धर्मशास्त्रसंमत नसलेली गोष्ट करण्याच्या संदर्भात विक्रम भावे यांची झालेली विचारप्रक्रिया

१. प्रमुखांची आज्ञा शिरसावंद्य मानून ‘समाजाची सेवा हीच ईश्‍वराची
सेवा’, असा भाव ठेवून विविध शिबिरांचे आयोजन करणारे एका संप्रदायाचे साधक !

‘काही दिवसांपूर्वी एका संप्रदायाचे साधक भेटायला आले होते. स्वतःचा संप्रदाय आणि संप्रदायप्रमुख यांविषयी ते अत्यंत आदरभावाने बोलत होते. त्यांच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी भक्तांना हाक दिल्यावर काही दिवसांतच सहस्रो लोकांनी अवयवदानासाठी स्वतःच्या नावांची नोंदणी केली. सहस्रो लोकांनी रक्तदानही केले. या वेळी संबंधित संप्रदायाचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या संप्रदायप्रमुखांची आज्ञा शिरसावंद्य मानून ‘समाजाची सेवा हीच ईश्‍वराची सेवा’, असा भाव ठेवून त्या संप्रदायाच्या साधकांनी या संपूर्ण मोहिमेचे आयोजन करणे, घरोघरी फिरून नोंदणी करणे, रक्तदान शिबिरे घेणे, ज्यांना शिबिरात येणे शक्य नाही, त्यांच्या घरी जाऊन रक्त घेणे, अशा अनेक गोष्टी सेवाभावाने केल्या. हे सर्व सांगतांनाही आपल्या संप्रदायाच्या प्रमुखांविषयी असलेला भाव त्या व्यक्तीच्या बोलण्यात जाणवत होता. त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले होते.

 

२. धर्मशास्त्रानुसार रक्त किंवा अवयव दानाला मान्यता नसतांनाही
गुर्वाज्ञा म्हणून भावपूर्ण सेवा केल्याने साधकांना पातक लागत नसणे

हे सर्व ऐकतांना मनात प्रश्‍न आला, ‘धर्मशास्त्र हे रक्तदान किंवा अवयवदान यांना मान्यता देत नाही. त्याचे कारणही तितकेच समर्थ आणि योग्य आहे. एका संप्रदायाच्या प्रमुखांनी अशा गोष्टी भक्तांना करायला सांगणे कितपत योग्य ? ते पातक नव्हे का ?’ त्याच क्षणी देवाने आतून उत्तर सुचवले, ‘त्या संप्रदायाच्या साधकांनी गुर्वाज्ञा म्हणून भावपूर्ण सेवा केली आहे. त्याचे त्यांना पातक लागणार नाही, उलट सेवेचे फळही त्यांना मिळेल; कारण ती करतांना त्यांचा सेवाभाव होता. अशा प्रकारच्या गोष्टी कुणालाही करायला सांगतांना सांगणार्‍याचा भाव जसा असेल, तसे त्यालाही फळ मिळते.

 

३. शिष्याच्या उन्नतीसाठी धर्मशास्त्रसंमत नसलेली गोष्ट गुरुपदावर
आरूढ असणार्‍या संतांनी सांगितल्यास ते संत आणि शिष्य यांना पातक लागत नसणे

धर्मशास्त्रसंमत नसलेली एखादी गोष्ट गुरूंनी शिष्याला करायला सांगितली, तर त्यात शिष्याच्या उन्नतीचा विचार असल्याने आणि गुरु सतत भावावस्थेत असल्याने गुरुपदावर आरूढ असणार्‍या संतांना पातक लागणार नाही. उच्च कोटीच्या संतांनी काही निष्काम हेतूने आपल्या भक्तांना किंवा शिष्याला असे काही करायला सांगितल्यास त्यांच्याकडून घडलेले कर्मच निष्काम कर्म असल्याने त्यांनाही पातक लागत नाही.

 

४. आध्यात्मिक स्तर न्यून असतांना
धर्मशास्त्रसंमत नसलेली गोष्ट करण्यास सांगणार्‍याला पातक लागणे

आध्यात्मिक पातळी अधिक नसतांनाही एखाद्याने धर्मशास्त्रसंमत नसलेली एखादी गोष्ट करण्यास इतरांना सांगितले, तर करणार्‍याच्या सेवाभावामुळे त्याला पातक लागत नाही. सांगणार्‍याला मात्र मोठ्या प्रमाणात पातक लागते.

 

५. अजाणतेपणाने व्यक्तीगत घडलेले पाप क्षम्य असणे;
पण समष्टीत मात्र नेतृत्व करणार्‍याला पातक चुकणार नसणे

थोडक्यात मोठ्या समाजाचे/समुदायाचे नेतृत्व ज्याच्याकडे आहे, त्याच्यावर पुष्कळ मोठे दायित्व असते. अजाणतेपणाने व्यक्तीच्या संदर्भात घडलेले पाप एक वेळ क्षम्य ठरेल; पण समष्टीच्या संदर्भात मात्र नेतृत्व करणार्‍याला पातक चुकणार नाही. अग्नीवर जाणूनबुजून पाय ठेवला किंवा अजाणतेपणे ठेवला, तरी भाजतेच. त्याप्रमाणेच समष्टीच्या संदर्भात धर्माचे नियम आहेत.’

सेवाभावाचे आणि भावावस्थेचे महत्त्व अशा प्रकारे लक्षात आणून दिल्याबद्दल देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment