डॉ. तावडे यांच्या न्यायअधिकारावर पोलिसांची गदा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

६ फेब्रुवारीला पोलीस डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करणार का, याविषयी प्रश्‍नचिन्ह !

कोल्हापूर : सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही. यासाठी पोलीस वेगवेगळी कारणे देत आहेत. डॉ. तावडे यांना कोल्हापूर येथे उपस्थित न करण्याला ४ मासांहून अधिक काळ लोटला आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी डॉ. तावडे यांना उपस्थित न केल्याने अधिवक्ता म्हणून माझीही त्यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही. ही एकप्रकारे पोलिसांनी डॉ. तावडे यांच्या न्यायअधिकारावर आणलेली गदाच आहे, याची गंभीर नोंद न्यायालयाने घ्यावी, असे मत डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

सोमवार, ६ फेब्रुवारी या दिवशी या प्रकरणाची सुनावणी आहे. गेल्या ४ मासांपासून पोलिसांची एकूणच वेळकाढूपणाची भूमिका पहाता सोमवारी पोलीस डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करणार का, यावर प्रश्‍नचिन्हच निर्माण झाले आहे. मागील सुनावणी २१ जानेवारी या दिवशी झाली. त्या वेळी न्यायालयाचे आदेश असतांनाही डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. त्या सुनावणीत अन्वेषण अधिकारीही न्यायालयात उपस्थित नव्हते आणि सरकारी अधिवक्ता कोणतेही समाधानकारक उत्तर न्यायालयास देऊ शकले नाहीत.

खटला लांबवण्याचा पोलिसांचा डाव !

या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांनाही पोलिसांनी न्यायालयात उपस्थित करण्यास नेहमीच विलंब केला. ९ ऑक्टोबर २०१५ या दिवशी श्री. समीर यांचे ब्रेनमॅपिंगचे आवेदन फेटाळल्यानंतर खटला लांबवण्याच्या कुटील उद्देशाने श्री. समीर यांना दोन मास न्यायालयातच उपस्थित करण्यात आले नाही. गणेशोत्सव आहे, निवडणुका आहेत, हाय प्रोफाईल कैदी, अपुरे मनुष्यबळ, अशी वेगवेगळी कारणे देत पोलीस श्री. समीर यांना न्यायालयात  उपस्थित करणे टाळत होते. अखेर एक मासाच्या प्रदीर्घ युक्तीवादानंतर २१ नोव्हेंबर या दिवशी श्री. समीर यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली. यानंतर डिसेंबर २०१५ पासून श्री. समीर यांना परत न्यायालयात उपस्थित करण्यात येऊ लागले. यानंतर मार्च-एप्रिल २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध कारणे देत पोलीस श्री. समीर यांना न्यायालयात उपस्थित करण्याचे टाळत होते. असाच प्रकार पोलीस आता डॉ. तावडे यांच्याविषयी करत आहेत. पोलिसांचे हे वेळकाढू धोरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर निश्‍चित संशय घेण्यास जागा ठेवते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात