समीर गायकवाड यांना जपमाळ देण्यास न्यायालयाची अनुमती

सनातनची उत्पादने प्रयोगशाळेत पडताळणी करून वापरण्यास देण्याचा आदेश !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना नामस्मरण करण्यासाठी जपमाळ देण्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी अनुमती दिली; मात्र सनातनची उत्पादन असलेले गोअर्क, अत्तर आणि उदबत्ती देण्यास कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी आक्षेप घेतल्याने न्यायाधीश बिले यांनी या वस्तू श्री. समीर गायकवाड यांना देण्यास नकार दर्शवला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कारण पुढे करून श्री. समीर गायकवाड आणि सनातनचे साधक अन् संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करता आले नाही, असे विशेष शासकीय अधिवक्ता श्री. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात सांगितले.

सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन हे युक्तीवाद करतांना म्हणाले की, अत्तर, उदबत्ती आणि गोअर्क वापरल्याने श्री. समीर गायकवाड यांना मनःशांती मिळते. सनातन गोअर्कामुळे त्यांच्या पोटातील विकार नष्ट होतात. यासाठी त्यांना ही उत्पादने देणे आवश्यक आहे.

अधिवक्ता शिवाजीराव राणे आणि कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके म्हणाले की, जपमाळ वगळता सनातनची उत्पादने देता येणार नाहीत. सनातनची उत्पादने सोडून इतर आस्थापनांनी बनवलेले साबण, अत्तर, उदबत्ती देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी केवळ सनातनची उत्पादनेच श्री. समीर गायकवाड यांना हवी आहेत. इतर आस्थापनांच्या वस्तू त्यांनी मागितलेल्या नाहीत. यावर न्यायाधीश श्री. बिले यांनी या तीन उत्पादनांचे प्रयोगशाळेत पृथक्करण करून त्या पडताळून द्याव्यात, असा आदेश दिला.

सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात येईल, असे अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात सांगितले; मात्र हे करण्यापूर्वी पोलिसांनी ८ दिवस अगोदर तसे पत्र न्यायालयात दिले पाहिजे, असे न्यायाधीश श्री. बिले यांनी पोलिसांना सुनावले. या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन म्हणाले, पोलीस सनातनचे साधक आणि संशयित आरोपी श्री. सारंग अकोलकर अन् श्री. विनय पवार यांची मालमत्ता कह्यात घेते. या प्रकरणाचे अन्वेषण कुठपर्यंत आले आहे, याची माहिती समोर येत नाही. यावर अधिवक्ता राणे यांनी पोलिसांनी केलेले अन्वेषण गोपनीय ठेवणार असल्याचे सांगितले. या वेळी न्यायाधीश बिले यांनी कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या खटल्याचा अभ्यास केला आहे का, अशी विचारणा अधिवक्ता शिवाजीराव राणे यांना केली. यावर राणे यांनी अभ्यास केला आहे, असे उत्तर दिले.

कॉ. गोविंद पानसरे यांनी केलेल्या पत्रव्यवहारांच्या
संदर्भातील सर्व कागदपत्रांची मागणी करणार ! – अधिवक्ता पटवर्धन

सनातनचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, यापूर्वी न्यायालयाने अधिवक्ता राणे यांना कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या खटल्याचा अभ्यास करण्यास सांगितला होता. दाऊद याची संपत्ती जप्त केल्याने दाऊद सापडलेला नाही, हे पुन्हा न्यायालयाने अधिवक्ता राणे यांना सांगितले आहे. कॉ. पानसरे कुटुंबियांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या आंदोलनाला विरोध करून त्यांचे मानसिक शोषण केले, असा आरोप केला आहे. याची माहिती पोलिसांनी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. वास्तविक डॉ. तावडे यांनी तसे काही केलेले नाही; मात्र कॉ. पानसरे कुटुंबीय त्या काळात कॉ. गोविंद पानसरे यांचे मानसिक शोषण झाल्याचे मान्य करतात. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट अथवा इतर कोणत्यातरी संघटनेकडून त्यांचे मानसिक शोषण झालेे असल्याने आम्ही त्या काळात कॉ. पानसरे यांनी केलेला पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रे यांची मागणी २८ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात करणार आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात