थिरुवनंतपुरम् (केरळ) येथे ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्विस फेअर’ मेळाव्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

१. आमदार राजगोपालजी यांना ग्रंथ भेट देतांना २. सनातनच्या कु. रश्मी परमेश्‍वरन्

थिरुवनंतपुरम् (केरळ) : येथे २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदु स्पिरिच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. केरळमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या हिंदु आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात १०० हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आध्यात्मिक मेळाव्यासह या ठिकाणी हिंदु संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आलेल्या पाहून चांगले वाटले.’ असे एका युवकाने सांगितले. या प्रदर्शनाला नेमोम येथील भाजपचे आमदार ओ. राजगोपाल, भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष कुम्मानम् राजशेखरन्, बीदरचे पू. श्री. बंते वरज्योती स्वामीजी, बीदर येथील गुरद्वाराचे शीख गुरु श्री श्री ग्यानी दरबार सिंह आदी मान्यवरांनी भेट दिली.

क्षणचित्रे

१. ब्रह्मचारी अरुणजी यांनी जेव्हा या ठिकाणी सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिले, तेव्हा त्यांनी याविषयी त्यांच्या गुरुजींना माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांपैकी हिंदुत्वासाठी कार्य करणारी सनातन संस्था एक आहे.’’ त्यानंतर ब्रह्मचारी अरुणजी यांनी दुसर्‍या दिवशी प्रदर्शनस्थळी येऊन त्यांच्या गुरुजींची सनातन संस्थेविषयी वरील प्रतिक्रिया सांगितली.

२. काही स्थानिक धर्माभिमानी हिंदूंनी प्रदर्शनस्थळी येऊन साधकांना साहाय्य केले.

३. अनेक जिज्ञासू सनातनची सात्त्विक उत्पादने घेऊन दुसर्‍यांनाही ती घेण्यास सांगत होते.

४. एका व्यक्तीने सांगितले की, तुमचे ग्रंथ अतिशय वेगळे आणि आकर्षक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात