इये मराठीचिये नगरी !

‘संस्कृतनंतर मराठीसारखी समृद्ध, संपन्न आणि सात्त्विक भाषा नाही. तथापि आज मराठी जनांना स्वत:च्या भाषेचाच विसर पडत चालला आहे. ‘सर्व आहे तुजपाशी…’ असे असूनही आपण विनाकारण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहोत. खरे तर प्रत्येकात मराठी भाषेचा अभिमान रूजणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. मराठी भाषेचे वैभव जाणून घेतल्यास तिचे महत्त्व अपोआपच अधोरेखित होईल. त्यासाठीच हा लेखप्रपंच आहे. प्रस्तुत लेखात आरंभी मातृभाषा आणि मराठी यांविषयी थोडे तात्त्विक विवेचन करणे अपरिहार्य आहे; कारण त्यामुळेच माय मराठीचे वैभव स्पष्ट होऊ शकेल. सदर लेख आपण जसजसा वाचत जाऊ, तसतसे ‘आपण खोल आणि विस्तृत, सूक्ष्म-सूक्ष्म होत जात आहोत’, असा अनुभव आपणास येईल. मर्यादित जागेत मराठी भाषेचे संपूर्ण वैभव अनावृत्त करणे अवघड आहे; कारण उल्लेखिलेल्या प्रत्येक विषयावर स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल. तथापि या लेखात अतीसंक्षिप्त स्वरूपातच सगळे कथन करणे भाग आहे. हा लेख वाचून आपण सर्वांनी मराठी भाषेचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी प्रयत्नरत व्हावे, ही अपेक्षा !

१. नादब्रह्मातून भाषेची उत्पत्ती !

कोणतीही भाषा पहा. तिच्यात अक्षरे असतात. त्यांचे उच्चार असतात. आता हे सगळे कसे निर्माण झाले ? कोणत्याही निर्मितीसाठी किमान २ गोष्टींची आवश्यकता असतेच. भारतीय तत्त्वज्ञानानुसार ही २ तत्त्वे म्हणजे प्राण आणि आकाश ! ब्रह्म-माया, प्रकृति-पुरुष, शिव-शक्ति आदी नावेही याच २ तत्त्वांची आहेत. ही दोन्ही तत्त्वे कार्यरत होऊन प्रथम ध्वनी (नाद) उत्पन्न झाला. हेच नादब्रह्म ! त्याचे सगुण रूप म्हणजेच ॐकार ! या नादब्रह्मातून अक्षरे आली. ते अक्षरब्रह्म ! त्यांतून शब्द आले ते शब्दब्रह्म ! या सगळ्यांचीच शास्त्रशुद्ध अशी मांडणी म्हणजेच ‘भाषा’ !

अक्षरसमूह म्हणजे आपली वर्णमाला. ही मूळ वर्णमाला आपण बहुतेक सर्व भाषांसाठी थोड्या-फार अंतराने संस्कृतमधूनच स्वीकारली आहे.

२. ‘मराठी’च्या मूळ वर्णमालेत जपमाळेतील १०८ मण्यांच्या संख्येचे गणित !

अ आ इ ई उ ऊ ऋ ऋृ लृ ल ॄए ऐ ओ औ अं अः, क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श ष स ह ळ (क्ष) हे ५० वर्ण झाले. यांत १६ स्वर आणि ३४ व्यंजने असतात. हेच वर्ण विलोम क्रमाने, म्हणजे ळ पासून अ पर्यंत घेतले की, १०० अक्षरे होतात. त्यांत अ क च ट त प य श, हे ८ वर्ण मिळवले की, ही संख्या १०८ होते. जपमाळेचे मूळ ते हेच ! असो.

३. वर्ण आणि वर्णध्वनी !

या वर्णांचे परत वर्गीकरण केले गेले. त्यास ‘वर्ग’ म्हटले गेले. उदा. ‘क’ वर्ग (क ख ग घ ङ), ‘प’ वर्ग (प फ ब भ म), ‘च’ वर्ग (च छ ज झ ञ.) या वर्णमालेत ‘क्ष’ हा मेरुमणी (सुमेरू) मानला गेला आहे. (मेरुमण्यावर जप करत नाहीत.) वर्णध्वनींच्या प्रकट रूपाला ‘मातृका’ म्हटले गेले. या वर्णांमध्ये परत बाराखड्या आल्या. उदा. क, का, कि, की; भ, भा, भि, भी इत्यादी. याप्रमाणे आपण सर्व वर्णांच्या बाराखड्या पाहू शकतो. यांत आपले विद्वतजन अनुस्वार, १ मात्रा, २ मात्रा, विसर्ग, उकार, वेलांट्या, रफार, पोटफोडी अक्षरे आदी भर टाकत गेले.

४. ज्ञानाचा सागर असलेल्या माय मराठीचे श्रेष्ठत्व !

आता या सगळ्याचे निरीक्षण करून किती अक्षरे होतील ? केवळ कल्पना करून पहावी. भारताबाहेरच्या कोणत्याही भाषेत इतके विस्तृत काहीही नाही. उदा. इंग्रजीत (A to Z) केवळ २६ अक्षरे ! त्यांतच सगळे व्यवहार ! त्यात संपन्नता अन् सौंदर्य कोठे आहे, हे दुर्बिणीतून शोधावे लागेल. आता मराठीचा उपयोग आपण कसा करतो ? वर्णध्वनींतून अक्षरे, त्यांतून शब्द, त्याद्वारे ज्ञान आणि ज्ञानांतून परिपूर्णतेचा प्रयत्न ! हे ज्ञानही आपल्या विद्वानांनी, संत-महात्म्यांनी कसे सजवले-नटवले आहे, ते पाहूया.

५. मराठीला लयबद्धता आणि गेयता (गानक्षमता) प्रदान करणारे घटक !

आपल्या बोलण्यात लयबद्धता यावी, गोडवा यावा, सौंदर्य यावे, ताल असावा, यांसाठी नियम सांगितले गेले. व्याकरणाची निर्मिती होऊन सुसूत्रता आणली. मराठी म्हणजे ज्ञानाचा सागर ठरली, ती यामुळेच ! संस्कृत नंतरची संपन्न अन् सुंदर भाषा म्हणजे मराठीच !

या ताला-सुरांना, लयबद्धतेला दिले गेलेले नांव म्हणजे ‘वृत्त’ ! वृत्त म्हणजे सौंदर्याची लेणीच ! उदा. आर्या, शार्दूलविक्रीडित, मंदाक्रांता, मालिनी, शिखरिणी, इंद्रवज्रा इत्यादी. या वृत्तांमध्ये ३-३ अक्षरांचे समूह करून त्यास ‘गण’ असे नाव दिले. अक्षरांमध्ये लघु-गुरु असे प्रकार करून त्यांच्या विशिष्ट क्रमाला ‘गण’ म्हटले आहे. उदा. ‘त’ गण, ‘न’ गण, ‘य’ गण, ‘म’ गण इत्यादी. त्यामुळे लय कोठेही विस्कळीत होण्याची शक्यताच उरली नाही. इतकी अचूकता आली. उदाहरणांसाठी ‘वृत्तदर्पण’ वा तत्सम पुस्तके पहावीत. भाषेला गेयता (गानक्षमता) प्रदान करणारा आणखी एक घटक म्हणजे ‘छंद’ ! उदा. त्रिष्टुप, अनुष्टुप, गायत्री, पंक्ति इत्यादी. एकच उदाहरण पहा. अनुष्टुप छंदांमधील ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ !

६. अलंकारांचे सौंदर्य !

प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकार वापरले जात आहेत. मराठीलासुद्धा सजवले अन् खुलवले ते अलंकारांनी ! हे अलंकार म्हणजे अनुप्रास, श्‍लेष, व्याजोक्ति, वक्त्रोक्ति, उपमा, उत्प्रेक्षा, यमक इत्यादी. वर्णांमध्येही सूक्ष्म निरीक्षणे करून आपल्या आचार्यांनी वर्णांचेदेखील प्रकार (उदा. तालव्य, दंतव्य, ओष्ठव्य, कंठव्य, मूर्धन्य) प्रतिपादित केले आहेत. त्या त्या वर्णाचा ध्वनी, टाळ्याला (उदा. ट ठ ड ढ ण) स्पर्श करणारा, दातांना (उदा. त थ द ध न) स्पर्श करणारा, ओठांच्या (उदा. प फ ब भ म) स्पर्शाने, घशांतून (उदा. क ख ग घ ञ) नाद निर्माण करणारा आदी.

अलंकारांमुळे मराठीला लावण्य मिळाले, हे आपण बघितलेच ! ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्‍वरीत उपमा-उत्प्रेक्षा हे अलंकार अक्षरशः नर्तन करतात. यावर कळस म्हणजे या ज्ञानियांच्या राजाने मराठीला सलगी दिली.

७. अमृतदायिनी मराठी !

आविष्कारांतून ज्ञान देता येते, हे सिद्ध करून दाखवले. ‘अमृताशी पैजा’ जिंकण्याचे सामर्थ्य मराठीत आहे. मूठभर विद्वानांच्या चिंतनाचे विषय बालकभावाने, हळुवारपणे, जनसामान्यांसाठी मराठीत प्रकट केले त्यांनी ! ज्ञानाचा इतका ‘सुकाळु’ केला की, ‘त्याचा वेलु गगनी’ भिडला. भागवत धर्म, वारकरी संप्रदाय ही त्याचीच दृश्य रूपे ! ज्ञान मूलतः निर्गुण-निराकारच ! त्याला विठुरायाचे-पांडुरंगाचे सगुण अधिष्ठान उत्कट भावपूर्णतेने देऊन संपूर्ण समाज एकसंध करून टाकला. पाश्‍चात्त्य संस्कृतीत असे कुठे दिसते का ? मग हे आपलेच वैभव आपण कधी उपभोगणार आहोत ? आपण आरंभ जरी केला ना, तरी ‘अतिंद्रिय ! परि भोगवीन इंद्रियांकरवी’, या संत ज्ञानेश्‍वरांच्या प्रतिज्ञेचा आपण स्वतःमध्येच अनुभव घेऊ लागतो.

८. समासामुळे मराठीचे सौंदर्य आणखी बहरते !

मराठीची आणखी वैशिष्ट्ये पाहू. एखाद्या गोष्टीची फोड करून सांगितली की, ती सोपी होते. भाषेत याला ‘समास’ नाव दिले गेले. समासांची काही नावे पहा – द्वंद्व, तत्पुरुष, बहुव्रीही, मध्यम-पद-लोपी इत्यादी. आता फोड कशी होते पहा.

१. कृष्णार्जुन = कृष्ण आणि अर्जुन

२. महाबळेश्‍वर = महाबळीचा ईश्‍वर इत्यादी

एखाद्या शब्दाची फोड एकापेक्षा अधिक प्रकारे होऊ शकतेे.

उदा. पुष्पनेत्रा : अ. फुलाप्रमाणे सुंदर डोळे आहेत जिचे ती !

आ. फूल आहे डोळ्यांत जिच्या ती !

याप्रमाणे अनेक घटकांनी मराठी संपन्न झाली. बोलतांना जी वाक्ये वापरली जातात, त्यांच्या प्रकारांना, कर्तरी, कर्मणि अणि भावे प्रयोग, अशी त्या त्या प्रकारांनुसार नावे आहेत. सर्वच वाक्यांमध्ये उच्चारित आणि अनुच्चारित अनुस्वारांचे नियमसुद्धा बसवले गेले. आजच्या युवा पिढीला, तर हे ऐकिवातही नसावे. तसेच वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते इत्यादींचीही भर पडली. लिखाण जलद व्हावे म्हणून ‘मोडी’ लिपी उदयाला आली.

९. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेची संपन्नता !

आता इतर भाषांची तुलना मराठीशी केली, तर काय दिसते ते पाहू ! प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. उदा. १. उर्दू : शेर-शायरी, कवाली, गझल इत्यादी. २. जपानी : हायकू ३. इंग्रजी : सॉनेट. याचेच पु.ल. देशपांडे यांनी पुढे ‘सनीत’ असे नामकरण करून हा प्रकार मराठीत आणला. तसेच ‘र्‍हीदम’ ‘डेथ-र्‍हीदम्’ असाही एक प्रकार आहे. त्याला कायद्याने बंदी आहे; कारण हा र्‍हीदम् सादर होत असतांना गायक, वादक, साथीदार इ. पैकी एकाचा मृत्यू होतोच ! आता मराठीकडे पहा. कितीतरी वैशिष्ट्ये दिसतात. ओव्या, ऋचा, श्‍लोक, अभंग, ठुमरी, भावगीत, भक्तीगीत, वात्रटिका, चारोळ्या, लावणी, पोवाडा, अंगाई गीत, जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, पाळणा, येळकोट, अष्टक, स्तवन इत्यादी पुष्कळ मोठी सूची होईल. तथापि या संक्षिप्त तुलनेवरून कोणती भाषा श्रेष्ठ वाटते, ते आपणच ठरवावे.

१०. आजच्या पिढीकडून मराठी भाषेच्या अंत्यसंस्काराची सिद्धता !

आजच्या पिढीची मराठी पहा !

१. ए, तू जरा जल्दीच निघून ये बर्का ! मी तुझ्यासाठी वेट (wait) करीन !

२. माझ्या टीचर्सनी चांगलं टीच केलं; म्हणूनच मी हे सक्सेस गेन (gain) करू शकलो !

कसे वाटते ऐकायला ? अहो, हे मराठी बोलणे आहे की, मराठीच्या अंत्यसंस्काराची सिद्धता ? असो.

११. मराठी भाषेचे वैभव टिकवण्यासाठी प्रयत्न आवश्यक !

शेवटी इतकेच की, वैभव प्राप्त करायला स्वतःची सिद्धता हवी. संगणकावरील एका ‘क्लिक’ने तेे मिळणार नाही. आपण प्रयत्नाने ते मिळवूया. ‘मराठाचि कौतुके’ शिकून ‘अमृताशीही पैजा’ जिंकूया. मग आपल्याला समजेल की, आपण न्यूनगंडाने स्वतःला तळ्यातले कुरूप आणि वेडे बदक समजत होतो. प्रत्यक्षात आपण ‘राजहंस’ आहोत.’

– श्री. अनिल गोविंद बोकील, शक्ती-उपासक, पुणे. (५.१.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात