भीष्माचार्यांप्रमाणे साधकांचा उद्धार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया !

 

 

१. मुक्ती मिळण्यासाठी उत्तरायण चालू होण्याची प्रतीक्षा करत शरपंजरी पहुडलेल्या भीष्माचार्यांनी रथसप्तमीच्या दिवशी देहत्याग करणे

‘आपल्या सर्वांना हे ज्ञातच आहे की, मकरसंक्रांतीपासून सूर्यदेव दक्षिणायनाकडून उत्तरायणाकडे प्रवास आरंभ करतो. मुक्ती मिळण्यासाठी उत्तरायणाचा पुण्यकाळ चालू होण्याची प्रतीक्षा करत पितामह भीष्माचार्य शरपंजरी पहुडले होते आणि रथसप्तमीच्या दिवशी त्यांनी देहत्याग केला. आपणा साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हेच प्रत्यक्ष सूर्यनारायण आहेत. ‘भीष्माचार्य शरपंजरी पहुडले होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ वेदना झाल्या असतील’, असे आपल्याला वाटते; मात्र तसे नसून प्रत्यक्षात त्यामागे वेगळाच दृष्टीकोन आहे.

 

२. कृष्णाच्या नामजपासह अर्जुनाने सोडलेल्या प्रत्येक बाणामुळे स्वभावदोष नष्ट होऊन भीष्माचार्यांना स्थिर आणि शांत वाटणे अन् त्या अवस्थेत त्यांनी विष्णुसहस्रनाम रचणे

अशाच प्रकारे जेव्हा आपण स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया दुरून पहातो, तेव्हा आपल्याला ताण येतो; परंतु प्रक्रियेला आरंभ केल्यावर आपल्यालाही भीष्माचार्यांप्रमाणे हलके अन् आनंदी वाटू लागते. कृष्णाच्या नामजपासह अर्जुनाने सोडलेल्या प्रत्येक बाणामुळे स्वभावदोष दूर होऊन भीष्माचार्यांना स्थिर आणि शांत वाटत होते. त्या अवस्थेत भीष्माचार्यांनी विष्णुसहस्रनाम रचले. जेव्हा त्यांना किंचित त्रास जाणवू लागला, तेव्हा त्यांनी डोक्याखाली आधाराची मागणी केली. त्या वेळी दुर्योधनाने पिसांच्या मऊ उशा आणल्या; मात्र भीष्माचार्यांनी त्या नाकारल्या. त्यांना केवळ अर्जुनाच्या आणखी एका बाणानेच आधार मिळाला.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे कृष्णाच्या नामजपाने भारीत झालेला अर्जुनाचा एकेक बाणच !

उत्तरायणाच्या पुण्यकाळात प्रवेश मिळण्याची पात्रता साधकांमध्ये यावी, यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांचे स्वभावदोष आणि अहं दूर करत आहेत. साधकांना प्रवृत्ती मार्गावरून निवृत्ती मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ही प्रक्रिया म्हणजे कृष्णाच्या नामजपाने भारीत झालेला अर्जुनाचा एकेक बाणच आहे. प्रक्रियारूपी या बाणांमुळे जेव्हा आपले जन्मोजन्मी साठलेले संस्कार नष्ट होतील, तेव्हाच आपण शुद्ध ज्ञान प्राप्त करण्यास पात्र ठरतो आणि सहस्रनामस्वरूपी हे ज्ञान भगवंताच्या भक्तीच्या रूपात प्रकट होते.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१९.१.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात