विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील उपमालिका !

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे
आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !

१. मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (२ भाग)

२. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार

३. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. ६.१२.२०१६ या दिनांकापर्यंत या मालिकेतील १३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील ‘विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन-उपचार’ या उपमालिकेचा परिचय करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथमालिकेत केले आहे. या ग्रंथमालिकेतील सर्व भाग वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.

‘स्वसंमोहन उपचारपद्धत’ ही केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे.

लेखाच्या या भागात ‘दमा’ या शारीरिक विकारावर ‘स्वसंमोहन उपचार कसे करू शकतो ?’ याचे विवेचन केले आहे.

ग्रंथांचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ)

उत्तरार्ध (भाग १)

६. दमा

‘माणसाला अतिशय त्रस्त करणारा रोग कोणता ?’, असे कोणी विचारले, तर बहुतेक वैद्य त्याचे उत्तर ‘दमा’ असेच देतील. पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडतो, त्याप्रमाणे सभोवार हवा असूनही वातावरणातील प्राणवायू शरिरात जाऊ शकत नसल्याने दम्याचा विकार झालेला रुग्ण अक्षरशः माशासारखा तडफडत असतो.

दम्याच्या विकारात श्‍वासनलिकांचे आकुंचन होऊन श्‍वासोच्छ्वासाला अडथळा निर्माण होतो.

आपण येथे ‘श्‍वासनलिकांचे आकुंचन झाल्यामुळे दमा लागणे’, या विकाराचा विचार करणार आहोत. सर्वसाधारण व्यक्ती ज्या वेळी ‘दमा’ असा उल्लेख करते, त्या वेळी तिच्या मनात हाच विकार असतो. इतर कारणांमुळे दम लागत असल्यास त्याला ‘दमा’ असे संबोधले जात नाही, तर त्याला ‘धाप लागली’, असे म्हणतात.

६ अ. दम्याची लक्षणे

६ अ १.    पूर्वसूचना मिळणे : काही जणांना अस्वस्थता वाटणे, शिंका येणे अशांसारख्या लक्षणांमुळे दमा लागणार असल्याची पूर्वसूचना मिळते.

६ अ २.    दम्याचा झटका येणे : छातीवर अचानक दाब आल्यासारखे वाटून रुग्ण उठून बसतो आणि श्‍वास घेण्यासाठी तडफडू लागतो. तो दारे, खिडक्या उघडायला सांगतो. त्याच्या अंगाला घाम फुटून त्याचे हात-पाय थंड पडतात.

६ अ ३.    दम्याचा झटका नाहीसा होणे : शेवटी खोकला येऊन अल्पसा कफ बाहेर पडल्यावर दम्याचा झटका नाहीसा होतो.

६ अ ४. धापेचा अवधी : काही मिनिटे ते काही घंटे (तास)

‘केवळ ३४ टक्के रुग्णांमध्ये ‘अ‍ॅलर्जी’ किंवा फुफ्फुसाचा गंभीर विकार यांमुळे दमा लागतो. ६६ टक्के रुग्णांत मनावर ताण आला की, शरिरावरही ताण येतो. त्यामुळे छातीचे स्नायू आवळले जाऊन श्‍वासोच्छ्वास करायला त्रास होतो, म्हणजेच दमा लागतो.’

६ आ. उपचार

६ आ १.   सर्वसाधारण उपचार

अ. दमा लागण्याचे जे कारण असेल, त्यानुसार उपचार करण्यात येतात.

आ. प्रत्यक्षात दमा लागलेला असतो, त्या वेळी ‘रुग्णाला व्यवस्थितपणे श्‍वासोच्छ्वास कसा करता येईल’, याला प्राधान्य द्यावे लागते.

इ. श्‍वासनलिका प्रसरण पावण्याच्या दृष्टीने गोळ्या, औषधे, ‘इंजेक्शन’ इत्यादी उपचार करण्यात येतात.

ई. दम्याचा त्रास अधिक असल्यास रुग्ण प्राणवायूअभावी गुदमरू नये; म्हणून त्याला कधीकधी प्राणवायू द्यावा लागतो.

६ आ २. संमोहनावस्थेत द्यावयाच्या सर्वसाधारण स्वयंसूचना : संमोहनशास्त्राद्वारे ‘रुग्ण कोणत्या प्रकारच्या मानसिक ताणाला बळी पडतो ?’, हे शोधून ‘त्या ताणाच्या वेळी मन निर्विकार कसे ठेवायचे आणि शरिराचा ताण कसा अल्प करायचा’, हे शिकवण्यात येते. त्यायोगे छातीचे स्नायू सैल रहातात आणि दमा लागत नाही. अशा प्रकारे बरा झालेला रुग्ण ‘ब्राँकोडायलेटर’ औषधांच्या कचाट्यातून पूर्णपणे सुटतो.

ज्या गोष्टींचा रुग्णाच्या मनावर ताण येत असेल, त्या गोष्टींना तोंड द्यायला संमोहन उपचाराद्वारे रुग्णाला शिकवल्यास दम्याचा विकार बरा होतो. संमोहन उपचाराद्वारे भावनाप्रधानता, एकलकोंडेपणा यांसारखे स्वभावदोष घालवून रुग्णाचे व्यक्तीमत्त्व निरोगी केल्यास व्यक्तीचा दमा नेहमीसाठी बरा होतो. येथे लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे सूत्र म्हणजे प्रत्यक्ष दम्याचा झटका येईल, त्या वेळी रुग्ण स्वसंमोहन करू शकत नाही; म्हणून अशा वेळी रुग्णाने औषधेच घ्यावीत.

६ आ ३. संमोहनावस्थेत द्यावयाच्या विशिष्ट स्वयंसूचना

६ आ ३ अ. दमा लागणार असल्यास त्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी मनाला सूचना देणे : पुष्कळ रुग्णांना धाप लागणे, हा विकार होणार असल्याची पूर्वसूचना मिळत नाही. पूर्वसूचना मिळाल्यास रुग्ण स्वसंमोहनाचे अभ्याससत्र करून किंवा या विकारावरील औषध घेऊन दमा लागण्याचा येणारा झटका टाळू शकतात. संमोहनावस्थेत पुढीलप्रमाणे सूचना दिल्यास रुग्णाला दमा लागणाच्या झटक्याची पूर्वसूचना मिळू शकते. ‘मला दम्याचा झटका येणार असेल, त्या वेळी त्याची पूर्वसूचना मिळेल’, अशा प्रकारच्या सूचनेमुळे झटका येण्याआधीच रुग्णाचे अंतर्मन त्याच्या बाह्यमनाला त्याची जाणीव करून देते.

६ आ ३ आ. मनावर ताण येणार्‍या प्रसंगात दमा लागणे : परीक्षा आणि चाकरीसाठी मुलाखत अशांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी दमा लागू नये, यासाठी ‘प्रसंगाचा सराव मनात करणे’, या संमोहन उपचार पद्धतीचा वापर करावा.

६ इ.  उपचारामुळे होणारा लाभ

३३ टक्के रुग्णांत दमा हा विकार केवळ मानसिक कारणांमुळे झालेला असतो आणि तो संमोहन उपचाराने पूर्णपणे बरा होतो. दुसर्‍या ३३ टक्के रुग्णांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही कारणांमुळे धाप लागते; म्हणूनच संमोहन उपचाराने त्यांना ५० टक्के लाभ होतो. म्हणजे गोळ्या, औषधे, इंजेक्शन ५० टक्क्यांहून अल्प प्रमाणात घ्यावी लागतात. उर्वरित ३४ टक्के रुग्णांत शारीरिक कारणांमुळे दमा लागत असल्यामुळे त्यांना केवळ १० – २० टक्के एवढाच लाभ होतो; कारण दमा या विकाराचा स्वीकार करायला त्यांचे मन शिकल्यामुळे, दम्याच्या भीतीमुळे निर्माण होणारी काळजी मनात निर्माण होत नाही आणि काळजी न्यून झाल्यामुळे दम्यामध्ये घट होते. कोणत्या रुग्णाला किती टक्के लाभ होईल, हे निश्‍चित सांगणे कठीण असल्यामुळे श्‍वासरोगाच्या प्रत्येक रुग्णानेच संमोहन उपचार शिकणे आवश्यक आहे. स्वसंमोहन उपचारामुळे त्यांचा दमा पूर्ण बरा होईल किंवा न्यून होईल, हे निश्‍चित !

६ ई.  साधना

प्रत्येक दमा लागणार्‍या व्यक्तीने पुढील साधनामार्गाचा अवलंब केल्यास त्याला निश्‍चितच लाभ होतो.

६ ई १. अखंड नामजप : यामुळे ‘परत कधी दमा लागेल’, हा विचार, तसेच स्वभावदोषांमुळे निर्माण होणारे चुकीचे विचार आणि भावना मनात येत नाहीत. त्यामुळे अंतर्मनातील काळजी न्यून होऊन दमा लागण्याचे प्रमाण न्यून व्हायला लागते.

६ ई २. प्राणायाम : प्राणायामामुळे शरिरात प्राणवायू न्यून असला, तरी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्याचा शरिरातील प्रत्येक पेशीला सराव होतो; म्हणूनच दमा लागला, तरी अधिक त्रास होत नाही.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार’)

टीप : वाचकांनी प्रस्तुत लेख संदर्भासाठी जपून ठेवावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात