श्री गणेश जयंती

‘श्री गणेश जयंती’निमित्त आपण श्री गणेशाच्या गणपति, महागणपति या नावांचा अर्थ, तसेच प्रथम पूज्य, दिशांचा स्वामी, प्राणशक्ती वाढवणारा, विघ्नहर्ता अशा अनेक वैशिष्ट्यांच्या मागे कोणती कार्यरत शक्ती आहे आणि त्याच्या कार्याचे स्वरूप कोणते, श्री गणेशाचे विविध अवतार अन् श्री गणेशाशी संबंधित तिथी कोणत्या हे विस्तृतपणे पहाणार आहोत. ‘गणेशाच्या रूपांची शक्ती गणेशभक्तांना लाभावी’, हीच श्री गणेश जयंतीनिमित्त प्रार्थना !

 

इतिहास

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला.

माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. एका साधकाला आलेल्या पुढील अनुभूतीवरून या तिथीला गणेशतत्त्व जागृत कसे असते, हे लक्षात येईल.

 

अनुभूती

‘श्री गणेश जयंती’ आहे, हे ठाऊक नसतांना नामजपाच्या वेळी आपोआप श्री गणेशाचा नामजप चालू होणे : ‘१२.०२.२००५ या दिवशी श्री गणेश जयंती होती; पण मला ते ठाऊक नव्हते. सकाळी ७.३०- ८.०० या वेळेत मी माझा नेहमीचा वैयक्तिक नामजप करत असतांना माझा आपोआप श्री गणपतीचा नामजप चालू झाला. ते लक्षात आल्यानंतर मी माझा वैयक्तिक नामजप चालू केला, तरीही पुन्हा श्री गणपतीचाच नामजप चालू झाला; म्हणून मी गणपतीचाच नामजप चालू ठेवला. नामजप पूर्ण झाल्यानंतर ‘श्री गणेश जयंती असल्याकारणाने नामजपाच्या वेळेत श्री गणपतीचा नामजप करायचा आहे’, असे मला कळले. ‘नामजपाच्या वेळेत माझा श्री गणपतीचाच नामजप का होत होता’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले आणि गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. कौस्तुभ येळेगांवकर

 

महत्त्व

गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति (भाग १)’

 

१. श्री गणेशाच्या काही नावांचा अर्थ

१ अ. गणपति

‘विविध शक्तींचे गण कार्यरत असतात, उदा. राक्षसांचे राक्षसगण आणि देवतांचे देवगण, शिवाचे शिवगण आणि विष्णूचे विष्णुगण इत्यादी असतात. गणपति हा देवगणांचा स्वामी आणि गणाध्यक्ष आहे. तो देवगणांचा अधिपति असल्यामुळे त्याला ‘गणपति’ हे नाव प्राप्त झाले आहे.

१ आ. महागणपति

गणपति जेव्हा त्याच्या सर्वशक्तीनिशी कार्यरत असतो, तेव्हा तो विराट किंवा महा रूप धारण करतो. म्हणूनच ऋद्धि आणि सिद्धि या शक्तींसमवेत असणार्‍या गणपतीला ‘महागणपती’ म्हणतात.

 

२. श्री गणेशाचे ब्रह्मांडव्यापी रूप !

श्री गणेश जेव्हा ब्रह्मांडाला व्यापतो, तेव्हा महर्लोक ते सत्यलोक हे उच्चलोक त्याचे मस्तक बनतात. सूर्य आणि चंद्र हे दोन्ही त्याचे नेत्र असतात. अष्टदिशा त्याचे वस्त्र असतात. पृथ्वी त्याचे उदर असते अन् सप्तपाताळ त्याचे चरण असतात.

 

३. श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् कार्याचे स्वरूप

 

४. श्री गणेशाचे विविध अवतार

 

५. श्री गणेशाची विविध रूपे, त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्यरत शक्ती

टीप – तांत्रिक उपासनेत श्री गणेशाची संबंधित शक्ती. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गणपति – भाग १’)

 

६. श्री गणेशाशी संबंधित तिथी

शुक्ल आणि कृष्ण पक्षांतील चतुर्थी

६ अ. संकष्टी आणि विनायकी

६ आ. अंगारकी

मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. गणपतीचा संबंध ‘अंगारक’, म्हणजे अग्नीच्या रूपाशी असून तो मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला अग्नीच्या स्तरावर, म्हणजे तेजतत्त्वाच्या स्तरावरही कार्यरत असतो. या दिवशी वार आणि तिथी हे दोन्ही घटक श्रीगणेशतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे, यादिवशी श्रीगणेशाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात, म्हणजे १० टक्के कार्यरत असते. वर्षातून २ वेळा अंगारकी येते. अंगारकीला ६ संकष्टी किंवा ६ विनायकी यांचे एकत्रित फळ मिळते. उपासकाला श्रीगणेशाचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता यावे, यासाठी ते संकष्टी, विनायकी आणि अंगारिका या दिवशी उपवास करतात.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०१८, रात्री १०.३३)

 

७. श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ आणि तेथून प्रक्षेपित होणारी शक्ती

८. श्री गणेशाच्या उपासनेच्या कृती, सूक्ष्मातील कार्य,
परिणाम आणि कार्यरत होणार्‍या गणेशतत्त्वाचे प्रमाण

(फुले आणि पत्री वाहण्याचा क्रम : आधी फुले वाहवीत, त्यानंतर पुढील क्रमाने दिलेल्या झाडांची पाने (पत्री) वाहवीत – मालती, भृंगराज, बेल, पांढर्‍या दूर्वा, बदरी, धोतरा, तुळस, आघाडा, शमी, केतकी, करवीर, अश्मंतक, रुई, अर्जुन, विष्णुक्रांत, डाळिंब, देवदारु, मरुबक, सिंदुवार, जाती, अगस्तिपत्र – वेदमूर्ती केतन शहाणे)

टीप – पंचखाद्य : खोबरे, खारीक, खडीसाखर, काजू किंवा मनुके आणि फुटाणे

 

९. श्री गणेशाशी संबंधित विविध घटक

९ अ. लोक : श्री गणेशलोक

९ आ. श्री गणेशाची शक्ती : भक्तीमार्गानुसार ऋद्धि आणि सिद्धि, तर तांत्रिक मार्गानुसार गणेश्‍वरी, अर्धगणेश्‍वरी अन् गणेशानी

९ इ. पंचमहाभूत : प्रामुख्याने पृथ्वीतत्त्वाशी संबंधित

९ ई. कुंडलिनीतील सप्तचक्र : मूलाधारचक्र

९ उ. सूक्ष्म रंग : गणेशतत्त्वाचा रंग लाल आहे. लाल रंगाच्या वस्तूकडे गणेशतत्त्व लवकर आकृष्ट होते. यासाठी गणेशपूजनात लाल फुले, रक्तचंदन, कुंकुममिश्रित लाल रंगाच्या लक्षता, लाल वस्त्रे इत्यादींचा वापर केला जातो.

९ ऊ. सुगंध : श्री गणेशाच्या तारक उपासनेसाठी चंदन, केवडा, चमेली आणि वाळा अन् त्याच्या मारक उपासनेसाठी हिना हे गंध पूरक आहेत.

९ ए. पूजासाहित्य : हळदीमध्ये भूमी आणि गणेश ही दोन्ही तत्त्वे असतात. रक्तचंदनाकडे गणेशतत्त्व आकृष्ट होते.

९ ऐ. प्रिय पुष्पे, पत्री आणि वृक्ष : जास्वंद हे फूल आणि मंदार अन् शमी या वृक्षांची पाने

९ ओ. नदी : पवित्र असणार्‍या सप्तनद्यांपैकी सरस्वति नदीमध्ये गणेशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत आहे.

९ औ. प्रदक्षिणांची संख्या : गणपतीला आठ प्रदक्षिणा घालाव्यात; कारण त्याचा संबंध अष्टदिशांशी आहे.

९ अं. रत्न आणि धातू : माणिक हे रत्न आणि तांबे हा धातू यांमध्ये श्री गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.

९ क. वार : मंगळवार

९ ख. नैवेद्य : मोदक

९ ग. शस्त्र किंवा आयुध : पाश आणि अंकुश

९ घ. वाद्य : गणपति संगीतात पारंगत आहे. त्याला मृदुंग, बासरी आणि वीणा ही वाद्ये प्रिय आहेत.

९ च. तीर्थक्षेत्रे, शक्तीपीठ किंवा जागृत देवस्थान : अष्टविनायक, गणपतीची २१ स्थाने आणि गणपतीची शक्तीपीठे

९ छ. गणेश – उपासक ऋषि, भक्त आणि कलियुगातील संत

९ छ १. ऋषि : भृशुंडीऋषि, गणकऋषि, पराशरऋषि आणि महर्षि व्यास

९ छ २. भक्त राजे : राजा धर्मसेन आणि राजा वरेण्य

९ छ ३. संत : मोरया गोसावी हे कलियुगातील गणपतीची उपासना करणारे महाराष्ट्रातील थोर संत होते.

९ ज. ग्रंथ : गणेशपुराण, मुद्गलपुराण

९ झ. स्तोत्र किंवा कवच : श्री गणपतिस्तोत्र, श्री अष्टविनायक, श्रीनारदकृत संकटनाशन-स्तोत्र, संकटनाशन-स्तोत्र, श्री गणेशवरदस्तोत्र इत्यादी.

९ ट. आरती : त्या त्या भाषांतील प्रसिद्ध आहेत.

९ ठ. यज्ञ : गणेशयाग, गणहोम आणि उच्छिष्ट गणपतियाग

९ ड. व्रत : सत्यविनायक व्रत

९ ढ. सण : श्री गणेशचतुर्थी

९ ण. उत्सव : गणेशोत्सव

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०१८, रात्री १०.३३)

 

गँ गणपतये नमः । या बीजमंत्रातील गँचा उच्चार करण्याची पद्धत

गं गणपतये नमः । हा बीजमंत्र गँ गणपतये नमः । असाही लिहितात. यातील  गवरील अर्धचंद्र हे अनुनासिकाचे चिन्ह आहे. त्यामुळे गँ याचा उच्चार गॅम् असा नसून गङ् असा आहे. संस्कृत उच्चारशास्त्रानुसार गम् गणपतये नमः । यापेक्षा गङ् गणपतये नमः । असे म्हणणे अधिक योग्य आहे.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०१८)

 

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित होणारे साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती’, यांचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा !

‘आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला ‘योग्य कि अयोग्य ?’, असे म्हणता येत नाही. ‘ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?’, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात (उदा. उच्च लोक, पंचमहाभूते यांच्याविषयीच्या अनुभूतींच्या संदर्भात) धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर ‘अयोग्य काय ?’, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.’ – संपादक, सनातन प्रभात

 

एके काळी विश्‍वात हिंदु संस्कृतीचाच प्रभाव असणे

‘गणेशभक्ती करणारे भृशुंडीऋषि, गणकऋषि, पराशरऋषि आदी अनेक ऋषिमुनी या पवित्र भारतभूमीत होऊन गेले. या थोर ऋषिमुनींचे आदर्श जीवनचरित्र आणि उज्ज्वल वाङ्मय संपूर्ण जगताचे चिरंतन प्रेरणास्थान आहे. प्र्राचीन काळापासून जगातील अनेक देशांनी भारतातील आर्यांच्या श्रेष्ठतम हिंदु धर्माचे अनुसरण केले आहे. एके काळी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव होता. याचे अनेक ठोस पुरावे आजही उपलब्ध आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ श्री गणपति

 

जपानवर अजूनही टिकून असलेला हिंदु संंस्कृतीचा प्रभाव !

‘जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या हिंदु देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणार्‍या शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते. ११ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिर’ हे येथील सर्वांत प्राचीन मंदिर आहे.

अ. इ.स. पूर्व ८०६ मध्ये ‘कोबोदेशी’ या जपानी संतांनी चीनचा प्रवास करून जपानमध्ये मंत्रायाना या पंथाचे ग्रंथ, विविध मूर्ती, तसेच धार्मिक ग्रंथ आणले होते. याच संतांनी जपानमध्ये हिंदु देवतांच्या प्रार्थना आणि पूजा करण्यास आरंभ केला.

आ. जर्मनीचा विचारवंत फिलीफ फ्रांझ व्हान शिबोल्ड याने वर्ष १८३२ मध्ये टोकियोत श्री सरस्वतीदेवीची १३१ मंदिरे आणि श्री गणेशाची १०० मंदिरे मोजून त्यांची संख्या नमूद केली होती.

इ. डॉ. चंद्रा यांच्या मते मंत्रांवर आधारित पूजेअर्चेसाठी बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये ‘मंत्रायाना’ नावाचा एक पंथ आहे आणि जपानी लोक होमाप्रमाणे ‘गोमा’ या नावाने आजही हा यज्ञविधी करतात. त्यासाठी ऑस्ट्रेलिया येथून मुद्दाम तूप मागवण्यात येते.

ई. जपानच्या कुसा या भागातील १२ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिरा’ला राष्ट्रीय संपत्ती मानले जाते.

उ. जपानचे सांस्कृतिक सल्लागार शिगेयुकी शिमानोरी यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘‘हिंदु देवतांच्या अभ्यासासाठी बुद्धीवंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जपान करत आहे.’’

संकलक : श्रीकृष्णाचा अंश असलेली, कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०१५)

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, ८.७.२००७