते निर्माण झाल्याचे जाणवले.

३. अधिवेशनाच्या ठिकाणी सनातननिर्मित सात्त्विक वस्तू आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावले होते. त्याला अनेक हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

४. काही हिंदुत्वनिष्ठांनी आवर्जूनपणे अधिवेशनाच्या वेळी असलेला महाप्रसाद (दुपारचे जेवण) सात्त्विक असल्याचे सांगितले.

५. एका हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशनाचे आयोजन शिस्तबद्ध झाल्याचे सांगितले.

संत आणि मान्यवर यांचे उद्बोधक विचार

समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांनी मार्गदर्शनात मांडलेली सूत्रे

१. आपण नानाविध उपासना करतांना अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे. त्यातून ती उपासना आपल्या ‘हिंदु राष्ट्र’ या देवाप्रती पोचणे आवश्यक आहे.

२. हिंदु धर्मियांमध्ये असलेले धर्मविषयक अज्ञान दूर करणे आणि अन्य धर्मियांनी हिंदूंमध्ये पसरवलेला पराकोटीचा द्वेष काढणे यांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३. ‘परित्राणाय साधूनाम् …’ गीतेतील वचनानुसार आपण आपल्या उपासनेची दिशा हवी आणि त्यासाठी संकल्प केला पाहिजे. यातून हिंदु राष्ट्राची निर्मिती लवकर होईल.

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी साधना आणि
भगवान श्रीकृष्ण यांचे साहाय्य आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघर्ष आणि साधना करावी लागणार आहे. आपल्याला अहंकारापोटी कार्य न करता धर्माधिष्ठित कार्य करायचे आहे. गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्य करत असूनही त्यांना अपेक्षित यश मिळालेले दिसून येत नाही; कारण संघटनेच्या मागे ईश्‍वरी अधिष्ठान नसते. ते असल्याविना कार्याला यश मिळत नाही. त्यासाठी आपल्याला साधना आणि ईश्‍वरकृपा संपादन करणे आवश्यक आहे. साधनेमुळे ईश्‍वरकृपा आणि धर्माभिमान निर्माण होतो. त्यामुळे साधना आणि भगवान श्रीकृष्ण यांचे साहाय्य घेतल्यास हिंदु राष्ट्र निर्मिती लवकर शक्य आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व स्तरांवरील हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभिजीत देशमुख

 

हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत आहोत; पण हिंदु समाज अनेक सामाजिक, भाषिक, प्रांतीय किंवा ज्ञातीय संघटनांमध्ये विभागलेला आहे. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अशाच प्रकारच्या विविध समाजांचे संघटन केले होते. ते लोकमान्य तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी, कामगार संघटनेचे नेते, ज्योतिष परिषदेचे नेते, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि पुण्यातील राष्ट्रप्रेमी पत्रकार-संपादकांचे संघटन केले होते. अशा प्रकारे ज्या ज्या समुदायाचे संघटन करता येईल, त्यांचे त्यांनी संघटन करण्याचा प्रयत्न केला होता. आपणही लोकमान्यांचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन करायचे आहे. तसेच आपल्याला संघटित समुदायासमोर त्यांच्या बैठकीत, मेळाव्यात किंवा एखादी एक वक्ता सभा आयोजित करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा विषय मांडण्याचे नियोजन आपण केल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचा हिंदूसंघटनाचा विषय पुढे जाईल. आपली धर्मशास्त्रे सांगतात, ‘संहता हि महाबलाः ।’ म्हणजे संघटितपणामुळेच महाबळ प्राप्त होते; म्हणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व स्तरांवरील हिंदूंचे संघटन करणे आवश्यक आहे.

भोंग्यांमुळे मनुष्याच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा !
– अधिवक्ता निलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

कुराणात ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती दिलेली नसतांनाही मशिदींवर लावण्यात येणार्‍या भोंग्यांच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण केले जाते. नमाजासाठी वर्षातून केवळ १५ दिवसच भोंग्यांचा वापर केला जावा, असे ध्वनीप्रदूषण कायद्यात नमूद केले आहे. स्वित्झर्लंडसारख्या अनेक देशांत, ऑक्सफर्ड विद्यापीठ परिसरातही भोंग्यांवर प्रतिबंध करण्यात आला. विविध न्यायालयात भोंग्यामुळे होणार्‍या प्रदूषणावर प्रतिबंध असावा, यासाठी निवाडे दिले आहेत. तरीही पोलीस यंत्रणा कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत भोंग्यांवर कारवाई करण्याचे टाळते. भोंग्यांमुळे मनुष्याच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांवरच गदा आणली आहे. यामुळे शांत निद्रा घेणे, हा मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेला आहे कि काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

माहिती अधिकार कायद्याने भ्रष्टाचारावर थोड्या प्रमाणात अंकुश !
– चंद्रकांत वारघडे, संस्थापक अध्यक्ष, माहिती अधिकार सेवा समिती

माहिती अधिकार कायद्याने भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यात थोड्या प्रमाणात यश आले आहे. या कायद्यामुळे आपण शासनाकडून मागवलेली माहिती ही त्यांना देणे बंधनकारक आहे. त्याचा प्रभावी वापर केल्यास अनेक सामाजिक दुष्प्रवृतींच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढता येते. या कायद्याचा आणखी एक लाभ म्हणजे जनता ही मालक असून प्रशासन हे चाकर आहेत, ही जाणीव दृढ होते.

लोकशाहीतील भ्रष्ट व्यवस्था मोडण्यासाठी सिद्ध व्हा !
– अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

देशात सध्या पुरोगामी आणि राष्ट्रद्रोही मंडळी यांची अभद्र युती निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये एक भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये निर्माण झालेली भ्रष्ट व्यवस्था मोडण्यासाठी सिद्ध होण्याची आवश्यकता आहे.

पुरोगाम्यांचा हिंदु असण्याला विरोध आहे. पुरोगामी मुसलमानांच्या पाठीशी आहेत. मनुस्मृती जाळणे, हा एकच कार्यक्रम राबवणारे पुरोगामी आता प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) काढणे, हा एकच कार्यक्रम राबवत आहेत. हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तेत येऊनही आज मालेगाव बाँबस्फोटातील हिंदू आरोपी अनेक वर्षे कारागृहात आहेत. श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांना गोवा राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे, श्रीराम मंदिराचे निर्माण करणे, ही सूत्रे आकार घेत नाहीत.

पनून काश्मीरची निर्मिती ही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची शिडी !
– राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, युथ फॉर पनून काश्मीर

आतापर्यंत काश्मीरमधून हिंदूंचे ७ वेळा पलायन झाले. देशाच्या विविध भागात काश्मीरसारखे धुमसते भाग निर्माण होत आहेत; मात्र एक भारत अभियानाच्या माध्यमातून देशभरातील संघटना ‘पनून काश्मीर’च्या निर्माणासाठी कृतीशील पाठिंबा देत आहेत. त्यातूनच जिहादी आतंकवाद उखडला जाऊन पनून काश्मीरची निर्मिती होईल आणि हीच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीची शिडी असेल.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढे यावे !
– अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदुत्वनिष्ठांचा प्रखर विरोध असूनही, तसेच पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होऊनही ‘सनबर्न’सारखे संस्कृतीविरोधी कार्यक्रम पुण्यात पार पडले. भविष्यात असे कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट करायला हवी. हिंदुत्वनिष्ठांना कार्य करतांना प्रशासकीय स्तरावर दमन होत असल्याचा अनुभव येतो. अधिवक्त्यांनी पुढे येऊन त्यांना साहाय्य करावे.

समितीचे श्री. नागेश जोशी यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि विविध प्रकारे करण्यात आलेली आंदोलने यांच्या फलनिष्पत्तीविषयी उपस्थित धर्माभिमान्यांना अवगत करून दिले.

‘सनबर्न’रूपी शाहिस्तेखानला महाराष्ट्रातून हद्दपार करूया ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीच्या दिवशीच ‘शिवपिंडीवर दूध वाहू नका !’, असे धर्मद्रोही आवाहन तथाकथित पुरोगामी आणि पर्यावरणवादी यांच्याकडून करण्यात आले. ‘सनबर्न’सारखा व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम पुण्यात घेतला गेला. त्या वेळी मात्र हे पुरोगामी आणि पर्यावरणवादी लपून बसले होते. तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, भूमीचे सपाटीकरण, भूमी उकरण्याचे काम केले गेले. अवैध आणि पर्यावरणाला हानी करणारे ‘फेस्टिव्हल’ होत असतांना पर्यावरणवाद्यांनी विरोध केला नाही. पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना ‘केसनंद गावात जाऊन ‘सनबर्न’चा कार्यक्रम होऊ नये’, यासाठी आवाहन केले. ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनीही ‘सनबर्न’ला विरोध केला. तरीही शासनाने ‘हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम आहे’, असे सांगून कार्यक्रम होऊ दिला. ‘सनबर्न’च्या विरोधात मात्र हिंदू आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे संघटन झाले. ‘सनबर्न’ने केलेल्या चुकीच्या कामांची माहिती ही माहिती अधिकारात मागवून आयोजकांना १ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शाहिस्तेखानाला पुण्यातून हद्दपार केले, त्याचप्रमाणे ‘सनबर्न’रूपी शाहिस्तेखानालाही आपण हद्दपार करूया.

गटचर्चांची फलनिष्पत्ती

प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांचे विविध गट करून राष्ट्रीय हिंदू आंदोलन, समाज मेळावे आणि धार्मिक अन् सामाजिक दुष्प्रवृत्ती विरोधातील आंदोलन यांसह अन्य विषयांवर गटचर्चा घेण्यात आल्या. त्यामध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्या वेळी झालेल्या चर्चांची कृतीशील फलनिष्पत्ती

* पुणे शहराला ‘भोंगामुक्त’ बनवणार.

* २ सहस्र ५०० हून अधिक संख्येने हिंदुत्वनिष्ठ राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधातील आंदोलनाला उपस्थित रहाणार.

* १२ समाजमेळाव्यांमधून हिंदु राष्ट्राचा विषय पोचवणार.

* ८ हिंदु धर्मजागृती सभा घेणार आणि ३ धर्मशिक्षण वर्ग, १ स्वसंरक्षण प्रशिक्षण चालू होणार.

* सण-उत्सव यांविषयीचे धर्मशिक्षण देणारी हस्तपत्रके प्रत्येक सणाच्या वेळी ३६ सहस्र ५०० जणांपर्यंत पोचवणार.

* समाजहिताचे विविध १५ विषय मार्गी लावणार. त्यांपैकी ५ विषयांवर त्वरित बैठक घेणार आणि ३ विषयांवर शक्य तितक्या लवकर आंदोलन घेणार.

* धर्म आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी ३ ठिकाणी माहिती अधिकाराच्या संदर्भात कार्यशाळा आयोजित करणार.

* २ मार्चला चाकण येथे कानिफनाथ महाराजांच्या दर्शनसोहळ्याच्या निमित्ताने धर्मशिक्षणविषयक फलकांचे प्रदर्शन लावून प्रबोधन करणार.

* करवडे गावात ७ मे या दिवशी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या वेळी, तसेच पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना होणार्‍या यात्रेच्या वेळी धर्मशिक्षणाचा प्रचार करणार.

* पुण्यात प्रस्तावित हज हाऊसला कायदेशीर मार्गाने विरोध करणार.

* शासकीय, तसेच धर्मादाय रुग्णालयांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार.

सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी यशस्वी
कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांचा सत्कार

सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी यशस्वी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांचा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल माहिती अधिकार कक्षेत यावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी कायदेशीर लढा दिला होता.

ठराव

भारतभूमीला संविधानाद्वारे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे !

अधिवेशनाच्या शेवटी ‘भारतभूमीत विश्‍वकल्याणकारी शिकवण देणारे आणि हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ म्हणून प्रसिद्ध पावलेले वेद, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता जन्माला आले. ज्या भारतभूमीने हिंदु संस्कृतीच्या आधारावर जगाला सत्य, नीती, सहिष्णुता, संस्कृत, गणित आणि तत्त्वज्ञान यांची शिकवण दिली, जी भारतभूमी विश्‍वातील १०० कोटी हिंदूंना स्वतःची मातृभूमी, देवभूमी आणि पुण्यभूमी वाटते, ती भारतभूमी संविधानाद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केली जावी’, असा ठराव सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मांडला. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात एकमुखाने ठरावाला अनुमोदन दिले.

अधिवेशनातही अप्रत्यक्षरित्या पोलीस चौकशी

अधिवेशनामध्ये एका साध्या वेशातील पोलिसाने ‘वेठबिगारी आहे. सभागृहाच्या बाहेर लावलेला फलक पाहून आलो’, असे सांगून आत येऊन कार्यक्रमाविषयी चौकशी केली. त्यानंतर थोड्या वेळाने स्थानिक पोलीस ठाण्यातून एका पोलिसाने दूरभाष करून कार्यक्रमातील वक्त्यांची नावे मागून घेतली. या कालावधीत एका साध्या वेशातील पोलिसाने अधिवेशनातील प्रदर्शनाच्या ठिकाणी येऊन अधिवेशनाच्या रूपरेषेची पहाणी केली. (पोलिसांनी धर्मांधांच्या कार्यक्रमांची अशा प्रकारे चौकशी केली असती, तर एव्हाना हा देश आतंकवादमुक्त झाला असता. सनदशीर मार्गाने चालणार्‍या अधिवेशनांची चौकशी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ पोलिसांनी आतंकवाद्यांच्या शोधार्थ द्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात