विवाह सोहळ्याच्या प्रसंगी सनातन संस्थेचा ग्रंथप्रसार करणारे हिंदुत्वनिष्ठ उद्योजक महात्मे बंधू !

असे हिंदुत्वनिष्ठ उद्योजक सर्वत्र हवेत !

जयसिंगपूर येथील बळीराजा पाईप कारखान्याचे मालक श्री. रवींद्र महात्मे आणि श्री. चंद्रकांत महात्मे हे दोघेही सनातन संस्थेचे हितचिंतक, तसेच सनातन प्रभातचे वाचक आहेत. महात्मे बंधू हिंदुत्वनिष्ठ उद्योजक असून दोघेही सनातनला सर्वोतोपरी साहाय्य करतात. १९ फेब्रुवारी या दिवशी श्री. रवींद्र महात्मे तसेच श्री. चंद्रकांत महात्मे यांच्या मुला-मुलींचे विवाहसोहळे पार पडले. या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने अध्यात्मप्रसार करण्याच्या उद्देशाने श्री. महात्मे यांनी सनातन संस्थेकडून ५०० ‘प्रार्थना’ लघुग्रंथ घेतले होते. हे लघुग्रंथ विवाह सोहळ्यासाठी आलेल्यांना वितरीत करण्यात आले. विवाह सोहळ्यातही धर्मजागृतीची कृती होणे अपेक्षित असल्याने त्यांनी विवाह सोहळ्यात आलेल्या महिलांना हळदीकुंकू लावून, तसेच पुरुषांना कुंकवाचा टिळा लावून विवाहस्थळी जाण्यास सांगावे आणि ही सेवा सनातनच्या साधकांनी करावी, अशी श्री. महात्मे यांची इच्छा होती. ही सेवाही सनातनच्या साधकांनी केली. त्यामुळे हा विवाह सोहळाही सर्वांना आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आला. (स्वत:च्या मुलाच्या विवाहाप्रीत्यर्थ समाजात अध्यात्मप्रसार होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या महात्मे बंधू यांचे अभिनंदन ! अन्यत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी श्री. महात्मे यांच्याकडून आदर्श घेऊन त्याप्रमाणे कृती करावी ! – संपादक)

सनातन संस्थेचा कोणताही उपक्रम असेल, तर साहाय्य करण्यासाठी नेहमी सिद्ध असतात. श्री. महात्मे यांचे कुटुंब स्वामी समर्थ संप्रदायातील असून त्यांच्या घराला असलेले ‘स्वामी कुटी’ हे नाव अध्यात्मदृष्ट्या आदर्श आहे. सनातनचे साधक धर्मासाठी पुष्कळ करतात, असा त्यांचा भाव असतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात