हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही !

१. सोलापूरमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनात सहभागी १०० हून अधिक धर्माभिमान्यांचा संकल्प !
२. वेळ पडल्यास सनातनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यास धर्मबांधव सिद्ध !
३. धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले !

डावीकडून अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, श्री. मनोज खाडये, पू. महंत मावजीनाथ महाराज, भागवताचार्य वा.ना. उत्पात, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. सुनील घनवट

सोलापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत धर्मरक्षणाचे कार्य करत राहू, असा संकल्प २८ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या एकदिवसीय प्रांतीय हिंदूअधिवेशनात सहभागी धर्माभिमानी हिंदूंनी केला. या अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांतून १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या अधिवेशनात धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले.

 

या वेळी मान्यवर वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन

हिंदु धर्माचे कार्य धैर्याने आणि नेटाने करा !

श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक, सोलापूर

आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मबांधव पुढे येत असतांना आप्तस्वकियांकडूनच विरोध होत आहे. पूर्वी श्रीकृष्ण, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आप्तस्वकियांकडून विरोध झाला. तरीही धर्माचे कार्य करत असल्याने श्रीकृष्ण पाठीशी असणारच आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने २०२३ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. आपण आपले धर्मकर्तव्य म्हणून कार्य धैर्याने आणि नेटाने करा.

हिंदु राष्ट्राची स्थापना हाच सर्व समस्यांवरील उपाय !

हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य असूनही आज हिंदूंवर विविध कायदे लादून त्यांना त्रास दिला जात आहे. पूर्वी काँग्रेसचे शासन होते तेव्हाही त्रास होता आणि आता हिंदूंचे शासन असूनही हिंदूंना निश्‍चिंतपणे श्‍वास घेता येत नाही. आज सनातनच्या साधकांवर विविध आरोप ठेवून त्यांना कारागृहात टाकले जात आहे. शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सनातन संस्था हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत लढत आहे. आज देशात ज्या काही समस्या वाढत आहेत, त्यावर हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच ठोस उपाय आहे.

हिंदूंमध्ये सुसंवाद वाढायला हवा ! पू. महंत मावजीनाथ महाराज, तुळजापूर

आज कुटुंबात, संघटनांमध्ये सुसंवाद वाढायला हवा. हिंदूंनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करून संघटन मजबूत करायला हवे. हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या संकटापासून वाचवले पाहिजे. हिंदु संघटनेचे कार्य जेथे चालू आहे, तेथे सर्व धर्मबांधवांनी एकत्र यायला हवे. हिंदूंचे प्रभावी संघटन झाल्यास सर्व पक्ष आपल्या पाठीशी उभे रहातील. स्वत:ला निधर्मी शासन म्हणवणारे राज्यकर्ते हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी आपापसांतील वाद टाळून सुसंवाद वाढवायला हवा.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वैध मार्गाने संघर्षच करावा लागेल !

श्री. मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंचे प्रभावी संघटन होण्यासाठी आतापर्यंत ५ अखिल भारतीय हिंदु अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून २१ राज्यांतून २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रिपणे कार्य करू लागल्या आहेत. या माध्यमातून धर्माभिमान्यांच्या बैठका, धर्मसभा, अधिवेशनांचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदूंसमोरील समस्या वाढतच चालल्या आहेत. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांच्या छाताडावर उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदूंच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वैध मार्गाने संघर्षच करावा लागेल.

 

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्याचे प्रभावी माध्यम राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! – श्री. राजन बुणगे, सोलापूर जिल्हा समन्वयक,

– श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या सहभागाने राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेतले जाते. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी समाजात जागृती करून प्रशासनास योग्य कृती करण्यास भाग पाडले जाते. या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांवरील अनेक महत्त्वपूर्ण आघात रोखण्यास समिती यशस्वी झाली आहे.

 

सतर्क होऊन हिंदु धर्म परंपरांच्या विरोधातील आघात रोखूया !

श्री. संदीप ढगे, हिंदु धर्माभिमानी

हिंदु धर्मातील रुढी परंपरांना खुळचट समजून विरोध करण्याचे काम तथाकथित पुरोगामी विचाराच्या संस्था आणि प्रसारमाध्यमे करत असतात. आपण सतर्क राहून आपला विषय प्रसार माध्यमापर्यंत पोचवून त्यामागील शास्त्र विशद केल्यास या घटनांची पुनरावृत्ती रोखू शकतो.

 

 

राष्ट्र-धर्म यांचे कार्य करत असतांना धर्माभिमान्यांना येणार्‍या अडचणींवर चर्चासत्र

धर्मद्रोही कृतीच्या विरोधात प्रतिकृती उभारल्यास धर्मद्रोह थांबेल ! – श्री. सुनील घनवट

आज सण, उत्सव साजरे करतांना, तसेच धर्माचे रक्षण करतांना जाणूनबुजून विविध धर्मद्रोही संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून विरोध होत असतो. धर्मपरंपरा पाळण्यात आडकाठी आणली जाते, अशा वेळी कायद्याचा आणि धर्मपरंपरांचा अभ्यास असेल, तर धर्मद्रोही कृतीच्या विरोधात प्रतिकृती उभारून प्रशासनाला जाणीव करून दिल्यास प्रशासन नरमते. यासाठी आपणाला सतर्क राहून सनदशीर मार्गाने अभ्यासपूर्ण लढा द्यावा लागेल.

या वेळी धर्माभिमानी हिंदूंनी कार्यात येणार्‍या अडचणींचे शंकानिरसन करून घेतले. या चर्चासत्राच्या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि भागवताचार्य वा.ना. उत्पात उपस्थित होते.

पंढरपूर येथील धर्मवीर प्रसाद हुलवान यांचा
सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते सत्कार

पंढरपूर येथील शिवछत्रपती हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा बालधर्मवीर प्रसाद हुलवान (वय १४ वर्षे) याने लहान वयात केलेले धर्मकार्य, तसेच संघटनात्मक कार्य याचा गौरव म्हणून त्याचा हिंदु अधिवेशनात सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

गटचर्चेच्या माध्यमातून धर्मावरील आघातांच्या विरोधात धर्माभिमानी कृतीशील !

धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांच्या क्षेत्रवार बैठकीतून धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटित होऊन राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवून समाजप्रबोधन करून शासनकर्त्यांना योग्य कृती करण्यास भाग पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. याविषयी करावयाच्या ठोस कार्याची दिशा यानिमित्ताने ठरवण्यात आली.

धर्मद्रोह्यांच्या आघाताचे खंडण
करण्यासाठी त्यामागीलशास्त्राचा अभ्यास आवश्यक !

– भागवताचार्य वा.ना. उत्पात महाराज, पंढरपूर

आपले ते सर्व वाईट आणि पाश्‍चात्त्यांचे सर्व चांगले या प्रकारच्या मेकॉले शिक्षणपद्धतीने नास्तिकतावाद फोफावला. वेदांवर टीका, संस्कृतवर टीका, पुरुषसूक्त म्हणणे बंद करा, मनुस्मृती जाळा म्हणणार्‍यांनी सर्व शोधांचे मूळ भारतीय संशोधनात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मद्रोह्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रत्येक कृतीमागील शास्त्र आपण अभ्यासून त्यांचा प्रतिवाद केला पाहिजे, जेणेकरून योग्य समाजप्रबोधनातून समाजमनाची शुद्धी होऊन त्यांची राष्ट्र आणि धर्म यांविषयक श्रद्धावृद्धी होणार आहे.

मंदिर व्यवस्थापनाने भाविक भक्तांच्या हितास
प्राधान्य देणे आवश्यक ! – महंत मावजीनाथ महाराज, तुळजापूर

हिंदूंच्या बहुसंख्य मंदिरांचे शासनाने सरकारीकरण केले. परिणामस्वरूप मंदिरास मिळालेल्या भूमी, दागिने, रोख रक्कम यात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे आज समोर आली आहेत. मंदिराने भाविक भक्ताच्या हितास प्राधान्य देणे, भक्तांना भावपूर्ण दर्शन घेता यावे, यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

आत्मबळाच्या प्राप्तीसाठी साधना अनिवार्य !

– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपण सर्वजण हिंदु राष्ट्रं स्थापनेसाठी कार्यरत आहोत. हिंदु राष्ट्र हे आपणाला भेट म्हणून कोणाकडून मिळणार नाही, तर त्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठानानुसार साधना करून आत्मबळ प्राप्त करून संघर्षच करावा लागणार आहे.

साधनेच्या बळाने कार्य सिद्धीस जाते आणि ईश्‍वरी कृपा होते म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन  ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।। हा नामजप करावयास हवा. जीवनात साधनेचे असाधारण महत्त्व आहे. त्यासमवेतच धर्माचरण करणेही आवश्यक आहे. शिष्योत्तम अर्जुनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा भक्त होण्यासाठी आजपासून प्रयत्न करूया आणि ईश्‍वरी कार्यात सर्वस्व अर्पण करूया. या वेळी त्यांनी दैनिक सनातन प्रभातचे वाचक होऊन धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सनातनच्या समर्थनार्थ मान्यवर वक्त्यांनी मांडलेले विचार

सनातनवर बंदी घालण्याचे कोणाचेही धाडस नाही !

हिंदु धर्माचे कार्य हे सतीचे वाण आहे. धर्माचे कार्य करतांना संकटे तर येणारच, सनातन संस्था हिंदु धर्मजागृतीचे कार्य करत असल्यानेच सनातनवर बंदी घालण्याचे षड्यंत्र रचले जात आहे; मात्र सनातनवर बंदी घालण्याचे कोणाचेही धाडस नाही. सनातन ही धर्मप्रेमी संघटना आहे. सनातनच हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करू शकते. सनातनच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी हिंदूंमध्ये आध्यात्मिक बळ आवश्यक !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

सनातनच्या साधकाला अटक केली असता त्याचा खटला चालवण्यासाठी जवळपास हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने ३२ अधिवक्ता पुढे आले, त्यामुळे विरोध करणार्‍या पुरोगाम्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कोल्हापुरात घेतलेल्या हिंदु संघटन मेळाव्यात १५१ हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन सनातनला पाठिंबा दर्शविला. सनातन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत आहे. या कार्यात आपणा सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. यासाठी शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावर सिद्धता करावी लागणार असली, तरी प्रामुख्याने सर्वांनाच आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनाच साधनेचे सामर्थ्य वाढवावे लागणार आहे. सत्ता पालटली; मात्र व्यवस्था पालटली नाही. समस्या अनेक आहेत, एक एक सोडवण्याऐवजी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केल्यास समस्या रहाणार नाहीत यासाठी प्राधान्य हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेनेच असावा. धर्मकार्य करत असतांना सामाजिक समस्या सोडवण्यासाठीही नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न करूया.

हिंदु विधीज्ञ परिषद सनातनच्या सदैव पाठीशी !
– अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, सदस्य हिंदु विधीज्ञ परिषद

दाभोलकर कुटुंबियांनी केलेले अपप्रकार समोर येऊ नयेत, ते झाकले जावेत, यासाठी सनातनला कसे अडकवता येईल, असाच पुरोगाम्यांचा प्रयत्न अधिक दिसतो. कोठेही खरे मारेकरी सापडावे, असे त्यांना वाटत नाही, असे दिसते. त्यामुळेच सनातनच्या साधकाला अटक केल्यानंतर साधकाला जामीन मिळू नये, त्याचसमवेत खटलाही चालवला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हिंदु विधीज्ञ परिषद सनातनच्या पाठीशी आहे, हे त्यांनी विसरू नये.

सनातन संस्थेवर बंदी म्हणजे एका मातेला मुलावर संस्कार करण्यास बंधन आणल्यासारखे !
– श्री. गंगाधर गवसणे, सदस्य आजोबा गणपति मंदिर, सोलापूर

सनातनशी माझा संपर्क १० वर्षांपासून असून जसे आई आपल्या मुलाला घडवते तसे सनातन संस्था भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंना घडवत आहे. २०२३ ला हिंदु राष्ट्र येणार असले, तरी यासाठी आपल्यासमोर सनातन संस्थाच मार्गदर्शक म्हणून असेल. सनातनवर बंदी घालणे म्हणजे एका मातेने मुलावर संस्कार घडवण्यावर बंधने आणल्यासारखे होईल.
सनातनच्या समर्थनार्थ या वेळी सावरकर विचार मंचचे श्री. शेखर पाटील यांसह बापू ढगे यांनी विचार मांडले.

सनातनच्या पाठीशी ठामपणे उभ्या असणार्‍या संघटनांची सनातन संस्था आभारी आहे !
– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सनातन संस्था हिंदूंना जागृत करून धर्मासाठी संघटित करत आहे. सनातनचे कार्य वाढू नये; म्हणून सनातनवर बंदीची मागणी केली जात आहे. अत्यंत प्रतिकूल काळातही सर्वत्र सनातनवर बंदीची मागणी होत असतांना बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. त्याविषयी सनातन संस्था सर्वांची आभारी आहे. सर्वांनी एकत्र येऊन श्रीकृष्णाला अभिप्रेत असे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात