ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेचे देहली येथील नोव्हेंबर २०१६ मधील प्रसारकार्य

१. ग्रंथप्रदर्शने

१ अ. हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्यात ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन

‘उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील कवीनगरच्या रामलीला मैदानात १७ ते २०.११.२०१६ या काळात ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सनातनच्या वतीने अध्यात्म, राष्ट्ररक्षण, धर्मशिक्षण, आयुर्वेद इत्यादी विषयांवरील ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनुमाने २ सहस्र जिज्ञासूंनी लाभ घेतला.

१ अ १. क्षणचित्रे

अ. १९.११.२०१६ या दिवशी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री श्री. शिवप्रकाश यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्यांच्यासमवेत क्षेत्रीय संघटनमंत्री श्री. चंद्रशेखर, क्षेत्रीय महामंत्री सत्येंद्र शिशोदिया, महानगर अध्यक्ष श्री. अजय शर्मा आणि महानगर महामंत्री श्री. राजीव अग्रवाल होते.

आ. २०.११.२०१६ या दिवशी गाझियाबाद जिल्ह्याचे ‘मेंबर ऑफ पार्लमेंट जनरल’ वी.के. सिंह यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

१ आ. कपालमोचन जत्रेत ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन

हरियाणा राज्यातील विलासपूरच्या यमुनानगर येथे प्रसिद्ध ‘कपालमोचन जत्रेच्या निमित्ताने हिंदु भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि धर्मशिक्षण मिळावे’, या हेतूने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे धर्मशिक्षण देणारे फलकही लावले होते. सहस्रो जिज्ञासूंनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाला ‘हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन’चे सदस्य
श्री. भोपाल सिंह यांनी भेट देऊन संस्थेचे कार्य जाणून घेतले.

१ आ १. क्षणचित्र : या जत्रेत धर्मपरिवर्तन करण्यासाठी बायबलचे वाटप विनामूल्य करण्यात येत होते; परंतु सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथ आणि फ्लेक्स यांचे प्रदर्शन पाहून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन काही जिज्ञासूंनी बायबलच्या प्रती परत केल्या.

२. शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सनातन संस्थेने
प्रकाशित केलेल्या हिंदी भाषेतील ‘मनोविकारों के लिए स्वसम्मोहन उपचार’ या ग्रंथाचे प्रकाशन

२८.११.२०१६ या दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या देहली येथील निवासस्थानी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या हिंदी भाषेतील ‘मनोविकारों के लिए स्वसम्मोहन उपचार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांचे स्वीय साहाय्यक, तसेच मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी श्री. प्रसाद जोशी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली येथील समन्वयक श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते. खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांनी ‘हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ग्रंथ वाचून उपायोजना काढायला हवी’, असे सांगितले. श्री. गजानन कीर्तीकर यांनी ‘मनोविकाराने ग्रस्त व्यक्तींवर उपचार होऊन ते निरोगी व्हावेत, यासाठी संसदेत विधेयक सादर केले आहे’, असेही सांगितले.’

– कु. मनीषा माहुर आणि सौ. तृप्ती जोशी, देहली

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात