देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवण्याचा भारतीयांमध्ये अभाव नाही ! – सौ. नंदिनी सुर्वे, सनातन संस्था

रामनाथ (अलिबाग) येथील हिंदु धर्मजागृती सभा

रामनाथ (अलिबाग) : गांडिवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक योद्ध्यांचा आमच्याकडे इतिहास आहे. हिंदु हा लढाऊ योद्धा आहे, हे इंग्रजांनी अचूक ओळखले म्हणून त्यांनी १८६० साली भारतात शस्त्रबंदी कायदा लागू करून हिंदूंच्या हातातली शस्त्रे काढून घेतली.

हिंदु हा अवघ्या विश्‍वात वीर म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धात १५ लाख आणि दुसर्‍या महायुद्धात २५ लाख भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाचे दर्शन घडवले. अशाप्रकारे देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवण्याचा भारतीयांमध्ये अभाव नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी येथे केले.

२२ जानेवारीला वावे गावातील श्री राम मंदिराच्या पटांगणात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. सभेला व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नंदिनी सुर्वे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्थित होते. सभेला ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती होती. या सभेला वावे, चिंचोटी, उसर, देऊळ भेरसे, रेवदंडा, सराई, वलवली, आंदोशी, बेलोशी, महाजने या गावांतून धर्माभिमान्यांची उपस्थिती होती. सभेला श्री संप्रदाय, शिवसेना, बैठक संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सौ. सुर्वे पुढे म्हणाल्या की, आपल्याकडे बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा आहे, सिंहाचा कुणी बळी देत नाहीत, त्यामुळे आता आपण सिंह म्हणून जगण्याची आवश्यकता आहे, तरच या देशात लवकर हिंदु राष्ट्र येईल.

आजपासून अलिबाग नव्हे, तर रामनाथ असेच संबोधणार ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

श्री. प्रसाद वडके

१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांंनी रामनाथ हे गाव वसवले, काही दिवसांनी एक अली नावाचा इस्रायली यवन येथे आला, त्याने येथल्या जमिनी विकत घेऊन एक बाग बनवली आणि आज आपण त्या शहराला अलिबाग असे संबोधतो आहे. आजपासून आपण सर्व हिंदु बांधवांनी अलिबागला आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे रामनाथ असे संबोधले पाहिजे आणि सरकारवरसुद्धा हे नाव पालटण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

वावे गावात काही दिवसांपूर्वी धर्मांतर करण्यास आलेल्या मिशनरींना गावातील तरुणांनी बाहेर काढले, त्याविषयी त्या सर्व जागरूक तरुणांचे अभिनंदन ! वावे गाव हे हिंदु राष्ट्रातील रामनाथ तालुक्यातील आदर्श गाव संबोधले जाईल, असे प्रतिपादन श्री. प्रसाद वडके यांनी केले.

क्षणचित्रे

१. गावातील सर्व नागरिकांनी रस्ते शेणाने सारवले होते आणि स्थानिक धर्माभिमान्यांनी सकाळी चार वाजेपर्यंत जागून सभेकडील मार्गावर चुन्याने नक्षीकाम केले होते.

२. सभेला सर्वश्री सुमित गायकर, परेश, अविनाश, सुहास आणि नितीन गावंड यांनी आठवडाभर प्रसारासाठी आणि सभेला साहित्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

३. अन्य गावांतून आलेल्या धर्माभिमान्यांनी त्यांच्या गावातसुद्धा धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात