लोकहो, प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्था कोणतेही मूल्य आकारत नाही, हे लक्षात घ्या आणि अपप्रचारांपासून सावध रहा !

सद्गुरु (कु.) स्वाती      खाडये

नुकतेच एका गावात एका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एका सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेलाही प्रवचन घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी प्रवचन घेण्यासाठी येण्याजाण्याचा व्ययही साधकांनीच केला होता. या प्रवचनाला उपस्थित असणारी एक महिला सनातन संस्थेच्या वतीने अन्य एका शहरात घेण्यात आलेल्या एका प्रवचनासाठीही उपस्थित होत्या. त्या वेळी प्रवचन झाल्यावर या महिलेने स्वतःच्या एका नातेवाइकास सनातन संस्थेच्या लोकांनी आमच्या गावात झालेल्या कार्यक्रमासाठी २० सहस्र रुपये घेतले, असे सांगितले. प्रत्यक्षात सनातन संस्थेच्या साधकांनी तेथील प्रवचनासाठी असे कोणतेही मूल्य घेतले नव्हते आणि येण्याजाण्याचा व्ययही साधकांनीच केला होता.

या संदर्भात सनातन संस्थेच्या साधकांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असता, त्या मंडळातील कार्यकर्त्यांनी आमच्याकडे प्रवचन घेण्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते आले होते, त्यांचा येण्याजाण्याचा व्यय, सभागृह भाडे, तसेच अन्य कारणांसाठी १५ ते २० सहस्र रुपये व्यय झाले. याविषयी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत चर्चा केली होती. यात तुमचा (सनातनचा) काही संबंध नाही, असे स्पष्ट केले.

लोकहो, सनातनच्या वतीने सर्व प्रकारची प्रवचने ही विनामूल्यच घेण्यात येतात. सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी संस्था असून केवळ प्रवचनच नव्हे, तर संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या कोणत्याही उपक्रमासाठी पैसे घेण्यात येत नाहीत, तसेच अन्य कोणत्याही कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक उपस्थित असल्यास तेथेही कोणी पैसे घेत नाही; मात्र ऐकीव माहितीवरून, तसेच वस्तूस्थिती समजून न घेता सनातन संस्था प्रवचनासाठी पैसे घेते, असा गैरसमज पसरवण्यात येत असल्यास तो अयोग्य असल्याचे जनतेने लक्षात घ्यावे, तसेच अशा कोणत्याही अपप्रचारास बळी पडू नये.

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात