अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला, तरच हिंदूंना न्याय मिळेल ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन

श्री. समीर पटवर्धन

कोल्हापूर : समाजात धर्मजागृती आणि गोरक्षण यांचे कार्य करत असतांना बहुसंख्य लोक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना कायदा, न्यायालय आणि पोलीस यांची भीती वाटत असते; मात्र ‘भारतीय दंड विधान संहिता’ आणि ‘माहितीचा अधिकार’ या पुस्तकांचे वाचन करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यांना कोणतीही भीती रहाणार नाही, उलट धर्म कार्य करण्यास स्फूर्ती येईल. तसेच धर्मकार्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना कधीही अधिवक्त्यांचे साहाय्य हवे असल्यास हिंदू विधीज्ञ परिषद त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास नेहमी सिद्ध आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा अधिवक्ता परिषद अध्यक्ष श्री. समीर पटवर्धन यांनी केले. येथील प्रांतीय अधिवेशनात ‘हिंदु धर्मावर होणारे स्थानिक आघात तथा उपाय’ या विषयावर ते उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘समाजातील लोक पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांना पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. पोलिसांना अहंभाव असतो. लोकांसमोर पोलिसांकडून कायद्याचा बागुलबुवा निर्माण केला जातो. त्यामुळे वरील पुस्तकांचे वाचन केल्यास कायद्याची विस्तृत माहिती मिळते. भारतीय नागरिकाला कोणते अधिकार दिले आहेत, याची माहिती मिळते. पुस्तक वाचून पोलिसांशी संवाद साधल्यास आपोआपच उत्साह निर्माण होईल. लोक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी अतिउत्साहीपणे कधीही पोलीस ठाण्यात निवेदन द्यायला जाऊ नये. पोलीस अधिकार्‍यांची भेटीची वेळ ठरवून संबंधित पोलिसांना त्यांना निवेदन द्यावे.’’

 

अन्य मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे

माहितीचा अधिकार हे शस्त्र असल्याने लोकांनी त्याचा
प्रभावी वापर करावा ! – राहुल कोल्हापुरे, माहिती अधिकार कार्यकर्ते

श्री. राहुल कोल्हापुरे

समाजाची स्थिती दयनीय असून समाजातील गंभीर समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. माहितीच्या अधिकाराखाली सेवा करत असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा घोटाळा माहितीच्या अधिकारामुळे बाहेर काढता आला, तसेच अंनिसला विदेशातून मिळणारे साहाय्य बंद झाले. ‘पुरोगामी आणि निधर्मीवादी यांना आम्ही अंधश्रद्धा नष्ट करतो’, असे वाटत असते. प्रत्यक्षात हा त्यांचा भ्रम असून हिंदु साधूसंतांनी समाजातील अंधश्रद्धा नष्ट केली आहे, हे नाकारले जाते. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या नावाखाली हिंदूंच्या रूढी-परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहितीचा अधिकार हे शस्त्र असून लोक त्याचा प्रभावी वापर करू शकतात. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा परिणामकारक वापर केला. पोलीस कायद्याची भीती दाखवतात; मात्र माहितीच्या अधिकाराचा अभ्यास केल्यास भीती नष्ट होईल. समाजातील अनधिकृत पशूवधगृहे आणि मशिदी यांची माहिती माहितीच्या अधिकारातून मिळू शकते.

उद्योजकांनी तन, मन आणि धन अर्पण केल्यास
हिंदु राष्ट्र स्थापन करणे अवघड नाही ! – उद्योजक व्यंकटेश शिंदे

श्री. व्यंकटेश शिंदे

आपल्या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी उद्योजकांची कष्ट करण्याची सिद्धता असते. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून उद्योजकांनी तन, मन आणि धन अर्पण केल्यास, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अवघड नाही. उद्योजक हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या कार्यासाठी सहज वेळ काढू शकतात. इस्लामी आतंकवादाचे संकट वाढत असल्याने उद्योजकांनी संघटित होणे आवश्यक आहे. ज्यांनी राष्ट्र आणि धर्म यांकडे दुर्लक्ष केले, त्या देशांची अधोगती झाली आहे. उद्योजकांनी राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी पुढे यावे.

आपले ध्येय सहज साध्य होणार नसल्याने हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – किरण कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख, कागल (जिल्हा कोल्हापूर)

श्री. किरण कुलकर्णी

एकजुटीने कार्य करतांना ध्येय सहजपणे साध्य होणार नसल्याने हिंदुत्वनिष्ठांना संघर्ष करावा लागेल. यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध आहे. महाराष्ट्र पुरोगामी नव्हता, आताही नाही आणि येथून पुढे भविष्यात कधीही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी नव्हते. त्यांनी मुसलमान मोघल यांच्याविरुद्ध लढा दिलेला आहे. पुरोगामी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास रचत आहेत. पुरोगामी आणि निधर्मीवादी हे परदेशातील देशाचे उदाहरण भाषणात देतात; मात्र त्यांना भारत देशाचा विसर पडतो. काही मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मराठ्यांपुरते मर्यादित केले आहे. पुरोगामी मंडळी जाती फोडायचे काम करत असून त्यांना हिंदु धर्म संपवायचा आहे. यासाठी हिंदूंनी पुरोगाम्यांचे प्रत्येक ठिकाणी खंडण करावे.

अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला, तरच हिंदूंना न्याय मिळेल ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

सद्यस्थितीत प्रत्येकजण प्रतिदिन अगणित समस्यांना तोंड देत आहे. अन्नपदार्थांतील भेसळ, शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचार, लाचलुचपत, गुन्हेगारी, तसेच पोलिसांची याविरोधातील अनास्था यांमुळे समाजात सुप्त असंतोष निर्माण झाला आहे. तो विधायक मार्गाने व्यक्त होण्यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन अधिकाधिक ठिकाणी करणे आवश्यक आहे. जो समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करतो, त्यालाच न्याय मिळतो. हिंदूंना अन्यायाच्या विरोधात संघर्षशील बनवण्यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सामावून घ्यावे लागेल, तरच आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने मार्गक्रमण होईल. हिंदूंनी केवळ आंदोलन करून न थांबता विषय मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करत रहाणे आवश्यक आहे. येणार्‍या काळात धार्मिक अन्याय रोखण्यासमवेत सामाजिक अन्याय रोखण्यासाठीही सज्ज व्हावे लागेल. जागृत धर्माभिमानी हिंदूंनी माहितीचा अधिकार आणि इतर आवश्यक कायद्याचे ज्ञान घेऊन पिचलेल्या हिंदु समाजाला दिशा दाखवावी.

हिंदुत्वनिष्ठांनी साधना करून लढा दिल्यास त्यांच्या पाठीशी ईश्‍वराचे
अधिष्ठान उभे राहील ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदू विधीज्ञ परिषद

शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराची साखळी असल्यामुळे शैक्षणिक अधिकारी आणि आधुनिक वैद्य हे लोकांना प्रतीदिन लुबाडतात. समाजातील हा भ्रष्टाचार नष्ट करून आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराचे असे विषय लोकांसमोर मांडून ते सोडवायचे आहेत. गंभीर गुन्हा घडलेला असतांनाही पोलीस तक्रार प्रविष्ट करण्याऐवजी ‘आपापसात हे प्रकरण मिटवून घ्या’, असे सांगतात. पोलिसांना या गुन्ह्याचे काही देणेघेणे नसते. काही वेळा हिंदुत्वनिष्ठ तक्रार करायला गेल्यानंतर पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करतात. यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कार्य करतांना साधना करून लढा दिल्यास त्यांच्या पाठीशी ईश्‍वराचे अधिष्ठान उभे राहील.

 

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गांमुळे हिंदु धर्माभिमान्यांना झालेले लाभ

१. पूर्वी केवळ कार्याकडे लक्ष असल्याने माझ्यात पुष्कळ अहंभाव निर्माण झाला होता; साधनेला आरंभ केल्यावर त्याची जाणीव झाली. साधना केल्यामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र धर्मकार्यात साहाय्य करू लागले. भगवंताचे साहाय्य घेऊन धर्मसेवा केल्याने सर्वांचेच साहाय्य मिळते. – श्री. सर्वेश रामनाथकर, बेळगाव

२. गावकर्‍यांमध्ये एकजूट वाढली. लोक धर्माचरण करू लागले आहेत. गणेशोत्सवांमधील अयोग्य प्रकार बंद करून सर्वजण धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरे करत आहेत. – श्री. राजू पाटील, सांगली

३. धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे कुलदेवीचा नामजप केल्यामुळे कुलदेवीच्या दर्शनाची अनुभूती घेता आली. धर्मशास्त्रामधील कृतींचे कारण, त्याचे परिणाम यांची माहिती मिळाली. समितीचे धर्मशिक्षणवर्ग सर्वत्र चालू करणे आवश्यक आहे. – श्री. मारुती जाधव, कोल्हापूर (देवतेच्या संदर्भात आलेली अनुभूती ही प्रत्येकाच्या भावामुळे आलेली असून ती वैयक्तिक स्वरूपाची असते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

 

अधिवेशनासाठी उपस्थित प्रातिनिधिक हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : भारतीय जैन संघटनेचे सुमीत ओसवाल, धर्माभिमानी श्री. गोविंद देशपांडे, श्री. देवराज सहानी, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाटये, मलकापूर येथील श्री. रमेश पडवळ, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, बजरंग दलाचे श्री. सुरेश पटेल, श्री संप्रदायाचे लगमाण्णा नाईक आणि महिला आघाडीच्या सौ. तिलोत्तमा नाईक, शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि युवासेनेचे श्री. ऋतुराज क्षीरसागर, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, श्री. उदय भोसले, हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुती जाधव आणि शिये येथील श्री. शशिकांत पाटील

सांगली : श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सचिन पवार, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, तासगाव येथील बजरंग दलाचे सहसंयोजक श्री. अभिजित घुले, कौलगे येथील श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री राजू पाटील, अरुण यादव, शिवसेनेचे श्री. निवास पाटील, बजरंग दलाचे श्री. मंदार पाटुकले

बेळगाव : श्रीराम सेनेचे श्री. सचिन पाटील आणि श्री. बाळकृष्ण पाटील यांसह अन्य कार्यकर्ते, अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेने श्री. व्यंकटेश शिंदे, श्री. उमेश नायक, धर्माभिमानी टी. विजयकुमार, भक्तीवेदांत समितीचे श्री. अमरसा चौधरी

सातारा : श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. घनश्याम ढाणे

 

विशेष

१. श्री भगवती मंगल कार्यालयाचे मालक श्री. संतोष व्यवहारे अधिवेशनासाठी प्रारंभीपासून उपस्थित होते. त्यांनी हिंदुत्वनिष्ठांसाठी बिसलरी पाणी उपलब्ध करून दिले. श्री. संतोष यांनी अल्पाहार आणि भोजन उपस्थित हिंदुत्वनिष्ठांसमवेत घेतले. अधिवेशनाच्या संदर्भात श्री. संतोष म्हणाले, ‘‘तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. ९ जून या दिवशी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. तिथे तुमचा विषय मांडा.’’

२. सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज आणि पू. विठ्ठल स्वामी यांचा गटचर्चांमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता.

 

अधिवेशनात मांडलेले ठराव !

भारतभूमी संविधानाद्वारे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावी ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

समारोपाचे सत्र

‘ज्या भारतभूमीत विश्‍वकल्याणकारी शिकवण देणारे आणि हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ म्हणून प्रसिद्ध पावलेले वेद, पुराणे, रामायण, महाभारत आणि गीता जन्माला आली, ज्या भारतभूमीने हिंदु संस्कृतीच्या आधारावर जगाला सत्य, नीती, सहिष्णुता, संस्कृत, गणित आणि तत्त्वज्ञान यांची शिकवण दिली आणि जी भारतभूमी विश्‍वातील १०० कोटी हिंदूंना स्वतःची मातृभूमी, देवभूमी आणि पुण्यभूमी वाटते, ती भारतभूमी संविधानाद्वारे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केली जावी’, असा ठराव हे अधिवेशन एकमताने पारीत करीत आहे.

या ठरावास ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशी घोषणा देऊन हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे अनुमोदन दिले.

प्रांतीय अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची वाटचाल
निश्‍चित झाली आहे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

संत आणि ऋषीमुनी यांनी यापूर्वीच हिंदु राष्ट्र येणार असल्याचे सांगितले होते. समितीने आतापर्यंत राबवलेल्या मोहिमा, आंदोलने आणि आता प्रांतीय अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची वाटचाल निश्‍चित झाली आहे. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून तशी कृती सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे. अल्प कालावधीत छोट्या छोट्या कृतीपासून हिंदुत्वनिष्ठांनी प्रारंभ करायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापन करतांना हिंदुत्वनिष्ठांना संघर्ष करावा लागणारच आहे. हे हिंदु राष्ट्र सर्वांना प्रेरणा देणारे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांमध्ये धर्मबांधुत्वाची भावना निर्माण झाली आहे. या अधिवेशनात आलेले हिंदुत्वनिष्ठ हे श्रोते नव्हते आणि येथे वक्त्यांची भाषणे नव्हती. येथील हिंदुत्वनिष्ठांनी खारीचा वाटा नव्हे, तर हनुमंताचा वाटा उचलला आहे.

लोकशाहीत हिंदूंच्या बाजूने कायदे केले जात नाहीत, हे दुर्दैव ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र कसे असणार आहे, याचा विचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्र स्थापन कसे होईल, याकडे हिंदुत्वनिष्ठांनी वाटचाल केली पाहिजे. एखादे ध्येय गाठायचे असेल, तर राज्यकर्त्यांना नुसते सांगून त्याचा उपयोग होत नाही. यासाठी देशात जनआंदोलन उभे करावे लागेल; कारण जनआंदोलन केल्यानंतर संपूर्ण व्यवस्था कोलमोडून पडते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी जनआंदोलन उभे केल्यानंतर ‘लोकपाल कायदा’ संमत झाला. तसे राष्ट्रीय हिंदू आंदोलन उभे करून हिंदूंनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. जनआंदोलन असे उभे केले पाहिजे की, निधर्मी विचारसरणीचे राज्यकर्ते आंदोलनाची नोंद घेऊन ते संसदेत ‘हिंदु राष्ट्र स्थापन’ करण्याचा ठराव करतील. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठांनी कितीही आवेदने दिली, विनंती केली, तरी शासन त्यांना केराची टोपली दाखवते. लोकशाहीत हिंदूंच्या बाजूने एकही कायदा केला जात नाही. त्यामुळे शासनाला ऐकू जाईल, असे मोठे जनआंदोलन हिंदूंनी उभे केले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात